ओझोन महत्त्वाचा का आहे? वातावरणाला पडलेली भगदाडं बंद होण्याची चिन्हं

फोटो स्रोत, NASA
- Author, फेलन चॅटर्जी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Author, संकलन - जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तुमच्या अंगावरचा कपडा कुठे उसवला किंवा फाटला, तर तुम्ही काय करता? तो शिवण्यासाठी टाके घालता, ठिगळ लावता किंवा फारच फाटला तर शेवटी वापरणं थांबवता. आता असंच पृथ्वीचं वातावरण कुठे फाटलं तर, ते शिवता येईल?
ही काही कल्पना नाहीये, तर असं काहीसं खरंच घडलं आहे. कपडे आपलं ऊन आणि थंडीपासून रक्षण करतात, काहीसं तसंच पृथ्वीभोवतीचं ओझोनचं आवरण या ग्रहाचं संरक्षण करतं.
या आवरणात पडलेलं भगदाड बुजवण्यात माणसाला मोठं यश मिळत असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या एका ताज्या अहवालातून स्पष्ट झालंय.
ओझोनचं आवरण नष्ट करणाऱ्या घातक रसायनांवर बंदी घालण्याच्या जगभरातील देशांच्या निर्णयाचं हे फळ असल्याचं या तपासणीत समोर आलं आहे. ही अशक्य गोष्ट कशी शक्य झाली?
पृथ्वीचं रक्षण करणारं कवच
ऑक्सिजनचे तीन अणू एकत्र आले, की ओझोन वायूचा अणू तयार होतो.
पृथ्वीच्या वातावरणात या ओझोनचा तुलनेनं पातळसर असा थर आहे. हा थर सूर्याकडून येणारी घातक अतीनील किरणे म्हणजे (अल्ट्रा व्हॉयलेट किंवा UV रेज) परावर्तीत करतो.
ओझोनचं आवरण विरळ झालं तर हे अतीनील किरण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकतात आणि मानवासह अन्य सजीवांना हानी पोहोचवतात.
अतीनील किरण डीएनएला इजा पोहोचवतात तसंच त्यामुळे सनबर्न (त्वचेचा क्षोभ) होऊ शकतो आणि त्वचेच्या कॅन्सरसारख्या समस्यांची शक्यता वाढते.
थोडक्यात, माणसाच्या अस्तित्वासाठीच नाही, तर पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी ओझोनचं आवरण कवचासारखं काम करतं. पण 1970 च्या दशकात हे आवरण विरळ व्हायला सुरूवात झाली.

फोटो स्रोत, RAPEEPONG PUTTAKUMWONG
स्प्रे कॅन्स, फ्रिज, एअर कंडिशनर्स आणि घरं गरम राखणारं फोम इन्सुलेशन अशा गोष्टींमध्ये असलेल्या क्लोरोफ्लुरोकार्बन्स अर्थात सीएफसीमुळे ओझोनचं आवरण नष्ट होत असल्याच तेव्हा समोर आलं होतं.
1985 साली या आवरणात मोठं भगदाड पडलं असल्याचं वैज्ञानिकांना दिसून आलं.
मॉन्ट्रियल प्रोटोकॉल
1980 नंतर ओझोनचं आवरण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात फाटत गेलं.
अंटार्क्टिकावर म्हणजे दक्षिण ध्रुवाजवळ या छिद्राचा आकार सगळ्यांत मोठा आहे.
ओझोन आवरणाला पडलेल्या छिद्राचा शोध लागल्यावर सगळे खडबडून जागे झाले.

फोटो स्रोत, Getty Images
दोनच वर्षांनी जगभरातील 46 देशांनी एकत्र येऊन मॉन्ट्रियल प्रोटोकॉल या करारावर सह्या केल्या आणि सीएफसींचा वापर हळूहळू बंद करण्याचं वचन दिलं.
1992 साली भारतानंही या करारावर स्वाक्षरी केली.
पुढे जाऊन 198 देशांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलला मान्यता दिली आणि हा करार संयुक्त राष्ट्रांचा वैश्विक मान्यता मिळालेला पहिला ठराव बनला.
आता संयुक्त राष्ट्रे, यूएस आणि युरोपियन युनियनशी निगडीस संस्थांनी जाहीर केलं आहे की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल अपेक्षेप्रमाणेच यशस्वी ठरला आहे.
या करारातली धोरणं अशीच कायम ठेवली तर ओझोनच्या आवरणातलं भगदाड बुजेल म्हणजे 1980 सारखं पूर्ववत होईल, असं संयुक्त राष्ट्रांचा ताजा अहवाल सांगतो.

ओझोन आवरणातली छिद्रं साधारण कधीपर्यंत बुजतील, याविषयीचा अंदाजही या अहवालात मांडण्यात आलाय.
कधीपर्यंत बुजेल हे भगदाड?
- अंटार्क्टिकावरचं म्हणजे दक्षिण ध्रुवीय प्रदेशातलं ओझोन आवरणातलं भगदाड 2066 सालापर्यंत भरून निघेल.
- आर्क्टिक परिसरातलं म्हणजे उत्तर ध्रुवीय प्रदेशातलं ओझोनमधलं भगदाड 2045 सालापर्यंत भरून निघेल.
- इतर ठिकाणी असलेली लहान भगदाडं पुढच्या दोन दशकांत भरून निघतील.
पण ही प्रगती अशीच सुरू राहायची असेल, तर आपले प्रयत्न इथेच थांबून चालणार नाही, हेही लक्षात घ्यायला हवं.
ओझोन यशाचा हवामान बदलावर परिणाम
ओझोनचं आवरण कमी झाल्यानं घातक सूर्यकिरणांचं प्रमाण वाढतं, पण हवामान बदलावर त्याचा काही मोठा परिणाम होत नाही.
मात्र ओझोनचं आवरण वाचवण्याच्या प्रयत्नांमुळे हवामान बदलाला आळा घालण्याच्या प्रयत्नांना मदत होत असल्याचं हा अहवाल सुचवतो.
यामागचं कारण म्हणजेे सीएफसी वायू वापरणं आपण बंद केलं, तेही ग्रीनहाऊस गॅसेस आहेत आणि त्यांची उष्णता धरून ठेवण्याची क्षमता कार्बन डायऑक्साईडपेक्षाही हजारो पटींनी जास्त आहे.
सीएफसीचा वापर आधीसारखाच सुरू राहिला असता, तर या शतकाच्या मध्यापर्यंत जगाचं तापमान आणखी 1 अंश सेल्सियसनं वाढलं असतं. पण ते रोखण्यात मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे यश आलं आहे.
म्हणूनच या अहवालाकडे एक चांगली बातमी म्हणून पाहिलं जातंय. कारण जगातील सर्व देशांनी जलद हालचाली केल्या तर पर्यावरणीय संकट टाळता येतं, हेही यातून सिद्ध होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








