You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वंदे भारत दिसायला इतकी चकाचक, तरी काही मार्गावर इतका कमी प्रतिसाद का?
- Author, चंदन जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वंदे भारत गाड्यांना हिरवा कंदिल दाखवल्यानंतर दावा केला की भारताच्या मध्यमवर्गीयांमध्ये वंदे भारत ट्रेन इतकी लोकप्रिय झाली आहे की देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून या ट्रेनची मागणी होत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा देशाचा प्रत्येक कोपरा वंदे भारतने जोडला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 मध्ये लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती.
या सगळ्य ट्रेन भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्याच्या निमित्ताने 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र सोशल मीडियावर मिळालेली लोकप्रियता आणि वंदे भारतशी निगडीत दावे हे रेल्वेच्या आकडेवारीपेक्षा वेगळे आहेत
अनेक मार्गावर वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांची संख्या नगण्य असल्याची परिस्थिती आहे.
त्यामुळे वंदे भारतने आता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी भाड्यात सवलत आणण्याची योजना जाहीर केली आहे.
रेल्वेच्या या योजना काय आहेत त्या पाहू या त्या आधी वंदे भारतशी निगडीत काही खास गोष्टींवर एक नजर टाकूया
सद्यस्थिती काय आहे?
भारतात पहिली वंदे भारत ट्रेन 2019 मध्ये धावली होती. तेव्हापासून आतापर्यंत 25 मार्गांवर 50 वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
जुलै 2023 मध्ये चार नव्या वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.
भारतात ज्या गतीने वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत त्या पाहता खरंच इतक्या ट्रेन्सची आवश्यकता आहे का असा प्रश्न पडतो.
काही वंदे भारत ट्रेनमध्ये तर फक्त आठ कोच आहेत तरी प्रवासी अतिशय कमी संख्येने येत आहेत.
रानी कमलापती स्टेशन (भोपाळ) ते जबलपूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला 8 कोच आहेत. तरी एप्रिल 2023 ते 29 जून 2023 मध्ये या 32 टक्के प्रवाशांनी प्रवास केला.
परतीच्या मार्गावरही या ट्रेनला 36 टक्के प्रवासी मिळाले. जर ही ट्रेन 16 कोचची असती तर त्या ट्रेनच्या 15 टक्केच जागा भरल्या असत्या.
बंगळुरू ते धारवाड या मार्गावर या दरम्यान चालणाऱ्या गाड्यांच्या 60 टक्केच बुकिंग झालं आहे.
या सर्व ट्रेन 8 कोचच्या आहेत. परतीच्या प्रवासातही ट्रेनच्या इतक्याच जागा भरल्या आहेत.
सगळ्यात वाईट परिस्थिती इंदौर ते भोपाळ या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतमध्ये होती.
या ट्रेनमध्ये फक्त 21 टक्के प्रवाशांनी प्रवास केला. परतीच्या प्रवासात फक्त 29 टक्के जागा भरल्या.
हीच परिस्थिती दिल्ली कँट ते अजमेर भागात धावणाऱ्या वंदे भारतची होती. त्यात फक्त 61 टक्के जागा भरल्या.
मडगांव ते मुंबई या वंदे भारतला 55 टक्के प्रवासी मिळाले.
अशा प्रकारे वंदे भारत ट्रेनच्या क्षमतेपेक्षा अतिशय कमी प्रवासी ट्रेनला मिळाले आहेत. ही ट्रेन युरोपियन डिझाईन आणि भारताची सगळ्यात आधुनिक ट्रेन असल्याचं सांगितलं जातं.
काही मार्गावर प्रचंड मागणी
सगळ्याच मार्गावर मागणी कमी आहे अशातला भाग नाही. काही मार्गावर प्रवाशांमध्ये वंदे भारत प्रचंड लोकप्रिय आहे.
एक एप्रिल 2023 ते 29 जून 2023 या भागात कासरगोड- त्रिवेंद्रम सेंट्रल वंदे भारत गाडीची ऑक्युपँसी 182 टक्के होती. परतीच्या प्रवासाला ती 176 टक्के होतकी.
याचा अर्थ आहे की ट्रेन पूर्ण भरली होती आणि 82 आणि 76 टक्के लोकांना बुकिंग मिळालं नाही.
मुंबई सेंट्रल- गांधीनगर वंदे भारतची ऑक्युपंसी 129 टक्के होती, तर परतीच्या प्रवासात ती 134 टक्के होती.
सिकंदराबाद-विशाखापट्टणम वंदे भारतची ऑक्युपंसी 114 टक्के होती. अशा प्रकारे काही वंदे भारतला तुफान प्रतिसाद मिळतो आहे.
नवीन ट्रेन कधी सुरू केल्या जातात?
खरंतर नवीन ट्रेन सुरू करण्याआधी अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
रेल्वे बोर्डाच्या माजी सदस्यांच्या मते राजकीय मागणीच्या व्यतिरिक्त कोणत्या मार्गावर ट्रेन्स हव्या आहेत याची रेल्वेला कल्पना असते.
सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांमध्ये बुकिंगची परिस्थिती आणि गर्दीनुसार त्याचं आकलन केलं जातं. रेल्वेमध्ये डेली युझर्स कंसल्टेटिटव्ह कमिटीचीसुद्धा स्थानिक डीआरम बरोबर बैठक होते. त्यावर प्रादेशिक रेल्वेत चर्चा होते आणि मग प्रकरण मंत्रालयापर्यंत येतं.
अनेकदा मागणीनुसार सध्या उपलब्ध असलेल्या ट्रेनच्या कोचची संख्या वाढवली जाते आणि मागणी कायम असेल तर नवीन ट्रेन सुरू केली जाते.
त्यासाठी ट्रेनची रचना म्हणजे कोणत्या वर्गाच्या डब्यांची किती मागणी आहे आणि वेळेनुसार गाड्या चालवल्या जातात.
त्याशिवाय खासदार किंवा लोकप्रतिनिधींच्या मागण्यांनुसारही गाड्या सुरू केल्या जातात.
मात्र त्यासाठी त्या विशिष्ट मार्गावर मागणी आणि नवीन मार्गावर सर्व शक्यतांचा नीट विचार केला जातो.
ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा म्हणतात, “मार्गावरच्या मागण्या वगैरे आता जुन्या झाल्या आहेत. आता निवडणुकीनुसार गाड्यात चालवल्या जातात आणि त्यांचं उद्घाटन होतं.”
वंदे भारतचं तिकीट जास्त
शताब्दीसारख्या मानल्या जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचं तिकीट जास्च आहे आणि त्यामुळे अनेक प्रवासी या ट्रेनपासून दूर असतात.
शताब्दी एक्सप्रेसमध्ये चेअर कारचं 100 किमीचं बेसिक भाडं 215 रुपये आहे, तर वंदे भारतचं भाडं 301 रुपये आहे.
एक्झिक्युटिव्ह क्लासचं शताब्दीचं भाडं 488 रुपये आहे तर वंदे भारतचं बेसिक भाडं 634 रुपये आहे.
500 किमी अंतराचा विचार केला तर शताब्दी एक्सप्रेसचं भाडं 658 रुपये आहे तर वंदे भारतमध्ये हेच भाडं 921 रुपये आहे.
याच अंतरासाठी शताब्दी एक्सप्रेसचं भाडं 1446 आहे तर वंदे भारतचं 1880 रुपये आहे.
इतकंच नाही तर प्रवाशांना रिझर्व्हेशन चार्ज, सुपरफास्ट चार्ज, नुसार खाण्यापिण्याचा खर्च आणि जीएसटीही चुकवावा लागतो.
रेल्वेच्या मते प्रवाशांना 45 टक्के सूट मिळते तरी ही अवस्था आहे.
शिवगोपाल मिश्रा सांगतात, “वंदे भारतचं भाडं इतकं जास्त आहे की चार लोकांना प्रवास करायचा असेल तर ट्रेनच्या तुलनेत कारने कमी खर्चात प्रवास शक्य आहे. मात्र रेल्वेचा फोकस आता सामान्य लोकांसाठी ट्रेन चालवायचा नाही तर श्रीमंतांसाठी ट्रेन चालवणं हाच झाला आहे.”
वंदे भारत विरुद्ध शताब्दी एक्सप्रेस
ICF चेन्नईमध्ये वंदे भारतचं सुरुवातीचं नाव ट्रेन-18 ठेवलं होतं कारण ही योजना 2018 मध्ये सुरू झाली होती.
याशिवाय याच तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन-20 2020 मघ्ये सुरू होणार होती.
ट्रेन-20 मध्ये एसी क्लासचे स्लीपर कोच होते आणि रेल्वेच्या मते ही ट्रेन मार्च 2024 मध्ये सुरू होऊ शकते.
या ट्रेनचं नावही वंदे भारत सारखं होऊ शकतं.
वंदेभारत शताब्दी एक्सप्रेसला पर्याय मानला जात आहे. त्यातही शताब्दीसारखे चेअर कारचे डबे असतात.
भारतात पहिली शताब्दी एक्सप्रेस 10 जुलै 1988 ला धावली होती.
सुरुवातीला ही ट्रेन ग्वाल्हेर पर्यंत धावली नंतर ती भोपाळपर्यंत वाढली होती.
ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय रेलचे संपादक अरविंद कुमार यांनी शताब्दी ट्रेनचे पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होते.
ते सांगतात, “माधवराव सिंधिया त्यावेळी रेल्वेमंत्री होते आणि त्यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या जन्मशताब्दीनिमित्त ही ट्रेन सुरू केली होती. मात्र नेहरुंचा फोटोही लावला नव्हता. तरीही ही ट्रेन अत्याधुनिक आणि 21 व्या शतकाची असल्याचा प्रचार केला होता.”
आता वंदे भारतला भारतातल्या सर्वांत आधुनिक ट्रेनचा दर्जा दिला गेला आहे. आतापर्यंत प्रत्येक वंदे भारतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.
गेल्या 35 वर्षांत भारतात फक्त 19 मार्गावर शताब्दी एक्सप्रेस ट्रेन धावल्या आहेत. आता शताब्दी एक्सप्रेस ऐवजी वंदे भारत ट्रेनवर सगळ्यात जास्त लक्ष आहे.
16 कोचची वंदे भारत तयार करण्यात 100 कोटी रुपयांचा खर्च येतो. तेच 20 डब्यांची शताब्दी तयार करण्यासाठी 55 कोटींचा खर्च येतो.
वंदे भारतची ओळख तिच्या वेगासाठी झाली आहे.
मात्र खरी परिस्थिती अशी आहे की भारतीय रेल्वे ट्रॅकवर गाड्या जास्तीत जास्त 160 किमी प्रतितास वेगानंच धावू शकतात. त्यामुळे वंदे भारत आणि शताब्दीचा सरासरी वेग हा ताशी 160 किलोमीटरपेक्षा थोडा कमीच असतो.
पण तरीही ही गाडी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन शताब्दीच्या तुलनेत थोडी वेगवान आहे. याचं कारण वंदे भारत लवकर वेग पकडते आणि लवकर ब्रेक लागतो.
वंदे भारत शताब्दीसारखी इंजिनच्या मदतीनं धावत नाही तर तो एक ट्रेन सेट आहे. म्हणजे यात प्रत्येक एका कोचनंतर दुसऱ्या कोचमध्ये बॅटरी आहे.
ही बॅटरी ट्रेनला अधिक वेगाने ओढते. त्यामुळे ट्रेन लवकर वेग घेते आणि ब्रेक लावल्यावर लगेच थांबते.
मात्र काही मिनिटं वाचवण्यासाठी प्रवासी वंदे भारतकडे पाठ फिरवत आहे आणि त्यावर रेल्वेने एक उपाय काढला आहे.
भारतीय रेल्वेने एक परिपत्रक काढलं आहे. त्यानुसार वंदे भारतमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असतील तर प्रवासी भाड्यात 25 टक्क्यापर्यंत सूट दिली जाईल.
ही योजना विस्टाडोम कोच, अनुभुती कोच आणि अन्य एसी सीटिग कोचवर लागू ती.
त्यासाठी झोनल रेल्वेला भाड्यात सूट देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा बीबीसीशी बोलताना म्हणाले, “ही योजना 2019 मध्ये आणण्यात आली होती मात्र कोव्हिडमुळे पुढे जाऊ शकली नाही. रेल्वेने तीच योजना नव्याने समोर आणली आहे. ही एक तर नवीन योजना नाही आणि फक्त वंदे भारतसाठी ही योजना नाही.”
वंदे भारत दोन शहरांना जोडणारी ट्रेन आहे. आणि भारतात रस्ते चांगले झाल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
अशा प्रकारच्या प्रवासामुळे लोकांना डोअर टु डोअर कनेक्टिव्हिटी मिळते.
त्यामुळे रेल्वेला नवीन ट्रेन सुरू करताना आणि नवीन ऑफर देताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotifyआणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)