You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई मेट्रो 3 : मुंबईच्या 75 फूट खालून धावणारी मेट्रो कशी असणार? वाचा 7 प्रश्नांची 7 उत्तरे
कुलाबा - वांद्रे -सिप्झ ते आरे मेट्रो 3 ही मुंबईची पहिली अंडरग्राऊंड मेट्रो असणार आहे. त्याच्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्याचं काम 88% पूर्ण झालं आहे.
डिसेंबर 2023 मध्ये या मेट्रोचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत येऊ शकतो, असा अंदाज आहे. बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून करण्यात आला आहे.
त्यामुळे ही मेट्रो सुरू झाल्यावर कोणते फायदे होतील? पावसाळ्यात ही मेट्रो चालू शकेल का? अंडरग्राऊंड मेट्रोचे ‘व्हायब्रेशन्स’ जमिनीपर्यंत येतील का?
हे काम करताना कोणती आव्हानं होती? मिठी नदीच्या खालून बोगदा कसा बांधण्यात आला या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न...
1. मुंबई मेट्रो 3 कशी असेल?
कफ परेड ते आरे अशी 33.5 किलोमीटरची ही मेट्रो असणार आहे. दक्षिण मुंबईतल्या जुन्या इमारती, रस्ते पार करत मध्य मुंबईतल्या मिठी नदीच्या खालून थेट पश्चिम मुंबईतल्या आरे जंगलात ही मेट्रो जाते.
साधारण 22 ते 25 मीटर खाली खोदून बोगदे तयार करण्यात आले आहेत. या मार्गावर एकूण 27 स्थानकं असतील.
त्यापैकी 26 स्थानके ही भूमिगत असतील आणि एक आरेचं स्थानक कारशेडमुळे जमिनीलगत असेल.
2. मेट्रो लाईनवर कोणकोणती स्थानके?
मेट्रो 3 ही अशी मेट्रो आहे जी पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना समांतर नसेल.
अगदी काही ठिकाणं सोडली तर जिथून पश्चिम रेल्वे जात नाही किंवा पश्चिम रेल्वेची ‘कनेक्टिव्हिटी’ लांब आहे, अशा ठिकाणाहून ही मेट्रो जाईल.
कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.
ज्या ठिकाणी पश्चिम रेल्वे थेट जात नाही अशा ठिकाणी रस्ते वाहतूक अधिक आहे. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या अधिक आहे.
त्याचा विचार करून रेल्वेला न जोडणारी स्थानकं या मेट्रोची तयार करण्यात आली आहेत असं एमएमआरसीचं म्हणणं आहे.
ज्यात कफ परेड, नरिमन पॉईंट, फोर्ट, लोअर परेल, सिप्झ , एमआयडीसी ही सहा औद्योगिक क्षेत्र आहेत. या ठिकाणी नोकरीसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
या मेट्रोमुळे 15% आताच्या रेल्वेमधून आणि 85% हे रोडचं ट्रॅफीक कमी होईल असा अंदाज असल्याचं एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे सांगतात.
3. प्रकल्पाला किती खर्च?
मुंबई मेट्रो 3 च काम ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे ‘ (MMRC) आहे. या अंडरग्राऊंड मेट्रोच्या कामासाठी एमएआरसीची स्थापना करण्यात आली.
2011 मध्ये हा प्रकल्प प्रस्तावित होता. पण प्रत्यक्षात याचं काम 2016 मध्ये सुरू झालं. 2020 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा होती.
पण प्रत्यक्षात वेगवेगळ्या कारणांमुळे या प्रकल्पाला 2.5 वर्ष उशीर झाला. दरम्यानच्या काळात या प्रकल्पाची किंमत 14 हजार कोटींनी वाढून 37 हजार कोटी इतकी झाली.
4. पावसात या मेट्रोच्या बोगद्यात पाणी भरेल का?
हा प्रश्न असंख्य मुंबईकरांच्या मनात आहे. अश्विनी भिडे याबाबत बोलताना सांगतात,
“हा बोगदा ज्या पध्दतीने बांधला जातो तो पूर्णपणे वॉटरप्रुफ असतो त्यावर कॉंक्रीटचे थर असतात. त्यामुळे थेट पावसाचं पाणी आत येणं शक्य नाही. मेट्रो स्टेशन्सच्या एन्ट्री आणि एक्झिटमधून पाणी आत जाण्याची शक्यता असते."
"पण या मेट्रोचं काम करताना मुंबईचा पाऊस, आतापर्यंतच्या पुराची सर्वाधिक पातळी या सगळ्याचा विचार करून स्टेशन्स बांधकाम करण्यात आलं आहे. याउलट जेव्हा पावसाळ्यात लोकल ट्रेनवर परिणाम होईल तेव्हा या मेट्रोचा सर्वाधिक फायदा मुंबईकरांना होईल.”
5. मेट्रोचे व्हायब्रेशन्स इमारतींमध्ये आणि रस्त्यावर जाणवतील का?
कोणतेही अंडरग्राऊंड बांधकाम असेल तर त्याचे व्हायब्रेशन्स काही प्रमाणात जाणवतात. व्हायब्रेशन्स दगडामधून हे वरपर्यंत येतात.
पण मेट्रो 3 मध्ये व्हायब्रेशन्सचा त्रास होऊ नये यासाठी आपण विशेष काळजी घेतली आहे. ट्रॅक स्ट्रक्चर वेगळं वापरण्यात आलं आहे. हे भारतात पहिल्यांदा या मेट्रोमध्ये वापरण्यात आलं आहे. ज्यामुळे ‘व्हायब्रेशन्सचा’ त्रास होणार नाही, अशी माहिती भिडे यांनी दिली.
6. मिठी नदीच्या खालून बोगदा कसा बनवण्यात आला?
हे काम करत असताना मुंबईसारख्या गजबजलेल्या, समुद्राने वेढलेल्या शहरात भुयारी मेट्रोचं काम करत असताना अनेक आव्हानं होती.
काही ठिकाणची रेल्वे क्रॉसिंग, इतर मेट्रो क्रॉसिंग, मिठी नदीखालचा बोगदा आणि उंच इमारतींची सुरक्षा या अनेक बाबींचा अभ्यास करून या मेट्रोचं काम करण्यात आलं.
कोणत्याही नदीचा तळ हा खडकाने बनवलेला असतो. त्या खडकाच्या खालून हे बांधकाम करण्यात आलं आहे.
या प्रकल्पाचे अभियंता आणि चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सुयश त्रिवेदी सांगतात, “मिठी नदीच्या आता दोन टीबीएम टनल आणि एक एनटीएम टनल याचं ड्राईव्ह थ्रू केलं आहे.
पाण्याच्याखाली काम करताना खूप मोठं आव्हान असतं. जर पाणी आत आलं तर ते बाहेर काढणं कठीण होतं. आम्ही खूप हळू काम केलं.
काम करत असताना कुठून गळती होत नाही याची सतत तपासणी करत होतो. पण सुदैवाने पाणी न येता मिठी नदी यशस्वी क्रॉस केली.”
7. आरे कारशेडचं काय?
आरेच्या जंगलातल्या या कारशेडवरूनच मुंबईत आंदोलनं झाली होती.
मुंबईच्या मधोमध असणाऱ्या या जंगलातली झाडं तोडायला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला.
मध्यरात्री झाडं तोडण्यात आली - त्यावरून जंगलात आंदोलन झालं. प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. कारशेडच्या कामाला 2022 मध्ये हिरवा कंदील मिळाला.
आता कारशेडचं काम 65% पूर्ण झालंय. अॅक्वा लाईनच्या सगळ्या ट्रेन्स इथे पार्क केल्या जातील आणि त्यांची देखभालही या डेपोत होईल.
इथूनच मेट्रो दक्षिण मुंबईच्या दिशेने निघेल. पण पर्यावरणावाद्यामध्ये या कारशेडवरून आजही नाराजी आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)