बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठं नुकसान

बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी (15 जून) रात्री गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखू बंदरावर धडकलं. गुजरातच्या किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय. या चक्रीवादळामुळे अनेक भागातील वीज गेली आणि अनेक विद्युत खांब उन्मळून पडलेत.

आतापर्यंतच्या 5 महत्त्वाच्या घडामोडी :

1) 15 जूनला जाखौ किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 125 किमी इतका होता.

2) प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वादळात किमान 20 जण जखमी झाले आहेत. 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

3) गुजरातमधील 940 गावांमध्ये जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले. अनेक भागात वीज नाही. रेल्वेने आतापर्यंत 70 हून अधिक गाड्या रद्द केल्यात किंवा वळवल्यात.

4) मांडवी शहरात पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झालाय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाखौ-मांडवी रस्त्यालगत तसेच मांडवी शहरात अनेक झाडे उन्मळून पडलीत. जिल्हाधिकारी अमित अरोरा म्हणाले, "आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही."

5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. गुजरातच्या गीर जंगलातील सिंहांसह वन्य प्राण्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही पंतप्रधान मोदींनी विचारणा केली.

द्वारकामधून बीबीसीचे प्रतिनिधी तेजस वैद्य यांनी दिलेली माहिती :

बिपरजॉय चक्रीवादळामुळे 15 जूनच्या रात्रीपासून गुजरातच्या द्वारकामध्ये जोरदार वारा आणि पाऊस सुरू आहे. द्वारकाचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) यांनी बीबीसीला सांगितलं की, "काल संध्याकाळपर्यंत द्वारकामध्ये 750 विजेचे खांब पडले. द्वारकामध्ये 15 तारखेला 147 मिमी पाऊस झाला.

"द्वारकाच्या अवलपारा नावाच्या गावात सखल भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. पोलीस प्रशासनानं हे काम केलं," अशी माहिती स्थानिक डीवायएसपी (पोलीस उपअधीक्षक) समीर सरडका यांनी बीबीसीला ही माहिती दिली.

द्वारकाचे मंदिर आजही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि विद्युत खांब पडल्याने विजेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. काल रात्री काही घरांचे छतही उडून गेले.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे प्रशासनाने आधीच साडेपाच हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय दिला होता. द्वारकाच्या रुग्णालयात 20 जूनपूर्वी ज्यांची प्रसूती होऊ शकते, अशा 138 महिलांसाठी आगाऊ व्यवस्था करण्यात आली होती. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी बीबीसीला ही माहिती दिली.

बीबीसीची टीम द्वारकामधील हायवेजवळ साईबाबा मंदिराशेजारी एका हॉटेलमध्ये थांबली आहे. हॉटेलमध्येही गेल्या 24 तासांपासून वीज नाही.

बिपरजॉय वादळामुळे काल संध्याकाळी हॉटेलच्या बाहेरील काचेला तडा गेला. वारा इतका जोरात होता की 14 तारखेपासूनच हॉटेलचा मुख्य दरवाजा कपाटं आणि धान्याच्या पोत्या ठेवून बंद करावा लागला. रात्रभर पाऊस पडल्यानंतर सकाळी हॉटेलच्या लॉबीमध्ये काही प्रमाणात पाणी साचले होते.

15 जूनच्या रात्री लँडफॉल सुरू

"कच्छमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 108 किमी आहे," असं गुजरातचे मदतकार्य आयुक्त आलोक पांडे यांनी गुरुवारी (15 जून) रात्री उशिरा सांगितलं.

गुजरातमधील 940 गावांमध्ये विजेचे खांब पडल्याची माहिती मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, काल (15 जून) रात्री उशिरापर्यंत वादळात किमान 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

गुजरात सरकारने आज, शुक्रवारी (16 जून) शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चक्रीवादळानंतर मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बिपरजॉय वादळाची माहिती देताना सांगितलं की, "वादळ जमिनीवर आदळताच त्याची तीव्रताही कमी झाली आहे. ते आता 'अत्यंत तीव्र चक्रीवादळ'वरून 'गंभीर चक्रीवादळ'मध्ये रुपांतरित झालं आहे. वाऱ्याच्या वेगाबद्दल बोलायचे झाले तर आता त्याचा वेग ताशी 105 ते 115 किमी इतका नोंदवला गेला आहे. उद्या सकाळपर्यंत त्याची तीव्रता आणखी कमी होईल आणि ते चक्रीवादळाच्या श्रेणीत जाईल.

"16 जूनच्या संध्याकाळपर्यंत हे वादळ डिप्रेशनमध्ये बदलेल," असंही महापात्रांनी सांगितलं.

जोरदार वाऱ्यामुळे ओखा आणि जामनगरमध्ये कोळशाच्या साठ्याला आग लागली, आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कोळशाचा साठा जळून राख झाला.

रेल्वेने एकतर 70 हून अधिक गाड्या रद्द किंवा वळवल्या आहेत.

प्रशासनाची तयारी

"कच्छ जिल्ह्यातल्या 47 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून त्यांना पर्यायी निवारा केंद्रांमध्ये नेण्यात आलं आहे. गरोदर महिलांची सोय रुग्णालयं आणि अन्य सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे. शून्य हानी व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. लोकांनी ते जिथे आहेत तिथे सुरक्षित राहावं, प्रवास करू नये," असं गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषीकेश पटेल यांनी म्हटलं आहे.

या वादळाचा सर्वांत जास्त प्रभाव गुजरातमध्ये जाणवणार असला, तरी मुंबईतही त्याचा परिणाम दिसेल. मुंबईत उंच लाटा पाहायला मिळतील. खबरदारीचा उपाय म्हणून जुहू बीचवर लाइफ गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतील चौपाट्यांवर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

गुरूवारी (15 जून) सकाळी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय कच्छमधील जाखौ बंदरापासून 180 किलोमीटर अंतरावर होतं, तर देवभूमी द्वारका आणि नलियापासून 210 किलोमीटर अंतरावर होतं.

"कच्छ जिल्ह्यातल्या 47 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून त्यांना पर्यायी निवारा केंद्रांमध्ये नेण्यात आलं आहे. गरोदर महिलांची सोय रुग्णालयं आणि अन्य सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे. शून्य हानी व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. लोकांनी ते जिथे आहेत तिथे सुरक्षित राहावं, प्रवास करू नये," असं गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषीकेश पटेल यांनी म्हटलं आहे.

या वादळाचा सर्वांत जास्त प्रभाव गुजरातमध्ये जाणवणार असला, तरी मुंबईतही त्याचा परिणाम दिसेल. मुंबईत उंच लाटा पाहायला मिळतील. खबरदारीचा उपाय म्हणून जुहू बीचवर लाइफ गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतील चौपाट्यांवर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बुधवारी (14 जून) बिपरजॉय संदर्भात पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली.

त्यांनी म्हटलं, "चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजात कोणताही बदल झालेला नाही. चक्रीवादळ त्याच मार्गाने पुढे सरकत आहे आणि 15 जूनला कच्छमधील जाखौ बंदराजवळ संध्याकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत धडकण्याची शक्यता आहे."

हवामान विभागाच्या अहमदाबाद विभागाचे संचालक मनोरमा मोहंती यांनीही वादळाच्या परिणामांची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, "वादळानंतर कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू शकतात."

मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटलं, "गुजरातच्या किनारी भागात वेगाने वारे वाहतील, परंतु कच्छ जिल्ह्यात सर्वाधिक वारे वाहतील."

सरकारने काय तयारी केली आहे?

  • पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, केंद्रीय गृह मंत्रालय 24 तास परिस्थितीचा आढावा घेत आहे.
  • केंद्र सरकार या प्रकरणी राज्य सरकार आणि संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहे.
  • NDRF ने वादळाचा सर्वाधिक धोका असलेल्या भागांमध्ये 12 टीम तैनात केल्या आहेत.
  • मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.
  • विमानं आणि हेलिकॉप्टर किनाऱ्यावर लक्ष ठेवून आहेत.
  • लष्कर, एअर फोर्स आणि इंजिनिअर टास्क फोर्स युनिट्स बोटी आणि बचाव उपकरणांसह स्टँड बायवर आहेत.
  • लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाची आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथकेही मदतीसाठी सज्ज आहेत.
  • निवेदनात म्हटले आहे की, गुजरातमध्ये मुख्यमंत्री स्तरावर जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात आली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण राज्य प्रशासन सज्ज आहे.
  • यासोबतच कॅबिनेट सचिव आणि गृह सचिव हे गुजरातचे मुख्य सचिव आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये, एजन्सी यांच्या सतत संपर्कात आहेत.
  • या वादळाचा सामना करण्यासाठी गुजरात सरकारने केलेल्या उपाययोजनांचीही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला गृहमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बिपरजॉय चक्रीवादळ इतका काळ कसं टिकलं?

6 जून 2023. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं. पुढच्या काही तासांतच बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती झाली.

7 जून 2023 चा दिवस संपण्यापूर्वी आधी सीव्हियर सायक्लोन म्हणजे तीव्र चक्रीवादळ आणि मग व्हेरी सिव्हियर सायक्लोन म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळ अशी बिपरजॉयची तीव्रता वाढत गेली.

अवघ्या चोवीस तासांत ज्या वेगानं हे चक्रीवादळ तयार झालं, ते अगदी थक्क करणारं आहे. इतकंच नाही तर या चक्रीवादळानं आपली ताकदही बरेच दिवस टिकवून ठेवली.

६ जूनला हे चक्रीवादळ तयार झालं होतं आणि 15 जूनला ते किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. म्हणजे जवळपास दहा दिवस या वादळाची ताकद टिकून राहिली, असं म्हणता येईल.

पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी अर्थात आयआयटीएमच्या 2021 सालच्या अहवालानुसार उत्तर हिंदी महासागरात म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात येणाऱ्या चक्रीवादळांचा कालावधी गेल्या चाळीस वर्षांत 80 टक्के वाढला आहे. तसंच अतीतीव्र चक्रीवादळांचा कालावाधी 260 टक्क्यांनी वाढला असल्याचंही हा अहवाल सांगतो.

समुद्राच्या एखाद्या भागात तापमान वाढलं की तिथली हवा वर सरकते आणि तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यातूनच चक्रीवादळाची निर्मिती होते.

म्हणजेच समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान जेवढं जास्त तेवढी वादळाला मिळणारी ऊर्जा जास्त असते आणि त्यातूनच वादळ ताकदवान बनतं, जास्त दिवस टिकून राहतं आणि जास्त अंतर पार करू शकतं.

याउलट चक्रीवादळ जमिनीला धडकतं किंवा थंड पाण्याच्या प्रदेशात सरकतं, तेव्हा त्याला मिळणारी ऊर्जा कमी होते आणि ते विरून जातं.

गेल्या काही दशकांत अरबी समुद्राचं तापमान सातत्यानं वाढत असल्याचं भारतीय हवामान विभागाच्या 2019 सालच्या अहवालात म्हटलं होतं. 1981-2010 च्या तुलनेत गेल्या 2019 साली अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 0.36 अंश सेल्सियसनं वाढल्याचं हा अहवाल सांगतो. जागतिक तापमानवाढीमुळे हे होत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

म्हणजेच आपण करत असलेल्या कार्बन उत्सर्जनाशी बिपरजॉय सारख्या चक्रीवादळांच्या तीव्रतेचा थेट संबंध आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)