क्रिकेट वर्ल्ड कप : 'टीम इंडियाला स्पेशल बॉल दिला जातो' हा दावा खरा आहे का?

क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, के. बोधिराज
    • Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी

आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय क्रिकेट टीमनं 18 पॉईंट्सची कमाई करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. या स्पर्धेच्या साखळी फेरीत टीम इंडियानं सर्व 9 सामने जिंकलेत.

यजमान संघ म्हणून होणारा फायदा, प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा, पिच आणि हवामानाची योग्य माहिती या सर्व बाबी भारतीय टीमला मदत करणाऱ्या आहेत.

टीम इंडियातील 7 ते 8 खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘विश्वचषक जिंकण्याची ही योग्य वेळ आहे,’ असा विश्वास व्यक्त केलाय.

भारत 2011 नंतर आयसीसी वन-डे वर्ल्ड कप जिंकेल अशीच सर्व चाहत्यांची अपेक्षा आहे.

भारतीय संघाच्या या विजयी घौडदौडीवर सोशल मीडियावर अनेकांनी शंका व्यक्त केलीय. संपूर्ण स्पर्धेत चांगली होत असलेली भारतीय गोलंदाजी हा त्यांच्या आक्षेपाचा एक मुद्दा आहे.

आजवरची सर्वात भक्कम गोलंदाजी

भारतीय क्रिकेट टीमला भक्कम फलंदाजीची मोठी परंपरा आहे. पण, यंदा पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांनी या स्पर्धेत अभुतपूर्व असं यश मिळवलंय.

मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा हा वेगवान गोलंदाजांचा वैविध्यपूर्ण मारा आपल्याकडं आहे. ते कोणत्याही टीमला खिंडार पाडू शकतात.

वर्ल्ड कप

फोटो स्रोत, Getty Images

कुलदीप यादव आणि जाडेजा हे दोनच फिरकी गोलंदाज भारतीय टीममध्ये आहेत. पण, त्यांचा सामना करणं प्रतिस्पर्धी संघांसाठी मोठं आव्हानात्मक आहे. त्यामुळे भारतीय संघाची आजवरची सर्वात भक्कम गोलंदाजी असल्याचं मत क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

कुणी व्यक्त केली शंका ?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझाने भारतीय संघाच्या विजयावर शंका व्यक्त केली. टीम इंडियानं श्रीलंकेला 55 धावांवर ऑल आऊट केल्यानंतर रझानं ‘त्या’ विजयावर शंका उपस्थित केली होती.

पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हसन रझा म्हणाला की, ‘भारतीय गोलंदाजांना दिल्या जाणाऱ्या बॉलची चौकशी व्हायला हवी. भारतीय गोलंदाजांचा चेंडू अधिक स्विंग होतोय. शमी आणि सिराज हे अ‍ॅलन डोनाल्ड आणि अ‍ॅनिटीनी सारखे भासतायत. मुंबईतील सामन्यात शमीला मिळालेला स्विंग पाहून मॅथ्यूज देखील आश्चर्यचकित झाला होता,’ असा दावा रझानं केला.

‘भारतीय गोलंदाजांना आयसीसी किंवा बीसीसीआयकडून दुसऱ्या इनिंगमध्ये मदत मिळतीय त्यांना दुसरा बॉल दिला जातोय. तो बॉल अधिक स्विंग होतोय. थर्ड अंपायरही भारतीय संघांना मदत करतायत, असं मला वाटतं,’ असं रझानं या कार्यक्रमात सांगितलं.

त्यामुळे भारतीय गोलंदाजांना स्विंग होण्यास मदत मिळणारा, अधिक चकाकी असलेला बॉल दिला जातोय का? याची चौकशी व्हावी,’ असं मत रझानं व्यक्त केलं.

वासिम अक्रमचं खणखणीत उत्तर

पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम अक्रमनं रझानं उपस्थित केलेल्या शंकेला उत्तर दिलंय.

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्रम म्हणाला, ‘ मी काही जणांना भारतीय क्रिकेट टीमनं मिळवलेल्या यशावर शंका घेताना पाहिलं. हे हास्यास्पद आहे. ही मंडळी संपूर्ण जगासमोर स्वत:चं हसं करुन घेतायत. तसंच पाकिस्तानलाही अडचणतील आणत आहेत.’

बॉल निवडण्याची एक पद्धत असते. चौथा अंपायर 12 बॉलचा एक बॉक्स घेऊन मैदानात येतो. टॉस जिंकणाऱ्या कर्णधारानं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्या टीमचा कर्णधार मैदानातील अंपायर थर्ड अपांयरसमोर दोन बॉल निवडतात,’ अशी माहिती अक्रमनं दिली.

न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

‘मैदानातील अंपायर एक बॉल उजव्या तर दुसरा बॉल डाव्या खिशात ठेवतो., उर्वरित बॉल फोर्थ अंपायर घेऊन जातो. दुसऱ्या इनिंगमध्येही फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कर्णधार दोन नवे बॉल निवडून ते अंपायर्सना दाखवतो. या प्रकारच्या समजुतींवर आधारित बातम्या कोण पसरवतंय हे माहिती नाही,’ असं त्यानं सांगितलं.

जगभरातील माजी क्रिकेटपटू भारतीय टीमच्या कामगिरीचं कौतुक करत असताना पाकिस्तानच्या खेळाडूंनी त्यावर आक्षेप नोंदवल्यानं सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलंय.

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर टी20, वन-डे आणि कसोटी सामन्यात किती बॉल वापरले जातात हे माहिती हवं.

एका सामन्यात किती बॉल वापरले जातात?

T20 सामन्यातील प्रत्येक इनिंगमध्ये नवीन बॉल वापरला जातो. तर कसोटी सामन्यात 80 ओव्हर्सनंतर नवीन बॉल वापरता येतो.

एकदिवसीय सामन्यात प्रत्येक इनिंगमध्ये दोन बॉल वापरले जातात. तर वन-डे क्रिकेटमधील दोन्ही इनिंग मिळून चार बॉल वापरले जातात. आयसीसीच्या नव्या नियमानुसार पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये नवीन बॉल वापरले जातात.

यापूर्वी एका इनिंगममध्ये एकच बॉल वापरला जात असे, पण, 2011 साली आयसीसीनं त्या नियमात बदल केले. पांढरा बॉल लवकर झिजतो आणि लेदर बॉलचे टाके फाटण्याची शक्यता असते. त्याचा रंगही कमी होतो.

वर्ल्ड कप

फोटो स्रोत, Getty Images

हा त्रास कमी करण्यासाठी आयसीसीनं प्रत्येक इनिंगमध्ये दोन बॉल वापरण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बॉलची निगा कशा पद्धतीनं राखायची हे बॉलिंग करणारी टीम ठरवते.

स्पिनर्ससाठी चांगली शिवण असलेला आणि वेगवान गोलंदाजांसाठी चकाकी असलेला बॉल वापरणे त्यामुळे कर्णधाराला शक्य होते.

पांढरा बॉल हा सुरूवातीला टणक असतो आणि तो लाल बॉलपेक्षा अधिक स्विंग होतो. पण 5 ओव्हरनंतर बॉलचे स्वरुप बदलते. त्यांचा टणकपणा आणि स्विंग कमी होऊ लागतो.

यापूर्वी वन-डे क्रिकेटमध्ये अंपायर 35 ते 36 ओव्हर्सनंतर बॉल बदलत. तेवढ्या ओव्हर्सपूर्ण केल्यानंतर अंपायर्सकडून बॉलचे परिक्षण केले जात असे. बॉलचे स्वरुप तपासून गरज पडली तर नवा बॉल दिला जात असे.

सामन्याच्या दरम्यान बॉल हरवला तर…

क्रिकेट सामन्याच्या दरम्यान फलंदाजाने मारलेला बॉल मैदानाच्या बाहेर गेला अथवा मैदानातील प्रेक्षकांच्यामध्ये हरवू शकतो. त्यावेळी अंपायर लगेच नवीन बॉल देत नाहीत.

त्यावेळी अंपायर ज्या ओव्हरमध्ये बॉल हरवलाय, तेवढ्या ओव्हर्स जुना असलेला बॉल फिल्डिंग करणाऱ्या टीमला देतात. अंपायरकडील बॉक्समध्ये वेगवेगळ्या ओव्हर्सपर्यंत वापरलेले बॉल असतात. त्यामधील एक बॉल दिला जातो.

गोलंदाज किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधारानं बॉलचा आकार खराब झालाय तसंच तो गोलंदाजीसाठी योग्य नसल्याची तक्रार केली तर अंपायर त्या बॉलची तपासणी करून नवा बॉल देऊ शकतात.

वर्ल्ड कप

फोटो स्रोत, Getty Images

अंपायरकडं बॉल बदलण्याचं अपिल करण्यात आल्यास आयसीसी क्रिकेट बॉल नियम क्रमांक 4.5 नुसार मैदानातील अंपायर बॉलची पाहणी करतात.

बॉल तपासण्यासाठी ‘गेज स्किल रिंग’ हे एक साधन आहे. त्याद्वारे बॉलचा घेर आणि आकार मोजतात. अधिक वापरानंतर बॉलचा आकार खराब झाला असेल, शिलाई फाटली किंवा फुटली असेल तर बॉल बदलण्याची शिफारस केली जाते.

बॉल बदलताना अंपायरकडून मैदानातील दोन्ही फलंदाज आणि कॅप्टनला कळवण्यात येते. आयसीसीच्या नियमानुसार बॉल खेळण्यास अयोग्य असेल, त्याचा आकार बदलला किंवा वजन कमी झालं तर तो बदलण्यात येतो.

बॉलचा आकार तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘बॉल गेज रिंगचे एक परिघ बॉलच्या आकारापेक्षा मोठे तर दुसरे बॉलच्या आकारापेक्षा थोडे लहान असते.

बॉल मोठ्या रिंगमधून सहज गेला किंवा कमी घेराच्या रिंगमधून नीट गेला नाही तर त्याचा आकार बदलला आहे, हे अंपायर ठरवू शकतात. त्या परिस्थितीमध्ये ते बॉल बदलण्याचा निर्णय घेतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)