You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताने पाकिस्तानला सहा विकेट राखून पराभूत केलं, चौकारासह विराट कोहलीनं पूर्ण केलं शतक
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 विकेट राखून पराभव केला आहे.
प्रथम फलंदाजी करत पाकिस्ताननं भारतासमोर 242 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं कोहलीचे शतक आणि श्रेयस अय्यरचं अर्धशतक आणि गिलच्या 46 धावांच्या जोरावर हे आव्हान सहज पूर्ण केलं.
त्यापूर्वी गोलंदाजीतही भारतीय संघानं पाकिस्तानच्या चांगल्याच मुसक्या आवळल्याचं पाहायला मिळालं. भारतीय गोलंदाजांनी अत्यंत कसून गोलंदाजी करत पाकिस्तानी संघाला 241 धावांत ऑलआऊट केलं.
या विजयासह भारतीय संघानं 2017 मध्ये पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
या सामन्यात कोहलीनं 14 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. तर भारतीय कर्णधार रोहित शर्मानंही सलामीवीर म्हणून 9000 धावांचा टप्पा ओलांडला.
एशिया कप, वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरोधात शतकी खेळी करणारा कोहली पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला.
शतकी खेळी करणारा कोहली प्लेयर ऑफ द मॅच ठरला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर या कामगिरीचा अभिमान असल्याचं म्हणाला.
"महत्त्वाच्या सामन्यात कामगिरी केल्याचा आनंद आहे. रोहित लवकर बाद झाल्यानंतर आम्हाला, सांभाळून खेळणं गरजेचं होतं. मधल्या डावात जबाबदारी सांभाळणं हे माझं काम होतं. त्यानंतर शेवटी श्रेयसनं धावांची गती वाढवली," असं कोहली म्हणाला.
भारतीय गोलंदाजांची चलती
पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना सावध सुरुवात केली. बाबर आणि इमामनं 40 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली.
पण, ती फार काळ टिकली नाही. हार्दिक पांड्यानं बाबर आझमला 23 धावांंवर बाद केलं. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये कुलदीपच्या गोलंदाजीवर एक धाव चोरण्याच्या प्रयत्नान इमाम उल हक बाद झाला.
अक्षर पटेलनं उत्तम डायरेक्ट हीट करत त्याला धावबाद केलं.
दोन विकेट पडल्यानंतर मात्र पाकिस्तानचा कर्णधार रिझवाननं सऊद शकीलच्या साथीनं पाकिस्तानचा डाव सांभाळला. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेकपर्यंत दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी केली.
हार्दिकच्या चेंडूवर हर्षित राणाच्या हातून रिझवानचा झेल सुटला. पण त्याचा त्याला फार फायदा उचलता आला नाही. अक्षरने त्यानंतर त्याला बोल्ड केलं. रिझवानचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं.
त्याच ओव्हरमध्ये कुलदीपनं शकीलचाही झेल सोडला. त्यामुळं पाकिस्तानला जरा दिलासा मिळाला.
पण हा आनंद फार काळ टिकला नाही. पुढच्याच ओव्हरमध्ये हार्दिकच्या गोलंदाजीवर शकील फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्यानंतर जडेजानंही कमाल दाखवली. तय्यब ताहीरला अवध्या 4 धावांवर बोल्ड करत आल्या पावली परत पाठवलं. या विकेटनंतर पाकिस्तानची धावसंख्या 5 बाद 165 झाली होती.
त्यानंतर सलमान आगा आणि खुशदील यांनी 200 धावांपर्यंत जडाप पुढं नेला. पण कुलदीपनं सलमान आगाला 19 धावांवर बाद केलं. आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीलाही पायचित केलं.
त्यामुळं पाकिस्तानची धावसंख्या 7 बाद 200 झाली होती. त्यानंतर कुलदीपनं नसीम शाहलादेखिल बाद केलं. कोहलीनं त्याचा झेल घेतला.
त्यानंतर अक्षर पटेलनं हारीस रऊफला धावबाद केलं. तर शेवटच्य ओव्हरमध्ये खुशदीलला हर्षितनं बाद करत पाकिस्तानचा डाव 241 धावांवर संपुष्टात आणला.
भारताकडून कुलदीपनं तीन, हार्दिकनं 2 तर हर्षित, अक्षर आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तर दोन धावबाद झाले. हार्दिकच्या 200 वन डे विकेटही पूर्ण झाल्या.
पाकिस्तानकडून सऊद शकीलनं सर्वाधिक 62 धावा केल्या. तर कर्णधार रिझवाननं 46 आणि खुशदीलनं 38 धावा केल्या.
फलंदाजीतही कायम ठेवला दबदबा
भारताची सुरुवात रोहित शर्मानं त्याच्या नेहमीच्या स्टाईलनं केलं. त्याच्या षटकार आणि एक दोन चौकारांनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजनही केलं. पण रोहितला मोठी खेळी करता आली नाही. 20 धावांवर असताना शाहीन शाह आफ्रिदीच्या यॉर्करवर त बोल्ड झाला.
त्यानंतर मैदानावर आलेल्या विराट कोहलीनं शुबमनच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागिदारी केली. शुबमन चांगली फलंदाजी करत असतानाच अबरारच्या एका कॅरम बॉलवर तो फसला आणि बोल्ड झाला. त्यानं 46 धावा केल्या.
तो बाद झाला तेव्हा भारताच्या 18 ओव्हरमध्ये 2 बाद 100 धावा झाल्या होत्या.
त्यानंतर विराट कोहलीनं डावाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानं संयमाने फलंदाजी करत धावफलक चालता ठेवला. विराटनं 62 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फॉर्मबाबत चाहत्यांना असलेल्या चिंतेतून दिलासा मिळाला.
श्रेयस अय्यरनेही कोहलीला चांगली साथ दिली. त्यानं अर्धशतकी खेळी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागिदारीही केली.
शेवटी अय्यर आणि पांड्या बाद झाले, पण कोहलीनं शतकी खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहोचवले.
किंग कोहलीच्या विक्रमांचा दिवस
पाकिस्तान विरोधातील या विजयाचा शिल्पकार ठरला किंग कोहली. कोहलीनं शतकी खेळी करत पाकिस्तानच्या सर्व आशांवर पाणी फेरलं.
रोहित लवकर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आल्यानंतर कोहलीवर डाव सांभाळण्याची जबाबदारी होती. त्यानंतर गिल बाद झाल्यानंतर त्यानं ते सर्व ओझं खांद्यावर घेतलं आणि श्रेयसच्या साथीनं भारताला संकटातून बाहेर काढलं.
गेल्या काही महिन्यांपासून सतत अपयश पाहावं लागल्यानं विराट कोहलीवर काही प्रमाणात टीकाही सुरू झाली होती, पण कोहलीनं या खेळीनं सगळ्यांची तोंडं बंद केली.
विराटनं शुबमनच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 80 तर श्रेयसबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागिदारी केली.
दरम्यान, विराटनं वन डे क्रिकेटमध्ये 14000 धावांचा टप्पाही ओलांडला. ही कामगिरी करणारा कोहली जगातला चौथा फलंदाज ठरला.
कोहलीने 299 सामन्यांत 287 इनिंग्जमध्ये हा विक्रम पूर्ण केला. या धावा करताना कोहलीची सरासरी 57.86 तर स्ट्राईक रेट 93.44 राहिला.
वनडेमध्ये धावांचा विचार करता कोहलीच्या पुढं फक्त सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा आहेत.
या शतकासह कोहलीच्या वनडे शतकांचा आकडा 51 वर पोहोचला आहे. तो सर्वाधिक वन डे शतकं करणारा फलंदाज आहे.
रोहितकडून गोलंदाजांचं कौतुक
सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार रोहितनं गोलंदाजांचं कौतुक केलं. गोलंदाजांनी ज्या पद्धतीनं कामगिरी केली ती आमच्या फायद्याची ठरली, असं रोहित म्हणाला.
अक्षर, कुलदीप आणि जडेजा यांच्या कामगिरीचं रोहितनं कौतुक केलं. त्यांनी वेळोवेळी विकेट घेत संघाला कायम पुढं ठेवलं. हार्दिक, हर्षित आणि शमीनंही उत्तम गोलंदाजी केली, असं तो म्हणाला.
पिच स्लो असलं तरी फलंदाजीवर विश्वास होता, असं त्यानं सांगितलं. कोहलीबद्दल बोलताना, कोहलीला कायम देशासाठी उत्तम कामगिरी करायला आवडतं. आम्ही अनेक वर्ष त्याला हे करताना पाहतोय. त्यामुळं आम्हाला त्याच्यावर विश्वास होता, असंही रोहित म्हणाला.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान यानं म्हटलं की, भारतीय संघानं चांगली गोलंदाजी केली त्यामुळं पाकिस्तानच्या फलंदाजांना पुनरागमन करता आलं नाही. काही फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाल्याचा फटका बसला, असंही तो म्हणाला.
"त्यामुळं भारतीय गोलंदाजांनी आणखी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजीतही आम्हाला फार यश आलं नाही. शुबमन गिल आणि कोहलीनं सामना आमच्या हातून खेचून नेला.
फिल्डिंगमध्ये पाकिस्तानच्या खूप चुका झाल्या यात सुधारणा करण्याची गरज आहे," असंही रिझवान म्हणाला.
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानं या सामन्यात पाकिस्तानवर खूप दबाव होता. आता या पराभवानंतर त्यांचं स्पर्धेतं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
शमीच्या दुखापतीने चिंता वाढली
दरम्यान, गोलंदाजीला सुरुवात केल्यानंतर भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची लय फारशी चांगली वाटत नव्हती. त्यानंतर त्यानं गोलंदाजी करतानाच फिजिओंचा सल्ला घेतला.
त्यानंतर तो फिजिओबरोबर ड्रेसिंगरूममध्ये गेल्यानं, शमीच्या दुखापतीच्या मुद्द्यावरून भारतीय संघाच्या चिंता वाढल्या होत्या.
पण शमीच्या जागी गोलंदाजीचा भार खांद्यावर घेतलेल्या हार्दिक पांड्यानं नवव्या ओव्हरमध्ये पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर काहीवेळानं शमी पुन्हा मैदानात आला आणि त्यानं गोलंदाजीही केली. बुमराहच्या अनुपस्थितीत बुमराहवर भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.