भारत-पाकिस्तान : जखमी सचिनचं धाडस, शोएबची माफी अन् सेहवागचा डायलॉग

    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

क्रिकेट हा भारतातील सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे. त्यातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असेल तर मग त्यापेक्षा मोठं दुसरं काहीही असू शकत नाही. त्यामुळं या सामन्यांकडं कायम सगळ्यांच्या नजरा लागून असतात.

आशिया कप स्पर्धेत आज दुबईत भारत-पाकिस्तान (14 सप्टेंबर 2025) यांचा सामना होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार असल्यानं जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची वाटत पाहत आहे.

दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळं भारत आणि पाकिस्तानात यांच्यात फार सामने होत नाहीत. पण आयसीसीद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या मालिका आणि आशिया चषकासारख्या काही स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने येत असतात.

पण, यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात एकमेकांविरोधात क्रिकेट खेळलं आहे. त्या मालिकांमध्ये दोन्ही संघाच्या एकमेकांविरोधातील अनेक आठवणी अनेक किस्से आहेत.

भारत-पाकिस्तानात जेव्हाही अशाप्रकारे सामना होतो तेव्हा एखादं युद्ध असल्यासारखं वातावरण जणू निर्माण झालेलं असतं. त्यामुळं या दोन्ही संघांदरम्यान असे आठवणीतील अनेक किस्से आहेत. असेच काही किस्से आपण जाणून घेणार आहोत.

जखमी सचिनने वाचवला सामना

सचिनच्या अगदी सुरुवातीच्या काळातील पाकिस्तानविरोधातील एक किस्सा प्रसिद्ध आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी अनेकदा हा किस्सा सांगत सचिनचं कौतुक केलं आहे.

1989 मध्ये भारत-पाकिस्तान मालिकेतील चौथा कसोटी सामना सियालकोटमध्ये सुरू होता. 5 विकेट लवकर गेल्यानं भारतीय संघ अडचणीत सापडलेला होता. त्यावेळी सचिन फलंदाजीला आला.

सचिन तेंडुलकरचा तो पहिलाच पाकिस्तान दौरा होता. त्या दौऱ्यात 16 व्या वर्षी वकार युनूस, वसीम अक्रम, इम्रान खान, अकीब जावेद अशा वेगवान गोलंदाजांचा सामना सचिन करत होता.

सचिन फलंदाजीचा आला तेव्हा वसीम अक्रम अत्यंत वेगवान 150-160 वेगानं गोलंदाजी करत होता. असाच एक बाऊन्सर हूक करण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटला लागून सचिनच्या नाकावर आदळला आणि सचिन खाली कोसळला.

"त्यावेळी माझ्या मनात आलेला पहिला विचार म्हणजे, हा मेला की काय?" असं सिद्धू सांगतात.

सचिनच्या नाकातून रक्त वाहत होतं. त्याचे कपडे रक्तानं माखलेले होते. डॉक्टर मदतीसाठी धावले, त्यांनी रक्त पुसत उपचार सुरू केले. सिद्धूला वाटलं होतं, आता नवीन कोणीतरी फलंदाज येईल, म्हणून सिद्धू पॅव्हेलियनकडे पाहत होते, तेवढ्यात त्यांना मागून आवाज आला "मै खेलेगा..". सचिनचा तो नाजूक आवाज ऐकल्यानंतर सिद्धू सचिनजवळ गेले आणि त्याचं कौतुक केलं.

सिद्धू सांगतात की, "त्यानंतर सचिननं त्या ओव्हरमध्ये दोन चौकर खेचले. दिवसाअखेर सचिन नाबाद 67 आणि मी नाबाद 97 वर होतो. त्यादिवशी नंतर भारताची एकही विकेट गेली नाही, आणि आम्ही सामना वाचवला."

तिथूनच सचिन मोठा फलंदाज बनणार याची जाणीव झाली होती, असं सिद्धू सांगतात. याच मालिकेत सचिननं कादीरच्या गोलंदाजीवर मारलेल्या षटाकांचा किस्साही चांगलाच प्रसिद्ध आहे.

कादीर यांनी सचिनला षटकार मारण्याचं आव्हान दिलं आणि सचिननं खरंच त्यांच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचले होते.

गांगुलीबाबत सकलेनचा गैरसमज

भारत आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू यांच्यातलं मैदानावरचं वैर सर्वांनाच माहिती असलं तरी मैदानाबाहेर मात्र दोन्ही संघातले खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.

पाकिस्तानचा प्रसिद्ध फिरकीपटू सकलेन मुश्ताक सौरभ गांगुलीबद्दलचा असाच एक किस्सा अनेकदा शेअर करत असतो. गांगुलीला प्रेमानं सगळेच दादा म्हणतात.

सकलेन आणि दादा एकत्र खेळत होते तेव्हा सुरुवातीला सौरभ गांगुलीकडं पाहून सकलेनला तो रागिट किंवा शिष्ट आहे असं वाटायचं. त्यामुळं सकलेन दादाशी फार काही बोलत नसायचा.

असं बरेच वर्ष सुरू होतं. नंतर दुखापतींमुळं सकलेनच्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर त्यातून सावरत असताना सकलेन ससेक्स काऊंटीकडून क्रिकेट खेळत होता. तेव्हा त्यांचा एक सराव सामना भारतीय संघाबरोबर होणार होता.

त्यावेळी सौरभ गांगुली स्वतः सकलेनसाठी कॉफी घेऊन आला आणि जवळपास अर्धा तास अत्यंत आपलेपणानं त्याची चौकशी, विचारपूस केली होती. आजारपणाबाबत विचारलं. त्यानंतर सकलेनला आपण दादाबद्दल चुकीचा विचार केला याचं वाईट वाटलं.

त्यानंतर काही आठवड्यांनी एका कार्यक्रमात सकलेननं सौरभ गांगुलीला भेटून सगळं काही खरं सांगितलं आणि असा विचार केल्याबद्दल माफीही मागितली होती.

शोएबने मागितली माफी

सेहवागनं शोएब अख्तरबाबत एक किस्सा अनेकदा सांगितलेला आहे. लखनऊमध्ये एकदा भारत-पाकिस्तान संघांसाठी एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शोएब अख्तरही तिथं होता.

शोएब कार्यक्रमात कदाचित थोडी जास्त दारु प्यायला होता, असं सेहवाग सांगतो. त्यामुळं शोएब गमतीत सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करू लागला. पण सचिनला तो सहजासहजी उचलू शकत नव्हता.

त्याचवेळी उचलण्याच्या प्रयत्नात सचिन आणि शोएब दोघंही खाली पडले. सचिनला फार काही लागलं नव्हतं. सेहवागनं मात्र तेव्हा शोएबला चांगलंच घाबरवलं होतं.

"तू भारताच्या सगळ्यात मोठ्या क्रिकेटपटूला पाडलं आहे. आता सचिन बीसीसीआयला सांगेल आणि बीसीसीआय पीसीबीला तक्रार करेल, म्हणजे तुझं करिअर संपलं," असं सेहवाग शोएबला म्हणाला.

त्यामुळं शोएब अख्तर चांगलाच घाबरला होता. त्यानं सचिनला भेटून माफी मागितली आणि आपली तक्रार करू नये असं म्हटलं. पण नंतर त्याला ही सेहवागनं केलेली गंमत असल्याचं समजलं.

युनूसने द्रविडकडून घेतले फलंदाजीचे धडे

2004 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होत होती. त्यावेळी पाकिस्तानचा फलंदाज युनूस खान राहुल द्रविडकडे फलंदाजीसंदर्भात काही टिप्स किंवा सल्ला विचारण्यासाठी गेला होता.

राहुल द्रविड त्यावेळी युनूस खानच्या तुलनेत सिनिअर क्रिकेटपटू होता. शिवाय युनूस पाकिस्तानच्या संघातील होता. तरीही तसा विचार न करता राहुल द्रविड स्वतः युनूस खानकडे मदत करण्यासाठी गेला होता.

राहुल द्रविडनं त्यावेळी युनूसला फलंदाजीसंदर्भात काही सूचना केल्या. त्यानंतर पुढच्या काळात त्या टिप्स लक्षात ठेवून खेळल्यामुळं भविष्यातील फलंदाजीत खूप सुधारणा झाली होती, असं युनूस खाननं स्वतः एका कार्यक्रमात सांगितलं होतं.

मियांदादचे गमतीशीर स्लेजिंग

सुनील गावस्कर पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियांदादबद्दलचा गमतीशीर किस्सा अनेकदा सांगतात.

बंगळुरूत एका सामन्यात भारताच्या एका स्पिनरच्या गोलंदाजीवर जावेद मियांदाद फलंदाजी करत होते. गोलंदाजाला चिडवून त्याचं लक्ष विचलित करयाचं असा जावेद मियांदादचा प्लॅन असायचा.

असाच एका सामन्यात गोलंदाजानं चेंडू टाकला की मियांदाद पुढं येऊन खेळायचा आणि सारखं गोलंदाजा विचारायचा "तुझा रूम नंबर काय?" गोलंदाजाला त्रास द्यायचा हाच त्याचा उद्देश असायचा.

त्याचा सारखा सारखा तोच प्रकार सुरू होता. मियांदाद वारंवार त्याला रूम नंबर काय? असं विचारत होता. शेवटी गोलंदाजाला त्याचा त्रास व्हायला लागला, तेव्हा चिडून "तुला रूम नंबर कशाला पाहिजे," असं त्यानं विचारलं.

त्यावर तुझ्या रूममध्ये मला सिक्स मारायचा आहे, असं म्हणत मियांदादनं त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. मियांदाद नेहमी अशाप्रकारे त्रास देत असायचे असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं आहे.

"बाप बाप होता है... "

स्लेजिंग हा भारत पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सामन्यांचा अविभाज्य भाग असल्याचं पाहायला मिळतं. अशाच एका सामन्यात सेहवाग फलंदाजी करत असताना शोएब अख्तर सारखं त्याला स्लेज करत होता.

2003 च्या वर्ल्ड कपमध्येमध्ये शोएब अख्तर सेहवागला बाऊन्सर बॉल टाकत होता आणि सारखा हूक मारून दाखव असं म्हणून चिडवत होता. काही वेळानं सेहवाग कंटाळला आणि म्हणाला, समोर उभा आहे त्याला असे बॉल टाक तो मारून दाखवेल. समोर सचिन उभा होता.

पुढच्या ओव्हरमध्ये शोएबनं सचिनला बाऊन्सर टाकले, तेव्हा सचिननं त्याला षटकार खेचला. तेव्हा सेहवागनं त्याला 'बाप बाप होता है', असं म्हणत चिडवलं होतं.

सेहवागनं अनेकवेळा हा किस्सा सांगितला आहे. पण शोएबनं मात्र असं काही बोलणं झालं नव्हतं असं म्हणत नकार दिला. असं झालं असतं तर मीही शांत बसलो नसतो, असं शोएबनं एका मुलाखतीत म्हटलं होतं.

(हे सर्व किस्से संबंधित क्रिकेटपटूंनीच विविध कार्यक्रम आणि मुलाखतींमध्ये सांगितले आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.