हिंडनबर्ग काय आहे आणि त्यांच्या एका रिपोर्टमुळे उद्योगविश्व का हादरून जातं?

फोटो स्रोत, Getty Images
‘हिंडनबर्ग रिसर्च’ या अमेरिकन रिसर्च कंपनीने नव्या रिपोर्टमध्ये भारतातील शेअर बाजाराचं नियमन करमाऱ्या ‘सेबी’च्या विद्यमान अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे आरोप केले आहेत.
गेल्या 18 महिन्यांत भारतातील व्यावसायिक आणि वित्तीय बाजारात कथित वित्तीय अनियमिततेबाबत ‘हिंडनबर्गन’ने जारी करण्यात आलेला हा दुसरा रिपोर्ट आहे.
यापूर्वी 2023 साली ‘हिंडनबर्ग’ने उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर रिपोर्ट प्रकाशित करून खळबळ उडवली होती.
हे रिपोर्ट प्रकाशित करणारी हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था नेमकी काय आहे आणि यापूर्वी आलेल्या रिपोर्टमुळे अदानी समूहाला किती नुकसान सहन करावं लागलं होतं, हे आपण या बातमीतून पाहणार आहोत.
हिंडनबर्ग रिसर्च ही अमेरिकन रिसर्च कंपनी आहे. नेथन ऊर्फ नेट अँडरसन नावाच्या अमेरिकन नागरिकाने या कंपनीची सुरुवात केली आहे.
फॉरेन्सिक फायनान्स रिसर्च, वित्तीय अनियमिततांचा तपास आणि विश्लेषण, अनैतिक व्यावसायिक पद्धतीने आणि गुप्त वित्तीय प्रकरणांची चौकशी ही रिसर्च कंपनी करते.
'हिंडनबर्ग' कुणाची कंपनी आहे?
या कंपनीचे प्रमुख नेथन अँडरसन आहेत. त्यांनी 2017 साली ही कंपनी स्थापन केली. त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास केला असून त्यांनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम नावाच्या डेटा कंपनीत अँडरसन यांनी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर काम केलं होतं.
रॉयटर्सच्या बातमीनुसार त्यांनी इस्रायलमध्ये काही काळ रुग्णवाहिका चालवली होती.

फोटो स्रोत, THE WASHINGTON POST/GETTY
लोक तणावात कसं काम करतात हे आपण रुग्णवाहिका चालवताना अनुभवल्याचं अँडरसन लिंक्डीन प्रोफाइलवर लिहितात. त्यांना वैद्यक कामाचा 400 तासांचा अनुभव आहे असं ते सांगतात.
आपले रोल मॉडेल अमेरिकन अकाउंटंट हॅरी मार्कोपोलोस असल्याचे ते म्हणतात.
हॅरी यांनी 2008 साली बेनॉर्ड मॅडॉफ पॉन्झी स्कीममधील भ्रष्टाचाराची माहिती उघड केली होती.
हॅरी यांच्यावर नेटफ्लिक्सवर द मॉन्स्टर ऑफ वॉल स्ट्रीट ही मालिका प्रसिद्ध झाली होती.
हिंडनबर्ग कंपनी स्वत:बद्दल काय सांगते?
गौतम अदानी यांच्या समूहाबद्दल अहवाल देणाऱ्या कंपनीचं हिंडनबर्ग हे नाव जगातील सर्वात मोठ्या उडत्या जहाजाच्या एका घटनेवरुन घेतलंय. या घटनेसंदर्भात आपण पुढे पाहूच.
कंपनी म्हणते, या घटनेनुसार आम्हीही शेअर बाजारातील भ्रष्टाचार आणि अनियमितातंवर नजर ठेवतो, त्यांचं सत्य बाहेर आणणं आमचा उद्देश आहे.
हिंडनबर्ग घटनेत लोकांचं नुकसान झालं होतं. तसं नुकसान शेअर बाजारात होऊ नये यासाठी लोकांना वाचवण्याचं आपण काम करतो असं कंपनीचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोणताही अहवाल करण्यासाठी ही कंपनी काही मार्गांचा वापर करते :
- गुंतवणुकीचा निर्णय देण्यासाठी विश्लेषणाचा आधार घेते
- तपासणीसाठी संशोधन करतात
- सुत्रांद्वारे मिळालेल्या गुप्त माहितीवर संशोधन होतं,
असे तीन मार्ग कंपनीने संकेतस्थळावर सांगितले आहेत.
कंपनी तपास कधी करते?
- लेखा परीक्षणातील अनियमितता असेल तर
- महत्त्वाच्या पदांवर 'अयोग्य' व्यक्ती असेल तर
- अघोषित देवाणघेवाण व्यवहार झाले असल्यास
- कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार, अनैतिक व्यापार झाल्यास
'हिंडनबर्ग' नाव कुठून आलं?
हिंडनबर्ग रिसर्च कंपनीतलं 'हिंडनबर्ग' हे नाव कुठून आलं, हे आपण सविस्तरपणे पाहूया.
हिंडनबर्ग जगाच्या इतिहासातलं सर्वांत मोठं उडतं जहाज होतं. उडतं जहाज, म्हणजे शब्दशः उडतं जहाज.
तेवढं मोठं, तेवढंच आलिशान, त्यात प्रवास करणाऱ्यांसाठी वेगळ्या केबिन, साग्रसंगीत जेवणाचा डायनिंग हॉल... तात्पर्य पाण्यावर तरंगणारं आलिशान जहाज असायचं, तसं हवेत उडणारं जहाज.
हिंडेनबर्गने 1936 साली म्हणजे हा अपघात व्हायच्या आदल्या वर्षी युरोप ते अमेरिका अशा 10 फेऱ्या मारल्या होत्या.
1937 चं प्रवासी वेळापत्रक सुरू झालं तसं मार्च महिन्यात ते एअरशिप ब्राझीललाही जाऊन आलं. 3 मे 1937 ला हिंडनबर्ग फ्रँकफर्टहून निघालं आणि 6 मेला सकाळी ते अमेरिकेतल्या लेकहर्स्टला पोचणार होतं.
या उडत्या जहाजात एकूण 97 लोक होते. 36 प्रवासी आणि 61 कर्मचारी.
ही एअरशिप्स जमिनीवर पूर्णपणे उतरायची नाहीत. तर फ्लाईंग बेसवर असलेल्या मोठ्या मोठ्या उंच खांबावर बांधली जायची.

फोटो स्रोत, BRITISHPATHE
हवेतून हळूहळू वेग कमी करत एअरशिप्स त्या खांबापर्यंत यायची. अर्थात हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. बरोबर योग्य ठिकाणीच एअरशिपचा योग्य तो भाग आला पाहिजे, तरच हे लँडिंग शक्य होतं.
अचूक जागा शोधण्याच्या नादात हिंडनबर्ग हवेतल्या हवेत तीनदा फिरलं. पण शेवटी चौथ्यांदा ते योग्य ठिकाणी आलं. संध्याकाळचे साडेसात वाजले होते. लँडिंगची प्रक्रिया सुरू असतानाचा जमिनीवरच्या काही प्रत्यक्षदर्शींना वरच्या भागातून वायूगळती होतेय असं दिसलं.
काहींनी म्हटलं की त्यांना निळ्या रंगाची ज्वाला दिसली.
काही क्षणातच हिंडनबर्गने पेट घेतला, लाल-पिवळ्या रंगाच्या ज्वाळांचा लोट उठला. हिंडेनबर्गचा स्फोट झाला होता.
एअरशिपमध्ये असलेल्या 97 लोकांपैकी 35 आणि जमिनीवरची एक व्यक्ती अशा 36 लोकांची जीव गेला.
अनेकांनी पेटत्या एअरशिपमधून उड्या टाकून आपला जीव वाचवला. पण जे वाचले तेही गंभीररित्या भाजले होते.
37 सेकंदात हिंडनबर्गचा खेळ संपला होता.
अदानींच्या साम्राज्याला कसा दिला धक्का
गेल्यावर्षी म्हणजे 24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबाबतचा पहिला रिपोर्ट प्रकाशित केला होता. हा रिपोर्ट आल्यानंतर भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला होता.
या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांना 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. अहवाल समोर आल्यानंतर एका महिन्यात अदानी समूहाची एकूण संपत्ती 80 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6.63 लाख कोटी रुपयांनी घसरली.
हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर दहा दिवसांत गौतम अदानी श्रीमंतांच्या 'टॉप 20' यादीतून बाहेर पडले.
याशिवाय गौतम अदानी यांना त्यांच्या कंपनीचा 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओही रद्द करावा लागला. या कंपनीचं मोठं नुकसान झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या अहवालामुळे भारतात राजकीय वादळ निर्माण झालं आहे. कंपनीच्या कथित आर्थिक अनियमिततेबाबत संसदेत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं.
3 जानेवारी 2024 रोजी, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हिंडेनबर्ग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यासाठी किंवा हा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याची मागणी फेटाळून लावली.
सुप्रीम कोर्टाने सेबीवर यासाठी विश्वास दाखवला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून सांगितलं की, "सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सत्याचा विजय झाला आहे. माझ्यासोबत उभ्या राहिलेल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. भारताच्या विकासात आम्ही योगदान देत राहू."
हिंडनबर्ग आणि शॉर्ट सेलिंग
आपण करत असलेला Fundamental Research आपण कंपनीच्या गुंतवणुकीबद्दलचे निर्णय घेण्यासाठी करत असल्याचं हिंडनबर्गची वेबसाईट सांगते. ही हिंडनबर्ग कंपनी Short Selling करते. या शॉर्ट सेलिंगवरून अनेकांनी हिंजनबर्गच्या हेतूंवर आणि कामावर शंका उपस्थित केल्या.
सहसा शेअर बाजारातून नफा कमावण्याचा एक मार्ग म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स कमी किंमतीला विकत घ्यायचे आणि भाव वधारल्यावर विकायचे. 100 रुपयांना खरेदी करून 150 रुपयांना विकायचा आणि त्यातून नफा कमवायचा.
याच्याबरोबर उलटी प्रक्रिया शॉर्ट सेलिंगमध्ये होते. इथे गुंतवणूकदाराला वाटत असतं, की कंपनीच्या शेअर्सचा भाव काही कारणामुळे जास्त आहे आणि तो पडेल म्हणजेच कमी होईल. हा गुंतवणूकदार आधी चढ्या भावाला शेअर्स विकतो आणि घसरणीनंतर कमी दराला तेच शेअर्स विकत घेतो.
आता मुळात आपल्याकडे नसलेले शेअर्स आधी विकता कसे येतात, हा व्यवहार कसा होतो...हे समजून घ्यायचं असेल, तर शॉर्ट सेलिंगबद्दल इथे वाचा - शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?
हे शॉर्ट सेलिंग कायदेशीर आहे. ही हिंडनबर्ग कंपनी त्यांच्या संशोधनानंतरचा अहवाल प्रसिद्ध करण्याआधी Board of Investors ना देते आणि त्यानुसार शेअरबाजारात Short Positions घेते.
अदानी समूहाबद्दलचा जानेवारी 2023चा अहवाल जाहीर केल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीमध्ये खूप मोठी घसरण झाली आणि या घसरणीचा फायदा Short Selling मधून हिंडनबर्गला झाला. हिंडनबर्गने यातून 4 मिलीयन डॉलर्स कमावल्याचं मिंटने त्यांच्या बातमीत म्हटलंय.











