पठाणकोट हल्ल्याचा 'मास्टरमाइंड' शाहिद लतीफचं 'टार्गेट किलिंग' नेमकं कसं झालं?

    • Author, मोहम्मद जुबैर खान
    • Role, पाकिस्तानतून बीबीसीसाठी

मौलवी शाहिद लतीफ यांची बुधवारी ( 11 ऑक्टोबर) पाकिस्तानातील सियालकोटमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

असा दावा केला जात आहे की, हे तेच शाहिद लतीफ आहेत, ज्यांना भारत 2016 सालच्या पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड मानतो.

पठाणकोटमध्ये झालेल्या कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात सात भारतीय जवानांनी प्राण गमावले होते. या हल्ल्यात सहभागी असलेले सर्व कट्टरवादी मारले गेले.

सियालकोट पोलिसांनी हत्येला दुजोरा दिला असून घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. पठाणकोट हल्ल्याशी संबंधित शाहिद लतीफ आणि मारली गेलेली व्यक्ती एकच आहे का, यावर पाकिस्तानी पोलिसांनी काहीही सांगितलेलं नाही.

पण स्थानिक पत्रकार माजिद निजामी म्हणतात की "हा तोच शाहिद लतीफ होता, ज्याला भारत सरकार पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड मानतो. सियालकोटमध्ये बुधवारी हत्या झालेल्या शाहिद लतीफचा पठाणकोट हल्ल्याशी संबंध असल्याचा दावाही भारतीय माध्यमांनी केला आहे."

सियालकोट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दस्का तहसीलमध्ये बुधवारी सकाळी नमाजाच्या वेळी ही घटना घडली. असा आरोप आहे की शाहिद लतीफ जैश-ए-मोहम्मद या कट्टरवादी संघटनेशी संबंधित असून पठाणकोट हल्ल्याप्रकरणी वॉन्डेट होता.

पोलिसांनी दस्का सदर पोलीस ठाण्यात खून आणि दहशतवादाच्या कलमांतर्गत नोंद केली आहे. नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी गुरायाच्या नूर मशिदीत तैनात असलेल्या गार्डच्या वक्तव्याचा हवाला देत म्हटलं आहे की, "11 ऑक्टोबर रोजी सकाळी 20 ते 22 वर्षे वयोगटातील तीन अज्ञात तरुण नमाज अदा करण्याच्या बहाण्यानं मशिदीत घुसले."

तक्रारीनुसार, "लोक मशिदीत नमाज पढण्यासाठी उभे राहताच तिघांनीही गोळ्या झाडायला सुरुवात केली. या घटनेत मौलाना शाहिद लतीफ, मौलाना अब्दुल अहद आणि हाशिम नावाचे तिघं जखमी झाले."

एफआयआरमध्ये असं म्हटलं आहे की, "मौलाना शाहिद लतीफ यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं हाशिम यांचाही मृत्यू झाला."

ही टार्गेट किलिंगची घटना : पाकिस्तानी पोलीस

सियालकोट पोलिसांच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे.

दरम्यान, सियालकोटचे डीपीओ मोहम्मद हसन यांनी स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितलं की, "अज्ञात सशस्त्र लोक मशिदीत घुसले होते, त्यांनी मशिदीच्या आत गोळीबार केला. ही एक दहशतवादी घटना आहे. याला आपण टार्गेट किलिंग असंही म्हणू शकतो. मौलाना शाहिद लतीफ आणि हाशिम यांना वाचवता आलं नाही, पण हल्ल्यात अब्दुल अहद जखमी झाला."

ते म्हणाले, "पोलिसांना घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत, आम्ही त्यावर काम करत आहोत. शाहीद लतीफला आधीच धोका होता आणि त्यानं या संदर्भात आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली होती. या प्रकरणाची सर्व यंत्रणा एकत्रितपणे चौकशी करत आहेत."

अपघातानंतर नाकाबंदी बाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर डीपीओनं दावा केला की, "अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते."

मौलाना शाहिद लतीफ कोण आहे?

पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील रहिवासी मौलाना शाहिद लतीफ हे अनेक वर्षांपासून दस्का येथील नूर मदिना मशिदीचा प्रशासक म्हणून कार्यरत होते.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबात पत्नीशिवाय त्यांना दोन मुलं आहेत. काश्मीर प्रकरणातील जाणकार ज्येष्ठ पत्रकार माजिद निजामी म्हणतात की, मौलाना शाहिद लतीफ यांनी बराच काळ भारतीय तुरुंगात काढला आहे.

ते सांगतात, "90 च्या दशकाच्या सुरुवातीस तो पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधून भारत प्रशासित काश्मीरमध्ये गेला. त्यावेळी तो हरकत अल-मुजाहिदीन या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित होता. काही काळ तो सक्रिय राहिला."

पुढे ते सांगतात की, "त्याकाळी मुजाहिद्दीनचा नेता असलेल्या सज्जाद अफगानीच्या नेतृत्वाखाली आदोंलन सुरू होतं. त्यात सहभागी असलेल्या शाहिदला भारत सरकारनं अटक करून बनारस तुरुंगात ठेवलं होतं."

1999 मध्ये कंदहार विमान अपहरणाच्या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान ज्या 40 जणांची नावं सोडण्यासाठी भारताला देण्यात आली होती, त्यात शाहिद लतीफ यांचं नाव होतं. मात्र, वरिष्ठ नेतृत्वात त्यांचा समावेश करण्यात आला नाही.

माजिद निजामी म्हणतात की "त्यानंतरच्या वाटाघाटीनंतर केवळ पाच जणांना तुरुंगातून सोडण्यात आलं आणि त्यात शाहिद लतीफचा समावेश नव्हता."

2010 मध्ये शाहिद यांची भारतीय तुरुंगातून सुटका झाली, त्यानंतर ते पाकिस्तानात गेले. माजिद निजामी म्हणतात की "त्याच्या सुटकेनंतर, तो क्वचितच पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये राहिला."

माजिद निजामी यांच्या म्हणण्यानुसार, "शाहिद लतीफच्या जैश-ए-मोहम्मद किंवा हरकत अल-मुजाहिद्दीनशी संबंधीत कारवाया बऱ्याच दिवसांपासून प्रकाशात येत नव्हत्या. मात्र, जानेवारी 2016 मध्ये भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट विमानतळावर हल्ला झाला तेव्हा इंटरपोलनं त्याच्या नावानं रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती."

भारताचा दावा आहे की सुरक्षा एजन्सींनी फोन कॉलद्वारे हल्ल्याची योजना आखणारा गट ओळखला होता, ज्यामध्ये शाहिद लतीफ यांचाही समावेश होता. यानंतर शाहिद लतीफवर भारतात काही गुन्हे दाखल करण्यात आले होते.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, "त्याला 12 नोव्हेंबर 1994 रोजी अटक करण्यात आली होती, त्यानंतर तो 16 वर्षे भारतीय तुरुंगात होता. नंतर त्याची सुटका झाल्यावर वाघा मार्गे तो पाकिस्तानला पोहोचला."

माजिद निजामी यांच्या म्हणण्यानुसार, शाहिद लतीफ अशा लोकांपैकी एक होता ज्याला भारत शोधत होता. ते म्हणतात, "हे टार्गेट किलिंगचे प्रकरण असल्याचं दिसतं."

पत्रकार फैजुल्लाह खान यांचंही तेच मत आहे. शाहिद लतीफ यांच्या हत्येच्या काही दिवस आधी अबू कासिम (ज्याचा जमात-उद-दावाशी संबंध असल्याचं म्हटलं जातं) याची पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये हत्या करण्यात आली होती,

तीही अशाच पद्धतीने करण्यात आली होती, असं त्यांचं म्हणणं आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, फज्रच्या नमाजच्या वेळी रावळकोटमधील अल-कुद्स मशिदीमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

शाहिद लतीफ काही दिवसांपासून सतर्क

शाहिद लतीफ यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार, "मौलाना गेल्या दिवसापासून अधिक सावध होता आणि त्यानं लोकांना भेटणेही बंद केलं होतं."

नाव न सांगण्याच्या अटीवर एका नातेवाईकानं बीबीसीला सांगितलं की,

"अलीकडच्या काही दिवसांपासून तो खूप सावधगिरी बाळगून होता. त्यानं त्याच्या हालचालीही मर्यादित केल्या होत्या. त्यानं अनेकदा आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं."

फैजुल्लाह खान यांच्या म्हणण्यानुसार, "शाहिद लतीफच्या हत्येपूर्वी जैश-ए-मोहम्मदचा इब्राहिम मिस्त्री, हिजबुल-मुजाहिद्दीनचा इम्तियाज आलम आणि लष्कर-ए-तैयबाचा अबू कासिम यांना मशिदीमध्ये नमाज अदा करताना लक्ष्य करण्यात आलं होतं."

ते सांगतात, "हल्लेखोरांनी त्यांना मारण्यासाठी नमाजची वेळ निवडली असावी कारण ते यावेळी स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीत. आणि कदाचित या लोकांनी विचार ही केला नसेल की त्यांना मशिदीत लक्ष्य केले जाऊ शकतं."

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)