नक्षलग्रस्त भागात टॅक्सी चालवणाऱ्या किरणचं इंग्लंडमध्ये शिकण्याचं स्वप्न पूर्ण होणार का?

- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मला काही दिवसांपूर्वीच कळालं की माझं अॅडमिशन लंडन येथील लीड्स विद्यापीठात झालं आहे. एका नक्षलग्रस्त भागातून थेट लंडनला शिक्षणासाठी जाण्याचं माझं स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. पण समोर अनेक अडचणी आहेत."
गडचिरोली जिल्ह्यातील रेंगुठा या नक्षलग्रस्त भागातील गावात राहणारी किरण कुरमावार बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होती.
खरं तर किरण कुरमावार हीने यापूर्वीही एक नावलौकिक मिळवला आहे. दुर्गम भागातील सर्वात कमी वयातील महिला ड्रायव्हर म्हणून 'नोबेल वर्ल्ड रेकाॅर्ड्स' यांनी तिची दखल घेतली आहे.

फोटो स्रोत, KIRAN
ज्या भागात रात्री सहा ते सात वाजल्यानंतर कुणी घराबाहेरही पडू शकत नाही, अशा नक्षलग्रस्त भागात किरण कुरमावार हीचा जन्म झाला.
27 वर्षीय किरण कुरमावार हीला नुकतंच लंडन येथील लीड्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय मार्केटींग मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे.
अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीत लहानाची मोठी झालेली किरण गडचिरोलीहून थेट आता लंडनला जायची तयारी करत आहे.
किरणचा आतापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा होता? जाणून घेऊया.
'... म्हणून माझं नाव किरण ठेवलं'
किरणचा जन्म नक्षलग्रस्त अशा संवेदनशील भागातील रेंगुठा गावात झाला. आई, वडील आणि तीन बहिणी असं त्यांचं कुटुंब. तिच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत.
"मी आमच्या घरातील तिसरी मुलगी. आमच्याकडे लोक मुलगी 18 वर्षांची होण्यापूर्वीच तिचं लग्न करून देतात. पण माझे वडील म्हणतात की आम्ही तुला मुलाप्रमाणे मोठं केलंय. म्हणूनच तुझं नाव किरण ठेवलं आहे. यामुळे मला आणि माझ्या बहिणींनाही आई-वडिलांनी शिकवलं," किरण सांगत होती.
रेगुंठा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत किरणचं शिक्षण झालं. यानंतर तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
"तीन वर्ष मी 3 किलोमीटर रोज चालत जायचे आणि चालत शाळेतून यायचे. काहीच सोयी सुविधा आमच्या भागात नाही. पण माझी मोठी बहीण त्यावेळी हैद्राबाद येथील विद्यापीठात पदवीचं शिक्षण घेत होती. तिला पाहून मी सुद्धा शिकायचं ठरवलं," किरण सांगते.
रेगुंठा हे गाव महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर आहे. यामुळे या भागातील बरेच लोक कामासाठी, शिक्षणासाठी तेलंगणात जातात.
किरणचं अकरावी ते पदवीपर्यंतचं शिक्षणही हैद्राबाद येथील उस्मानीया विद्यापीठात पूर्ण झालं. यानंतर किरणने इकाॅनाॅमीक्स विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.

फोटो स्रोत, KIRAN
"एका दुर्गम गावातून हैद्राबादला शिकायला जाणं खूप आव्हामात्मक होतं. शिक्षणाचा खर्च सरकारी योजनेतून झाला पण हाॅस्टेल आणि बाकी खर्चही आमच्यासाठी कठीण होता. शिवाय तिकडे गेल्यावर सुरुवातीला गावठी म्हणून आमच्याकडे पाहिलं जायचं. कोणी बोलायचं नाही. काही विचारलं तर मदत करायचे नाही. ह्या काळात मी खूप शिकले," असं किरण सांगते.
गावातून, दुर्गम भागातून आल्याने आमचं शिक्षणही गुणवत्तेचं नव्हतं. आमच्या शाळांमध्येही नीट शिकवलं गेलं नाही हे मला हैद्राबादला गेल्यावर कळालं, तिकडे आम्हाला भाषेची मोठी अडचण झाली, असंही किरण सांगते.
किरण कुरमावार हीची मातृभाषा तेलगू पण तिचं शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झालं आहे. "पण आपण हैद्राबादच्या विद्यापीठात गेल्यावर सर्वकाही इंग्रजी भाषेतून शिकावं लागत होतं यामुळे सुरुवातीला खूप त्रास झाला. मी घरी येऊन आईजवळ रडायचे," असंही ती सांगते.
हा अनुभव गाठीशी असल्याने आता लंडनच्या लीड्स विद्यापीठात जाण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत, असंही ती आत्मविश्वासाने सांगते.
हैद्राबाद येथून इकाॅनाॅमिक्स विषयात एमए पूर्ण करून किरण आपल्या गावी परतली. पण परदेशातून उत्तम दर्जाचं शिक्षण घ्यायचं असं किरणने ठरवलं होतं. यानुसार तिने चार विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज केला होता.

फोटो स्रोत, KIRAN
यासाठी तिने प्रवेश पूर्व परीक्षा दिल्या आणि अखेर लंडनमधील लीड्स विद्यापीठातून इंटरनॅशनल मार्केटींग मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी तिची निवड झाली.
किरणचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण तिला याचीही जाणीव होती की आपल्यासमोर अडचणींचा डोंगर आहे.
सगळ्यात पहिली अडचण पैश्यांची. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किरणला 40 लाखांहून अधिक पैश्यांची आवश्यकता असल्याचं किरण सांगते.
यासाठी तिने राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या स्पेशल बॅकवर्ड क्लास स्काॅलरशीपसाठी अर्ज केला. बरेच दिवस झाले तरी तिला स्काॅलरशीपसाठी काही प्रतिसाद न मिळाल्याने किरणने थेट मुंबईतील विधिमंडळ गाठलं.
अधिवेशनादरम्यान, विधानपरिषदेत आमदार सचिन अहीर यांनी किरणच्या स्काॅलरशीपसाठी अर्ज केल्याचा प्रश्न उपस्थित केला. तिला स्काॅलरशीपसाठी 40 लाख रुपयांची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यानंतर तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात समाज कल्याण विभागातील सचिवांना फोन करून स्कॉलरशीपची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली.
"10 ऑगस्टपूर्वी स्काॅलरशीपची रक्कम मिळेल," असं आश्वासन दिल्याचंही किरणने सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
18 सप्टेंबरपासून लीड्स विद्यापीठात किरणचा कोर्स सुरू होत आहे. यापूर्वी तिला व्हिजा आणि इतर बर्याच प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत.
किरण सांगते, "मी आई वडिलांना सांगितल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की आम्हाला हे परवडणार नाही. एवढा खर्च आम्ही कुठून करणार? पण मी त्यांना सांगितलं की स्काॅलरशीप मिळाली तरच मी जाणार. आता सरकारकडून स्काॅलरशीप वेळेत मिळणं खूप गरजेचं आहे. नाहीतर पूर्ण प्रक्रियेला विलंब होईल."
"मी तिकडे कशी राहणार? इंग्रजी भाषेची अडचण याचं टेंशन आहे. मी तीन वर्ष आई वडिलांना सोडून राहिलेले नाही त्यांचीही आठवण येणार. हैद्राबाद वेगळं राज्य होतं पण हा वेगळा देश आहे तिकडे काही अडचण आली तर काय करायचं अशी भीती आहे," असंही किरण सांगते.
'दुर्गम भागातील पहिला महिला जीप चालक'
हैद्राबाद येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून आल्यावर किरण नोकरीची किंवा पुढील शिक्षणासाठी तयारी करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत किरणच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
कुरमावार कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे त्यांचं गावातलं एक छोटं दुकान आणि वडाप (जीप) चालवणं. किरणचे वडील वडाप चालवून कुटुंबाचा खर्च भागवायचे.
गावातल्या लोकांना तालुक्यापर्यंत रोज घेऊन जायचं आणि आणायचं हे काम ते करत होते. परंतु 2018 मध्ये किरणच्या वडिलांचा अपघात झाला. ज्यात वडिलांच्या पायाला दुखापत झाली. ते काही काळ वडाप चालवू शकणार नव्हते.
घरातली परिस्थिती पाहता किरणने वडापची गाडी (जीप) चावण्याचा निर्णय घेतला. जंगलातल्या, डोंगराळ भागातल्या रस्त्यांवर गाडी कशी चालवणार? असा प्रश्न होता पण किरणने आपल्या वडिलांकडून वडाप चालवायला शिकली.
तरीही तिचं आव्हान इथेच संपलं नव्हतं. यापूर्वी बीबीसी मराठीने गडचिरोली येथे जाऊन किरणची मुलाखत घेतली होती. त्यावेळी ती म्हणाली होती, "पहिल्या दिवशी गाडी चालवताना सर्व माझ्याकडेच पाहत होते. ही कोण आहे, ही कोण आहे असं विचारत होते. कारण जास्त करून मुलंच गाडी चालवताना दिसतात, मुलगी गाडी चालवते म्हटलं तर वेगळचं वाटतं असेल त्यांना."

फोटो स्रोत, KIRAN
"आमचं काम प्रवाशांना गोळा करुन त्यांना पोहचवणं असतं. प्रवाशांना गोळा करताना आमच्या गावच्या लोकांना भीती वाटत नव्हती, पण इतर गावातील लोक अरे मुलगी गाडी चालवत आहे, अपघात करेल म्हणून ते बसत नव्हते. माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. एखादा महिना माझ्याच गावातील लोक बसत होते. नंतर थोडा थोडा विश्वास ठेऊन ते बसायला लागले,"
जवळपास चार वर्ष किरणने वडाप चालवून घराची जबाबदारी सांभाळली. आजही ती वडिलांसोबत गाडी चालवते.
नक्षलग्रस्त भागातील पहिली महिला टॅक्सी चालक म्हणून किरणचं कौतुकही झालं. इंडिया बुकमध्ये तिच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.
"मी दररोज 7 वाजता घरुन गाडी काढते आणि 8 वाजेपर्यंत सर्व प्रवासी गोळा करुन 8 वाजता रेंगुठावरुन सिंरोचा जायला निघते. 70 किमीचा हा रस्ता आहे. रस्ते खराब असल्याने सिंरोचा पोहचायला मला 3 तास लागतात.
"सिरोंचा तहसिलच्या आणि इतर कामासाठी गेलेले प्रवाशी परत आले की त्यांना गोळा करुन 3 वाजता परत रेंगुठाला परत निघतो. सर्व प्रवाश्यांना त्यांच्या गावी पोहोचवून 6 ते 7 वाजेपर्यंत टॅक्सी घेऊन मी घरी येते," असंही किरण सांगते.
जंगलात गाडी पंक्चर झाली तर मुलगी ड्रायव्हर काय करणार, ती पंक्चर काढू शकते का असंही लोक बोलायचे असं ती सांगते.
'गावात शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आहे'
लंडनमधला अभ्यासक्रम हा एक वर्षाचा आहे. त्यानंतर दोन वर्ष मी तिथे नोकरी किंवा पार्ट टाईम जाॅब करण्याचा माझा विचार आहे.
"गावात परत आल्यानंतर मला इथल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. जिल्ह्याच्या बाहेर चांगल्या विद्यापीठांमध्ये गुणवत्ता शिक्षण मिळतं. त्यासाठी मुलांनी प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं. त्यासाठी मला काम करायची इच्छा आहे," असं किरणने सांगितलं.
सध्या तरी किरण कुरमावारची स्काॅलरशीप समाज कल्याण विभागाने मंजूर केली आहे. परंतु प्रत्यक्षात स्काॅलरशीपचे पैसे तिला अद्याप मिळालेले नाहीत.
पुढच्या काही दिवसात हे पैसे मिळतील असं आश्वासन तिला सरकारने दिलं आहे.
लीड्स विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर तिने आपली जागा निश्चित करून घेतली आहे. आता ती आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात व्हिजासाठी प्रयत्न करणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








