You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अभिनेत्री खुशबू सुंदर, 'आठ वर्षांची असताना वडिलांनीच माझं लैंगिक शोषण सुरु केलं'
- Author, दिव्या जयराज
- Role, बीबीसी तमीळ
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि राजकीय नेत्या खुशबू सुंदर यांनी आपल्या वडिलांबद्दल धक्कादायक खुलासा केला. 8 वर्षांची असताना वडिलांनी लैंगिक शोषण केल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
मागील 12 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेल्या खुशबू यांनी गेल्याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अलीकडेच त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त आयोजित 'वुई द वूमन' कार्यक्रमात खुशबू सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करणाऱ्या गोष्टी सांगितल्या.
या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, "मी आठ वर्षांची असतानाच माझं लैंगिक शोषण सुरु झालं. जर मी माझं तोंड उघडलं तर ते माझ्या आईला आणि भावाला मारहाण करण्याची धमकी द्यायचे. त्यामुळे मी कधीच यावर व्यक्त झाले नाही.”
माझ्या वडिलांना वाटायचं की पत्नी आणि मुलांना मारहाण करणं हा त्यांचा अधिकार आहे. आपल्या एकुलत्या मुलीचं लैंगिक शोषणही करणं त्यांचा हक्क असल्याचं त्यांना वाटायचं. माझ्या आईचं वैवाहिक जीवन फार त्रासदायक होतं.
वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांविरोधात आवाज उठवण्याचं धाडस माझ्यात आलं. मला वाटायचं की, माझ्या आईने माझ्यावर विश्वासच ठेवला नाही तर? कारण ती एकनिष्ठ पत्नी होती, तिच्यासाठी पती परमेश्वराच्या ठिकाणी होते. मात्र मला जसंजसं कळायला लागलं तसं मी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली.
त्या पुढे सांगतात, "या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षी मी धैर्य एकवटलं. एक स्त्री म्हणून जेव्हा तुम्ही घरातल्या पुरुषाविरोधात उभे राहण्याची हिंमत दाखवता तेव्हा तुमच्यात जगातल्या इतर कोणत्याही गोष्टीला तोंड देण्याची हिंमत असते."
खुशबू यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि लहानपणी झालेल्या अत्याचाराबद्दल खुलासा केल्याने देशात बाल लैंगिक शोषणाच्या चर्चेला उधाण आलंय.
याप्रकरणी बीबीसी तमिळने खुशबू यांच्याशी संपर्क साधून आणखीन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "माझ्यावर लहानपणी झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल आज मी उघडपणे व्यक्त झाल्याने माझ्या मनावरील कित्येक वर्षांचा भार हलका झालाय."
त्या पुढे सांगतात की, "वयाच्या अवघ्या आठव्या वर्षात तुम्हाला लैंगिक छळाचा सामना करावा लागतो. या वयात आपल्याला काहीच करता येण्यासारखं नसतं. ही क्रूरता आहे. पण आज जर मी ते उघडपणे व्यक्त करत असेन तर याचा अर्थ मी यातून सावरले आहे. या घटनेला आज खूप वर्ष लोटली. ज्यांना या अत्याचारांना सामोरं जावं लागतं त्यांच्या वेदना न समजण्यासारख्या असतात.
90% लैंगिक छळाची प्रकरणं ही आपल्या आजूबाजूच्या, आपल्या ओळखीच्या लोकांकडून झाल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. बाल लैंगिक शोषण असो वा महिला शोषण, मी कायमच याविरोधात आवाज उठवला आहे. कारण या सर्व गोष्टी मी अनुभवल्या आहेत. जेव्हा एखाद्यावर लैंगिक अत्याचार होतो तेव्हा त्याच्या जखमा भले ही बऱ्या होतील पण त्याचे व्रण मनात कायम राहतात. "
त्या सांगतात, "आपल्या समाजात एखादी महिला लैंगिक छळाबद्दल बोलत असेल तर समाज तिलाच प्रश्न विचारतो. त्याने तुझा विनयभंग केला, असं तू काय केलंस? तू कशाप्रकारचे कपडे घातलेस, तू तिथे का गेलीस? तू त्याच्याशी का बोललीस? पण आपला समाज ज्यांनी चूक केली आहे अशा पुरुषांना कोणतेच प्रश्न विचारत नाही."
आता मी माझ्या वडिलांनी केलेल्या अत्याचाराबाबत बोलले त्यावर सोशल मीडियावर खूप जण चर्चा करू लागले. ट्विटरवर असणारे एक प्राध्यापक म्हणतात, "तुमच्यावर लहानपणी झालेल्या अत्याचाराबद्दल तुम्ही बोलताय. पण यामुळे लोक तुमच्या वडिलांची चुकीची प्रतिमा निर्माण करणार नाहीत का आणि तुमची मुलं त्यांच्या आजोबांबद्दल चुकीचा विचार करणार नाहीत?"
म्हणजे हे प्रश्न त्यांनी मलाच विचारले आहेत. थोडक्यात समाजाला आजही पुरुषांच्या प्रतिमेची चिंता आहे. या समाजात सुशिक्षित लोकांची स्थिती वाईट आहे.
खुशबू म्हणतात की, म्हणूनच मी एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छिते की, कोणत्याही पीडितेने तिच्यावर झालेल्या लैंगिक छळाबद्दल बोलण्यास लाजू नये. अशा चुका करणाऱ्या पुरुषांनाच खरी लाज वाटली पाहिजे. आज मी माझा अनुभव सांगितला त्याचं कारण ही हेच आहे.
ज्यांनी चुकीचं काम केलंय त्यांच्यावर निर्भीडपणे सार्वजनिकपणे आरोप करायला हवेत. तुम्ही जर बोललाच नाहीत तर त्या चुकीच्या लोकांना तुम्ही शिक्षा कशी मिळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्या पुढे सांगतात की, "लैंगिक छळाबद्दल बोलल्यास त्या मुलांच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होईल, असं म्हटलं जातं. पण वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंत माझ्यावर लैंगिक अत्याचार होत राहिले. नंतर मी यावर धैर्याने बोलायला लागले. मी स्वत: काम करायला सुरुवात केली आणि मी समाजात मानाच्या समजल्या जाणाऱ्या एका स्थानावर पोहोचले. कुटुंबप्रमुख म्हणून अनेक जबाबदाऱ्या पेलताना, माझ्या वडिलांच्या चुका निदर्शनास आणून त्यांचा सामना केल्याने माझ्या आयुष्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही."
खुशबू सांगतात, "थोडक्यात, माझ्या वडिलांनी माझ्यासोबत जे काही वाईट केलं त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. त्यांच्या मृत्यू वेळीही माझे भाऊ तिथे गेले नव्हते. ते बेवारस होते आणि यालाच कर्म म्हणतात."
आपल्या मुलांचा लैंगिक छळ झाल्याचं लक्षात येताच पालकांनी पुढे येऊन गुन्हा दाखल करण्याचं धाडस दाखवावं. पोक्सो कायदा, सोशल मीडिया आणि इतर अनेक सामाजिक संस्था तुम्हाला पाठिंबा देतील असं खुशबू यांना वाटतं.
त्या शेवटी सांगतात, "आज इतके वर्ष लोटली आणि त्यानंतर मी याविषयी बोलण्याचं धाडस केलं. माझ्या मुलांनी मला ते धैर्य दिलं, शिवाय माझ्या पतीनेही मला साथ दिली. पण मला सर्वांनीच मला पाठिंबा दिला असं म्हणता येणार नाही. पण काळ बदलतोय. त्यामुळेच मी पुन्हा एकदा सांगते की, या समाजात काही गोष्टींमध्ये बदल व्हायलाच हवा."
तमीळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा
खुशबू यांचा जन्म 1970 साली महाराष्ट्रात मुंबईमध्ये झाला. त्यांचा विवाह अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सुंदर सी यांच्यासोबत झाला आहे.
खुशबू या तमीळ फिल्म इंडस्ट्रीतलं प्रसिद्ध नाव असलं तरीही त्यांचं चित्रपटसृष्टीतलं पदार्पण हे हिंदी सिनेमामधून झालं होतं...तेही बालकलाकार म्हणून. 'द बर्निंग ट्रेन' चित्रपटातल्या एका गाण्यामध्ये खुशबूही होत्या. त्यांनी लावारिस, कालियासारख्या चित्रपटातूनही बाल कलाकार म्हणून काम केलं.
1985 साली त्या 'मेरी जंग' चित्रपटात अभिनेता जावेद जाफरीसोबत झळकल्या.
पुढच्याच वर्षी त्यांचं तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आणि नंतर त्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच चमकल्या.
त्यांनी प्रामुख्यानं तमीळ चित्रपटांमधूनच काम केलं. त्यांनी काही मल्याळम तसंच कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला. त्यांनी जवळपास 150 चित्रपटांतून काम केलं. रजनीकांत, कमल हासन, मामुट्टी, मोहनलाल यांसारख्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं आहे.
राजकारणातला प्रवास
खुशबू यांनी 2010 साली द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) या पक्षात प्रवेश केला. 'कठोर परिश्रम हीच एकमेव गोष्ट डीएमकेमध्ये महत्त्वाची आहे,' असं खुशबू यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
पण चार वर्षांतच त्यांनी डीएमके पक्ष सोडला.
डीएमकेचे प्रमुख एम करूणानिधी यांनी आपला वारसदार म्हणून स्टॅलिन यांचं नाव पुढे केल्यानंतर खुशबू यांनी एका मुलाखतीत या निवडप्रक्रियेवर आक्षेप घेतले होते. त्यावरून वादही झाला होता.
"मी पक्षाला 100 टक्के दिलं, पण मला काहीच मिळालं नाही. मी डीएमकेसोबतचे माझे सर्व संबंध आता तोडत आहे, यापुढे माझा पक्षाशी संबंध नसेल. अतिशय जड अंतःकरणानं मी डीएमकेचं सदस्यत्व सोडत आहे," असं खुशबू यांनी तेव्हा म्हटलं होतं.
त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. "मला माझ्या घरी आल्यासारखं वाटत आहे," असं खुशबू यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
मार्च 2015 मध्ये काँग्रेसनं खुशबू यांची नियुक्ती प्रवक्त्या म्हणून केली. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांना पदावरून दूर करण्यात आलं.
त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
रोखठोक भूमिकांसाठी प्रसिद्ध
खुशबू यांनी लग्नापूर्वी शारीरिक संबंधांचं समर्थन केल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. 2005 साली दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, आपली बायको 'व्हर्जिन' असायला हवी अशी अपेक्षा पुरूषांनी ठेवू नये. लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवताना मुलींनीही खबरदारी घ्यायला हवी.
त्यांच्या या वक्तव्याविरोधात अनेकांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधातली सर्व प्रकरणं फेटाळून लावली होती.
दिल्ली बलात्काराच्या घटनेबद्दल चूक ही एका बाजूनंच होत नाही, असं वक्तव्य करणाऱ्या आसारामबापूंवर खुशबू यांनी कठोर टीका केली होती.
'आसारामबापूंची ही वक्तव्यं असंवेदनशील आहेत. त्यांच्या समर्थकांनी त्यांचं अनुसरण करणं थांबवावं,' असं खुशबू यांनी म्हटलं होतं. खुशबू यांच्या या वक्तव्यावरही अनेकांनी टीका केली होती.
खुशबू यांनी तामिळनाडूमधील बैलांच्या शर्यतींचं जलिकट्टूचं समर्थन केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)