लैंगिक अत्याचारः ‘त्यांनी माझं अपहरण केलं आणि सलग 25 रात्री माझ्यावर बलात्कार केला’

    • Author, राफेल अबुचेबी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नेहमीसारखाच एक रविवार. दुपारची वेळ. ग्वाटेमाला या राजधानीच्या शहरापासून जवळपास 100 किलोमीटरवरचं राबिनल शहर.

19 वर्षीय पॉलिना इक्साटापा तिच्या आईसोबत रस्त्यावरून चालत होती. तेवढ्यात तिथं काही लोक आले आणि तिच्या आईला म्हणाले, "आम्हाला तुमच्या मुलीसोबत काही महत्वाचं बोलायचं आहे."

1983 सालच्या या रविवारनं पॉलिनाच्या आयुष्यच बदलून टाकलं.

पॉलिना यांचे एक निकटवर्तीय नागरिक आत्मसंरक्षण दलाचे सदस्य होते. ग्वाटेमाला सरकारद्वारे हे निमलष्कर दल होतं. या दलात सर्वसामान्य लोकांचाच सहभाग असेल. हे दल डाव्या कट्टरतावादी गटांपासून नागरिकांचं रक्षण करत असे. मात्र, त्यातलेच काहीजण पॉलिनावरील अत्याचारांचे गुन्हेगार होते.

या घटनेला आता 39 वर्षे उलटून गेलीत.

या आत्मसंरक्षण दलाचे पाच माजी सदस्य आता न्यायालयात खटल्यांचा सामना करत आहेत. त्यांच्यावर 36 महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पॉलिना त्या 36 महिलांपैकी एक आहे.

आत्मसंरक्षण दलाचे सदस्या त्या रविवारी दुपारी पॉलिनाला लष्कराच्याच एका ठिकाणी घेऊन गेले. तिथं आधीपासूनच आणखीही काही महिला होत्या.

तुझा नवरा कुठे आहे, असं त्यांनी विचारलं. त्यावर पॉलिना म्हणाली, माझा कुणी नवरा नाहीय.

तर ते म्हणाले, तुझ्या नवऱ्याला नंतर पाहू.

नंतर त्यांनी युआन नामक व्यक्तीसोबतच्या नात्याबाबत विचारलं. मात्र, त्यावर पॉलिना म्हणाली, त्यानं मला काही दिवसांपूर्वीच सोडलंय.

हे उत्तर त्यानं पटलेलं दिसलं नाही.

त्यातल्या एका जणानं पॉलिनाचा गळा आवळला आणि म्हणाला, "तुझ्यासोबत रात्री कोण येतो, ते मला कळलं पाहिजे."

लैंगिक हिंसेचा शस्त्र म्हणून वापर

लूसिया जाइलोस या राबिनलमधील वकील आहेत. त्या 29 पीडित महिलांची बाजू मांडतातेयत.

त्या सांगतात की, ग्वाटेमालात 1981 ते 1985 दरम्यान झालेल्या अंतर्गत सशस्त्र संघर्षादरम्यान लैंगिक हिंसेच्या घटना समोर आल्या होत्या.

"या सर्व महिलांना अवैधरित्या ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यांना लष्कराच्या तळांवर नेण्यात आलं आणि सातत्यानं बलात्कार केला गेला," असं लूसिया सांगतात.

आत्मसंरक्षण दल हे तत्कालीन डाव्या कट्टरतावादी गटाला मोडीत काढण्याच्या हेतूनं काम करणं अपेक्षित असलेलं दल होतं. मात्र, त्यांनी लैंगिक हिंसा हे त्यांनी एखाद्या शस्त्राप्रमाणे वापरलं.

लूसिया म्हणतात की, ग्वाटेमाला सरकार या बलात्कारांसाठी जबाबदार आहे. लैंगिक हिंसा नसेल अशा वातावरणात महिलांना वावरता येईल असं वातावरण तयार करण्यात सरकार कमी पडलं होतं.

मात्र, या सर्व प्रकरणात सरकारही प्रतिवादी आहे की नाही, हे अद्याप कळलं नाहीय.

25 रात्री सतत बलात्कार

पॉलिना सांगते, 1983 मध्ये मला सलग 25 रात्री लष्कराच्या तळावर जबरदस्तीनं डांबून ठेवण्यात आलं. या सर्व रात्रींमध्ये लैंगिक शोषण केलं जात असे.

"त्यांनी रोज रात्री माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर मी भयंकर आजारी पडले. तेव्हापासून आमच्याबाबत भेदभाव सुरूच आहे. सार्वजनिक ठिकाणी दिसल्यास मला मारण्याची त्यांनी धमकी दिली होती," असं पॉलिना सांगतात.

या सर्व संकटातून सुटण्यासाठी पॉलिना राजधानी सोडून पळून गेल्या. त्या आता राजधानीत परतल्या आहेत. मात्र, त्यांना त्या प्रसंगातून मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यासाठी बराच कालावधी गेला. त्यांनी आतापर्यंत बरंच सहन केलंय.

"त्यांनी केवळ माझ्यावर बलात्कार केला नव्हता, तर त्यांनी काही मुलंही मारली होती. आमचं घर जाळलं. जेव्हा मी त्यांच्या हातून सुटले, तेव्हा माझ्याकडे केवळ कपड्यांची एकच जोडी होती," असं पॉलिना सांगतात.

5 जानेवारीपासून या प्रकरणाचा खटला सुरू झाला आहे आणि पीडित महिलांसाठी हा खटला महत्वाचा आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये पीडित महिलांनी एक पत्रकही काढलं होतं.

"आम्ही सहन केलेल्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या न्यायासाठी 40 वर्षांपासून प्रतिक्षेत आहोत," असं त्या म्हणाल्या.

न्याय मिळण्यास उशीर

आधीच 40 वर्षांपासूनच न्याय मिळण्यास उशीर झालाय. त्यात 5 जानेवारीला खटला सुरू झाला आणि पुन्हा 24 तासांसाठी स्थगित करण्यात आला.

पीडितांना आशा वाटतेय की, त्यांची व्यथा जगाला कळेल आणि न्याय मिळेल.

"आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. त्यांनी जे आमच्याकडून हिरावून घेतलं, ते काही परत मिळणार नाही. मात्र, न्याय मिळेल, अशी आशा आहे," असं पॉलिना म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)