लैंगिक अत्याचार : 'त्याने सामान्य लैंगिक संबंध ठेवले नाहीत, लॅपटॉपमध्ये मला पॉर्न पाहायला सांगायचा आणि...'

पतीनं जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पत्नीनं त्याचे गुप्तांग कापले. मध्यप्रदेशच्या टिकमगढ येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे.

"अशा प्रकारची कृती करताना स्त्रीला कोणत्या वेदना सहन कराव्या लागल्या असतील?" असं मत स्त्रीवादी या घटनेकडे पाहताना व्यक्त करत आहेत.

"पत्नीला तिचा कायदेशीर जोडीदार किंवा पती लैंगिक संबंध ठेवण्यास बळजबरी करू शकतो का?" असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झालाय.

दुर्दैवानं वैवाहिक बलात्काराला न्यायालयं मान्यता देत नाहीत, असं दिल्लीतील वकील सोनाली यांनी म्हटलं आहे.

जर कायदेशीर विवाह करणारी स्त्री वैवाहिक बलात्काराची तक्रार करू शकत नाही, तर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या स्त्रीला या परंपरावादी रचनेत कोणते अधिकार आहेत?

जोडीदाराकडून लैंगिक छळ केल्याबद्दल हैदराबाद पोलिसांकडे तक्रार केलेल्या एका महिलेशी बीबीसी न्यूज तेलगूनं संपर्क साधला.

गोपनीयतेच्या उद्देशाने पीडितांची नावं बदलण्यात आली आहेत.

'तो उपचारासाठी आला होता'

हैदराबादमधील मानसशास्त्रज्ञ ज्योती तिच्या पेशंटच्या प्रेमात पडली. हा पेशंट तिच्याकडे समुपदेशनाच्या थेरपीसाठी आला होता.

"यूकेमधून परत आलोय आणि आता करिअरमध्ये बदल करण्याची इच्छा आहे, अशी त्यानं स्वतःची ओळख करून दिली. तो माझ्या पालकांना भेटला आणि मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याच्या पालकांशी ओळख करून दिली. त्याच्या कृती आणि शब्दांनी एकप्रकारचा विश्वास निर्माण केला," ज्योतीनं बीबीसीला सांगितलं.

थोड्यात कालावधीत हे समुपदेशक-ग्राहकाचं नातं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये परावर्तित झालं.

"मला एक इंचही संशय आला नाही," ज्योती म्हणाली.

ज्योती सांगते, कमाई आणि घरगुती जबाबदाऱ्या वाटून न घेतल्याने पहिल्या दिवसापासूनच तिचा त्रास वाढू लागला.

"त्याने माझ्याशी कधीही सामान्य लैंगिक संबंध ठेवले नाहीत," ती म्हणाली.

"तो मला लॅपटॉपमध्ये पॉर्न पाहण्यास भाग पाडतो. त्या पॉर्न व्हिडिओमध्ये दिसणार्‍या इतर महिलांच्या शरीराच्या अवयवांची प्रशंसा करताना मला त्याला उत्तेजित करण्यास भाग पाडतो. यात तासनतास जातात आणि मला थकायला होतं."

"त्याचे लैंगिक वर्तन केवळ आमच्या बेडरूमच्या चार भिंतींपुरतं मर्यादित नाही. तो मला कारमध्ये आणि स्विमिंग पूलमध्येही असे करण्यास भाग पाडतो."

जेव्हा ज्योतीने त्याच्या असामान्य लैंगिक मागण्यांना विरोध दर्शवला तेव्हा त्याने स्वत:ला संतुष्ट करण्यासाठी तिला बाहेरून कोणीतरी आणण्यास सांगितलं, ज्योतीनं सांगितलं.

"हे खूप असामान्य होते आणि मग मी नात्यातील ठिपके जोडणं सुरू केलं आहे."

नंतर, ज्योतीला हे देखील कळले की लग्नासाठीच्या एका वेबसाईटवरून त्याने तिच्याशी संपर्क साधला आणि वास्तविक अर्थाने समुपदेशनासाठी तो संपर्क नव्हता.

घरातील अनेक वाद आणि भांडणानंतर ज्योतीनं पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानं आणि याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जात असल्यानं तक्रार नोंदवण्यासाठी तिला पोलिसांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. शिवाय पोलिसांनी तिला वैयक्तिक पातळीवर या समस्येवर तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता.

असं असलं तरी ज्योतीने तिच्या वकिलाच्या मदतीने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सिकंदराबाद तुकाराम गेट पोलिस ठाण्यात IPC S.376 (2) अन्वये पोलिस तक्रार दाखल केली आहे.

तक्रार दाखल करण्यास विरोध करण्यामागील कारणं समजून घेण्यासाठी बीबीसीने पोलिसांशी संपर्क साधला. हैदराबाद पूर्व विभागाचे डीसीपी एम रमेश यांनी सांगितलं की, "संबंध काहीही असले तरी वैधता असल्यास गुन्हा दाखल केला जाईल. फारच कमी घटनांमध्ये आम्ही संबंधितांना आपापसात वाद मिटवण्याचा सल्ला देतो."

NCRB च्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत एकूण 446 कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे नोंदवण्यात आली.

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलांचे हक्क काय?

सोनाली सांगतात, "लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या महिलेला देखील विवाहित महिलेसारखेच अधिकार असतील. कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील सर्व तरतुदी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी लागू आहेत", ती म्हणाली.

हैदराबादचे वकील श्रीकांत चिंतला सांगतात, "एखाद्या पुरुषाला स्त्रीच्या शरीराचे लैंगिक शोषण करण्याचा किंवा त्याच्या इच्छेनुसार अयोग्य रीतीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही".

सेक्स करतानाचे हे कृत्य करताना अस्वस्थ वाटत असेल, तर एखाद्या महिलेला तिच्या पतीला 'नाही' म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे, असंही ते म्हणाले.

लिव्ह-इन रिलेशनशिप कायदेशीर आहेत का?

पायल शर्मा विरुद्ध नारी निकेतन प्रकरणात लिव्ह इन रिलेशनशिप गुन्हा नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

इंद्र शर्मा खटल्यात सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की, घरगुती हिंसाचार कायदा 2005 च्या अंतर्गत सर्व तरतुदी लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलांसाठी देखील लागू आहेत.

असं असलं तरी, लिव्ह-इन नातेसंबंध स्वीकारण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे,असं स्त्रीवादी लेखिका कुप्पिली पद्मा म्हणतात. "स्वीकृतीचा अभाव हे अनेक समस्यांचे मूळ आहे," असं त्यांचं मत आहे.

ज्योतीचं प्रकरण पोलिसांत तक्रार दाखल करून संपलं नाही. तक्रार दाखल केल्यानंतर तिला तिच्या जोडीदाराकडून धमक्या मिळू लागल्या आहेत. ज्योतीनं तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीशी संपर्क साधून तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिने तिचा शोध घेतला आहे. तिने तर तिच्यासमोर आणखी धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत.

बीबीसीने सुधा यांच्याशी संपर्क साधला. जी त्या पुरुषाची पहिली पत्नी आहे आणि तिची कथा समजून घेतली आहे.

सुधा म्हणाली, "वराच्या कुटुंबाला मोठा हुंडा आणि भेटवस्तू देऊन सुधाने त्या माणसासोबत लग्न केले. त्यांच्या हुंड्याच्या मागण्या रोख, कार, सोने, मालमत्ता आणि झोपण्यासाठीच्या बेडपर्यंत होत्या."

जोपर्यंत तिच्या पालकांनी नवीन खाट पाठवली नाही तोपर्यंत तिच्या लग्नानंतरच्या विधी करण्यास कुटुंब तयार नव्हते, असं सुधाने बीबीसीला सांगितलं.

सुधाचे 2017 साली लग्न झाले होते आणि तिचे लग्न फक्त 5 महिने टिकले होते.

"माझ्यासाठी रोजचा दिवस एक दुःस्वप्न होता कारण आमच्यात जवळीक, जिव्हाळा आणि परस्पर संबंध नव्हते," तिने सांगितलं.

ज्योतीला जसा त्रास झाला तसाच तिचा त्रास होता.

विकृत वर्तन

"त्याला असामान्य लैंगिक कृतीची आठवण करून देण्यासाठी मला दर चार तासांनी अलार्म लावावा लागत असे. तसे न केल्यास मला तासनतास उभे राहण्याची शिक्षा दिली जायची. त्यामुळे माझे पाय फुगायचे आणि मी भान हरपून खाली पडायच्या घटना घडायच्या", सुधा सांगत होती.

"त्यानंतर तो रडायचा आणि मला त्याला रडवल्याबद्दल सॉरी म्हणण्याची मागणी करायचा. त्याचं हे वागणं मला समजू शकलं नाही."

"दरम्यान, मला सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस झाल्याचं निदान झालं. जेव्हा मी माझ्या सासूशी त्याच्या असामान्य वागणुकीची तक्रार केली, तेव्हा तिनं माझी समस्या समजून घेण्याऐवजी तिच्या मुलाच्या इच्छेनुसार वागण्यास सांगितलं.

"माझी सहनशक्ती संपुष्टात आल्यानंतर मी एका रात्री माझ्या नाईट गाउनमध्ये माहेरी पळत सुटले. माझ्या पासपोर्टसह इतर सर्व मौल्यवान वस्तू अजूनही त्यांच्या घरात पडून आहेत," तिनं सांगितलं.

एक वर्ष वाट पाहिल्यानंतर आणि पतीला उपचारासाठी नेण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, सुधानं त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आणि कोर्टात घटस्फोटाची मागणी केली. सध्या तिच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे.

सुधाचा पती सध्या अटकपूर्व जामिनावर आहे. पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्नही केला नसल्याचा आरोप ज्योतीने केला आहे.

मात्र सोनाली यांच्या मते, "पीडितांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला जाईल. पण, संशयितांचे अधिकार पूर्णपणे काढून टाकले जाऊ शकत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवं."

जून 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पत्रकार वरुण हिरेमठ यांना बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

आता कायदेशीर कारवाई सुरू असताना आपल्याला काय न्याय मिळेल याची वाट ज्योती आणि सुधा पाहत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)