बिनाब्लाऊजची साडी : भारतात स्त्रिया मुस्लीम आक्रमणानंतर चोळ्या घालायला लागल्या?

    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

डिसेंबर महिन्यात इंस्टाग्रामवर thanos_jatt नावाच्या एका अकाउंटवरून एक व्हीडिओ पोस्ट केला होता. हा एका महिलेचा व्हीडिओ होता.

तिने साडी नेसली होती पण ब्लाऊजच्या ऐवजी मेंहदीने ब्लाऊजचं डिझाईन काढलं होतं. हे डिझाईन तिच्या शरीराचा वरचा भाग कव्हर करत होतं.

ही पोस्ट व्हायरल झाली तेव्हा यावर तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी म्हटलं की ही खूप सुंदर कल्पना आहे असं म्हटलं तर काहींनी भारतीय संस्कृतीचे दाखले देत 'बेशरमपणाचाही मर्यादा ओलांडली गेली आहे' असं म्हटलं.

इंस्टाग्रामच्या या जगापासून लांब बिहार राज्यातल्या दरभंगा जिल्ह्यात मधुबनी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये 'एकवस्त्र' या नावाने फॅशन शो आयोजित झाला होता.

या शोमध्ये ज्या मॉडेल्सने कॅटवॉक केला त्यांना ना ब्लाऊज घातलं होतं ना परकर. त्यांनी शरीरावर फक्त साडी परिधान केली होती.

'निखंड' साडीची परंपरा

महाराष्ट्रात काही आदिवासी तसंच काही विशिष्ट समुदायातल्या महिलांमध्ये ब्लाऊज घालण्याची परंपरा नव्हती. म्हणजे या महिला फक्त साडी नेसायच्या पण त्याच्या आत ना परकर घालायच्या ना ब्लाऊज.

बिहारमधल्या मिथिलांचल भागात अशा साडी नेसण्याला 'निखंड साडी' असं म्हटलं जातं.

बिहारच्या सुप्रसिद्ध लेखिका उषा किरण खान म्हणतात की, "आधी महिला फक्त साडी नेसायच्या. शिवणकाम तर मुस्लिमांसोबत इथे आलं. त्यानंतर ब्लाऊज शिवून घालणं ही कन्सेप्ट आली. मी लहानपणी संथाल आदिवासी स्त्रियांना पाहिलं आहे. त्या आपले स्तन झाकायच्या नाहीत. काही उत्सव, समारंभ असेल तेव्हाच या महिला अशा प्रकारे साडी नेसायच्या की त्यांचे स्तन झाकले जातील. अनेकदा त्या आपल्या शरीराच्या वरच्या भागात फक्त एक कापड टाकायच्या. हे कापड अधूनमधून उडत राहायचं, पर्यायाने त्या महिलांचे स्तनही अधूनमधून दिसत राहायचे."

जसंजसा काळ लोटला तसं महिलांनी ब्लाऊज आणि परकर घालायला सुरूवात केली. चोळी-परकराची पद्धत समाजाने इतकी आत्मसात केली की निखंड साडीची परंपरा खंडित झाली.

मधुबनी साहित्य संमेलनात ज्यांनी हा 'एकवस्त्रा' फॅशन शो आयोजित केला त्या सविता झा म्हणतात, "एकवस्त्र ही संकल्पना दोन स्तरांवर काम करते. एक म्हणजे त्या विणकर महिला ज्यांच्या परंपरा काळाच्या ओघात नष्ट झाल्या आणि दुसरं म्हणजे आपल्या भागातल्या महिला पूर्वी स्वतःच्या शरीराला महत्व द्यायच्या, लाजायच्या नाहीत. स्वतःच शरीर त्यांच्यासाठी साजरा करण्यासारखा उत्सव होता. त्यांनी काय कपडे घालायचे हे ठरवण्याचा अधिकार त्या महिलांना होता, समाजात इतर कोणाला नाही.

आता सीतेच्या नावाचं उदारहण घ्या. तिला 'वैदेही' म्हणतात. वैदेहीचा अर्थ होतो 'देहापासून मुक्त झालेली ' देहाबदद्ल मिथिलेच्या काही विशिष्ट धारणा होत्या, मान्यता होत्या. त्या आम्ही पुन्हा जगासमोर आणू इच्छितो."

याचा संबंध महिला सबलीकरणाशी जोडता येईल का?

मिथिला भारतीचे संपादक आणि मिथिलेच्या लग्न परंपरांवर पुस्तक लिहिणारे लेखक भैरव दास म्हणतात, "देहाच्या आधारावर विचार करायचा झाला तर निखंड साडीला (बिना चोळीची साडी) महिला सबलीकरणाशी जोडलं जाऊ शकत नाही."

ते म्हणतात, "आपल्या संस्कृतीत न शिवलेली वस्त्र घालण्याची परंपरा होती, आणि ती स्त्री-पुरुष दोघांसाठी होती. याची कारणं धार्मिक आणि सांस्कृतिक होती. जेव्हा मुस्लीम आक्रमक या भूमीवर आले तेव्हा आपल्यासोबत शिवणकामाची कला घेऊन आले. मग या वस्त्रांना एक राजकीय पैलू जोडला गेला. कारण आधी जनमानसातून या शिवणकामाच्या कलेला विरोध झाला.

पूर्वीच्या काळी मिथिलेत अनेक महिला वैदक कार्य करायच्या पण शिवलेले कपडे घालत नसत. निखंड साडी की एकवस्त्राचा संबंध सबलीकरणापेक्षा त्याची शास्त्रीयता आणि लोकांच्या गरिबीशी होता. मिथिलेत किती गरीबी होती याचे दाखले आपल्याला विद्यापतींच्या रचनेत आढळतात. पण तुम्ही जर बंगाली चित्र किंवा बंगाली पारंपरिक कलाकृती पाहिल्या तर त्यातही महिलांनी चोळ्या घातलेल्या आढळत नाहीत."

भारताच्या अनेक भागांमध्ये ब्लाऊज किंवा चोळी घालण्याची पद्धत नव्हती. ब्रम्ह समाजच्या महिला ब्लाऊज घालत नव्हत्या, पण नंतर त्यांनी ते घालायला सुरुवात केली.

147 वर्षं जुन्या असलेल्या पटनाच्या 'बेहार हेरॉल्ड' वृत्तपत्राचे संपादक विद्युत पाल म्हणतात की, "कपड्यांच्या डिझायनिंगच्या इतिहासावर आपल्याकडे 90 च्या दशकानंतर काम सुरू झालं. पण त्यातून आपल्याला जी काही माहिती मिळते ती अशी की रविंद्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ सत्येंद्रनाथ टागोर मोठे सरकारी अधिकारी होते. त्यांच्या पत्नी ज्ञाननंदिनी देवी यांना ब्लाऊज न घातल्यामुळे एका क्लबमध्ये प्रवेश नाकारला गेला. त्यानंतर त्यांना ब्लाऊज घालावं लागलं."

साडीची परंपरा कधी आली?

आज आपण जी साडी नेसतो ती साडी जगातल्या काही सेक्सी पेहरावांपैकी एक आहे. पण ही साडी भारतीय उपखंडात ग्रीकांच्या प्रभावामुळे आली असं म्हणतात.

पुरातत्त्व अभ्यासक जलज कुमार तिवारी म्हणतात की, "ग्रीकांचा भारतावर असणारा प्रभाव मौर्य काळात ठळकपणे अधोरेखित झाला जेव्हा चंद्रगुप्त मौर्याने एका ग्रीक राजकुमारीशी लग्न केलं. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात शुंग शासन काळातल्या ज्या टेरिकोटाच्या मुर्त्या मिळाल्यात त्यावरून हे स्षष्ट होतं की इथल्या बायका साडी नेसायच्या पण त्यात ब्लाऊज किंवा चोळी हा प्रकार नव्हता."

ते पुढे म्हणतात, "पाचवारी साडी वगळता काही भागातल्या महिला चुडीदारसारखं वस्त्रही घालायच्या. त्यानंतर इसवी सनाच्या नवव्या शतकात आम्हाला बायका नऊवारी साडी नेसलेल्या आढळतात. तशा टेरिकोटाच्या मुर्ती आढळल्या आहेत. नऊवारी साडीमुळे व्हायचं काय की बायकांना मोकळेपणाने सगळी कामं करता यायची. त्या काळातल्या तारा आणि दुर्गा देवींच्या मुर्त्यांनीही नऊवारी साड्याच नेसलेल्या आहेत."

मग प्रश्न असा पडतो की त्यावेळी साडी नेसताना महिलांच्या शारिरीक कार्यक्षमतेला अडथळा येणार नाही अशा प्रकारे साड्या नेसल्या जायच्या (उदा नऊवारी साडी) मग काळाच्या ओघात देशातून अशा साड्या नेसण्याची पद्धत का लोप पावली?

जलज कुमार तिवारी म्हणतात, "त्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायच्या. त्या युद्धावर जायच्या, शिकार करायच्या, शेती करायच्या. पण नंतर त्यांना घरात राहायला आणि घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळायला सांगितलं गेलं. त्यामुळे त्यांच्या साडी नेसण्याच्या पद्धतीवर याचा परिणाम झाला. अशा साड्या नेसल्या जाऊ लागल्या ज्यामुळे महिलांच्या हालचालींवर मर्यादा येतील."

ब्रेस्ट टॅक्स

आज आपण कपड्यांच्या बाबतीत जो विचार करतो, त्याकडे ज्या दृष्टीने पाहातो तसेच इतिहासात होतो का?

लेखक-संपादक विद्युत पाल म्हणतात की, "जेव्हा कपडे माणसाच्या आयुष्यात आले तेव्हा त्यांच्या उद्देश 'लाज' नव्हता तर रोजची काम सुलभ व्हावी असा होता. उदाहरणार्थ जेव्हा माणूस शिकारीला बाहेर पडायचा तेव्हा बायकांना धावपळ करायची असेल तर त्यांच्या शरीराचा वरचा भाग बांधलेला असणं जास्त सोयिस्कर होतं तर पुरुषांच्या शरीराचा खालचा भाग बांधलेला असणं सोयिस्कर होतं. वस्त्र त्यांच्या अंगाना आधार द्यायची. तिच गरज लक्षात ठेवून वस्त्र बनवली गेली."

पण आपल्या रोजच्या गरजेला ध्यानात ठेवून बनवले गेलेले कपडे घालण्यासाठीही भारतातल्या महिलांना मोठी लढाई लढावी लागली.

केरळमध्ये जवळपास दीडशे वर्षांपूर्वी खालच्या जातीतील महिलांनी स्तन झाकायचे नाहीत असा आदेश होता. या आदेशाचं उल्लंघन केलं तर महिलांना ब्रेस्ट टॅक्स, म्हणजेच कर द्यावा लागायचा. या स्तन करच्या विरोधात एझवा जातीच्या नंगेली नावाच्या एका महिलेने आपले स्तनच कापून टाकले होते.

या काळात झारखंडच्या एका भागातल्या महिला आपले स्तन झाकत नव्हत्या पण केरळच्या महिलांना आपले स्तन झाकण्यासाठी संघर्ष करावा लागत होता.

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, पटनाचे संचालक प्रा पुष्पेंद्र कुमार याबाबतीत म्हणतात, "एकाच देशात, एकाच ठिकाणी, एकाच समुदायाचे कपडे त्यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय निकषांवर आधारित असतात. युरोपात कपड्यांच्या विरोधात एक मोहीम

मिथिलेच्या महिला

बिहारच्या इतर भागांच्या तुलनेत मिथिलांचलमध्ये विदुषी महिलांची समृद्ध परंपरा दिसून येते. रामाची पत्नी असणाऱ्या सीतेला मिथिलांचलमध्ये सेनापती म्हटलं जातं. गार्गी, मैत्रेयी, भारती, आणि जैन तीर्थंकर मल्लिनाथ यांची परंपरा इथे आहे. या महिलांनी कायमच राजकीय, सामाजिक, धार्मिक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे.

पद्मश्री मिळालेल्या लेखिका उषा किरण खान म्हणतात की, "मिथिलेत विदुषी स्त्रियांची परंपरा बौद्ध धर्मात तंत्रयान आणि सनातन धर्मात कौलाचार पद्धत आल्यानंतर थांबली. कारण तंत्रयान आणि सनातनी लोकांच्या येण्यामुळे मुलींना तंत्रमंत्रासाठी नेलं जाऊ लागलं आणि त्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम झाला. पण त्यावेळी महिलांनी स्वतःला मिथिला चित्रांव्दारे व्यक्त करणं सुरू केलं."

रिसर्चर लेखक भैरव लाल दास म्हणतात, "मुघलांचं थेट आक्रमण या भागात झालं नाही पण त्याचा प्रभाव इथे जरूर पाहायला मिळाला. तुम्हाला इथल्या घरांच्या रचनांमध्ये हा प्रभाव दिसतो. इथल्या खिडक्यांची रुंदी कमी झाली आणि त्या जास्त उंचावर गेल्या. म्हणजे बायकांना पडद्यात ठेवलं जाऊ लागलं."

दरभंगासारख्या तुलनात्मक लहान शहरात आयोजित झालेल्या 'एकवस्त्र' सारख्या फॅशन शो कडे मॉडेल्स कोणत्या नजरेने पाहातात? यावर टीव्ही अभिनेत्री आणि नाट्य कलाकार सोनल झा म्हणतात, "फक्त देह या नजरेतून या फॅशन शो कडे पहायला नको. एक मात्र नक्की की जेव्हा तुम्ही निखंड साडी नेसता तेव्हा तुमच्या तुमच्या शरीराप्रति असलेल्या लाजेची बंधन तुटतात."

सोनल झा या फॅशन शोच्या मुख्य मॉडेल होत्या. त्या पुढे म्हणतात, "अशा प्रकारचे कपड्यांना इतिहासात वेगळे अर्थ असले तरी आजकाल जेव्हा शरीरावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातंय तेव्हा एका नव्या चर्चेला असे शो जन्म देऊ शकतात."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)