आता कोणाची अंतर्वस्त्रं धुताय ते कळतंय- संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. आता कोणाची अंतर्वस्त्रं धुताय ते कळतंय- संजय राऊत
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती व्हावी अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच इच्छा होती, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. झी 24 तास ने ही बातमी दिली आहे.
पवार साहेब तुम्ही दिल्ली सांभाळा आम्ही महाराष्ट्र सांभाळतो असे बाळासाहेब म्हणाले होते. शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान फार मोठं आहे. त्यांच्याकडून बरचं काही शिकण्यासारखं आहे. यामुळे शरद पवारांचे शिष्य असल्यास गैर काय, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.
जेव्हा शरद पवारांसोबत सरकार बनवले तेव्हा हेच लोक होते ना पुढे होते ना सरकारमध्ये घुसायला, हेच लोक बाहेर रांगा लावून उभे होते आम्हाला घ्या. आता तुम्ही भाजपा सोबत गेलात. यामुळे तुम्ही आता कोणाची अंतर्वस्त्रं धुताय, असा खोचक टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.
2. भारताची विकासगती मंदावली, जीडीपीत मोठी घट
अर्थव्यवस्थेने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये 6.3 टक्क्यांचा वृद्धीदर नोंदविल्याचं बुधवारी सायंकाळी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट झालं आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) अर्थव्यवस्था 13.5 टक्क्यांनी विस्तारली होती. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
गतवर्षी दुसऱ्या तिमाहीचा वृद्धिदर 8.4 टक्के राहिला होता. प्रामुख्याने निर्मिती आणि खाण क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे विकासदराला खीळ बसली आहे.
जागतिक पातळीसह देशांतर्गत पातळीवर उसळलेली महागाई आणि ती कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून सुरू असलेल्या व्याज दरवाढीचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याने सरलेल्या तिमाहीत विकासदर खालावल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
पहिल्या तिमाहीपेक्षा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये वाढीचा दर निम्मा राहील, असा अंदाज विश्लेषकांनी आधीपासूनच वर्तविला होता.
3. कुणालातरी बोलायला हवंच होतं- नदाव लपिड

फोटो स्रोत, PIB
इस्रायली चित्रपट निर्माता नदाव लपिड यांच्या वक्तव्याने दोन दिवसांपूर्वी मोठा गदारोळ उडाला होता. मात्र कुणालातरी बोलायला हवंच होतं, असं वक्तव्य करत लपिड यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
नदाव लपिड यांन गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काश्मीर फाईल्स हा चित्रपट अतिशय बटबटीत असल्याचं म्हटलं होतं. एनडीटीव्ही ने ही बातमी दिली आहे.
“इथे जे काही सुरू आहे ते विचित्र आहे. हा शासकीय चित्रपट महोत्सव आहे. सरकारने हा चित्रपट निर्माण केला नसला तरी प्रमाणाबाहेर या चित्रपटाची स्तुती केली. काश्मीरबद्दल भारताची काय मतं आहेत, हे या चित्रपटातून कळतं," असं ते म्हणाले.
4 .आफताब ने श्रद्धाचा खून केल्याची पॉलिग्राफ टेस्टमध्ये कबुली.
आफताब पुनावाला ने श्रद्धा वालकरचा खून केल्याची कबुली पॉलिग्राफ टेस्टमध्ये दिल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. राष्ट्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ही चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी मंगळवारी 30 नोव्हेंबरला संपली.
2 डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. नार्को टेस्टला तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान श्रद्धा वालकर खुनानंतर आफताब आणखी एका मुलीला भेटला होता. तिचीही पोलिसांनी चौकशी केली. तिला या प्रकाराची माहिती नसल्याचं तिने सांगितलं.
5. गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान

फोटो स्रोत, Getty Images
गुजरातमध्ये विधानसभेच्या 89 जागांवर आज मतदान होणार आहे. 19 जिल्ह्यात हे मतदान होणार असून त्यासाठी एकूण 788 उमेदवार रिंगणात आहे. मंगळवारी या प्रचाराची सांगता झाली. दुसऱ्या टप्प्याचं मतदान 5 डिसेंबरला आहे. द हिंदू ने ही बातमी दिली आहे.
सकाळी 8 ते 5 या वेळात मतदान होणार आहे. त्यासाठी 14,382 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आल्याचं गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
गुजरातमध्ये एकूण 4.91 कोटी मतदार आहे. त्यापैकी 2.4 कोटी लोक आज मतदान करतील. त्यात 18-19 वयोगटातले 5.74 लाख मतदार आहेत तर 99 वर्षापेक्षा अधिक वयाचे 4945 मतदार आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








