राज्यपालांविरोधात आझाद मैदानात आंदोलन करणार- उदयनराजे

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (3 डिसेंबरला) रायगडावर आत्मक्लेश आंदोलन केलं. त्यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित करताना राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं.
ते म्हणाले, “शिवाजी महाराज एकमेव असे राजे होते ज्यांनी राज्यकारभारात सगळ्यांचा सहभाग व्हावा अशी कल्पना मांडली.
शिवाजी महाराजांच्या सन्माला कलाटणी दिली जाते, त्याला दुजोरा दिला जातो. आपण पाहत असतो प्रत्येकजण प्रतिक्रिया देणार. हीच आपली चूक झाली. असं उदयनराजे म्हणाले.
आपण प्रतिक्रिया वादी झालो आहोत. या देशाला घातक आहे. शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाचा, मग स्वराज्याचा विचार केला, आणि आपण इथे राहतोय याचा विचार करतोय.
स्वत:चं पूर्ण आयुष्य त्याने वेचलं, त्यांच्या प्रतिमेचाच त्यांचा अवमान होतोय. आपण आता गप्प बसणार आहोत का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे, त्यामुळे ते सगळं गृहित धरतात .राज्यपाल हे सन्मानाचं पद आहे. छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर अनेकांची खिल्ली उडवली जाते आणि आपण पाहत राहतो.
त्यामुळे आता आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. आंदोलनाची तारीख मात्र अद्याप सांगितलेली नाही.”
"छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच देशात लोकशाही अस्तित्वात आली आहे," असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं होतं.
30 नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 24 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर असे दोन दिवस आपण पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. त्यानंतरची ही गेल्या आठवड्याभरातील तिसरी पत्रकार परिषद आहे.
या पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी या संपूर्ण देशात-जगात लोकशाहीचा आराखडा घालून दिला. अजूनही जगभरात काही देशांत राजेशाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजेशाही अबाधित ठेवायची असं ठरवलं असतं तर आजही ती अस्तित्वात असली असती."
शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम राज्यकारभारात लोकांचा समावेश व्हावा, वेगवेगळ्या जातींचं प्रतिनिधित्व असावं, म्हणून अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. ज्याला आपण आज काऊन्सिल ऑफ मिनिस्टर असं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या विचारांच्या आधारावर सर्व जातीधर्मातील लोक एकत्र आले. त्यामुळे आपल्याला स्वराज्य मिळालं. तीच आपली आजची लोकशाही आहे.
प्रत्येक पक्ष वारंवार शिवाजी महाराजांचं नाव घेतात. त्यांना आदर्श मानतात. पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी पडतो की सर्वधर्मसमभावाची व्याख्या बदलली आहे का?
सर्वधर्मसमभाव म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, मात्र, आपल्याला सोयीस्कर असलेल्या समाजांचं-धर्मांचं ध्रुवीकरण करायचं, हे कितपत योग्य आहे?
आज ठिकठिकाणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सांगता. प्रत्येक जातीधर्माची लोक प्रत्येक पक्षात असली पाहिजेत. ते आपण आचरणात आणत नसू तर महाराजांचं नाव का घ्यायचं?
इतिहासात डोकावून पाहिल्यास, पूर्वी भारत-पाकिस्तान-बांगलादेश हे अखंडच होतं. आज तिन्ही देश वेगळे आहेत. आज प्रत्येक जण आपला वैयक्तिक विचार करू लागला, तर देशाचे किती तुकडे होतील, विचार करा. प्रत्येक राज्याला आपल्याला देश म्हणून पाहायचा आहे का, तर नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनीच देशाला अखंड ठेवलं आहे. आज सर्वात मोठी लोकशाही म्हणून पाहिलं जातं. मात्र प्रत्येकाला त्यांच्या विचारांचा विसर पडला, तर ते योग्य नाही.
शिवाजी महाराजांनी प्रत्येक समाजाचा सन्मान केला. आज त्यांचीच अवहेलना-अपमान सुरू आहे.
लेखणी, चित्रपटांच्या माध्यमातून तसंच तोंडात येईल ती वक्तव्ये करून त्यांचा अपमान करण्यात येत आहे.
त्यांचा अपमान होत असताना गप्प बसायला आपण इतके कोडगे झालो आहोत का?
मला सर्वच पक्षांच्या आमदार-खासदारांना विचारायचं आहे. आज शिवाजी महाराजांचं नाव घेत आपण त्यांचाच अपमान केला, तर पुढच्या पीढीला आपण काय धडे देणार आहोत, असं त्यांनी म्हटलं.
त्यांचा अवमान करणं म्हणजे फॅशन आहे, त्यात गैर काही नाही, असं हळूहळू लोकांना वाटेल.
परवा मला गहिवरून आलं होतं. पण मी हतबल झालेलो नाही. वेळप्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू. एवढं सगळं होत असताना पक्षांनी स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे.
आज राज्यपालांनी हे विधान केलं आहे. उद्या कुणी आणखी मोठ्या पदावरचा व्यक्ती असं विधान करेल. आपण ते खपवून घेणार आहोत का? त्यामुळे सर्व पक्षांनी याबाबत भूमिका मांडली पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले.
तसंच, शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद ही त्यांची अवहेलना आहे, असंही त्यांनी म्हटलं.
'हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं'
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसलेंनी पत्रकार परिषद घेतली.
सोमवारी (28 नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत उदयनाराजे भावनिक झाले आणि म्हणाले की, "हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं."
छत्रपती शिवाजी महाराजांवर जे वक्तव्य केले गेले आहे, ते निषेधार्ह आहे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
"महाराष्ट्रात प्रत्येक कार्यक्रमापूर्वी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून सुरुवात केली जाते. पण जर आज शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधानं करण्यात येत असतील आणि ती खपवून घेतली जाणार असेल तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही," असे उदयनराजे भोसले म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Facebook पोस्ट समाप्त
"शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करत नसाल, तर शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही," असं म्हणत उदयनराजेंनी भाजपला घरचा आहेर दिला.

फोटो स्रोत, Getty Images
उदयनराजे म्हणाले की, "काही लोक म्हणतात, त्यांना लिहून देण्यात आलं, मग बोललं. पण असं होत नाही. ते सज्ञान आहेत. ते वयाने मोठे आहेत, राज्यपाल आहे. अशा जबाबदारीच्या पदावर असताना, असं विधान करता, तेव्हा त्याचा अर्थ काय घ्यायचा?" "कोण तो त्रिवेदी, म्हणे माफीनामा. त्याने बुद्धी चेक केली पाहिजे. सर्वजण मुघलांना शरण गेले होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले होते," असंही उदयनराजे म्हणाले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेऊन याबाबत त्यांना सांगणार असल्याचंही उदयनराजे भोसले म्हणाले. "विरोधक कुणाला म्हणायचं, इथं प्रत्येकजण सोयीसाठी, राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव वापरतात. मग अशावेळी सत्तेत कोण आहे, हे महत्त्वाचं नाहीय, इथं प्रत्येकानं ठाम भूमिका मांडणं आवश्यक आहे," असं उदयनराजे म्हणाले.
आम्ही उदयनराजेंच्या पाठीशी - देवेंद्र फडणवीस
उदयनराजे यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसंच, "छत्रपती यांचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाही. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. शेवटी राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यांचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाहीत," असंही फडणवीस म्हणाले.
कोश्यारींची राज्याबाहेर जाण्याची इच्छा, पण...
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे राज्य सोडून आपल्या राज्यात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पण अद्याप त्याबाबतची कोणतीही प्रक्रिया सुरू झाले नसल्याचे राज्यपाल कार्यालयातील सुत्रांनी सांगितले.
राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर विविध नेत्यांनी आणि राज्यकर्त्यांनी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं पुण्यात राज्यपालांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात घोषणा देत आहेत.
याआधी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे.
राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली.
अशी वक्तव्य करणाऱ्यांकडे मोठी जबाबदारी दोणं योग्य नाही. राज्यपालांबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घ्यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केलीय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube,Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








