You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गश्मीर महाजनी: रवींद्र महाजनी यांच्याबद्दलच्या बातम्यांनी सनसनाटी निर्माण केली, पण वस्तुस्थिती वेगळीच होती
अभिनेते गश्मीर महाजनी यांनी आपले वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि त्यामुळे सर्वत्र तयार झालेल्या समजांना आपल्या बाजूने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. गश्मीर यांनी 'मित्र म्हणे' या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत काही खुलासे केले आहेत.
"रवींद्र महाजनी गेली 20 ते 22 वर्षं आपल्या कुटुंबाबरोबर राहात नव्हते. त्यांची एक जगण्याची पद्धत होती. त्यांना एकटं राहायचं होतं, त्याचा आम्ही आदर केला. ते कोठेही गेले तरी स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचे, स्वतःच सफाई करायचे. ते सक्षम होते, आणि आर्थिक परिस्थितीही चांगली होती. त्यांना कोणाचीही मदत घ्यायला आवडायची नाही. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ते शारीरिकदृष्ट्याही सक्षम होते. त्यांच्याकडे परवाना असलेलं पिस्तुलही होतं," अशी माहिती गश्मीर यांनी या मुलाखतीत दिली.
"त्यांच्या जीवनशैलीचा आम्ही आदर करायचो. गेली तीन वर्षं आमच्याशी त्यांचा आजिबातच संपर्क नव्हता पण आम्हाला त्यांच्या हालहवाल्याची सर्व माहिती असायची."
त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातम्या या वस्तुस्थितीला धरून नाहीत असं गश्मीर यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे. या बातम्यांतील वर्णनामुळे आपण व्यथित झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
गश्मीर म्हणाले, "ते अडगळीच्या खोलीत वारले, शोकांतिका झाली, हालाखीची परिस्थिती होती असे शब्द वापरून सनसनाटी तयार केली गेली. ते एका घरात राहात होते, एकटेच राहात होते, त्यांचं निधन होऊन दोन दिवस झाले होते ही वस्तुस्थिती आहे. मात्र याला केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी विशेषणं लावली गेली."
प्रत्येक गोष्ट चव्हाट्यावर आणायची नसते म्हणून मी काही काळ थांबून ही वस्तुस्थिती लोकांसमोर आणत आहे, असंही गश्मीर यांनी सांगितलं.
‘जजमेंट पास करणं सोपं, नाण्याच्या दोन्ही बाजू समजणं कठीण’
अभिनेते गश्मीर महाजनी यांच्यावरसुद्धा वडिलांची काळजी न घेतल्याबदद्ल टीका करण्यात आली होती.
त्यावर गश्मीर महाजनी यांनी उत्तर दिलं होतं.
एन्टरटेन्मेंट टाइम्सला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह केला. तसंच रवींद्र महाजनी आणि त्याच्या नात्याबद्दलही सांगितलं.
ते म्हणतात, “सगळ्यांना परफेक्ट व्हायचं असतं पण कोणीच तसं नसतं. माझे वडीलही तसे नव्हते आणि मीसुद्धा तसा नाही. मी त्यांना फ्लॅटमध्ये एकटं सोडलं असं म्हणतात. मी सांगू इच्छितो की गेल्या 20 वर्षांपासून ते एकटे राहत होते. कुटुंबाचे सदस्य म्हणून आम्ही फार काही करू शकलो नाही, आम्हाला ते स्वीकारावं लागलं. त्यांचं आणि आमचं नातं एकतर्फी होतं. त्यांना वाटलं तेव्हा ते आमची भेट घ्यायला यायचे. जेव्हापर्यंत इच्छा असेल तेव्हापर्यंत रहायचे आणि निघून जायचे.”
“जेव्हा माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते जास्त काळ राहिले. ते अतिशय मूडी होते आणि स्वयंभू होते. स्वयंपाकापासून त्यांना सगळी कामं स्वत:ची स्वत: करायला आवडायची. घरी नोकरचाकर ठेवले तरी एक दोन दिवसात त्यांना हाकलून द्यायचे.”
“गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी लोकांशी संपर्क कमी ठेवला होता. अगदी आमच्याशीसुद्धा. ते कोणाशीही स्वत:हून बोलायचे नाही. मॉर्निंग वॉकच्या एखाद्या ग्रुपमध्ये सुद्धा नव्हते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूचं कळलं नाही. मी हे सगळं कारणं देतोय असं वाटू शकतं पण आहे हे असं आहे. याचे लोक वेगवेगळे अर्थ काढतील पण ठीक आहे.”
वडील आणि त्याच्या नात्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “आमच्यात तणाव निर्माण होण्याची अनेक कारणं होती. पण शेवटी ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते. काही गोष्टी कुटुंबात असलेल्याच बऱ्या. माझे वडील अतिशय रुबाबदार कलाकार होते. त्यांचं हास्य लागट होतं आणि मला त्यावरच फोकस करायचं आहे.”
वडिलांचं निधन झाल्यानंतर गश्मीर महाजनीने इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकली होती. त्यात ते म्हणाले, “एखाद्या अभिनेत्याला अभिनेता म्हणून राहू द्या. उगाच नको त्या गोष्टी का उकरून काढताय? आता ती व्यक्ती या जगात नाही.”.
“फ्री इंटरनेट असलं की एखाद्याबद्दल जजमेंट पास करणं अतिशय सोपं असतं मात्र नाण्याच्या दोन्ही बाजू समजणं कठीण असतं,” असंही त्याने लिहिलं होतं.
या कठीण काळात पाठीशी उभे राहिलेल्या लोकांचेही त्यांनी आभार मानले. वडिलांच्या निधनानंतर ट्रोल्सच्या त्रासाने आईला दोन वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागल्याचंही त्यांनी सांगितलं.
“जर तुम्ही सार्वजनिक जीवनात असाल तर अशा वादात आपोआपच ओढले जाता मात्र अशा गोष्टी होत राहतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य असतो.” गश्मीर सांगतात.
रवींद्र महाजनी यांचा प्रवास
रवींद्र महाजनी यांचा जन्म पुण्यात आला. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती.
वडिलांच्या निधनानंतर रवींद्र यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी आली.
लोकमत फिल्मीनुसार, रवींद्र यांनी सुरुवातीला टॅक्सीचालक म्हणून काम केलं. त्याकाळी रवींद्र दिवसा अभिनयाचे धडे गिरवायचे आणि रात्री टॅक्सी चालवायचे.
मधुसूदन कालेलकर यांच्या 'जाणता अजाणता' या नाटकातून महाजनींना अभिनयाची संधी मिळाली.
याच नाटकाचा प्रयोग पाहून शांतारामबापूंनी रवींद्र महाजनींना 'झुंज' या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवडलं. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला.
या मराठी चित्रपटाद्वारे ते घराघरात पोहचले.
रवींद्र महाजनी यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला.
त्यांचे लक्ष्मीची पाऊले, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, कळत-नकळत, हे चित्रपट विशेष गाजले.
रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)