मॅकडोनाल्डच्या संस्थापकाने जेव्हा लग्नाच्या वाढदिवसालाच बायकोला सोडून दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हेलेन लेविस
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तुमच्या डोळ्यासमोर एक दृश्य आणा. 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धातील काळ आहे. अमेरिकेतील फ्लोरिडामधील फोर्ट लॉडरडेलमध्ये एका जलमार्गावर एक यॉट प्रवास करते आहे.
या खास बोटीवर काही पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. ते सर्व, रे क्रॉक आणि जेन क्रॉक या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा जल्लोष करण्यासाठी त्या बोटीवर जमले आहेत.
हे जोडपं लवकरच त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी क्रूझनं जगभर फिरण्यासाठी निघणार आहेत.
प्रवास, शॅम्पेन, कॅव्हियर (एका विशिष्ट माशाच्या अंड्यापासून बनणारी डिश), ग्लॅमरस कपडे...असा तो थाट होता. कारण रे अलीकडेच श्रीमंत झाले होते. नुसते श्रीमंत नाही तर गर्भ श्रीमंत झाले होते.
कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनोमधील बर्गरच्या व्यवसायामुळे हा चमत्कार झाला होता.
बर्गरच्या एका साध्या स्टँडपासून तो आता अमेरिकाभर भरभराटीला आलेला व्यवसाय झाला होता.
नुकताच रे यांची कंपनी शेअर बाजारात लिस्टेड झाली होती.
हो! तो व्यवसाय किंवा कंपनी म्हणजे मॅकडोनाल्ड्स. रे क्रॉक हे मॅकडोनाल्ड्सचे जनक आहेत.
रे-क्रॉक यांचं प्रेम आणि घटस्फोट
पार्टी जोरात सुरू आहे. पार्टी ऐन भरात असताना अचानक रे क्रॉक यांना जाणीव होते की त्यांना जेन यांच्याबरोबर जगभर प्रवास करायचा नाही. त्यांना जेन यांच्याबरोबर विवाहबद्ध देखील राहायचं नाही.
रे क्रॉक यांना त्यांचं ज्यांच्यावर प्रेम होतं, त्यांना जोन यांच्याशी लग्न करायचं आहे. काही वर्षांपूर्वी जोन यांच्याबरोबरच ते लास वेगासला पळून गेले होते. मात्र जोन यांच्याशी लग्न करण्याची त्यांची योजना यशस्वी झाली नव्हती. आता रे क्रॉक यांना त्यांचं प्रेम पुन्हा मिळवायचं होतं, जोन यांच्याशी लग्न करायचं होतं.
कदाचित रे यांना वाटत असावं की जोनबरोबर विवाहबद्ध होण्यासाठी आणखी एक वेळा प्रयत्न करुन पाहावा.
म्हणून, रे क्रॉक यांनी त्यांच्या वकिलाला फोन केला. त्यांनी वकिलाला सांगितलं की त्यांना जेन यांना घटस्फोट द्यायचा आहे.
तसंच त्यांनी वकिलाला हे देखील सांगितलं की जेन यांना या घटस्फोटाबद्दल वकिलानेच कल्पना द्यावी.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर रे क्रॉक जेन यांना एक प्रस्ताव देखील देत होते. जर जेन यांनी हा घटस्फोट लवकर पार पाडला, तर त्यांना 30 लाख डॉलर्स रोख दिले जाणार होते. तसंच घरदेखील देण्यात येणार होतं.
हे तपशील निश्चित झाल्यानंतर, रे क्रॉक पार्टीतून निघून गेले.
जोन रे क्रॉक यांच्या दुसरी पत्नी ठरल्या. रे यांच्या पश्चात त्यांनी स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला.
बर्गरचा बादशाह असलेल्या रे क्रॉक यांच्या मृत्यूनंतर जोन यांना जवळपास 50 कोटी डॉलर्सची संपत्ती मिळाली.
तर 2003 मध्ये जोन यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांनी त्यांच्यामागे जवळपास 3 अब्ज डॉलर्सची संपत्ती सोडली होती.
धनाढ्य व्यक्ती आणि मॅकडोनाल्ड्सचे संस्थापक असलेल्या रे क्रॉक यांची पत्नी हीच फक्त जोन यांची ओळख नव्हती.
त्यांनी त्यांच्या आयुष्यात इतकी सेवाभावी कामं केली की त्या 20 व्या शतकातील महान परोपकारी व्यक्तींपैकी एक ठरल्या.
त्यांचं औदार्य इतकं उत्साहानं भरलेलं आणि तरीदेखील विवेकी होतं की त्यांना 'सेंट जोन ऑफ द गोल्डन आर्चेस' हे टोपणनाव मिळालं होतं.
मॅकडोनाल्ड्स संस्थापक?
2016 मध्ये रे क्रॉक यांच्या जीवनावर एक चित्रपट बनवण्यात आला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं, "द फाउंडर". स्पॅनिश भाषा बोलणाऱ्या काही देशांमध्ये या चित्रपटाचं नाव "हंगर फॉर पॉवर" असं होतं. मात्र इतर काही देशांमध्ये ते मूळ नावाप्रमाणंच "एल फंडाडोर" असं ठेवण्यात आलं होतं.
चित्रपटाच्या या नावामुळे एक प्रदीर्घ काळापासून असलेला वाद पुन्हा पेटला. कारण क्रॉक हे काही मॅकडोनाल्ड्सचे संस्थापक नव्हते.
1954 मध्ये, रे क्रॉक 52 वर्षांचे होते. ते रस्त्यावर डिस्पोजेबल कप आणि मिक्सर विकायचे. त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता.
एकदा प्रवास करताना, रे क्रॉक यांची भेट रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड यांच्याशी झाली. हे दोघेही मॅकडोनाल्ड बंधू तेव्हा एक नेहमीपेक्षा वेगळं असं हॅम्बर्गर रेस्टॉरंट चालवत होते.
त्यांच्या रेस्टॉरंटमधील मेनू अगदी छोटासा होता. त्यात पदार्थांना पर्याय नव्हते. त्या काळानुसार त्यांच्या रेस्टॉरंटच्या बाबतीत आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट होती.
तेव्हा रेस्टॉरंटचे वेटर ग्राहकांपर्यंत त्यांची ऑर्डर आणून देत असत. मात्र मॅकडोनाल्ड बंधूंच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना त्यांची कार पार्क करून, मग काउंटरवर चालत यावं लागायचं.
या क्लृप्तीमुळे ते अधिक ग्राहकांना सेवा देऊ शकत होते. एखाद्या कारखान्यात जशी प्रॉडक्शन लाईन असते, त्यातूनच त्यांनी ही प्रेरणा घेतली होती. तीच संकल्पना त्यांनी रेस्टॉरंटच्या बाबतीत अंमलात आणली होती.
मॅकडोनाल्ड बंधूंनी त्यांच्या घराजवळच्या एका टेनिस कोर्टवर खडू वापरून त्यांच्या रेस्टॉरंटसाठीच्या आदर्श स्वयंपाकघराची रचना तयार केली. ग्रिल इथं असेल, स्मूथी मशीन तिथं असेल आणि फ्राईंग स्टेशन इथे असेल, अशी आखणी त्यांनी केली होती.
ग्राहकांनी ऑर्डर देणं, त्यांच्यापर्यंत खाद्यपदार्थ पोहोचणं आणि मग त्यांनी तो खाणं यामधील वेळ कमी करण्यासाठी सर्व गोष्टींचं सर्वात प्रभावी नियोजन करण्यात आलं.
त्यामुळेच मॅकडोनाल्ड त्यांच्या खाद्यपदार्थांना फास्ट फूड म्हणत असत.

फोटो स्रोत, Getty Images
स्वत: रेस्टॉरंट चालवण्याबरोबरच मॅकडोनाल्ड बंधू फ्रँचायझी देखील देत होते. त्यात ते त्यांचा लोगो म्हणजे गोल्डन आर्चेस (सोनेरी कमान), त्यांचा मेनू आणि त्यांचा मॅस्कॉट (त्यांचा बाहुला) वापरण्याची परवानगी देत असत.
मात्र तरीदेखील ते स्वत:च्या रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीनं किंवा व्यवस्थेनं काम करत होते, त्याची प्रतिकृती ते इतरत्र बनवू शकले नाहीत.
त्यानंतर रे क्रॉक यांनी या व्यवसायात भागीदारी घेतली आणि मॅकडोनाल्डला एक अद्भूत संकल्पना बनवलं.
रे क्रॉक यांनी "ग्राइंडिंग इट आउट" या नावानं त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या कामात झोकून दिलं होतं. त्यांनी लिहिलं आहे, "जसं मीट हा हॅम्बर्गरचा प्राण आहे, तसं काम हे आयुष्याचा प्राण आहे."
हे सर्व सुरू असतानाच, एके दिवशी रे क्रॉक एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथे त्यांनी एका सुंदर महिलेला पाहिलं. वयानं त्यांच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेली ही सोनेरी केसांची महिला तिथे पियानो वाजवत होती.
रे सुद्धा संगीतकार होते, मात्र त्यांना ते क्षेत्र करिअर म्हणून निवडता आलं नाही. कारण त्यांच्या वडिलांनी या कामापेक्षा एखादी व्यवस्थित नोकरी शोधण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला होता.
पियानो वाजवणाऱ्या त्या महिलेला पाहताच रे क्रॉक लगेचच तिच्या प्रेमात पडले. त्या महिलेचं नाव होतं जोन स्मिथ.
विभक्त होणं आणि समेट
रे क्रॉक आणि जोन स्मिथ हे दोघेही तेव्हा विवाहित होते.
जोन यांचे पती रॉली, यांनी मॅकडोनाल्डची फ्रँचायझी सुरू केली. त्यामुळे तिथे जाऊन जोन यांना भेटण्यासाठी रे क्रॉक यांना अगदी योग्य कारण मिळालं.
ते अनेकवेळा तिथे जाऊ लागले. विशेष म्हणजे तसं रे क्रॉक यांना खूश करणं हे कठीण काम होतं.
रे क्रॉक यांनी फ्रॅंचायझी दिलेल्या रेस्टॉंरटांना अतिशय स्वच्छ, टापटीपीचं असणं आवश्यक होतं. त्यांना मॅकडोनाल्ड्सच्या कराराचं तंतोतंत पालन करावं लागायचं.
सुरुवातीला, महिलांना मॅकडोनाल्ड्समध्ये काम करण्याची परवानगी नव्हती. कारण त्यांच्यामुळे पुरुषांचं कामावरून लक्ष विचलित होतं असं मानलं जायचं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र नंतर हा नियम बदलण्यात आला. फक्त महिला खूपच आकर्षक नसतील तरच त्यांना काम देता यायचं.
दरम्यानच्या काळात रे आणि जोन यांच्यातील प्रेम फुलत गेलं. मात्र लास वेगासमध्ये विवाह करण्याच्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर, त्या रॉली यांच्याकडे परतल्या.
रे क्रॉक यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. ही दोघं जवळपास 40 वर्षें सोबत होती.
मॅकडोनाल्ड बंधूंकडून रे क्रॉक यांनी सर्व ट्रेडमार्क आणि कॉपीराईटसह कंपनी विकत घेतली.
1963 मध्ये रे यांनी जेन डॉबिन्स ग्रीन यांच्या विवाह केला होता. मात्र जोन आणि रे यांच्या प्रेमाचे पडसाद नेहमीच या पती-पत्नीच्या नात्यावर पडत असत.
मग एकेदिवशी, म्हणजेच पाच वर्षांनी अचानक फ्लोरिडातील एका यॉटवर रे क्रॉक जेनला सोडून निघून गेले.
जोन यांनी रे क्रॉक यांचा विवाहाचा प्रस्ताव स्वीकारला
1969 मध्ये या दोघांचा विवाह रे यांच्या मोठ्या घरात झाला.
त्या घराला त्यांची पहिली पत्नी जेन यांच्या सन्मानार्थ 'जे अँड आर डबल आर्च रांच' असं म्हटलं जायचं.
मात्र रे क्रॉक यांची दुसरी पत्नी जोन यांचं नावदेखील 'जे' या आद्याक्षरांनीच सुरू होत असल्यामुळे त्यांना या घराचं नाव बदलण्याची गरज पडली नाही.
जोन यांनी गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. त्यांची एंगेजमेंट अंगठी बदामी आकाराच्या 11- कॅरेटच्या गुलाबी रंगाच्या हिऱ्याची होती.
असं असलं तरी त्यांचा संसार परीकथेसारखा होता असं म्हणता येणार नाही.

फोटो स्रोत, AP
रे क्रॉक यांचा स्वभाव "आक्रमक आणि नियंत्रणाबाहेर संताप करण्याचा" होता.
1971 मधील जोन यांच्या घटस्फोटाच्या याचिकेतील न्यायालयीन कागदपत्रांमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
त्यात त्यांनी म्हटलं होतं की 'रे यांनी त्यांना शारीरिक अपाय, हिंसाचार आणि दुखापती केल्या आहेत.'
ही गोष्ट उघड झाली आणि वृत्तपत्रांमध्ये बातमी आली की जोन यांना 'अत्यंत क्रूर मानसिकतेला सामोरं' जावं लागतं आहे.
मात्र 1972 मध्ये या जोडप्यामध्ये समेट झाला आणि हा विषय पुन्हा कधीही उपस्थित झाला नाही.
उदारमतवादी जोन आणि मानवी समस्यांबद्दल करुणा
रे क्रॉक यांचे विचार रुढीवादी होते. त्यामुळे जोन यांनी त्यांचे उदारमतवादी किंवा मुक्त विचार दडवून ठेवले.
त्या काळानुसार सार्वजनिक ठिकाणी त्या आपल्या पतीशी असहमत असणे शिष्टसंमत नव्हतं, असं त्या नंतर सांगत.
"सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांच्या मतांशी असहमत असणं हे किंवा योग्य नव्हतं," असं त्या नंतर म्हणायच्या.
मात्र एक गोष्ट त्या पूर्णपणे लपवू शकल्या नाहीत. ते म्हणजे त्यांच्या पतीच्या मद्यपानाबद्दल त्यांना वाटणारी चिंता.
रे क्रॉक दररोज 'अर्ली टाईम्स' नावाची व्हिस्की पिऊ लागले होते. त्या व्हिस्कीच्या नावाप्रमाणेच ते सकाळपासून उशीरापर्यंत ती पित असत.
जोन यांनी 'ऑपरेशन कॉर्क' नावानं मद्यपानाबद्दल जागरुकता निर्माण करणारी मोहीम सुरू केली.

फोटो स्रोत, Getty Images
दारूच्या बाटलीचे झाकण हे कॉर्कचे असते त्यामुळे त्याला ऑपरेशन कॉर्क नाव देण्यात आलं असावं असा एक अंदाज आहे. तर दुसरी गोष्ट अशी देखील आहे की कॉर्क या शब्दाचे स्पेलिंग उलट-सुलट लावले तर क्रॉक हे नाव देखील तयार होतं असं नंतर जोन स्पष्ट केलं होतं.
"मला माहीत आहे की हा ग्लॅमर नसलेला विषय आहे," असं त्यांनी 1978 मध्ये द न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
जेव्हा कॅन्सर किंवा हृदयरोगासाठी निधी उभा करायचा असतो तेव्हा लोक उदार मनाने मदत करतात पण जेव्हा मद्यपानाचा विषय निघतो तेव्हा मात्र अनेक जण दूर जातात, असं त्यांचं निरीक्षण होतं.
जोन यांनी मद्यपानाचाच मुद्दा का निवडला, हे कधीही सांगितलं नाही. त्या मुलाखतीत, त्यांनी सांगितलं की त्या मद्यपान करत नव्हत्या, तसंच त्यांचा कोणताही जवळचा नातेवाईक किंवा मित्र मद्यपी नव्हते.

फोटो स्रोत, Getty Images
'ऑपरेशन कॉर्क' अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यात मद्यपानाचा कुटुंबावर होणारा परिणाम दाखवणाऱ्या टीव्हीवरील मालिका, सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर यांच्या परिषदांचं आयोजन करणं यासारख्या कामांचा समावेश होता.
या गोष्टींमुळे मद्यपानाच्या समस्येचं निराकरण करण्यासंदर्भात अभूतपूर्व काम केलं. यामध्ये व्यसनावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांचा अभ्यासक्रम बदलण्याचा समावेश आहे.
मद्यपींचे कुटुंब त्यांच्या मद्यपानामुळे प्रभावित होतं. त्यामुळे
'देशातील 1 कोटी मद्यपींच्या कुटुंबावर आमचं लक्ष आहे,' असं जोन म्हणाल्या.
"कुटुंबातील प्रत्येक मद्यपीचा गंभीर परिणाम चार किंवा पाच सदस्यांवर होतो. आम्हाला त्यांना दाखवायचं आहे की ते काय करू शकतात आणि त्यांना का प्रकारे मदत मिळू शकते."
"मला व्यवसायात अजिबात रस नाही. माझा मेंदू तल्लख आहे आणि मी तर्कसंगत विचार करते. मात्र मला खरी चिंता मानवी समस्यांबाबत वाटते," असं जोन पुढे म्हणाल्या.
परोपकारी कामाचा मोठा वारसा
1984 मध्ये वयाच्या 81 व्या वर्षी रे क्रॉक यांचं निधन झालं. असं म्हणता येईल की त्यानंतरच जोन क्रॉक यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं सुरू झालं.
त्यावेळेस जोन 55 वर्षांच्या होत्या आणि अमेरिकेतील सर्वात प्रचंड संपत्तीपैकी एकाची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्यावर होती. त्यांना या संपत्तीपासून सुटका करून घ्यायची होती.
जोन यांच्या या परोपरकारी, सेवाभावी कामाकडे दोन प्रकारे पाहता येतं. एक म्हणजे हे काम रे क्रॉक यांना दिलेली श्रद्धांजली आहे, त्याचं नाव लोकांच्या स्मरणात राहावं यासाठी हे करण्यात आलं. तर दुसरा मार्ग म्हणजे तो जोन यांनी शांतपणे उगवलेला सूड होता.
जोन यांनी ज्या अनेक कामांना मदत केली, ते पाहून रे क्रॉक हादरले असते.
त्यांनी डेमोक्रॅटिक पार्टीला त्यांची पहिली 10 लाख डॉलर्सची देणगी दिली. डेमोक्रेटिक पार्टीचा अण्वस्त्रबंदीला पाठिंबा होता.
1985 मध्ये त्यांनी संशोधन संस्थेसाठी 60 लाख डॉलर्सची देणगी दिली होती. "तत्कालीन समाजातील शांतता, न्याय आणि हिंसाचार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करण्यासाठी अनेक अंगांनी संशोधन आणि अध्यापन करण्यासाठी केंद्र तयार करण्यासाठी," ही देणगी देण्यात आली होती.
नोत्र दाम मध्ये जोन बी. क्रॉक इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल पीस स्टडीजची स्थापना जोन यांनी दिलेल्या 6.9 कोटी डॉलर्सच्या देणगीमुळेच झाली.
वृद्ध झालेल्या आणि मृत्यूच्या जवळ पोहोचलेल्या लोकांची सेवा शुश्रूषा करणारं विशेष प्रकारचं हॉस्पिटल आणि एड्सवरील संशोधन याला प्रोत्साहन आणि निधी देणाऱ्या त्या पहिल्या व्यक्तींपैकी एक होत्या.
एखाद्या मुलाला एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या वर्गमित्रांनी त्याच्या शेजारी बसण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यासाठी विशेष शिक्षकाची व्यवस्था करण्यासाठी देखील त्यांनी पैसे दिले.

फोटो स्रोत, Getty Images
आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्तीवर होणाऱ्या मनाच्या परिणामांवर मूलभूत काम करणाऱ्या लेखक आणि अभ्यासक नॉर्मन कझिन्स यांच्यापासून ते संघर्ष करणारे चित्रपट, प्राणीसंग्रहालय आणि नाट्यगृहांपर्यंत सर्वत्र त्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली.
त्यांची प्रचंड आणि उत्साही उदारता कधीकधी विचारपूर्वक असायची तर कधीकधी उत्स्फूर्तपणाची असायची. त्यांना अस्वस्थ करणाऱ्या बातम्या किंवा ज्या लोकांना त्या भेटल्या होत्या, त्यांच्या हेलावून टाकणाऱ्या कहाण्यांमुळे त्या उत्स्फूर्तपणे मदत करायच्या.
अर्थात, त्यांनी फक्त सर्व सेवाभावी कामासाठीच पैसा खर्च केला असं नाही.
जोन सेवाभावी स्वभावाच्या होत्या म्हणून त्या काही संन्यस्त किंवा भौतिक सुखांपासून दूर असं आयुष्य जगल्या नाहीत.
त्या त्यांच्या खासगी विमानाचा वापर एखाद्या टॅक्सीसारखा करत असत. त्या विमानानं मित्रमंडळींना जुगार खेळण्यासाठी लास वेगासला घेऊन जायच्या. पाळीव प्राणी आणण्यासाठी विमानाचा वापर करायच्या. त्यांनी क्रिस्तिजमध्ये फॅबर्गे एगसारख्या बारीक नक्षीकाम आणि संपत्तीचं प्रदर्शन करणारी वस्तू 30 लाख डॉलर्सना विकत घेतली होती.
एकदा तर त्यांनी एका ऑपेरा कंपनीला 10 लाख डॉलर्सची देणगी देण्याचं आश्वासन दिलं होतं. कारण काय तर, त्यांनी त्यांचा शो सोडून थेट डिनरला जावं यासाठी.
पडद्याआड राहून केली प्रचंड मदत
मात्र जेव्हा सेवाभावी कामाचा मुद्दा आला, तेव्हा त्यांनी आपल्या नावाचं कौतुक व्हावं, त्याच्याशी जोडलं जावं किंवा गवगवा व्हावा असा विचार न करता बहुतांश मदत केली.
1997 मध्ये त्यांनी नॉर्थ डाकोटा आणि मिनेसोटामधील पूरग्रस्तांना गुप्तपणे 1.5 कोटी डॉलर्सची मदत केली होती. त्यांनी याची वाच्यता केली नव्हती. मात्र एका पत्रकारानं ही मदत त्यांनी केल्याचं शोधून काढलं. मात्र तरीदेखील त्यांनी सार्वजनिकरीत्या ते मान्य केलं नाही.
असंच आणखी एका प्रसंगात घडलं आहे. त्यावेळेस देखील आर्थिक मदत त्यांनी केली होती हे उघड झालं होतं.
रे क्रॉक यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं होतं. जोन यांनी मात्र त्याप्रमाणे कधीही आत्मचरित्र लिहिलं नाही.
त्यांच्याबद्दल आपल्याला जी माहिती मिळते ती त्यांच्या चरित्रकार लिसा नॅपोली यांच्याकडून मिळते. तसंच लिसा यांनी "रे अँड जोन: द मॅन हू मेड द मॅकडोनाल्ड्स फॉर्चुन अँड द वुमन हू गेव्ह इट ऑल अवे" हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातून आपल्याला जोन यांच्याबद्दल माहिती मिळते.
नॅपोली यांनी जोन यांनी मदत केलेल्या कामांची थक्क करुन टाकणारी यादीच तयार केली आहे. त्यात मशरूम क्लाउड पुतळ्यापासून ते ऑलिम्पिकच्या मशाल रिलेपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2003 मध्ये जोन यांचं निधन झालं. त्यावेळेस त्यांनी 'द साल्व्हेशन आर्मी'ला तब्बल 1.8 अब्ज डॉलरची मदत केली.
ही रक्कम त्यांच्या एकूण संपत्तीच्या जवळपास अर्धी होती. यातील एक गंमतीची गोष्ट म्हणजे, बँकेतून सुरूवातीला ही रक्कम ट्रान्सफरच झाली नाही. कारण त्या संख्येत खूप जास्त शून्य होते.
जोन यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी लाखो डॉलर्सची मदत करण्यात आली. ही मदत गरीब वस्त्यांमध्ये पहिल्या दर्जाची डझनावारी मनोरंजन केंद्रे निर्माण करण्यासाठी देण्यात आली होती.
त्यांनी दिलेली आणखी एक मोठी देणगी म्हणजे, एनपीआर या अमेरिकेतील सार्वजनिक रेडिओ नेटवर्कला दिलेले 22 कोटी डॉलर्स.
या नेटवर्कच्या इतिहासातील ही सर्वात मोठी देणगी होती.
अर्थात जोन यांनी सार्वजनिक टीव्हीसाठी काहीही मदत केली नाही. कारण त्यांनी जोन यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही.
कदाचित त्यांना जोन कोण आहेत हे माहीत नव्हतं. कारण जोन अशी मदत स्वत:चं नाव पुढे न करता करायच्या.
त्यांनी पडद्याआड राहून किंवा गुप्तपणे इतकी मदत केली होती की त्यांच्या बहुतांश सेवाभावी कामांबद्दल, देणग्यांबद्दल जगाला माहीतच नव्हतं.
त्यामुळेच वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचा मेंदूच्या कर्करोगानं मृत्यू झाल्यानंतर द न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात त्यांच्या निधनानंतर लिहिण्यात आलेला लेख फक्त पाच परिच्छेदांचाच होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











