भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया घालणाऱ्या रॉबर्ट क्लाईव्हना आत्महत्या का करावी लागली?

रॉबर्ट क्लाईव्ह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉबर्ट क्लाईव्ह किशोर वयातच खूप हिंसक आणि खोडकर होते
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

रॉबर्ट क्लाईव्ह लहानपणापासूनच खोडकर आणि आक्रमक होते. ते सात वर्षांचे होईपर्यंत त्यांना एकप्रकारे भांडण्याचं व्यसनच लागलं होतं. क्लाईव्ह यांचं व्यक्तिमत्वं असं होतं की, नम्रपणा, उदारपणा आणि धैर्य या गुणांशी आयुष्यभर कधीच संबंध आला नाही.

ब्रिटिश इतिहासकार जॉर्ज फॉरेस्ट यांनी 'द लाईफ ऑफ लॉर्ड क्लाईव्ह' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात जॉर्ज यांनी लिहिलं आहे, "किशोरवयात येईपर्यंत क्लाईव्ह एकप्रकारे बाल गुन्हेगार बनला होता."

"क्लाईव्ह त्याच्या गावातील त्रस्त व्यापाऱ्यांसाठी एक प्रोटेक्शन रॅकेट चालवत होता. त्याचं म्हणणं न ऐकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी तुंबवणं हा त्याचा खास छंद होता."

रॉबर्ट क्लाईव्ह 17 वर्षांचे होईपर्यंत त्यांचे वडील रिचर्ड क्लाईव्ह यांना अंदाज आला होता की रॉबर्टवर नियंत्रण ठेवणं ही त्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.

सुदैवानं रिचर्ड क्लाईव्ह यांची ईस्ट इंडिया कंपनीच्या एका संचालकांशी परिचय होता. त्यामुळे रिचर्ड यांनी ईस्ट इंडिया कंपनीत मुलाच्या नोकरीसाठी शिफारस करवून घेतली.

त्या संचालकाच्या शिफारशीवरून 15 डिसेंबर 1742 ला रॉबर्ट क्लाईव्ह पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे त्यांना रायटर म्हणजे कारकून म्हणून नोकरी देण्यात आली.

तीन महिन्यानंतर रॉबर्ट क्लाईव्ह एका जहाजातून भारताच्या दिशेनं निघाले.

सुरुवातीपासूनच होता भारताबद्दल द्वेष

रॉबर्ट क्लाईव्ह यांचा भारतापर्यंतचा प्रवास खूपच त्रासदायक ठरला. प्रवासात ते जहाजातून समुद्रात पडले आणि बुडता-बुडता वाचले. योगायोगानं एका खलाशाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यानं रॉबर्टना बुडण्यापासून वाचवलं.

मद्रासला (आताचं चेन्नई) पोहोचल्यावर रॉबर्ट क्लाईव्ह एकटेपणाचं आणि नीरस आयुष्य जगू लागले. कधी-कधी त्यांचं सहकाऱ्यांशी भांडण व्हायचं.

रॉबर्ट क्लाईव्ह

फोटो स्रोत, BLOOMSBURY

फोटो कॅप्शन, भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया घालणारे रॉबर्ट क्लाईव्ह

एकदा फोर्ट सेंट जॉर्जच्या सचिवांबरोबर इतकं गैरवर्तन केलं की, गव्हर्नरनं क्लाईव्ह यांना सर्वांसमोर माफी मागण्यास सागितलं.

विलियम डेलरिंपल यांनी 'द अनार्की' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, "लवकरच क्लाईव्ह यांच्या मनात भारताबद्दल द्वेष निर्माण झाला. आयुष्यभर त्यांच्या मनात हा द्वेष असाच राहिला."

"भारतात एक वर्ष वास्तव्य केल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी पत्र लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की मायदेश सोडल्यानंतर त्यांचा एकही दिवस आनंदात गेलेला नाही."

"ते इतके निराश झाले होते की एकदा त्यांनी आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला होता."

कोणतीही भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न केला नाही

कीथ फीलिंग यांनी त्यांच्या 'वॉरेन हेस्टिंग्स' या पुस्तकात लिहिलं आहे, "क्लाईव्ह यांना भारतात कधीही रस नव्हता. भारतातील सौंदर्याचा प्रभाव त्यांच्यावर कधीच पडला नाही."

"भारताचा इतिहास, धर्म आणि प्राचीन संस्कृती जाणून घेण्याची इच्छा त्यांच्यात कधीच निर्माण झाली नाही. इथल्या लोकांबद्दल त्यांना कोणतंच कुतुहल नव्हतं. तो भारतीयांकडे तुच्छतेनं पाहत असे."

मात्र, रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यामध्ये एक कौशल्य किंवा क्षमता सुरुवातीपासूनच होती. ती म्हणजे प्रतिस्पर्ध्याची क्षमता ओळखण्याची आणि संधीचा फायदा घेण्याची क्षमता. तसंच धोका पत्करण्याचं धाडसदेखील त्यांच्यात आधीपासूनच होतं.

विलियम डेलरिंपलचं पुस्तक, 'द अनार्की'

फोटो स्रोत, BLOOMSBURY

फोटो कॅप्शन, विलियम डेलरिंपलचं पुस्तक, 'द अनार्की'

परिणामांची पर्वा न करता शौर्य दाखवण्याचा गुणदेखील त्यांच्याकडे होता.

1746 मध्ये फ्रान्सनं मद्रासवर हल्ला केल्यानंतर आणि जिंकल्यानंतर त्यांचा हा गुण सर्वांसमोर आला होता.

रॉबर्ट क्लाईव्ह यांना मिळालं लेफ्टनंटचं पद

फ्रेंच लष्करी अधिकारी, जनरल जुप्लेक्स यानं मद्रास ताब्यात घेतलं, तेव्हा रॉबर्ट क्लाईव्ह तिथेच होते. ते रात्रीच्या वेळेस वेश बदलून फ्रेंच शिपायांना चकवून शहराबाहेर निसटले होते.

त्यानंतर ते पायी चालत कोरोमंडल किनाऱ्यावरील फोर्ट सेंट डेव्हिस या एका छोट्या ब्रिटिश तळावर पोहोचले होते.

इथे त्यांना 'ओल्ड कॉक' नावानं प्रसिद्ध स्ट्रिंगर लॉरेन्स यांनी लढण्याचं प्रशिक्षण दिलं. लॉरेन्स हा क्लाईव्हमधील क्षमता ओळखणारा पहिला व्यक्ती होता.

1740 च्या दशकात जुप्लेक्स त्याच्या सैनिकांच्या तुकड्यांना नवाबांच्या सेवेत पाठवत होता. क्लाईव्ह त्यांच्या लष्करी कौशल्यामुळे लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचले होते. त्याच वेळेस फ्रेंच सैनिकांची नक्कल करत लॉरेन्स आणि क्लाईव्हनं त्याच्या सैनिकांना देखील प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीकडे फक्त काहीशे सैनिक होते. त्या सैनिकांकडे नीट गणवेश देखील नसायचा. 1750 च्या दशकाच्या मध्यात क्लाईव्ह यांनी त्यांच्या वडिलांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं, 'त्या काळात युद्धकलेत आम्ही किती नवशिखे होतो.'

रॉबर्ट क्लाईव्ह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आरकोटच्या वेढ्यानंतर रॉबर्ट क्लाईव्ह चर्चेत आले

26 ऑगस्ट 1751 ला क्लाईव्हनं पहिल्यांदा नाव कमावलं. त्यावेळेस मुसळधार पावसात कर्नाटकातील नवाबाच्या, आरकोट या राजधानीला वेढ्यातून सोडवण्यासाठी क्लाईव्हनं 200 इंग्रज सैनिक आणि 300 भारतीय सैनिकांना घेऊन कूच केलं होतं.

सर पँड्रल मून यांनी 'द ब्रिटिश कॉन्क्वेस्ट अँड डॉमिनियन ऑफ इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे की, "क्लाईव्हनं भर वादळ,पावसात हल्ला केला. ते पाहून फ्रेंच सैनिक आणि त्याचे सहकारी थक्क झाले. या विजयामुळे पहिल्यांदा असं दिसून आलं की ईस्ट इंडिया कंपनी भारतात यशस्वी लष्करी मोहीमदेखील चालवू शकते."

"ईस्ट इंडिया कंपनीचा आत्मविश्वास वाढण्यामध्ये या विजयाचा मोठा वाटा होता. एक सैनिक म्हणून क्लाईव्हनं जलद हालचाली आणि शत्रूला आश्चर्यचकित करणं या डावपेचांचा वापर नेहमी केला."

फ्रेंच लष्करी अधिकाऱ्याची शरणागती

क्लाईव्हला सर्वात मोठं लष्करी यश 1752 मध्ये मिळालं. त्यावेळेस मद्रासवर होणारा हल्ला त्यांनी यशस्वीरित्या परतला होता.

त्यांनी आणि स्ट्रिंगर लॉरेन्स यांनी एकत्रितपणे नवाब मोहम्मद अली चा पराभव केला आणि आरकोट आणि तिरुचिरापल्ली जिंकून घेतलं. 13 जून 1752 ला फ्रेंच कमांडरनं क्लाईव्ह समोर शरणागती पत्करली होती.

क्लाईव्हनं एकूण 85 फ्रेंच सैनिक आणि 2000 भारतीय सैनिकांना कैद केलं. सर पँड्रल मून यांनी लिहिलं आहे की, "या विजयामुळे जुप्लेक्सच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला. पराभवाची बातमी ऐकल्यानंतर त्याला जेवण केलं नाही."

"काही दिवसांतच त्याला बडतर्फ करण्यात आलं आणि तो अपमानित होऊन फ्रान्सला परतला. याउलट मद्रासमध्ये क्लाईव्हचं स्वागत एक हिरो किंवा नायक म्हणून करण्यात आलं."

फ्रेंच जनरल जुप्लेक्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फ्रेंच जनरल जुप्लेक्स

लेफ्टनंट कर्नल पदावर बढती

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या यशामुळे क्लाईव्ह यांना फक्त क्वार्टर-मास्टरच्या पदाबरोबर 40 हजार पौंड बक्षीस म्हणून देण्यात आले.

23 मार्च 1753 ला क्लाईव्ह आणि त्यांची पत्नी बॉम्बे कॅसल जहाजानं इंग्लंडला जायला निघाले. लंडनला पोहोचल्यावर क्लाईव्हनं लगेचच त्यांच्या कुटुंबावर असणाऱ्या कर्जाची परतफेड केली. त्यांनी ब्रिटिश संसदेत खासदार होण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांची राजकीय कारकीर्द तशी यशस्वी झाली नाही.

फ्रेंचांकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना पुन्हा एकदा भारतात बोलावून घेण्यात आलं. यावेळेस क्लाईव्ह यांना मद्रासचं डेप्युटी गव्हर्नर पद देण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना लेफ्टनंट कर्नलचं पद देखील देण्यात आलं.

बंगालचा नवाब सिराजुद्दौलानं 1756 मध्ये कलकत्त्यात (आताचं कोलकाता) फोर्ट विलियम जिंकून घेतला. 16 ऑगस्टला ही बातमी मद्रासला पोहोचली. त्यावेळेस रॉबर्ट क्लाईव्ह ॲडमिरल वॉटसनच्या जहाजांच्या ताफ्यासह कोरोमंडलच्या किनाऱ्यावर पोहोचले.

फ्रेंचाकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याशी सामना करण्यासाठी त्यांना सज्ज करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळेस क्लाईव्हनं या गोष्टीवर भर दिला की बंगालमध्ये कंपनीसमोर जे आव्हान उभं ठाकलं आहे, त्याला तोंड देणं जास्त महत्त्वाचं आहे.

रॉबर्ट क्लाईव्ह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखआली नवाब सिराजुद्दौलाविरोधात युद्ध पुकारण्यात आलं होतं

दोन महिन्यांच्या तयारीनंतर 785 इंग्रज सैनिक, 940 भारतीय सैनिक आणि 300 नौसैनिक, सागरी मार्गानं कोलकात्याच्या दिशेनं निघाले.

या ताफ्यातील पहिलं जहाज 9 डिसेंबरला कोलकात्याला पोहोचलं. तोपर्यंत क्लाईव्हचे निम्मे सैनिक आजारांमुळे मरण पावले होते. तीन जानेवारीला क्लाईव्हनं सिराजुद्दौलाविरुद्ध युद्ध पुकारलं.

ईस्ट इंडिया कंपनीनं एखाद्या भारतीय राजाच्या विरोधात लढाईची औपचारिक घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ होती.

त्यांनी आधी हुगळीचे घाट लुटले, मग फोर्ट विलियमच्या आसपासच्या प्रदेशावर कब्जा केला. त्यानंतर सिराजुद्दौलानं क्लाईव्हकडे त्याचा शांतीदूत पाठवला.

नऊ फेब्रुवारीला अलीनगर करारावर सह्या झाल्या. या करारामुळे कंपनीला तिचे जुने अधिकार पुन्हा मिळाले. दुसऱ्या दिवशी सिराजुद्दौला पुन्हा मुर्शिदाबादकडे निघून गेला.

मात्र 13 जूनला क्लाईव्हनं सिराजुद्दौलाला पत्र लिहून इशारा दिला की त्यानं अलीनगर करारातील अटी मोडण्यास सुरुवात केली आहे.

त्याच दिवशी क्लाईव्हनं 800 इंग्रज सैनिक आणि 2200 दक्षिण भारतीय सैनिक घेऊन प्लासीच्या दिशेनं कूच केलं.

मुर्शिदाबादचे नवाब सिराजुद्दौला यांचं एक पेंटिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुर्शिदाबादचे नवाब सिराजुद्दौला यांचं एक पेंटिंग

प्लासीची ऐतिहासिक लढाई

23 जून 1757 ला सकाळी आठ वाजता प्लासीच्या लढाईचा पहिला तोफगोळा डागण्यात आला. प्लासी हे मुर्शिदाबादच्या दक्षिणेला जवळपास 50 किलोमीटर अंतरावरील एक छोटं शहर होतं.

या तोफगोळ्याचा मारा सिराजच्या सैनिकांनी केला होता. क्लाईव्हला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. कारण त्यांच्या गुप्तहेरांनी त्यांना माहिती दिली होती की सिराजच्या सैनिकांकडे कोणतीही तोफ नाही.

सुरुवातीला क्लाईव्हच्या सैन्याचं नुकसान झालं. त्यानंतर क्लाईव्हनं त्यांच्या सैनिकांना थोडं मागे सरकवलं. दुपारच्या सुमारास आकाशात ढग जमा होऊ लागले, वीजा कडाडू लागल्या आणि रणांगणात एक मोठं वादळ आलं. थोड्याच वेळात कोरड्या जमिनीत सर्वत्र चिखल झाला.

विलियम डेलरिंपल लिहितात, "कंपनीच्या सैनिकांनी ताडपत्रीचा वापरून पावसापासून त्यांच्या दारूगोळ्याचं आणि तोफांचं रक्षण केलं. पाऊस सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांमध्येच सिराजच्या सर्व तोफा थंडावल्या."

"पावसामुळे कंपनीच्या तोफा देखील निकामी झाल्या असतील असा विचार करून नवाबाचा सेनापती मीर मदननं त्याच्या सैनिकांना हल्ला चढवण्याचा आदेश दिला."

प्लासीच्या लढाईतील क्लाईव्ह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्लासीच्या लढाईतील क्लाईव्ह

हुसैन खाँ यांनी 'सैर मुताखरीन' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी या लढाईचं वर्णन केलं आहे.

त्यांनी लिहिलं आहे की, "तोफांचा मारा करण्यात इंग्रज सैनिकांचा हात कोणीही धरू शकत नव्हतं. ते अतिशय शिस्तबद्धपणे काम करायचे आणि अतिशय वेगानं काम करायचे."

"इंग्रजांनी नवाबाच्या सैन्यावर तोफांचा आणि गोळ्यांचा असा पाऊस पाडला की नवाबाचे सैनिक आश्चर्यानं उभं राहून पाहतच राहिले. तोफांच्या आवाजानं त्यांच्या कानाचे पडदे फाटले. तोफगोळ्यांच्या प्रकाशामुळे त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली."

सिराजचे बरचसे सैनिक मारले गेले. त्यांचा सेनापती मीर मदन देखील यात मारला गेला. मीर मदन त्यांच्या सैन्याला हल्ला चढवण्यासाठी प्रोत्साहन देत असतानाच तोफेचा एक गोळा त्याच्या पोटावर आदळला आणि तो तिथेच मारला गेला.

ते दृश्य पाहून सिराजुद्दौलाच्या सैन्यानं कच खाल्ली. ते मीर मदनचा मृतदेह घेऊन तंबूंमध्ये घुसले. दुपार होईपर्यंत त्यांनी ते तंबूदेखील सोडले आणि लढाईच्या मैदानातून पळ काढू लागले.

रॉबर्ट क्लाईव्ह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्लासीच्या लढाईमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह यांनी इंग्रजांच्या सैन्याचं नेतृत्वं केलं होतं

क्लाईव्हनं सिराजुद्दौलाचा केला पाठलाग

त्याच वेळेस क्लाईव्हचा डेप्युटी मेजर किलपॅट्रिक पुढे सरसावला. सिराजुद्दौलाच्या सैनिकांनी जे तळ सोडले होते, त्यावर त्यानं कब्जा करण्यास सुरुवात केली.

क्लाईव्हच्या किलपॅट्रिकला सूचना होत्या की आदेश मिळाल्याशिवाय हल्ला करू नये. मात्र जेव्हा किलपॅट्रिकनं अशाप्रकारे हल्ला चढवल्याचं क्लाईव्हना कळालं तेव्हा तो संतापले.

त्यांनी रागाच्या भरात किलपॅट्रिकला निरोप पाठवला की त्यानं जर आदेशाचं पालन केलं नाही तर त्याला अटक करण्यात आली. मात्र किलपॅट्रिकनं आदेश न मानल्यामुळेच क्लाईव्हला या लढाईत विजय मिळाला.

इंग्रजांच्या हल्ल्यामुळे सिराजुद्दौलाचं सैन्यं लढाईच्या मैदानातून पळ काढू लागलं. सुरुवातीला असं वाटलं की ते फक्त मागे हटत आहेत. मात्र लवकरच नवाबच्या सैन्यात गोंधळ उडाला.

प्लासीच्या लढाईतून पळ काढताना नवाब सिराजुद्दौला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्लासीच्या लढाईतून पळ काढताना नवाब सिराजुद्दौला

रॉबर्ट क्लाईव्ह यांनी या लढाईचा जो प्राथमिक अहवाल लिहिला, तो अजून राष्ट्रीय संग्रहात व्यवस्थित जतन करण्यात आला आहे.

त्यात क्लाईव्हनं लिहिलं आहे की, "आम्ही शत्रूचा सहा मैलांपर्यंत पाठलाग केला. ते 40 तोफा सोडून पळाले होते. सिराजुद्दौला उंटावर बसून तिथून निसटला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुर्शिदाबादला पोहोचला."

प्लासीच्या लढाईत विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी एक लष्करी शक्ती म्हणून उदयास आली. त्यातूनच भारतात इंग्रजाच्या राजवटीचा पाया घातला गेला.

रॉबर्ट क्लाईव्ह बनले युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

रॉबर्ट क्लाईव्ह 27 जून 1757 ला मुर्शिदाबादमध्ये प्रवेश करणार होते. मात्र जगत सेठनं त्यांना इशारा दिला की तिथे त्यांची हत्या केली जाऊ शकते. त्यामुळे 29 जूनला क्लाईव्ह मुर्शिदाबादमध्ये पोहोचले.

सर पँड्रल मून यांनी लिहिलं आहे, "मीर जाफरनं क्लाईव्ह यांना गादीवर बसवलं. त्यावेळेस क्लाईव्ह यांनी सर्वांसमोर सांगितलं की कंपनी त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नाही. कंपनी फक्त व्यापारावरच लक्ष केंद्रीत करेल."

मुर्शिदाबादच्या खजिन्यात फक्त दीड कोटी रुपये होते. क्लाईव्हच्या अपेक्षेपेक्षा ही रक्कम कमी होती.

सिराजुद्दौलाचा पराभव केल्यानंतर मुर्शिदाबादमध्ये मीर जाफरच्या दरबारात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिराजुद्दौलाचा पराभव केल्यानंतर मुर्शिदाबादमध्ये मीर जाफरच्या दरबारात

विलियम डेलरिंपल यांनी लिहिलं आहे, "या मोहिमेसाठी क्लाईव्ह यांना वैयक्तिक दोन लाख 34 हजार पौंडांचं बक्षीस मिळालं. याशिवाय त्यांना एक जहागीरदेखील देण्यात आली."

"त्या जहागिरीचं वार्षिक उत्पन्न 27 हजार पौंडांचं होतं. त्यामुळे वयाच्या 33 वर्षी अचानक क्लाईव्ह युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले."

क्लाईव्ह इंग्लंडला गेल्यावर त्यांचं तिचे एखाद्या नायकाप्रमाणे स्वागत करण्यात आलं. नंतर ब्रिटनचे पंतप्रधान झालेल्या विलियम पिट यांनी त्यांना 'स्वर्गात जन्माला येणारा जनरल' ही पदवी दिली.

1761 मध्ये क्लाईव्ह यांनी श्रूसबरीमधून खासदारकीची निवडणूक लढवली. ती निवडणूक ते जिंकले देखील. दोन वर्षांनी 'नाइट' या पदवीनं त्यांना गौरविण्यात आलं.

त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या विनंतीवर, क्लाईव्ह यांना पुन्हा एकदा गव्हर्नर आणि सैन्याचा सेनापती बनवून कोलकात्याला पाठवण्यात आलं. मे, 1765 मध्ये क्लाईव्ह कोलकात्यात पोहोचले.

क्लाईव्हवरील आरोप आणि चौकशी

1767 मध्ये क्लाईव्ह यांनी भारत सोडला आणि ते इंग्लंडला माघारी परतले. 1773 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्स (कनिष्ठ सभागृह) कडून क्लाईव्ह यांच्याविरोधात चौकशी करण्यात आली. क्लाईव्हवर चुकीच्या पद्धतीनं प्रशासन चालवल्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता.

तर क्लाईव्ह यांनी दिलेल्या भाषणात, त्यांना 'भुरट्या चोरा'सारखी वागणूक दिल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला.

ते म्हणाले, "प्लासीच्या लढाईनंतर एक मोठा राजकुमार माझ्या इच्छेवर अवलंबून होता. एक समृद्ध शहर माझ्या दयेवर चालत होतं. तिथले श्रीमंत बँकर माझं फक्त एक स्मित मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत होते."

"सोनं आणि रत्नांनी भरलेला खजिना माझ्यासाठी खुला करण्यात आला होता. अध्यक्ष महाशय, माझ्या संयमाबद्दल मलाच आश्चर्य वाटतं आहे."

क्लाईव्ह यांनी दोन तास त्यांची बाजू मांडली. शेवटी त्यांनी ते प्रसिद्ध वक्तव्यं केलं, "तुम्ही माझी संपत्ती घेऊ शकता, मात्र माझा सन्मान तरी राखा."

जेव्हा ते खोलीतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. संपूर्ण रात्रभर कारवाई सुरू होती. त्यानंतर क्लाईव्ह यांच्या विरोधातील सर्व आरोप मागे घेण्यात आले. त्यांच्या बाजूनं 155 मतं पडली तर त्यांच्या विरोधात 95 मतं पडली.

रॉबर्ट क्लाईव्ह यांचा पुतळा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रिटनमध्ये हळू-हळू रॉबर्ट क्लाईव्ह यांच्याविरोधात आवाज उठू लागला

क्लाईव्हचा दुर्दैवी शेवट

या चौकशीतून तर क्लाईव्ह यांची सुटका झाली. मात्र, त्यांना मानसिक शांतता मिळाली नाही.

त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी त्यांना फारसा वेळदेखील मिळाला नाही.

दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत गेली. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारवायांच्या बातम्या जसजशा इंग्लंडमध्ये पोहोचू लागल्या, तसतसं तिथलं जनमत त्यांच्या विरोधात होत गेलं.

22 नोव्हेंबर 1774 ला वयाच्या फक्त 49 व्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्ह यांनी आत्महत्या केली.

त्यावेळेस त्यांनी कोणतीही सुसाईड नोट मागे ठेवली नव्हती. रात्रीच्या अंधारात गुप्तपणे त्यांना एका कबरीत दफन करण्यात आलं. त्यांच्या कबरीवर कोणताही शिलालेख देखील लावण्यात आला नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)