सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्यात नेमके कसे संबंध होते?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, उर्विश कोठारी
- Role, बीबीसी, गुजरातीसाठी
'लोहपुरुष', 'इंडियाज बिस्मार्क', 'भारताच्या एकतेचे शिल्पकार', 'जगातील सर्वात उंच पुतळा असलेला नेता' अशा अनेक लोकप्रिय ओळखी सरदार वल्लभभाई पटेल यांचा खरा परिचय करून देण्यासाठी अपुऱ्याच ठरतात.
त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या पैलूंचा परिचय करून देण्याच्या उद्देशानं, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्माच्या 150 व्या वर्षाच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत या मालिकेअंतर्गत दर महिन्याला एक लेख प्रकाशित केला जाईल.
सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्यात संबंध कसे होते? या प्रश्नाचे उत्तर मागच्या अडीच दशकात भारतात जन्मलेल्या, म्हणजे भारताच्या 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला विचारले तर?
व्हॉट्सॲपच्या युगात समज (किंवा गैरसमज) झालेल्या पिढीच्या अनेक लोकांना असं वाटत असेल की, सरदार आणि नेहरू एकमेकांचे विरोधक किंवा शत्रू किंवा किमान प्रतिस्पर्धी होते.
पण याबाबत केवळ तरुण पिढीला दोष कसा देता येईल? कारण मागील पिढीतही असा गैरसमज असणारे लोक कमी नाहीत.
भारताच्या स्वराज्यरथाच्या या दोन चाकांमधील फरक उलगडत असताना, या दोन चाकांमध्ये समन्वय नसता तर स्वातंत्र्यानंतर लवकरच रथ रुळावरून घसरला असता किंवा अडखळला असता, हे सहजपणे विसरलं जातं. असं झालं नाही आणि भारतात स्थिर, लोकशाही स्थापन झाली. हे सर्वात सरळ आणि साधं सत्य आहे.


स्वतंत्र प्रतिभा, विचारसरणी असलेल्या नेत्यांमध्ये मतभेद होणं स्वाभाविक आहे. त्याचवेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे की, सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू अनेक दशके गांधींच्या छत्रछायेखाली स्वराज्याच्या लढ्यात एकमेकांचे सहकारी होते. ते केवळ राजकारणी नव्हते.
त्यांच्यातील संबंध साधारणपणे तीन भागात विभागले जाऊ शकतात...
- राजकारणात प्रवेशापासून 1945 पर्यंतचा जवळपास तीन दशकांचा काळ
- त्यानंतर 1945 ते 1947 पर्यंत सत्ता हस्तांतरणाचा टप्पा आला
- शेवटी स्वातंत्र्यापासून 1950 मध्ये सरदारांच्या मृत्यूपर्यंत
तीन दशके, दोन पिढ्या, एक ध्येय
सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातील नातेसंबंधांबद्दल बोलताना, त्यांच्या वयातील फरक विचारात घ्यावा लागेल. सरदार हे नेहरूंपेक्षा 14 वर्षांनी मोठे होते. जवळजवळ एका पिढीचं अंतर होतं. (गांधीजी सरदार वल्लभभाईंपेक्षा 6 वर्षांनी मोठे होते.)
दोघांचे संगोपन वेगवेगळ्या पद्धतीनं झालं होतं. कौटुंबिक वातावरणही वेगळं होतं. नेहरू हे लहानपणापासूनच चळवळीत सक्रिय झाले होते. परंतु, वल्लभभाई स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले तेव्हा ते चाळीशीत होते आणि सांसारिक जीवनातून निवृत्त म्हणजे संसारच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त झाले होते.
नेहरूसोबत वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची आणि मतभेदांची सुरूवात 1920 च्या दशकात झाली होती. परंतु याकडे 'सरदार विरुद्ध नेहरू' असं पाहिलं जाऊ शकत नाही. कारण काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी, दोन्ही बाजूने अनेक नेत्यांचा समावेश होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्या काळातील काँग्रेसमध्ये देशभरातील विविध प्रकारचे नेते होते– डाव्या, उजव्या, मध्यममार्गी, रूढीवादी, उदारमतवादी, आक्रमक आणि मवाळ यांसारख्या विविध विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारे नेते त्या पक्षात होते.
त्यामध्ये वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांसारखे नेते उजव्या विचारांचे होते, तर जवाहरलाल नेहरू डाव्या विचारधारेकडे झुकलेले होते.
समाजवादाचा आदर्श नेहरुंना खूप आकर्षित करत होता, तर सरदार पटेल यांना ते एक असं गुलाबी स्वप्न वाटायचं जे वास्तविकतेपासून दूर आहे.
समाजवाद्यांच्या सहभागाच्या मुद्द्यावर 1936 मध्ये काँग्रेसमध्ये मतभेद झाले. त्यावेळी सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद आणि राजगोपालाचारी यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीतून राजीनामा देऊन आपला विरोध दर्शवला.
नेहरूंनी देखील त्यांचा राजीनामा दिला. अखेर गांधीजींनी दोन्ही पक्षांना, विशेषत: नेहरूंना फटकारले आणि राजीनामा मागे घेण्यास भाग पाडले.
मतभेदांच्या अशा प्रसंगांनंतरही, 1937 मध्ये झालेल्या प्रांतांच्या निवडणुकीत सरदार पटेल आणि नेहरूंनी संयुक्तपणे काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले आणि काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिला.
तुरुंगात आणि बाहेर: सहकैदी, साथीदार
वर्ष 1942 मध्ये 'भारत छोडो' आंदोलन सुरू झाल्यावर, ब्रिटिश सरकारने काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना पकडून तुरुंगात टाकले.
आचार्य कृपलानी, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि नेहरू यांसारख्या सर्वोच्च नेत्यांना अहमदनगर किल्ल्यात कैद करण्यात आले.
तिथे त्यांना जवळजवळ साडेतीन वर्षे एकत्र राहण्याचा अनुभव मिळाला. सरदारांना याआधी गांधीजींसोबत येरवडा तुरुंगात राहण्याचा अनुभव होता.
तुरुंगवासाच्या दरम्यान, दोघांना, विशेषतः गांधीजींना सरदारांच्या व्यक्तिमत्त्वाचे भावनिक पैलू दिसले होते, तरीही गांधीजींच्या मनात त्यांच्याबद्दल वेगळे स्थान होते.
या तुरुंगवासाच्या काळात सरदारांचे नेहरू किंवा इतर सहकाऱ्यांशी संबंध वाढले (किंवा कमी झाले) हे माहीत नाही.
दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवून देखील ब्रिटनने भारतातून माघार घेण्याचे ठरवले. परंतु ते कधी आणि कशी माघार घ्यायची, याच्या योजना आणि प्रस्तावांमध्ये गोंधळ आणि राजकीय डावपेचांनी भरलेली एक जटिल प्रक्रिया सुरू झाली.
काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रदीर्घ तुरुंगावासा दरम्यान बाहेर मुस्लीम लीगचे मोहम्मद अली जिना ब्रिटिश सरकारच्या सहाय्याने बळकट झाले होते.
त्यामुळं सरदार आणि नेहरू दोघेही याबाबत चिंतेत होते. परंतु जिनांसाठी प्रतिकूल असलेला कोणताही प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही, अशी स्थिती त्यावेळी तयार झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
वर्ष 1946 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मुस्लीम बहुल प्रांतांमध्ये काँग्रेसच्या विरोधात मुस्लीम लीगचा विजय झाला. हे काँग्रेससाठी, म्हणजेच सरदार आणि नेहरूसाठी एक संयुक्त अपयश म्हणून गणले गेले.
त्यानंतर स्थापन झालेल्या काँग्रेस-लीगच्या संयुक्त सरकारच्या कामकाजात सरदारांनी गृहखाते आपल्याकडे असावे असा आग्रह धरला आणि या मुद्द्यावर नेहरू त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
आघाडी सरकार चालवण्याच्या कठीण अनुभवांनी सरदारांना देशाच्या विभाजनाची स्थिती दुःखद, पण अपरिहार्य असल्याचे समजले आणि यामध्ये नेहरू त्यांच्यासोबत पूर्णपणे सहमत होते.
खोट्या प्रचारामुळे गोंधळात टाकलेली वस्तुस्थिती अशी आहे की, 1945 ते 1947 या काळात नेहरू आणि सरदार हे गांधीजीच्या विचारधारेपासून वेगळे असतानाही एकमेकांच्या साथीत आणि सहकार्याने राहिले.
फाळणीसाठी गांधीजींना समजावून सांगण्याची किंवा किमान ते उघडपणे फाळणीला विरोध करणार नाहीत हे पाहण्याची मोठी जबाबदारी नेहरूंनी सरदारांवर सोपवली होती आणि सरदारांनी ती यशस्वीपणे निभावलीही होती.
स्वतंत्र राष्ट्राच्या जन्माच्या वेळेस म्हणजे 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री आणि दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांमध्ये नेहरू आणि सरदार एकत्र होते.
विचार वेगळे पण विश्वास भक्कम
स्वातंत्र्याच्या वेळी भारताला अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. या आव्हानांचा मुकाबला पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांनी आपापल्या शैलीत तरीही एकत्रितपणे केला.
नेहरू आणि पटेल यांचे सांप्रदायिक घटक हाताळण्याबाबत विचार वेगवेगळे होते. नेहरू हिंदू सांप्रदायिक घटकांबद्दल अधिक कठोर होते, तर सरदार पटेल हे मुस्लीम जातीय घटकांबद्दल अधिक सजग होते.
दोघांनीही जातीयवादाचा कधीच पुरस्कार केला नाही. मात्र, त्यांच्यातील हा भेद आंदोलनाने पेटलेल्या वातावरणात खूप गाजला आणि गाजवला गेला.
सरकारमध्ये दोघांमधील मुख्य फरक हा पंतप्रधानांच्या भूमिकेबद्दल होता. नेहरूंचा असा विश्वास होता की पंतप्रधान म्हणजे सर्व मंत्र्यांचे प्रमुख, तर सरदारांचा असा विश्वास होता की पंतप्रधान म्हणजे 'समानांमध्ये प्रथम'. म्हणजेच सर्व मंत्री समान असले तरी पंतप्रधानांचा क्रमांक पहिला आहे.
असे असले तरी सरदार हे उपपंतप्रधान होते आणि ते संस्थानिक खाते, गृह खाते आणि माहिती खाते पाहत होते. तरीही, त्याशिवाय जवळपास सर्व मंत्रालये त्यांचा सल्ला घेत आणि त्यांना विचारत असत, असं त्या वेळेच्या पत्रव्यवहारांवरून समजतं.

फोटो स्रोत, Getty Images
काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघात नेण्याची बाब असो किंवा धार्मिक दंगलींची चौकशी करण्याचा मुद्दा, नेहरूंच्या उत्साही आणि तापट स्वभावाच्या विरूद्ध सरदार पटेलांची ठाम, निर्णयात्मक आणि दृढ स्वभावाचा संघर्ष अनेक वेळा अपरिहार्य होता.
सत्तरी ओलांडलेल्या सरदारांनी नेहरूंच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक वेळा गांधींकडे नाराजी व्यक्त केली होती आणि राजीनामा देण्याची देखील गोष्ट केली होती.
पण आधी गांधीजींनी समजवल्यामुळं आणि नंतर गांधीजींच्या हत्येनं दोन्ही नेते कधीच वेगळे झाले नाहीत. मृत्यूपर्यंत सरदार पटेल हे नेहरूंचे विश्वासू सहकारी राहिले.
काँग्रेस पक्षाच्या रचनेवर पूर्ण वर्चस्व असतानाही, सरदार पटेल यांनी नेहरूंना दाखविण्यासाठी किंवा त्यांना कमजोर करण्यासाठी कधीही आपल्या प्रभावाचा उपयोग केला नाही.
सरदार पटेल यांना कार्यकारी पंतप्रधानपद देऊन नेहरू हे परदेश दौरे करू शकले. सरदार पटेल यांनी सार्वजनिकपणे तसेच खासगीतही नेहरूंच्या विरोधाला किंवा त्यांच्यावरील असंतोषाला कधीही हवा दिली नाही.
दोघांमधील मतभेद अतिशयोक्तीपणे आणि विकृतपणे लोकांसमोर आणले गेले. परंतु, यामुळं दोघांमधील सहकार्य आणि चांगल्या भावनेकडे दुर्लक्ष केलं गेलं. हा दोन्ही व्यक्तिमत्त्वांवर एकप्रकारचा अन्यायच आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











