व्ही.पी.मेनन: सोन्याच्या खाणीतले कामगार, नोकरशहा आणि भारताच्या एकीकरणाचे जनक

व्ही. पी. मेनन

फोटो स्रोत, COURTESY NARAYANI BASU

फोटो कॅप्शन, व्ही. पी. मेनन
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1947 मध्ये भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र होणार होता. त्यावेळी 54 वर्षांचे भारतीय सरकारी अधिकारी व्ही.पी. मेनन थकलेल्या अवस्थेत होते. गेली 30 वर्षं ते ब्रिटिश नोकरशाहीत कार्यरत होते.

मेनन यांचं चरित्र लिहिणाऱ्या नारायणी बासू लिहितात की, मेनन खूप थकले होते. ते आजारी आणि कामाच्या ओझ्यानं दबले होते.

मेनन यांनी वेगवेगळ्या व्हाईसरॉयसाठी महत्त्वाचे अधिकारी म्हणून राजकीय आणि घटनात्मक सुधारणांवर काम केलं होतं. यासोबतच त्यांनी सत्ता हस्तांतरणाचा आराखडाही तयार केला होता.

15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर संपलेल्या हस्तांतरण समारंभानंतर मेनन निवृत्ती घेण्याचा विचार करत होते. मेनन हे पुराणमतवादी विचारांचे होते. ते काँग्रेस पक्षाचे नेते आणि स्वातंत्र्यलढ्यातील नायक सरदार वल्लभभाई पटेल यांचे सहकारीही होते.

मात्र निवृत्तीऐवजी त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोन आला आणि त्यांच्या नवीन कामास सुरुवात झाली.

सरदार पटेल यांच्याकडे नुकत्याच स्थापन झालेल्या गृहमंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. यामाध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या संस्थानांचं विलीनीकरण करण्याचं अवघड काम करण्याचा यामागे उद्देश होता. सरदार पटेल यांना या कामासाठी व्ही. पी. मेनन त्यांचे सचिव म्हणून हवे होते.

व्ही. पी. मेनन हे काम करण्यासाठी विशेष उत्सुक नव्हते, असं इतिहासकार रामचंद्र गुहा सांगतात.

शेकडो संस्थानांचं विलिनीकरण

भारतातील या 565 संस्थानांकडे भारताचा एक तृतीयांश भूभाग होता आणि देशाची 40 % लोकसंख्या या भागात राहत होती. यापैकी अनेक राजघराण्यांचं स्वतःचं सैन्य, रेल्वे सेवा, चलन आणि स्टॅम्पही होते.

यातील बहुतेक राजे अवाढव्य पैसा खर्च करणारे होते. एका अंदाजानुसार, हैदराबादच्या निजामाचा खर्च आणि कमाई बेल्जियम देशापेक्षा जास्त होती. एवढंच नाही तर त्यांची कमाई आणि खर्च संयुक्त राष्ट्राच्या 20 संस्थापक सदस्य देशांपेक्षाही जास्त होता.मेनन यांना एक विशेष काम देण्यात आलं होतं.

जानेवारी 1948 मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना व्ही.पी.मेनन आणि सरदार पटेल

फोटो स्रोत, COURTESY NARAYANI BASU

फोटो कॅप्शन, जानेवारी 1948 मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना व्ही.पी.मेनन आणि सरदार पटेल

त्यांना या शेकडो संस्थानांच्या राज्यकर्त्यांना त्यांची संस्थानं भारतात विलीन करण्यासाठी तयार करायचं होतं. तेही अशा वातावरणात जेव्हा देशात अविश्वास आणि हिंसाचार शिगेला पोहचला होता. संपूर्ण उपखंडात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जातीय तणाव चालू होता.

काँग्रेस नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रशासकीय कामाच्या दृष्टीनं हे अत्यंत आव्हानात्मक काम असल्याचं वर्णन केलं होतं.

शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आणि नंतर पटेल यांच्यासोबत काम करणारे मेनन यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ अॅक्सेशनवर काम केलं. ज्या अंतर्गत या संस्थानांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण याच्याशी संबंधित बाबी सरकारकडे सोपवल्या होत्या.

दोन वर्षे मेनन आणि पटेल राजघराण्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते.

या प्रक्रियेत त्यांना अनेकदा संस्थानांच्या फेऱ्या माराव्या लागल्या. स्वतंत्र भारतात आपलं भविष्य काय असेल? असा प्रश्न या संस्थानांच्या राज्यकर्त्यांसमोर होता.हा प्रश्न मेनन यांनाही वारंवार विचारण्यात आला.

हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड संस्थानांनी या मुद्द्यावर सहकार्य करण्यास नकार दिला होता. तर त्रावणकोरनं भारत किंवा पाकिस्तान यापैकी कोणत्या एका देशात सामील होण्यास नकार दिला होता.

संस्थानाची समजूत कशी काढावी?

काही राजांनी भारत सोडून स्वत:चं वेगळं संघटन स्थापन करण्याचा विचार केला. ओरिसा आणि छत्तीसगडच्या राज्यकर्त्यांनी पूर्वेकडील राज्यांचं संघटन स्थापन करण्याबाबत चर्चाही केली.

'व्ही. पी. मेनन - द अनसंग आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया'मध्ये नारायणी बासू लिहितात, "देशापासून विभक्त होण्याचे प्रयत्न अधिक तीव्र होत होते आणि अशा आव्हानात्मक वातावरणात व्ही. पी. मेनन यांनी संस्थानांना भारतात विलीन करण्याचं काम केलं."

वल्लभभाई पटेल यांचे दूत म्हणून व्ही. पी. मेनन यांनी आर्थिक प्रलोभनं तसंच वेळप्रसंगी कठोर भूमिका घेऊन संस्थानांचं मन वळवण्याचं काम केलं.

या संस्थानांना नुकसान भरपाईसाठी निवृत्ती वेतन देण्याचं आश्वासन दिलं गेलं. सुरुवातीला त्यांना त्यांचे राजवाडे आणि पदव्या कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली. पण, जेव्हा परिस्थिती बिघडली तेव्हा मात्र त्यांच्याशी कठोरपणे वागण्यात आलं.

जामनगरचे शासक दिग्विजय रंजीतसिंह जडेजा यांच्यासोबत व्ही. पी. मेनन

फोटो स्रोत, COURTESY NARAYANI BASU

फोटो कॅप्शन, जामनगरचे शासक दिग्विजय रंजीतसिंह जडेजा यांच्यासोबत व्ही. पी. मेनन

हैदराबादच्या निजामाला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांपासून वेगळं राहायचं होतं. अशापरिस्थितीत बंडखोरांना शांत करण्यासाठी सप्टेंबरमध्ये भारतीय लष्कर हैदराबादला पाठवण्यात आलं. भारतीय सैन्यानं जुनागडवर हल्ला केला. इथल्या मुस्लिम शासकानं पाकिस्तानसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

यानंतर एक जनमत घेण्यात आलं आणि त्यात स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये विलीन होण्यास सहमती दाखवली. पाकिस्तानहून आलेल्या कबायली योद्ध्यांनी संस्थानावर हल्ला केला, हे सांगण्यासाठी मेनन जेव्हा काश्मीरमध्ये गेले तेव्हा महाराजा हरिसिंह झोपलेले होते. हल्ल्याची बातमी ऐकून काश्मीरच्या महाराजांनी काश्मीर भारतात विलीन करण्याचं मान्य केलं आणि इंस्ट्रुमेंट ऑफ अॅक्सेशनवर सही केली.

दोन वर्षांत तब्बल 500 संस्थानांचे विलीनीकरण करून 14 नवीन राज्ये निर्माण करण्यात आली. हे मोठं यश होतं.

बासू लिहितात, "सरदार पटेल हे संस्थानिकांचा खुलेआम तिरस्कार करत. तर व्ही. पी. मेनन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे संस्थानिकांशी वागताना चातुर्याने आणि निष्ठूरपणे वागत."

आधीचे मेनन कसे होते?

भारताच्या एकत्रीकरणाचं काम सुरू होण्यापूर्वीच व्ही. पी. मेनन हे महत्त्वाचे अधिकारी बनले होते. 1947 मध्ये फार कमी वेळात त्यांनी भारत आणि पाकिस्तान सरकारकडे सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव स्वत:च्या टाईपरायटरवर तयार केला होता. याच आधारे झालेल्या करारानुसार ब्रिटननं तीन महिन्यांनी भारत सोडला.

बासू सांगतात, "मेनन यांनी अवघ्या चार तासांत हे काम केलं. यामुळे दक्षिण आशिया आणि इतिहास बदलला. ही एक उल्लेखनीय कामगिरी होती."

मेनन यांनी त्यांच्या आयुष्यात जे काही मिळवलं, त्याचा विचार त्यांनी स्वप्नातली केला नसेल. आपल्या आयुष्यात कधीही कॉलेजमध्ये न गेलेल्या व्ही. पी. मेनन यांनी आयुष्याची सुरुवात सोन्याच्या खाणीपासून केली. यानंतर ते हळूहळू सनदी अधिकाऱ्यासारख्या उच्च पदावर पोहचले.

व्ही.पी. मेनन

फोटो स्रोत, COURTESY NARAYANI BASU

नोकरशहा म्हणून त्यांच्या 37 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भारतानं गुलामगिरीपासून स्वातंत्र्यापर्यंतचा खडतर प्रवास केला.

ते सिव्हिल सर्व्हिसच्या विशेष संवर्गातून येत नव्हते. ब्रिटिश नोकरशाहीत त्यांनी टायपिस्ट, स्टेनोग्राफर आणि लिपिक म्हणून काम केलं. वर्षानुवर्षं सरकारी कार्यालयांच्या मोठ्या तसंच धुरांनी भरलेल्या खोल्यांमध्ये नेत्यांमधील गंभीर संभाषणं ऐकून आणि अधिकाऱ्यांचे आदेश लिहून मेनन बरेच काही शिकले.

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री एडविन मोंटेग्यू यांनी त्यांना पत्र लिहिण्यापेक्षा आणि फायली हलवण्यापेक्षा अधिक काही करण्यास सांगितलं होतं, असं मेनन यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर मेनन यांना वेगवेगळ्या प्रकारची कामं देण्यात आली होती. एकदा एका उत्तर भारतातील संस्थानिकानं लंडनमधील नाईट क्लबमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिल्लीला बोलवलं होतं. मेनन यांनी हस्तक्षेप केला आणि त्यांनी ते थांबवलं. कारण या गोष्टीहून भारतात गदारोळ झाला होता.

त्यांनी एका ज्येष्ठ मंत्र्याला तार पाठवून लंडनहून भारतीय राजाची मौल्यवान कलाकृती आणण्यास सांगितलं. हैदराबादच्या निजामाच्या कुटुंबाच्या दागिन्यांशी संबंधित एका प्रकरणामध्ये ते भारत सरकारच्या बाजूनं उभे राहिले.

पण यानंतरही पटेल यांच्या मृत्यूनंतर नेहरू मेनन यांना पटकन विसरले आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, असं नारायणी बसू यांना वाटतं.

बासू लिहितात, "मेनन यांना भारतातील राजकीय चर्चा आणि वादविवादातून बाहेर करण्यात आलं."

वयाच्या 75 व्या वर्षी मेनन यांचं निधन झालं. त्यांनी दोनदा लग्न केलं होतं. त्यांना तीन मुलं होती. व्ही.पी. मेनन यांच्यावर अत्यंत छोटेखानी पद्धतीनं अंत्यसंस्कार झाले.

मेनन हे एक नोकरशहा तसंच समस्या सोडवणारे आणि भारताच्या एकत्रीकरणाचा मसुदा लिहिणारे अधिकारी होते.

बासू सांगतात, "मेनन यांनी वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांसोबत आणि त्यांच्या अहंकारासोबत वेळ घालवला. ज्यातून ते शब्द कसे विणायचे आणि तडजोड कशी करायची हे शिकले. यानुसार त्यांनी पुढे स्वतःला तयार केलं.

"मेनन आज असते तर म्हणाले असते की, तळापासून सुरुवात केली तरच तुम्ही खूप काही शिकू शकता."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)