वास्को द गामाने केरळमध्ये जेव्हा महिला, मुलं, वृद्धांनी भरलेलं जहाज जाळलं होतं

केरळच्या इतिहासात वास्को-द-गामाकडे एक 'खलनायक' म्हणून पाहिलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केरळच्या इतिहासात वास्को-द-गामाकडे एक 'खलनायक' म्हणून पाहिलं जातं.
    • Author, सिराज
    • Role, बीबीसी तमिळ

"पोर्तुगीज राजवटीत केळू लहानाचा मोठा झाला. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, वास्कोला संपवायचं."

'उरुमी' या लोकप्रिय मल्याळम चित्रपटाचा नायक चिरक्कल केळूची पहिली झलक दाखवण्याआधी त्याच्याबद्दलचा हा संवाद प्रेक्षकांना दाखवला जातो.

त्या चित्रपटात नायक केळूचं जीवन एकाच उद्दिष्टाभोवती फिरतं, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाला ठार मारणं. हे ध्येय साध्य करण्यासाठी तो अनेक अडचणींना सामोरा जातो, तो एक क्रांतिकारी फौज उभी करतो आणि पोर्तुगीज सैन्याशी लढतो.

या लढ्यात त्याला आपल्या जीवाभावाचा मित्र गमवावा लागतो. तरीही शेवटी तो स्वतःचं उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही आणि आपले प्राणही गमावून बसतो.

वास्को द गामाला ठार मारण्याची इच्छा असलेला 'चिरक्कल केळू' हे एक काल्पनिक पात्र आहे. पण पृथ्वीराजनं साकारलेलं हे पात्र आणि 'उरुमी' हा चित्रपट केरळमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

वास्को द गामानं जरी भारताकडे जाणारा समुद्रमार्ग शोधला असला तरी मल्याळम चित्रपट, लोककथा आणि गाण्यांमधून केरळमध्ये त्याच्याकडे खलनायक म्हणून पाहिलं जातं.

25 मार्च 1497 साली वास्को द गामा पोर्तुगालची राजधानी लिस्बनहून भारताच्या दिशेनं निघाला. त्याला पोर्तुगीज राजाचा पाठिंबा होता. अनेक महिने चाललेल्या समुद्रमार्गाच्या प्रवासानंतर भारतात पोहोचणारा तो पहिला युरोपियन ठरला. यामुळे युरोपच्या इतिहासात त्याला 'नायक' म्हणून गौरवण्यात आलं.

आपल्या पाठ्यपुस्तकांमध्येही वास्को द गामाच्या भारतातील व्यापाराच्या हेतूने केलेल्या प्रवासावर आणि त्याच्या व्यापारी/नाविक रूपावरच जास्त भर दिला गेला आहे.

भारतात पोहोचण्याचं युरोपियन लोकांचं स्वप्न

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"भारताशी थेट संपर्क सुरू करण्याचं भाग्य लाभलेला वास्को द गामा हा मजबूत शरीरयष्टीचा आणि कणखर स्वभावाचा व्यक्ती होता. तो अशिक्षित असला तरी क्रूर आणि हिंसक होता, तरीही तो निष्ठावान आणि निर्भय होता.

भारताच्या प्रवासासाठी नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली. कारण अशा प्रकारचं कठीण काम एखाद्या सौम्य नेतृत्वाखाली पूर्ण होणं शक्य नव्हतं."

'द ग्रेट डिस्कव्हरीज' या पुस्तकात अमेरिकन इतिहासकार चार्ल्स इ. नोवेल यांनी वास्को द गामाचं अशाप्रकारे वर्णन केलं आहे.

जानेवारी 1497 मध्ये, पोर्तुगालचा राजा मॅन्युएल पहिला याने 'भारतात पोहोचण्याचं युरोपचं स्वप्न' पूर्ण करण्याची जबाबदारी वास्को द गामाकडे सोपवली होती.

भारतात सर्वात आधी पोहोचायचं, यासाठी युरोपातील अनेक देशांमध्ये शेकडो वर्षांपासून स्पर्धा सुरू होती. पोर्तुगालसारखा लहान देशही आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत होता.

पण, त्याआधीच अरब आणि पर्शियन व्यापाऱ्यांनी भारत गाठून येथे आपली व्यापारकेंद्रं स्थापन केलेली होती. विशेषतः दक्षिण भारतातील मलबार (आजचं केरळ) भागातूनच युरोपमध्ये मसाल्याचे पदार्थ मुस्लीम व्यापाऱ्यांच्या माध्यमातून येत असत.

वास्को द गामा आणि कोळीकोडच्या (कालिकत) राजाची भेट दाखवणारं चित्र.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वास्को द गामा आणि कोळीकोडच्या (कालिकत) राजाची भेट दाखवणारं चित्र.

"पोर्तुगीज येण्यापूर्वी गुजरात, मलबार आणि अरबी समुद्रातील बंदरांमध्ये इस्लामिक समुद्री व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते," असं इतिहासकार जॉन एफ. रिचर्ड्स यांनी त्यांच्या 'द मुघल एम्पायर' या पुस्तकात नमूद केलं आहे.

"1492 मध्ये कोलंबस अमेरिकेत पोहोचला. त्याच्या मृत्यूपर्यंतही त्याला असंच वाटत राहिलं की, त्याने ज्या भूमीचा शोध लावला आहे, ती आशियाचा भाग आहे आणि भारत त्याच्या जवळच आहे.

म्हणूनच त्याने त्या भागात राहणाऱ्या लोकांना 'इंडियन' (भारतीय) असं संबोधलं," असं जॉर्ज एम. टॉली यांनी त्यांच्या 'द व्हॉयजेस अँड अॅडव्हेंचर्स ऑफ वास्को द गामा' या पुस्तकात लिहिलं आहे.

युरोपियन लोक भारत गाठण्यासाठी इतके उत्सुक का होते, याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या मनात तयार झालेलं भारताचं आकर्षक चित्र.

युरोपमध्ये भारताकडे सोनं, हिरे, मौल्यवान रत्नं, मिरीसारखे महागडे मसाले आणि इतर खजिन्यांनी भरलेली एक श्रीमंत भूमी म्हणून पाहिलं जात होतं. त्यामुळे आशिया विशेषतः भारत, हे युरोपियन लोकांसाठी खूपच आकर्षणाचं ठिकाण मानले जात असत.

विल्यम लॉगन यांच्या 'मलबार मॅन्युअल' या पुस्तकात म्हटलं आहे की, "1497 साली वास्को द गामा निघालेल्या समुद्र मोहिमेत तीन जहाजं होती. 'साओ राफेल', 'साओ गॅब्रिएल' आणि 'साओ मिगुएल'. या प्रत्येक जहाजावर अधिकारी, खलाशी (नाविक) आणि कर्मचारी होते."

1497 साली, पोर्तुगालचा राजा मॅन्युएल पहिला याने 'भारतात पोहोचण्याचं पोर्तुगीजांचं स्वप्न' पूर्ण करण्याची जबाबदारी वास्को द गामाकडे सोपवली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1497 साली, पोर्तुगालचा राजा मॅन्युएल पहिला याने 'भारतात पोहोचण्याचं पोर्तुगीजांचं स्वप्न' पूर्ण करण्याची जबाबदारी वास्को द गामाकडे सोपवली होती.

पहिल्यांदा जेव्हा वास्को द गामा भारतात आला, तेव्हा तो खूपच कमी सैन्यासोबत आला होता. त्याच्याबरोबर किती लोकं होते, याबद्दल वेगवेगळ्या इतिहासग्रंथांमध्ये वेगवेगळी माहिती मिळते. पण एक गोष्ट मात्र नक्की आह, त्याच्या जहाजात काही गुन्हेगार सुद्धा होते.

'एम नॉम द्यू डियूस: द जर्नल ऑफ द फर्स्ट व्हॉयेज ऑफ वास्को द गामा टू इंडिया 1497–1499' या पुस्तकात असं म्हटलं आहे की, वास्को द गामाच्या समुद्र मोहिमेत देशातून हाकलून दिलेले (निर्वासित) दहा गुन्हेगारही होते.

त्यांचे गुन्हे पोर्तुगालच्या राजाने माफ केले आणि या मोहिमेसाठी मदतीला त्यांना पाठवण्यात आलं. मात्र, काही इतिहासतज्ज्ञ यामागे एक वेगळं कारणही सांगतात.

म्हणजेच, असा धोकादायक समुद्रप्रवास असताना पोर्तुगालच्या तुरुंगात शिक्षा भोगून व्यर्थ मरण्यापेक्षा, वास्कोला मदत करताना समुद्रात मरण येणं अधिक योग्य ठरेल, असं त्या काळच्या राजाने विचार केला असावा, असं बोललं जातं.

या गुन्हेगारांपैकी एक महत्त्वाची व्यक्ती होती, जो आवो नुनेस नावाची एक 'नवख्रिस्ती'. म्हणजेच, अलीकडेच धर्मांतरित झालेला तो एक ज्यू होता. त्याला अरबी आणि हिब्रू या भाषा थोड्याफार प्रमाणात येत असत.

'द जर्नल ऑफ द फर्स्ट व्हॉयेज ऑफ वास्को द गामा टू इंडिया' या पुस्तकानुसार, "जो आवो नुनेस हा बुद्धिमान होता. त्याला 'मूर' (म्हणजे मुस्लीम) लोक बोलत असलेली भाषा समजायची."

भारतात पाऊल ठेवणारा पहिला युरोपियन, एक गुन्हेगार होता का?

20 मे 1498 रोजी वास्कोच्या ताफ्याने केरळ गाठलं, तेव्हा त्यांची जहाजं किनाऱ्यापासून थोडं अंतर ठेवून समुद्रातच नांगर टाकून थांबवण्यात आले होते.

इतिहासात असं म्हटलं गेलं आहे की, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम केरळमधील कोळीकोड जिल्ह्यातील कप्पड या गावात उतरला.

पण खरं तर तो सर्वप्रथम कोल्लम जिल्ह्याजवळच्या पंडालयनी भागात गेला होता, असं मत इतिहासतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ एम.जी.एस. नारायणन यांनी व्यक्त केलं होतं.

मलबारच्या किनाऱ्यावरून चार छोट्या बोटी वास्कोच्या जहाजांपर्यंत आल्या आणि त्यांनी तिथल्या लोकांची चौकशी केली. विशेषतः, "वास्को कोणत्या देशातून आलाय?" असा प्रश्न त्यांनी विचारला.

वास्को द गामाच्या प्रवासाचं वर्णन करणारा नकाशा. टिंबांनी (ठिपकेदार रेषा) दाखवलेली रेषा ही 1497 मधील भारतासाठीचा पहिला प्रवास दाखवते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वास्को द गामाच्या प्रवासाचं वर्णन करणारा नकाशा. टिंबांनी (ठिपकेदार रेषा) दाखवलेली रेषा ही 1497 मधील भारतासाठीचा पहिला प्रवास दाखवते.

खरं तर भारतात सर्वप्रथम पाऊल ठेवणारा युरोपियन वास्को द गामा नसून, तो एक 'गुन्हेगार' असण्याची शक्यता जास्त आहे. कारण 'वास्को द गामा अँड द सी रूट टू इंडिया' या पुस्तकात असं म्हटलं आहे की, "जहाजांना नांगर टाकून थांबवल्यानंतर, वास्कोनं अरबी आणि हिब्रू भाषा बोलू शकणाऱ्या व्यक्तीला मलबारच्या बोटींसोबत किनाऱ्यावर पाठवलं होतं."

असं पाहिलं तर, मलबार किनाऱ्यावर सर्वप्रथम पोहोचणारा युरोपियन म्हणजे अरबी आणि हिब्रू भाषा जाणणारा 'नवख्रिस्ती' जो आवो नुनेस असण्याची शक्यता आहे. मात्र, हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी कागदपत्रं उपलब्ध नाहीत.

निराशेत संपलेला पहिला भारत प्रवास

अशा प्रकारे केरळच्या किनाऱ्यावर उतरलेल्या दुभाष्याला (अनुवादक), तिथे राहणाऱ्या दोन अरब लोकांकडे नेण्यात आले. पण त्यांनी वास्कोच्या दुभाष्याला शत्रू मानलं.

"सैतान तुला घेऊन जावो!" असं ते ओरडले. त्यानंतर त्यांनी त्याला विचारलं, "तुम्ही इथं का आलात?"

त्यावर वास्कोचा माणूस म्हणाला, "आम्ही ख्रिस्ती आहोत आणि मसाल्यांचे पदार्थ शोधत इथे आलो आहोत."

अशाप्रकारे, भारतात आलेला पहिला युरोपियन व्यक्ती आणि येथे आधीपासून व्यापार करत असलेल्या अरब व्यापार्‍यांमध्ये झालेलं हे संभाषण. असा उल्लेख अनेक इतिहासग्रंथांमध्येही करण्यात आला आहे.

त्यानंतर वास्को द गामा काही निवडक माणसांना सोबत घेऊन, इतरांना जहाजावरच सावधगिरीने थांबण्यास सांगून मलबारच्या किनाऱ्यावर उतरला. तिथे त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि आदरानं स्वागत करण्यात आलं.

पण वास्को द गामाचा पहिला भारत प्रवास त्याच्या अपेक्षेइतका यशस्वी झाला झाला नाही. तो कोळीकोडच्या हिंदू राजाला (ज्याला पोर्तुगीज लोक 'झामोरीन' म्हणत) दिलेल्या भेटवस्तू त्यांना फारच सामान्य वाटल्या आणि त्या भेटवस्तूंची खिल्ली उडवण्यात आली.

वास्को द गामाचं ‘साओ गॅब्रिएल’ जहाज.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वास्को द गामाचं 'साओ गॅब्रिएल' जहाज.

मसाल्यांच्या व्यापारावर वर्चस्व असलेल्या अरब मुस्लिमांनी पोर्तुगीज लोकांच्या आगमनाला तीव्र विरोध केला.

"पोर्तुगीजांनी काळ्या मिरीच्या व्यापारावर एकाधिकार (मक्तेदारी) मागितला, पण तो व्यापार मुस्लीम व्यापाऱ्यांच्या नियंत्रणात असल्यामुळे झामोरीन (कोळीकोडचा राजा) यांनी त्याला नकार दिला.

त्यानंतर पोर्तुगीजांनी कोची राज्याशी संधान बांधून तिथे आपली व्यापाराची केंद्रं उभारली. पुढे, ते विजय नगर साम्राज्याजवळ असल्यामुळे गोव्याकडे वळले," असं इतिहासतज्ज्ञ एम. जी. एस. नारायणन यांनी इंग्रजी दैनिक 'द हिंदू' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

1499 साली वास्को द गामा थोड्याशा मसाल्याच्या वस्तूंसह युरोपला परतला. तरीही पोर्तुगालमध्ये त्याचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं.

"पहिल्या भारत प्रवासानंतर वास्को द गामाच्या ताफ्याने आणलेले मसाल्याचे पदार्थ प्रचंड नफ्यावर विकले गेले. या व्यापारातून मिळालेला नफा, संपूर्ण प्रवासाच्या खर्चापेक्षा कितीतरी पट जास्त होता," असं के. एम. पणिक्कर यांनी त्यांच्या 'एशिया अँड वेस्टर्न डोमिनियन्स' या पुस्तकात लिहिलं आहे.

हा तो क्षण होता, जेव्हा पोर्तुगीजांना भारतातील संपत्तीची जाणीव झाली.

वास्कोचा दुसरा भारत प्रवास

भारतासाठीचा वास्को द गामाचा पहिला प्रवास (1497–1499) युरोप आणि भारत यांच्यातील समुद्रमार्ग स्थापन करण्यास कारणीभूत ठरला. पण केरळमधील कोळीकोडच्या राजासोबत मजबूत व्यापारी करार करण्यात मात्र तो अपयशी ठरला.

हिंदी महासागरातील मसाल्याच्या व्यापारावर दीर्घकाळ वर्चस्व गाजवणाऱ्या अरब मुस्लीम व्यापाऱ्यांनी पोर्तुगीजांचा अपमान केला, त्यांना तुच्छ लेखलं आणि त्यांच्याकडे दुर्लक्षही केलं.

"वास्कोच्या मते, कोळीकोडमधील मुस्लीम व्यापारी हे फक्त आर्थिक स्पर्धक नव्हते, तर धार्मिक आणि सांस्कृतिक शत्रूही होते. झामोरीनच्या दरबारात त्यांना असलेलं प्रभावशाली स्थान पोर्तुगीजांच्या महत्त्वकांक्षेसाठी एक मोठं आव्हान होतं," असं इतिहासतज्ज्ञ संजय सुब्रमण्यम यांनी त्यांच्या 'द करिअर लेजेंड ऑफ वास्को द गामा' या पुस्तकात लिहिलं आहे.

या धोक्याला उत्तर देण्यासाठी पोर्तुगीज सरकारने दुसऱ्या भारत प्रवासाची आखणी केली. या वेळेस उद्दिष्ट पूर्णपणे स्पष्ट होतं, "भारतामध्ये पोर्तुगीज वर्चस्व प्रस्थापित करणं, पहिल्या प्रवासातील अपयशाचा बदला घेणं आणि मसाल्याच्या व्यापारावर मक्तेदारी मिळवणं."

फेब्रुवारी 1502 मध्ये वास्को द गामा 20 युद्धनौका आणि सुमारे 1,500 सैनिकांच्या ताफ्यासह लिस्बनहून निघाला. या ताफ्यात तोफा आणि इतर शस्त्रास्त्रं होती, आणि तो युद्धासाठी सज्ज होता.

वास्को द गामाच्या जहाजावर कोळीकोडच्या व्यापाऱ्यांना पकडण्यात आल्याचं दर्शवणारं चित्र.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वास्को द गामाच्या जहाजावर कोळीकोडच्या व्यापाऱ्यांना पकडण्यात आल्याचं दर्शवणारं चित्र.

त्याच वर्षी, 11 सप्टेंबर रोजी, वास्को द गामाचा ताफा केरळमधील कन्नूर किनाऱ्यावर पोहोचला. त्यानंतर जे काही घडलं, त्याचं वर्णन वास्कोच्या ताफ्यातील एका व्यक्तीने 'द जर्नल ऑफ द फर्स्ट व्हॉयेज ऑफ वास्को द गामा टू इंडिया' या पुस्तकात पुढीलप्रमाणे केलं आहे.

"तिथे आम्हाला मक्का येथून आलेली जहाजं दिसली. हीच ती जहाजं होती जी आमच्या देशात (पोर्तुगालमध्ये) मसाल्याचे पदार्थ घेऊन जात होती. पुढे फक्त पोर्तुगालच्या राजालाच भारतातून थेट मसाल्याचा व्यापार करता यावा, या उद्देशाने आम्ही ती जहाजं लुटली."

"त्यानंतर आम्ही मक्केहून आलेलं एक जहाज पकडलं, त्यात 380 पुरुष, अनेक महिला आणि मुलं होती. त्या जहाजातून आम्ही किमान 12,000 डुकाट (सोन्याची नाणी) आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू लुटल्या. एक ऑक्टोबर रोजी, त्या जहाजाला आणि त्यावर असलेल्या सगळ्या लोकांना आम्ही जाळून टाकलं."

इथे उल्लेख केलेलं 'मक्का जहाज' म्हणजे 'मेरी' नावाचं एक मोठं जहाज. हे जहाज कोळीकोड परिसरात राहणारा श्रीमंत व्यापारी खोजा कासिम याच्या भावाचं होतं, असं इतिहासतज्ज्ञ के. एम. पणिक्कर यांनी म्हटलं आहे.

 ‘मक्काच्या जहाजांवर’ वास्कोच्या नौदलाने हल्ला करताना दाखवणारं चित्र.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'मक्काच्या जहाजांवर' वास्कोच्या नौदलाने हल्ला करताना दाखवणारं चित्र.

वास्कोच्या सैन्याच्या हाती लागलेल्या या जहाजात 'हज'साठी प्रवास करत असलेल्या अनेक महिला, लहान मुलं आणि वयोवृद्ध यात्रेकरू होते. त्याचबरोबर व्यापारासाठी असलेल्या मौल्यवान वस्तूंनीही ते जहाज भरलेलं होतं.

"वास्कोनं ते जहाज जाळून टाकण्याचा आदेश दिला. महिलांनी आपली मुलं समोर आणून दयेची याचना केली. पोर्तुगीज सैनिक त्यांच्या जहाजावरून हे सगळं पाहत होते. त्या जहाजावरील सर्व लोक वेदनेनं रडत रडत मृत्युमुखी पडले."

"त्या जहाजावरील एकही जण वाचला नाही. मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांच्या किंकाळ्या संपूर्ण समुद्रात घुमत होत्या. आणि त्या वेळी वास्को तसाच स्थिर उभा होता," असं वर्णन लेंडास दा इंडिया या पुस्तकात कास्पर कोहिया यांनी केलं आहे.

वास्को द गामाच्या नेतृत्वाखाली घडलेली ही घटना त्या काळातील काही पोर्तुगीज लोकांनाही हादरवून टाकणारी ठरली. आणि केरळच्या इतिहासात वास्को द गामाला 'खलनायक' म्हणून स्मरणात ठेवण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण बनलं.

'फोडा आणि राज्य करा'

त्या काळात केरळ अनेक लहान राज्यांमध्ये विभागलेलं होतं, आणि हेच पोर्तुगीजांचे वर्चस्व वाढण्यासाठी एक कारण ठरलं.

उदाहरण द्यायचं झाल्यास, 'मेरी' जहाजाच्या घटनेनंतरसुद्धा वास्कोच्या ताफ्याचं कन्नूरच्या राजाकडून स्वागत करण्यात आलं, असं 'द जर्नल ऑफ द फर्स्ट व्हॉयेज ऑफ वास्को द गामा टू इंडिया' या पुस्तकात नमूद केलं आहे.

"20 ऑक्टोबर रोजी आम्ही कन्नूर राज्यात गेलो. तिथे आम्ही सर्व प्रकारचे मसाल्याचे पदार्थ खरेदी केले. राजा फार थाटात आला होता. त्याच्यासोबत दोन हत्ती आणि अनेक वेगवेगळे विचित्र प्राणीही होते."

वास्को-द-गामा आणि कन्नूरच्या राजाची भेट दाखवणारं चित्र.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वास्को-द-गामा आणि कन्नूरच्या राजाची भेट दाखवणारं चित्र.

यानंतर वास्को द गामाचा ताफा कोळीकोडकडे गेला. तिथे त्यांनी झामोरीन राजाकडे अशी मागणी केली की, शहरातून सगळ्या मुस्लीम व्यापार्‍यांना हाकलून द्यावं आणि पोर्तुगीजांच्या व्यापार मक्तेदारीला मान्यता द्यावी.

पण झामोरीन राजाने मुक्त व्यापाराला पाठिंबा दिला आणि वास्कोची ही मागणी स्पष्टपणे नाकारली. त्यामुळे वास्को द गामाने कोळीकोड शहरावर हल्ला केला.

"आम्ही आमच्या सैनिकांना शहराच्या बाहेर एकत्र केलं आणि त्यांच्याशी तीन दिवस लढलो. अनेकांना पकडलं आणि त्यांना जहाजांच्या दरवाजांवर टांगून ठेवलं. त्यांना मारहाण केली, त्यांचे हात, पाय आणि डोकं कापून टाकलं." (द जर्नल ऑफ द फर्स्ट व्हॉयेज ऑफ वास्को द गामा टू इंडिया.)

अशा प्रकारे हळूहळू, हिंसक कृत्यांच्या माध्यमातून आणि 'शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र' या नीतीनुसार इतर केरळच्या राजांशी हातमिळवणी करून, पोर्तुगीजांनी केरळमध्ये आपलं वर्चस्व मजबूत केलं.

"ही म्हणजे स्थानिक राजकारणातील स्पर्धांचा वापर करून पोर्तुगीज वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रचलेली 'फोडा आणि राज्य करा' अशी नीती होती," असं द पोर्तुगीज सीबॉर्न एम्पायर या पुस्तकात चार्ल्स आर. बॉक्सर यांनी लिहिलं आहे.

1524 साली वास्को द गामाची भारतातील पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1524 साली वास्को द गामाची भारतातील पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली.

1998 साली, केरळमध्ये त्या वेळी सत्तेवर असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी सरकारने वास्को द गामा मलबारमध्ये येऊन 500 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या घटनेचा 'आंतरराष्ट्रीय पर्यटन उत्सव' म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या निर्णयाला केरळमध्ये तीव्र विरोध झाला.

'वास्कोचा प्रवास आणि कृती ही भारतातील युरोपियन वसाहतवादी वर्चस्वाच्या सुरुवातीस कारणीभूत ठरली. त्यामुळे अशा घटनेचा उत्सव साजरा करणे योग्य नाही,' अशी टीका करण्यात आली.

युरोपच्या वसाहतवादी मानसिकतेसाठी वास्को द गामा एक प्रभावी साधन ठरला, असं म्हणता येईल.

पोर्तुगीज साम्राज्याच्या वतीने आशियात भारतात पाऊल ठेवणारा पहिला युरोपियन म्हणून ओळख मिळवलेला वास्को द गामा, 1524 साली तिसऱ्यांदा केरळमध्ये आला, तेव्हा तो 'भारतावर पोर्तुगीज सत्तेच्या वतीने नेमलेला व्हाइसरॉय' या पदासह आला होता.

कोचीनला पोहोचलेला वास्को द गामा नंतर आजारी पडला आणि 24 डिसेंबर 1524 रोजी त्याचे निधन झाले. त्यानंतर, 1539 साली त्याच्या मृतदेहाचे अवशेष पोर्तुगालला नेण्यात आले आणि तिथे पुन्हा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.