2013 च्या केदारनाथ पुरात 'मृत' घोषित व्यक्ती सापडली वैजापूरमध्ये, अनेक वर्षांनी झाली कुटुंबीयांशी भेट

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत, व्हीलचेअरवर बसलेले 'शिवम'

फोटो स्रोत, Rohini Bhosale

फोटो कॅप्शन, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत- व्हीलचेअरवर बसलेले 'शिवम'
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं, हा वाक्प्रचार आपण कित्येकदा ऐकतो पण जोपर्यंत याचा प्रत्यय येत नाही तोपर्यंत हे केवळ शब्दच बनून राहतात. पण शिवम आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत घडलेली ही गोष्टी तर अद्भूतहूनही काकणभर सरसच म्हणावी लागेल.

ज्या भावाचे आपल्या हाताने श्राद्ध देखील केले तो भाऊ आपल्याला काही वर्षांनी भेटेल याची कल्पनादेखील त्यांना कदाचित झाली नसेल. पण ही गोष्ट पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाचा स्टाफ आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याने प्रत्यक्षात पूर्ण झाली.

2013 साली केदारनाथ पुरात वाहून गेलेली व्यक्ती अशी ज्या व्यक्तीची नोंद झाली. ज्यांना मृत घोषित करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर प्रतीकात्मक अंतिम संस्कार करून श्राद्ध देखील केले ती व्यक्ती महाराष्ट्रात सापडली.

झालं असं की 2021 साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका मंदिरात चोरी करताना काही जणांना पकडण्यात आले. मंदिरात ही चोरी आपण येथेच राहणाऱ्या व्यक्तीच्या सहकाऱ्याने केली असे चोरांनी गावकऱ्यांना सांगितले.

त्या मंदिरात एक मध्यमवयीन व्यक्ती राहायची. या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नाही असे निरीक्षण पुढे न्यायालयाने नोंदवले. या व्यक्तीला चोरीच्या आरोपात अटक झाली.

जेव्हा या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा न्यायाधीशांच्या ही बाब लक्षात आली की संबंधित व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम नाही. तसेच पोलिओमुळे दोन्ही पाय हे कमकुवत आहेत आणि त्यांना चालता येत नाही. काहीच शब्द वारंवार बोलत असल्याचे दिसून आल्यावर न्यायालयाने या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात यावे असे निर्देश दिले.

न्यायालयाने काही जरी विचारले तरी त्या प्रश्नाचे उत्तर ही व्यक्ती 'ओम नमः शिवाय' असंच द्यायची. या व्यक्तीला पुण्यातील येरवडा येथील कैद्यांसाठी असलेल्या मनोरुग्णालय विभागात दाखल करण्यात आले.

तेथील स्टाफ त्यांना 'शिवम' असे म्हणू लागला. हे त्यांचे खरे नाव नाही तर तेथील स्टाफने दिलेले नाव आहे. त्यांचे वय हे अंदाजे 50-52 असे आहे, असे संबंधित मनोरुग्णालयाच्या समाज सेवा विभागाच्या अधीक्षक रोहिनी भोसले यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

प्रादेशिक मनोरुग्णालय

शिवम हे फारसं कुणाशी बोलत नसत. त्यांना कर्मचाऱ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अगदी ते आज्ञाधारकपणे ऐकत असत.

2023 मध्ये रोहिनी भोसले या संबंधित वार्डाच्या समाजसेवा अधीक्षक बनल्या. त्यानंतर रोहिनी यांनी शिवम यांची फाइल पाहिली. त्यांनी शिवम यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

शिवम यांना मराठी येत नव्हतं. ते थोडं हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते असं लक्षात आल्यावर रोहिनी यांनी शिवम यांच्याशी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवम हे पहाडी हिंदीमध्ये बोलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

शिवम यांच्या कुटुंबीयांचा शोध कसा लागला?

शिवम हे आपल्या कुटुंबाबाबत फारसं सांगू शकत नाहीयेत, त्यांच्या जुन्या आठवणी सांगू शकत नाहीयेत असं लक्षात आल्यावर रोहिनी यांनी शिवम यांना त्यांच्या शाळेबद्दल विचारले.

शाळेचा विषय काढल्यावर त्यांनी रुरकी येथील एका शाळेचे नाव सांगितले. (शिवम यांची ओळख जाहीर न होऊ देण्यासाठी हे नाव उघड करण्यात आलेले नाही.)

रोहिनी यांनी बीबीसी मराठीला याबाबत सांगितले, की "जेव्हा मला शाळेचे नाव समजले तेव्हा मला तर सुरुवातीला ते कोणत्या शहरातील आहे हे देखील समजले नाही. पण नंतर त्यांच्या बोलण्यात हरिद्वारचा उल्लेख आला आणि मी हरिद्वार आणि त्या परिसरात तशा नावाची एखादी शाळा आहे का हे गुगलवर पाहू लागले."

"शिवम यांनी सांगितलेल्या नावाची एक शाळा मला सापडली. मी शिवम यांना त्या शाळेचा फोटो दाखवला आणि त्यांनी लगेच तो ओळखला. त्यांच्या डोळ्यात एक चमक दिसू लागली," असे रोहिनी सांगतात.

केदारनाथ

फोटो स्रोत, BBC Hindi

फोटो कॅप्शन, केदारनाथ पूर ( 2013 ) संग्रहित छायाचित्र

यानंतर रोहिनी यांनी रुरकी, हरिद्वार येथील पोलिसांची संपर्क साधला. त्यांना अशा प्रकारचा रुग्ण आपल्याकडे राहत असल्याची कल्पना देण्यात आली.

त्यानुसार उत्तराखंड पोलिसांनी शोध घेतला असता अशा विवरणाच्या एका व्यक्तीची नोंद सापडली. पण संबंधित व्यक्ती 2013 साली पुरात वाहून गेली आहे. अशी नोंद असल्यामुळे त्यांचा तपास बंद करण्यात आला होता.

रोहिनी सांगतात की पोलिसांनी सुरुवातीला शिवम यांच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि अशा प्रकारची व्यक्ती हरवली होती का, याबाबत विचारले. त्यानंतर कुटुंबीयांनी सांगितले की केदारनाथ पुरात त्यांचा भाऊ वाहून गेला होता. त्याचा मृतदेह देखील सापडला नाही तेव्हा आम्ही त्यांच्यावर प्रतीकात्मक अंत्यसंस्कार केले.

पोलिसांनी त्यांना शिवम यांचे फोटो दाखवले. त्यावर हे त्यांचेच भाऊ असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवम हे वैजापूर येथे कसे पोहोचले?

शिवम हे अनेक वर्षांपासून बेपत्ता होते. ते 2013 मध्ये पुरात वाहून गेले अशी नोंद आहे पण त्याआधी ते हरवले होते. साधारणतः वीस वर्ष ते आपल्या घरापासून दूर होते असे रोहिनी सांगतात.

शिवम हे उत्तराखंडहून वैजापूरला कसे पोहोचले याबाबत त्यांना काहीच आठवत नाही. त्याबद्दल ते काहीच सांगू शकत नाहीत.

2015 मध्ये शिवम हे वैजापूरच्या एका मंदिरात रखवालदार म्हणून काम करू लागले. ते तिथेच खात असत आणि तिथेच झोपत असत. मंदिराची झाड-लोट देखील ते करायचे.

पण ते त्या ठिकाणी कसे आले याची कुणालाच काही माहिती नाही असे रोहिनी यांनी सांगितले.

शिवम यांना कुटुंबीयांनी कसे ओळखले?

शिवम यांच्याशी उत्तराखंडमधील कुटुंबीयांचा व्हीडिओ कॉलवर बोलणे करुन देण्यात आले. शिवम यांचे सख्खे भाऊ हे व्हीडिओ कॉलवर बोलले आणि त्यांनी त्यांना ओळखलं. इतकंच नाही तर शिवम यांनी देखील आपल्या भावाला ओळखले आणि त्या सर्वांचे डोळे गहिवरुन आले.

"ब्लड इज थिकर दॅन ॲनी लिक्विड म्हणतात, ही गोष्ट आम्हाला पटली. कितीही वर्षांनी तुम्ही भेटला तरी रक्ताचं नातं एकदम घट्ट असतं. हेच आम्हाला दिसलं. त्यानंतर शिवम हे अगदी आनंदी राहू लागले," असं मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले.

शिवम यांच्या कुटुंबीय त्यांची भेट घेण्यासाठी पुण्याला आले. पण त्यांना घेऊन जाण्यासाठी एक अडचण होती.

शिवम यांच्यावरील चोरीच्या आरोपाचे काय झाले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शिवम यांच्या नातेवाईकांचा शोध तर लागला पण ज्या प्रकरणामुळे त्यांना अटक झाली आणि ते कैद्यांसाठी असलेल्या मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आले होते त्यातून ते निर्दोष सुटले नव्हते. त्या प्रकरणाचा निकाल लागल्याशिवाय ते आपल्या घरी परतू शकत नव्हते.

रोहिनी भोसले सांगतात की जेव्हा माझ्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा मी या केसचे स्टेटस तपासले. पण त्यावर खटला सुरू नव्हता. पोलीस आणि न्यायाधीशांना जेव्हा ही गोष्ट सांगण्यात आली तेव्हा त्यांनी 2023 मध्ये चार्जशीट दाखल केले. त्यानुसार खटल्याची सुनावणी झाली.

शिवम यांना चालता येत नसल्यामुळे त्यांना न्यायालयासमोर व्हीडिओ कॉलनेच सादर करण्यात आले. या चोरी प्रकरणातील संशयितांनी न्यायालयासमोर सांगितले की शिवम यांचा या चोरीत सहभाग नव्हता. पण जेव्हा गावकऱ्यांनी आम्हाला पकडलं तेव्हा त्यांनी मारू नये या भीतीपोटी आम्ही त्याच ठिकाणी काम करणाऱ्या माणसाचे नाव खोटे सांगितले, अशी माहिती रोहिनी देतात.

त्यांच्या साक्षीनंतर सप्टेंबर 2025 मध्ये या केसचा निकाल लागला आणि त्यात शिवम यांची निर्दोष मुक्तता झाली. या आदेशाची प्रत नोव्हेंबरमध्ये आली आणि त्यानुसार त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आले.

कुटुंबीयांची भेट आणि शिवम यांना निरोप

शिवम आणि कुटुंबीयांची भेट होणे हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता असे रोहिनी सांगतात.

"गेल्या चार वर्षांपासून वार्डातील ब्रदर निलेश दिघे आणि सिस्टर कविता गाडे या शिवम यांची खूप काळजी घेत होत्या. शिवम हे सर्वांसाठी एक कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच झाले होते तेव्हा त्यांना निरोप देणे हा आमच्यासाठी भावपूर्ण प्रसंग होता पण ते त्यांच्या कुटुंबीयांकडे जात आहे याचा आम्हा सर्वांना निश्चितच आनंद होता," असे रोहिनी यांनी सांगितले.

"या चार पाच वर्षांच्या काळात आमचे त्यांच्याशी एक भावनिक नाते तयार झाले होते. ते अतिशय शांत आणि मृदू स्वभावाचे व्यक्ती आहेत, त्यांचं काम ते अगदी योग्यप्रकारे करतात. जेवणानंतर थाळी धुवून ठेवणे असो की आपला बेड लावणे असो ही काम अगदी चांगली ते करत," असं अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले.

मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले की या प्रकारे कैदी विभागातल्या रुग्णाची आपल्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणून देण्याचा हा पहिला-वहिलाच प्रसंग होता.

शिवम यांचे भाऊ हे सरकारी नोकरीत आहेत. आणि त्यांनी या प्रसंगाबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला असल्याचे रोहिनी भोसले यांनी सांगितले.

कुटुंब सध्या आनंदात आहे पण त्याचबरोबर कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी विनंती त्यांनी केलेली असल्याचे रोहिनी सांगितले, त्यामुळे बीबीसी मराठीने त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया घेतली नाहीये.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)