कोरोना नैसर्गिक की मानव निर्मित? वैज्ञानिकांच्या संशोधनातून समोर आलं धक्कादायक उत्तर

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटामुळे मानवजातीनं 'न भूतो न भविष्यति' परिस्थिती अनुभवली. कोरोनाच्या संकटाचं जगभर थैमान होतं तेव्हा यापासून बचाव करण्याबरोबरच याचा उगम नेमका कुठे आणि कसा झाला यावर प्रचंड चर्चा झाली.

वैज्ञानिकांच्या एका गटानं यावर अभ्यास केला आहे. त्यातून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत, जे या कोड्याची उकल करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्या संशोधनाविषयी जाणून घेऊया...

कोरोनाचं संकट नैसर्गिक की मानवी? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाची उकल करण्यासाठी वैज्ञानिकांनी अत्यंत सखोल आणि गहन अभ्यास केला आहे.

कोरोनाच्या संकटाची उत्पत्ती किंवा उगम नेमका कुठून झाला यासंदर्भात वैज्ञानिकांच्या एक गटाचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या संकटाची सुरुवात प्रयोगशाळेतून नाही तर बाजारात विकल्या जाणाऱ्या संक्रमित प्राण्यांपासून झाली यात कोणतीही शंका नाही.

वैज्ञानिकांचा हा गट जानेवारी 2020 मध्ये चीनमधील वुहान येथून गोळा केलेल्या शेकडो नमुन्यांचं विश्लेषण करत होता.

त्यांच्या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार कोरोनाच्या संकटाचं संभाव्य उगमस्थान रॅकून (racoon dogs) (कोल्ह्यासदृश कुत्रा), उदमांजर किंवा काळमांजर (civets) आणि पिकांमध्ये आढळणारे मोठे उंदीर (bamboo rats) यांसारखे प्राणी आहेत.

बाजारातील एक स्टॉल, विक्रीसाठी असलेले प्राणी आणि कोरोनाच्या विषाणूचा हॉटस्पॉट असल्याचं अधोरेखित करून देखील, अभ्यासातून यासंदर्भात कोणताही निश्चित असा पुरावा समोर येत नाही.

या अभ्यासासाठी वापरण्यात आलेले नमुने चीनच्या अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गोळा केले होते. हे नमुने कोरोनाच्या उगमाबद्दल किंवा त्याच्या उत्पत्तीबद्दलच्या माहितीचा वैज्ञानिकदृष्ट्या सर्वात मौल्यवान स्त्रोत आहेत.

यासंदर्भात वुहानच्या हॉस्पिटल्समध्ये गूढ स्वरुपाच्या न्यूमोनियाचे रुग्ण येताच हुआनान सीफूड होलसेल बाजाराशी कोरोनाच्या संकटाचा प्राथमिक दुवा जोडला गेला.

त्यावेळेस हे मार्केट बंद होतं आणि वैज्ञानिकांच्या टीमनं तेथील स्टॉल्स, प्राण्यांचे पिंजरे आणि कत्तल केलेल्या प्राण्यांच्या अंगावरील फर किंवा केस आणि पिसं काढण्यासाठी वापरली जाणारी उपकरणं अशा गोष्टींमधून नमुने किंवा स्वॅब घेतले.

वैज्ञानिकांनी केलेलं हे विश्लेषण मागील वर्षी प्रकाशित झालं. या विश्लेषणासाठी वापरण्यात आलेली सर्व माहिती आणि डेटा इतर वैज्ञानिकांना उपलब्ध करून देण्यात आला.

आता अमेरिका आणि फ्रान्समधील वैज्ञानिकांच्या एक टीमचं म्हणणं आहे की कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांसंदर्भात अधिक खोलात जाण्यासाठी त्यांनी आणखी प्रगत किंवा अद्ययावत अशी जनुकीय विश्लेषणं केली आहेत.

हे विश्लेषण करताना वैज्ञानिकांनी जानेवारी 2020 मध्ये वुहानच्या बाजारात कोणते प्राणी आणि विषाणू होते हे प्रस्थापित करण्यासाठी लाखो जनुकीय कोड किंवा डीएनए (DNA) आणि आरएनए (RNA)चं विश्लेषण केलं आहे.

"आम्हाला पर्यावरणीय नमुन्यांमध्ये या प्राण्यांचे घोस्ट डीएनए आणि आरएनए दिसत आहेत. यातील काही घोस्ट डीएनए आणि आरएनए ज्या ठिकाणी कोरोनाचे विषाणू सापडले अशा स्टॉल्समध्ये देखील आढळले होते," असं प्राध्यापक फ्लोरेन्स डीबार म्हणतात. त्या फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायन्टिफिक रिसर्चमध्ये कार्यरत आहेत.

(घोस्ट डीएनए किंवा घोस्ट आरएनए (DNA and RNA ghosts) म्हणजे अज्ञात प्रागैतिहासिक मानवापासून आलेला डीएनए किंवा आरएनए होय.)

वुहानमधील मार्केट हेच केंद्रस्थान

वैज्ञानिकांचा हा अभ्यास 'सेल' (Cell) या वैज्ञानिक संशोधनसाठी वाहिलेल्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे. यातून अनेक निष्कर्ष समोर आले आहेत.

यात दिसतं की कोरोना विषाणू आणि संवेदनशील प्राणी एकाच ठिकाणी होते. काही प्राणी आणि कोरोना विषाणू यांचे जनुकीय कोड असलेले स्वतंत्र नमुने गोळा करण्यात आले होते.

या प्रकारचे नमुने त्या बाजारात सर्वत्र आढळले नाहीत आणि ते विशिष्ट ठिकाणं किंवा हॉटस्पॉटकडेच लक्ष वेधतात.

"या प्रकारे विशिष्ट ठिकाणीच कोरोनाशी निगडीत नमुने सापडण्याबाबत अगदी प्रत्येक स्टॉलच्या पातळीवर आम्हाला सातत्य आढळून आलं. त्यातून हेच मार्केट कोरोनाच्या संकटाचं उगमस्थान असल्याचं दिसून येत आहे," असं प्राध्यापक ख्रिस्तियन अँडरसन म्हणतात. ते अमेरिकेतील स्क्रिप्स इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत.

अर्थात एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी असणं म्हणजे कोणत्याही प्राण्याला संसर्ग झाल्याचा पुरावा नाही.

नमुन्यांमधून जो प्राणी सर्वात जास्त आढळून आला तो म्हणजे रॅकून कुत्रा होय. प्रयोगांमध्ये कोरोना सापडणं आणि कोरोनाचं संसर्गाचा फैलाव होणं अशा दोन्हीमध्ये ते दिसून आलं.

कोरोनाच्या संसर्गासाठी संभाव्य स्त्रोत असलेला दुसरा प्राणी म्हणजे काळमांजर (masked palm civet) होय. 2003 मधील सार्स या अशाच संसर्गजन्य रोगाशी देखील या प्राण्याचा संबंध होता.

याव्यतिरिक्त पिकांमध्ये आढळणारे मोठे उंदीर (bamboo rats) आणि मलयन साळिंदर यांचा देखील संभाव्य स्त्रोतांमध्ये समावेश आहे.

हे प्राणी कोरोनाचा संसर्ग पसरवू शकतात की नाही हे पाहण्यासाठी मात्र प्रयोग करण्यात आलेले नाहीत.

सखोल जनुकीय विश्लेषणामुळे कोणत्या विशिष्ट प्रकारचे रॅकून कुत्रे विकले जात होते याची ओळख पटवता आली आहे. अंगावरील फर किंवा केसांसाठी पाळल्या जाणाऱ्या रॅकून कुत्र्यांऐवजी ते दक्षिण चीनमधील जंगलात सामान्यपणे आढळणारे रॅकून कुत्रे असल्याचं यात दिसून आलं.

यातून पुढील अभ्यासाची आणि विश्लेषणाची दिशा कोणती असावी याचे संकेत वैज्ञानिकांना मिळाले.

या बातम्याही वाचा:

कोरोनाच्या विषाणूचा जनुकीय अभ्यास

संशोधकांच्या टीमनं चीनच्या मार्केटमध्ये सापडलेल्या विषाणूंच्या नमुन्यांचं देखील जनुकीय विश्लेषण केलं आणि त्याची तुलना कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्णांकडून घेतलेल्या नमुन्यांशी केली.

विषाणूंच्या नमुन्यातील विविध जनुकीय बदलांचा अभ्यास केल्यावर सुद्धा संशोधकांना त्यातून काही संकेत मिळाले.

या नमुन्यांमधून असं दिसून आलं की त्या मार्केटमध्ये कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात एकापेक्षा अधिक वेळा झाली होती. त्यात प्राण्यांकडून माणसांना संभाव्य लागण होण्याची घटना दोनदा झाली होती.

संशोधक म्हणतात की कोरोनाचा संसर्ग इतरत्र सुरू होऊन मार्केटमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला यापेक्षा चीनमधील हे मार्केट हेच कोरोनाच्या संकटाचं उगमस्थान असण्याच्या कल्पनेला या अभ्यासातून आधार मिळतो.

कोरोनाच्या विषाणूच्या जनुकीय बदलांच्या अभ्यासाचा वापर वैज्ञानिकांनी त्या विषाणूच्या मागील पिढ्यांची मांडणी करण्यासाठी आणि भूतकाळात या विषाणूमध्ये झालेल्या बदलांमध्ये डोकावण्यासाठी देखील केला.

"कोरोनाची सुरुवात केव्हा झाली असं आपल्याला वाटतं, त्या तुलनेत मार्केटमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक कधी झाला या गोष्टींचा आपण अंदाज लावला तर या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या जातात. त्या दोन्ही गोष्टी एकच आहे," असं प्राध्यापक अँडरसन म्हणतात.

प्रकाशित झालेल्या वैज्ञानिक विश्लेषणात, कोरोनाच्या प्रसाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारी कोरोनाच्या विषाणूची संपूर्ण जनुकीय विविधता मार्केटमध्ये आढळून आली.

अरिझोना विद्यापीठाचे प्राध्यापक मायकल वोरोबी म्हणाले, "उत्क्रांतीच्या मोठ्या झाडाची एक छोटी शाखा असण्याऐवजी मार्केटमधील घटनाक्रम या झाडाच्या सर्व शाखांवर दिसून येतो. एका अर्थानं मार्केटमध्ये सुरू होणाऱ्या जनुकीय वैविध्याशी ते सुसंगतच आहे."

ते म्हणाले की मार्केटशी जोडले जाणारे कोरोनाचे सुरुवातीचे संसर्ग आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले रुग्ण यासारख्या इतर माहितीशी हा अभ्यास जोडून पाहिल्यास सर्व गोष्टी कोरोनाची उत्पत्ती प्राण्यांमधून झाल्याकडेच लक्ष वेधतात.

प्राध्यापक वोरोबी म्हणाले, "हे सर्व असंच घडलं आहे, याबाबात कोणतीही शंका नाही." या माहितीच्या इतर स्पष्टीकरणांसाठी "खरोखरच काल्पनिक विचित्र परिस्थिती" आवश्यक आहे.

"हे पुरावे किती भक्कम याबाबत आजतागायत स्वीकृतीचा अभाव आहे."

कोरोनाच्या संकटाची सुरुवात इथे झाली का?

कोरोनाचा संसर्ग प्रयोगशाळेतून पसरला असा एक सिद्धांत मांडला गेला आहे. त्यानुसार कोरोनाच्या विषाणूचा फैलाव वन्यजीवांमधून होण्याऐवजी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (WIV) मधून झाला आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये या विषाणूवर दीर्घकाळ अभ्यास करण्यात आला आहे.

हे इस्टिट्यूट मार्केटपासून वाहनाने 40 मिनिटांच्या अंतरावर आहे. अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांना या इस्टिट्यूटमधून अपघातानं किंवा मुद्दाम विषाणूची गळती करण्यात आल्याचा शक्यतेची माहिती घेण्यास सांगण्यात आलं होतं.

जून 2023 मध्ये या कामाशी निगडीत सर्व गुप्तहेर यंत्रणांनी माहिती दिली की प्रयोगशाळेतून विषाणूची गळती झाली किंवा प्राण्यांमधून प्रसार झाला या दोन्ही शक्यता वाजवी आहेत.

नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल आणि चार इतर संस्थांनी सांगितलं की प्राण्यांमधूनच कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग पसरल्याची शक्यता आहे. तर एफबीआय आणि ऊर्जा विभागाला वाटत होतं की हा संसर्ग प्रयोगशाळेतूनच झाला आहे.

प्राध्यापक अँडरसन म्हणाले, "अनेकांना याच गोष्टीची शक्यता अधिक वाटते. 'ती प्रयोगशाळा अगदी तिथेच आहे. अर्थात ती प्रयोगशाळा होती, तुम्ही मूर्ख आहात का?' मला हा युक्तिवाद पूर्णपणे पटतो."

मात्र, ते म्हणतात की आता असा भरपूर डेटा किंवा माहिती आहे "जो कोरोनाची सुरुवात खरोखरच त्या मार्कटमधून झाल्याचं दाखवतो" आणि "अगदी त्या मार्केटमधील ठिकाणं देखील दर्शवितो."

कोरोनाच्या संसर्गाचा स्त्रोत असलेल्या प्राण्यांची ओळख पटवण्यातून काही संकेत मिळू शकतात. या संकेतांद्वारे वैज्ञानिकांना प्राण्यापासून या आजाराची उत्पत्ती झाल्याचे आणखी पुरावे कुठे शोधता येतील ते कळू शकतं.

मात्र, कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शेतांमधील प्राण्यांना नष्ट करण्यात आल्यामुळे त्यासंदर्भात कोणतेही पुरावे शिल्लक राहिलेले नसणार.

"सर्व प्रकारच्या शक्यतांचा विचार करता, आपण संधी गमावली आहे," असं प्राध्यापक वोरोबी म्हणतात.

हाँगकाँग विद्यापीठातील प्राध्यापक अ‍ॅलिस ह्युजेस म्हणतात की हा एक 'चांगला अभ्यास' होता. अर्थात या अभ्यासात त्या सहभागी नव्हत्या.

त्या म्हणतात, "मात्र मार्केटमधील प्राण्यांच्या नमुन्यांशिवाय आपण यासंदर्भात कोणतीही मोठी खात्री मिळवू शकत नाही. शिवाय ते नमुने गोळा करण्यात आलेले नाहीत."

प्राध्यापक जेम्स वूड 'केंब्रिज संसर्गजन्य रोग' (Cambridge Infectious Diseases) या संस्थेचे सहसंचालक आहेत. ते म्हणाले, या अभ्यासातून कोरोनाच्या संकटाची सुरुवात मार्केटमधील वन्यजीवांच्या स्टॉल्समधून झाल्याचे "अतिशय भक्कम पुरावे" मिळाले आहेत.

मात्र, याबाबत निश्चित निष्कर्ष काढता येणार नाही, असंही ते पुढे बोलताना म्हणाले. कारण मार्केट बंद झाल्यानंतर प्राण्यांचे नमुने घेण्यात आले होते. तर कोरोनाचा संसर्ग बहुधा त्याच्या काही आठवड्यांआधीच सुरू झाला होता.

त्याचबरोबर ते असा सुद्धा इशारा देतात की वन्यजीवांच्या थेट व्यापारावर मर्यादा आणण्यासाठी "फारसं काही केलं जात नाही" आणि "प्राण्यांच्या संसर्गाच्या अनियंत्रित प्रसारामुळे भविष्यातदेखील या प्रकारच्या मोठ्या साथरोगांचा मोठा धोका कायम आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)