You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिडनंतर पुरुषांच्या तुलनेत घटले महिलांचे आयुर्मान, ही आहेत कारणे?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीसीसी प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटाचा भारतीय लोकांवर झालेल्या परिणामांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे.
कोरोना संकटाचा भारतीय स्त्री-पुरुष आणि इथले वेगवेगळे सामाजिक घटक यांच्यावर कसा परिणाम झाला यावर संशोधन करण्यात आलं आहे.
या विषयावरील शोधनिबंध 'सायन्स अॅडव्हान्सेस' या अमेरिकन नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
यूके, अमेरिका आणि युरोपातील 10 संशोधकांच्या एका टीमनं हे संशोधन केलं आहे.
संशोधकांना या अभ्यासातून आढळून आलं की, 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये भारतातील आयुर्मान 2.6 वर्षांनी घटले होते आणि मृत्यूदरात 17 टक्क्यांची वाढ झाली होती.
म्हणजेच 2020 मध्ये भारतात 11.9 लाख मृत्यू अधिक झाले.
अधिक होणारे मृत्यू हा मागील वर्षांच्या तुलनेत अपेक्षपेक्षा किती अधिक लोक मृत्यू पावत आहेत हे मोजण्याचा सोपा मार्ग आहे. (मार्च 2020 मध्ये भारतात कोरोना संकटाची नुकतीच सुरूवात झाली होती)
नवीन अभ्यास करणाऱ्या संशोधकांचं म्हणणं आहे की, जास्त उत्पन्न असलेल्या किंवा श्रीमंत देशांच्या तुलनेत भारतात आयुर्मानात झालेली घट मोठी होती आणि तरुणांवर त्याचा परिणाम झाला.
त्यांना आढळून आलं की सर्वच वयोगटांमध्ये मृत्यूदरात वाढ झाली आहे. मात्र श्रीमंत देशांच्या तुलनेत खासकरून तरुण वयोगटात मृत्यूदरातील वाढ दिसून आली. याचा परिणाम होत भारतातील आयुर्मानात मोठी घट झाली.
या संशोधकांना या अभ्यासातून जे आढळलं ते फारच चिंताजनक होतं.
पहिली बाब म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आयुर्मानात एक वर्ष जास्त घट झाली.
इतर बहुतांश देशांच्या तुलनेत भारतातील ट्रेंड किंवा पॅटर्न उलटा आहे. कदाचित हे लिंगभेदामुळे किंवा स्त्री-पुरुष असमानतेमुळे असेल, असं ऑक्सफर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि बर्कले अँड परिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इत्यादींमधील संशोधकाचं म्हणणं आहे.
याशिवाय सुस्थितीत असलेल्या उच्च जातींतील लोकांच्या तुलनेत मुस्लीम, दलित आणि आदिवासी या भारतातील उपेक्षित वर्गामधील आयुर्मानात मोठ्या प्रमाणात घट झाली. यातून आधीच अस्तित्वात असलेली असमानता आणखी वाढली.
हे संशोधक ही गोष्ट मान्य करतात की, कोरोना साथीच्या पूर्वी आयुर्मानाच्या बाबतीत या वर्गांमध्ये आधीच लक्षणीय नकारात्मक बाबी होत्या. 2020 मध्ये अमेरिकेतील नेटिव्ह किंवा मूळनिवासी अमेरिकन, कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक लोकांच्या आयुर्मानात झालेल्या घटी इतकंच किंवा त्याहून अधिक घट या वर्गांच्या आयुर्मानात झाली. कोरोनाच्या संकटामुळे ही असमानता आणखी भीषण झाली, असं या अभ्यासात म्हटलं आहे.
"जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या कोरोनाच्या संकट काळात झालेले मोठे आणि असमान मृत्यूदराचे परिणाम या अभ्यासातून समोर येतात," असं CUNY हंटर कॉलेजच्या संगिता व्यास यांनी मला सांगितलं. या संशोधकांपैकी त्या एक आहेत.
2022 च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)अहवालानुसार, भारतात 47 लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं मानलं जातं.
अधिकृत आकडेवारीपेक्षा ही संख्या जवळपास 10 पट अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेची मोजमाप करण्याची पद्धत सदोष असल्याचं म्हणत भारत सरकारनं हे आकडे नाकारले आहेत.
ताज्या अभ्यासात निश्चितपणे फक्त कोरोनामुळेच नाही तर इतर सर्व कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा अभ्यास करण्यात आला.
"या कारणामुळेच भारतातील पुरुषांपेक्षा महिलांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक होती हा निष्कर्ष आम्ही काढू शकत नाही. या अभ्यासातून आपण हा निष्कर्ष काढू शकतो की सर्वच कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक होतं." असं व्यास म्हणतात.
भारतातील बेरोजगारी संदर्भातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संशोधकांना वाटतं की मृत्यूदराचा हा पॅटर्न काही अंशी लिंगभेदामुळे किंवा स्त्री-पुरुष असमानतेमुळे आहे.
आधीच्या संशोधनातून दिसून आलं आहे की भारतीय कुटुंबामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आरोग्यावर कमी खर्च केला जातो. कोरोनाच्या संकटात बहुधा ही दरी आणखी रुंदावली.
पुरुषांइतकाच संसर्ग दर महिलांमध्येही असल्याचं सर्वेक्षणातून दिसून येत असूनही भारतातील अधिकृत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत महिलांचं प्रमाण कमी आहे.
याशिवाय कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गर्भवती महिलांच्या आरोग्यावर आणि उपजीविकेच्या साधनावर गंभीर स्वरुपाचा परिणाम झाला. या गोष्टी देखील मृत्यूदराच्या ट्रेंडसाठी कारणीभूत ठरले असण्याची शक्यता आहे.
संशोधक या निष्कर्षांवर कसे पोहोचले? संशोधकांनी, अपूर्ण माहिती आणि रोग निरीक्षणामुळे सुटलेले किंवा राहून गेलेले पॅटर्न लक्षात घेण्यासाठी 7,65,000 पेक्षा जास्त लोकांच्या माहितीचं सर्वेक्षण केलं.
सर्वेक्षणासाठी या नमुन्यातून भारताच्या एक चतुर्थांश लोकसंख्येतील विविधता आणि वितरण या गोष्टींचं प्रतिबिंब अचूकपणे उमटतं.
भारताच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 ने (India’s National Family Health Survey 5) अलीकडच्या काळात झालेले कौटुंबिक मृत्यू आणि सामाजिक-आर्थिक वैशिष्ट्यांवरील उच्च दर्जाची माहिती गोळा केली आहे.
या माहितीतून संशोधकांना वय, लिंग आणि वर्गावर आधारित मृत्यूदराच्या पॅटर्नचं विश्लेषण करणं शक्य झालं. 2021 मध्ये ज्या कुटुंबांची मुलाखत घेतली होती त्याच कुटुंबाची माहिती वापरून संशोधकांनी 2019 आणि 2020 मध्ये झालेल्या मृत्यूंची तुलना केली.
संशोधकांना वाटतं की भारतात पुरुषांपेक्षा महिलांचे मृत्यू अधिक का झाले, इतर देशांशी तुलना करता भारतात तरुण वयोगटात अधिक मृत्यू का झाले आणि इतर समाज घटकांपेक्षा मुस्लिमांच्या आयुर्मानात लक्षणीय घट का झाली, याचा शोध घेण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
"आरोग्यसेवांच्या उपलब्धतेतील आणि अंतर्निहित आरोग्यातील असमानता, लॉकडाऊनचे सार्वजनिक आरोग्य आणि उपजीविकेच्या साधनावर झालेले वेगवेगळे परिणाम आणि उपेक्षित वर्गाविरोधातील वाढता भेदभाव यामुळे कदाचित हे पॅटर्न निर्माण झालेले असू शकतात," असं व्यास म्हणतात.