कोरोनाचा नवीन व्हेरिएंट 'या' देशांमध्ये पसरतोय वेगाने; काय काळजी घ्याल?

    • Author, मायकल रॉबर्ट्स
    • Role, डिजिटल हेल्थ एडिटर, बीबीसी न्यूज

सध्या लोकांना पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग होत असून येत्या काळात तो अधिक प्रभावशाली होऊ शकतो अशी शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.

कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट जर्मनीमध्ये जून महिन्यात सापडला असून तेव्हापासून युनायटेड किंगडम, अमेरिका, डेन्मार्क या देशांमध्ये XEC व्हेरिएंटच्या केसेस वाढल्या आहेत; असं एक्स (पूर्वीचे ट्विटर) युजर्सने लिहिलं आहे.

या व्हेरिएंटमध्ये काही म्युटेशन्स झाले असून त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांत हा व्हेरिएंट पसरण्याची चिन्हं आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते लशींमुळे खूप गंभीर केसेस दिसण्याची शक्यता कमी आहे.

जे लोक कोव्हिडमुळे गंभीर आजारी आहेत त्यांना National Health Service तर्फे (NHS) मोफत बूस्टर शॉट देण्यात येत आहे.

नुकत्याच आलेल्या व्हेरिएंटवर प्रभावी ठरण्यासाठी लशीही अद्ययावत करण्यात आल्या आहेत. सध्या पसरत असलेला XEC व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या उपप्रकारांमधून तयार झाला आहे.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. फ्रान्सिस बॉलॉक्स यांनी बीबीसीला सांगितलं की, "XEC त्याआधीच्या कोव्हिड व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक सहजपणे पसरत असला तरीही लसीकरणामुळे त्याच्यापासून चांगलं संरक्षण मिळू शकतं."

ते म्हणाले, "XEC हा व्हेरिएंट हिवाळ्यात अधिक प्रभावशाली ठरेल."

कॅलिफोर्नियातील स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक एरिक टोपोल म्हणाले की, 'XEC ची ही फक्त सुरुवात आहे’.

“या व्हेरिएंटचं लाटेत रूपांतर होण्यासाठी अनेक आठवडे लागतील, अगदी काही महिनेसुद्धा लागतील.” त्यांनी एलए टाइम्सला सांगितलं.

“XEC वेगाने पसरतो आहे आणि तो पुढचा व्हेरिएंट असू शकतो. मात्र, त्याची तीव्रता वाढण्यासाठी काही महिने लागतील.

XEC कोव्हिडची लक्षणं

या प्रकाराची लक्षणंसुद्धा सर्दी, आणि फ्लू म्हणजे आधीसारखीच आहेत. इतर लक्षणांमध्ये,

  • ताप
  • वेदना
  • थकवा
  • खोकला किंवा घसा दुखणं

बहुतांश लोकांना काही आठवड्याच्या आत बरं वाटतं, मात्र काही लोकांना बरं होण्यासाठी वेळ लागू शकेल.

डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये XEC चांगलाच पसरला आहे, असं कोव्हिडसंदर्भातील माहितीचे विश्लेषक माईक हनी यांनी एक्सवर सांगितलं.

आता पूर्वीपेक्षा नियमित चाचण्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे कोव्हिड किती पसरला आहे, याचा अंदाज बांधणं अशक्य आहे.

युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKSHA) यांच्या मते या व्हायरसचं म्युटेशन होणं आणि त्यात बदल होणं अगदीच सामान्य आहे.

ज्या लोकांना मोफत बूस्टर डोस मिळतो, त्यात

  • 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे
  • वृद्धाश्रमात राहणारे व्यक्ती
  • जे क्लिनिकल रिस्क गटात सहा महिन्यांपासून आहे.
  • एनएचएसचे फ्रंट लाईन, केअर होम आणि सोशल केअर वर्कर्स यांचा समावेश आहे.

युनायटेड किंगडममध्ये फ्लू आणि कोव्हिडच्या लसीकरणाची मोहीम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. काहींना ही लस लवकरही मिळेल.

UKSHA च्या उपसंचालक डॉ. गायत्री अमिर्थलिंगम म्हणाल्या, “कालानुरूप विषाणूंच्या रचनेत बदल होतात. UKSHA कडून कोव्हिडच्या नवीन व्हेरिएंटबद्दल यूके आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व माहिती मिळवली जाईल आणि माहिती प्रकाशित केली जाईल.

“लसीकरणामुळे कोव्हिड 19 पासून उत्तम संरक्षण मिळेल. ज्यांना NHS ने संपर्क केला त्यांनी ही लस घ्यावी असं आम्ही आवाहन करत आहोत,” असं डॉ. गायत्री सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.