पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, दोन महिने विश्रांतीचा सल्ला

पोप फ्रान्सिस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोप फ्रान्सिस (फाईल फोटो) गेल्या पाच आठवड्यांपेक्षा अधिक दिवसांपासून दुहेरी न्यूमोनियाशी सामान करत आहेत
    • Author, बेथनी बेल, झहरा फातिमा
    • Role, बीबीसी न्यूज

पोप फ्रान्सिस यांना आज ( रविवारी -23 मार्च) रोममधील जेमेली हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे की पोप फ्रान्सिस यांना व्हॅटिकनमध्ये किमान दोन महिने विश्रांती घ्यावी लागेल.

पोप फ्रान्सिस यांना पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी जमा झाली होती.

त्यांना रुग्णालयातून बाहेर आलेले पाहून लोकांच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता.

"मी जेव्हा त्यांना पाहिलं, तेव्हा मला खरं सांगायचं तर मला हायसं वाटलं. त्यांना पाहून मला खूपच आनंद झाला," असं अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील ग्रीन्सबर्गच्या डायोसेसमधील बिशप लॅरी कुलिक म्हणाले.

"मी सर्ववेळ रडत होते. कारण या हॉस्पिटलच्या छोट्या चौकात जे प्रेम आपल्याला श्वासातून मिळतं ते स्वर्गीयच आहे," असं इलारिया डेला बिडिया म्हणाल्या. त्या रोममधील गायिका आहेत.

तर ब्राझीलमधील अॅना मॅटोस म्हणाल्या की "त्या ब्राझीलहून आजच इथे आल्या आहेत" आणि हॉस्पिटलच्या बाहेर "पोप दिसण्यापूर्वी 30 सेकंद आधी त्या तिथे पोहोचल्या आहेत."

त्या म्हणाल्या की, "मला जेव्हा माझा मुलगा झाला होता, तेव्हा जशी माझा भावना होती, तशीच अद्भूत भावना आता होती. पोपना निरोगी पाहून मला अतिशय आनंद झाला. मी त्यांना हसताना पाहू शकले."

पोप फ्रान्सिस 88 वर्षांचे आहेत. त्यांना श्वसनाशी संबंधित गंभीर संसर्ग झाल्यामुळे दुहेरी न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे त्यांना 14 फेब्रुवारीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

गेल्या पाच आठवड्यात पोप फ्रान्सिस यांची "प्रकृती दोन वेळा अतिशय गंभीर" झाली होती आणि त्यांच्या "जीवाला धोका निर्माण" झाला होता, असं डॉ. सर्जिओ अलफिएरी म्हणाले. पोप फ्रान्सिस यांच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये ते आहेत.

उपचारादरम्यान श्वसनासाठी पोप फ्रान्सिस यांच्या तोंडावाटे फुप्फुसात कधीही नळ्या टाकण्यात आल्या नाहीत. ते नेहमीच सतर्क होते आणि भानावर होते, असं डॉ. अलफिएरी म्हणाले.

पोप फ्रान्सिस व्हॅटिकन सिटीमध्ये परतणार

पोप अजूनही पूर्ण बरे झालेले नाहीत. मात्र आता न्यूमोनिया बरा झाला आहे आणि त्यांची तब्येत स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

"उद्या पोप घरी परतील हे सांगताना आज आम्हाला आनंद होतो आहे," असं डॉ. अलफिएरी यांनी शनिवारी (22 मार्च) पत्रकारांना सांगितलं.

पोप फ्रान्सिस व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी परतण्यापूर्वी जेमेली हॉस्पिटलमधील त्यांच्या खिडकीतून रविवारी (23 मार्च) आशिर्वाद देतील. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून पहिल्यांदाच ते लोकांसमोर येतील.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

डॉ. अलफिएरी म्हणाले की ज्या रुग्णांना दुहेरी न्यूमोनिया होतो त्या रुग्णांचा आवाज थोडा कमी होतो. "विशेषकरून वृद्धांच्या बाबतीत आवाज पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो."

शुक्रवारी (21 मार्च) कार्डिनल व्हिक्टर फर्नांडिस म्हणाले होते की "ऑक्सिजनच्या मोठ्या प्रवाहामुळे सर्वकाही कोरडं होतं" आणि त्याचा परिणाम म्हणून पोप "यांना बोलणं पुन्हा शिकण्याची आवश्यकता आहे", असं वृत्त रॉयटर्सनं दिलं होतं.

जर पोप यांच्या तब्येतीत सुधारणा होत राहिली तर ते लवकरात लवकर त्यांच्या कामावर परतू शकतील, असं डॉक्टर म्हणाले.

व्हॅटिकननं शुक्रवारी (21 मार्च) सांगितलं होतं की पोप यांच्या श्वासोच्छवासात आणि हालचालींमध्ये काही सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे.

व्हॅटिकन या गोष्टीला दुजोरा दिला होता की पोप रात्रीच्या वेळी श्वास घेण्यासाठी यांत्रिक व्हेंटिलेशन वापरत नाहीत. मात्र त्यांच्या नाकातून टाकण्यात आलेल्या एका छोट्या नळीद्वारे ते ऑक्सिजन घेत आहेत. दिवसा, त्यांना ऑक्सिजनचा कमी पुरवठा केला जात आहे.

पोप फ्रान्सिस

फोटो स्रोत, Getty Images

पोप हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून लोकांनी त्यांना फक्त एकदाच पाहिलं आहे. व्हॅटिकननं गेल्या आठवड्यात त्यांचा एक फोटो प्रसिद्ध केला होता, त्यातून लोकांना पोप दिसले होते. या फोटोत ते हॉस्पिटलच्या चॅपेलमध्ये प्रार्थना करताना दिसत आहेत. चॅपेल म्हणजे एक छोट्या स्वरुपाचं चर्चच असतं.

पोप फ्रान्सिस यांची आजारपण

त्याआधी या महिन्याच्या सुरुवातीला, व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स चौकात पोप फ्रान्सिस यांचं एक ऑढिओ रेकॉर्डिंग वाजवण्यात आलं होतं. त्यात ते त्यांच्या मूळ स्पॅनिश भाषेत बोलत होते.

कॅथलिकांच्या प्रार्थनांसाठी आभार मानत असताना पोप यांना दम लागत होता.

पोप फ्रान्सिस 12 वर्षांपासून रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख म्हणून काम करत आहेत.

त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक आजारपणांना तोंड द्यावं लागलं आहे. ते 21 वर्षांचे असताना त्यांच्या फुप्फुसाचा एक भाग काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे त्यांना श्वसनाचे संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.