'पोप हास्यविनोद करत असल्याचे पाहून आनंद झाला', इटलीच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बेथनी बेल आणि अॅलेक्स बॉयड
- Role, बीबीसी न्यूज
88 वर्षीय पोप फ्रान्सिस यांची इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रुग्णालयात भेट घेतली. पोप फ्रान्सिस यांना न्युमोनिया झाला असल्याचे व्हॅटिकन सिटीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मेलोनी यांनी म्हटले की "पोप यांना मी जेव्हा भेटले तेव्हा ते जागेच होते आणि ते प्रतिसादही देत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी हास्यविनोदही केला. त्यांची हास्यविनोद करण्याची शैली अबाधित असल्याचे पाहून आनंद झाला."
पोप लवकर बरे व्हावेत यासाठी मेलोनी यांनी इटलीचे सरकार आणि देशवासियांच्या वतीने सदिच्छा दिल्या.
पोप यांनी नाश्ता देखील केला आणि ते रुग्णालयातील आरामखुर्चीत थोडा वेळ बसले देखील. तसंच त्यांनी थोडं काम देखील केलं असं व्हॅटिकनच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
'जटिल वैद्यकीय' स्थितीमुळे रुग्णालयात दाखल
याआधी, पोप फ्रान्सिस यांना शुक्रवारी रोम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'जटिल वैद्यकीय स्थिती'मुळं उपचार सुरू आहेत. जोपर्यंत आवश्यकता वाटेल तोपर्यंत ते रुग्णालयातच राहतील असे व्हॅटिकन सिटीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं.
ब्राँकायटिससंदर्भातील चाचण्या आणि उपचार करण्यासाठी त्यांना दाखल करण्यात आलं. आता पोप यांना न्युमोनिया झाल्याचं व्हॅटिकनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
त्यानंतर प्रकृतीबाबत पुन्हा अपडेट देण्यात आलं. त्यानंतर पोप यांच्यावर ठरलेले उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं तसंच त्यांना ताप नसल्याचं सांगण्यात आलं. तसंच त्यांनी सोमवारी रुग्णालयात काही काम आणि वाचन केल्याचंही सांगितलं.
"गेल्या काही दिवसांत मिळालेल्या शुभेच्छा आणि त्यासंदर्भातील संदेशांमुळं पोप आपुलकी आणि जिव्हाळ्याचा अनुभव मिळाला," असं निवेदनात म्हटले आहे.
"विविधं चित्रं आणि संदेशांद्वारे शुभेच्छा देऊन काळजी व्यक्त करणाऱ्यांचे त्यांना विशेष आभार मानायचे आहेत. पोप त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि त्यांनीही पोपसाठी प्रार्थना करावी."


गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पोप यांना काही दिवस ब्राँकायटिसची लक्षणं दिसत होती. त्यामुळं त्यांनी भाषणं वाचण्यासाठी काही अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली होती.
व्हॅटिकनचे प्रवक्ते मात्तेओ ब्रुनी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना पोप चांगल्या मूडमध्ये असल्याचंही सांगितलं.
त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील छोट्याशा निवेदनात त्यांनी म्हटलं की, "आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांवरून जटिल वैद्यकीय स्थिती असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल राहून उपचार घ्यावे लागणार आहेत."
पोप यांचं दर आठवड्याला होणारं भाषण या आठवड्यात रद्द करण्यात आलं असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे. दर आठवड्याला बुधवारी हे भाषण होत असतं.
यापूर्वी व्हॅटिकननं पोप यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सावरण्यासाठी पूर्णपणे विश्रांतीची गरज असल्याचं म्हटलं होतं.
शुक्रवारी आणि शनिवारी त्यांनी गाझामध्ये फादर गॅब्रियल रोमानेल्ली यांच्या नेतृत्वात होत असलेल्या होली फॅमिली पेरिशमध्ये व्हीडिओ कॉलद्वारे सहभागही घेतला होता.
"आम्ही त्यांचा आवाज ऐकला. खरंच ते थकलेले वाटत होते. ते स्वतःही म्हणाले की, 'मला स्वतःची काळजी घ्यायला हवी.' पण त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. त्यांनी आमचं सगळं व्यवस्थित ऐकलं," असं फादर रोमानेल्ली व्हॅटिकन न्यूजशी बोलताना म्हणाले.
रविवारी फादर रोमानेल्ली म्हणाले की, त्यांना पोप फ्रान्सिस यांचा फक्त टेक्स्ट मेसेज आला होता. त्यांनी शुभेच्छासाठी पेरिशचे आभार मानले.

पोप यांना रविवारी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये आठवडी प्रार्थना सभेतही सहभागी होता आलं नाही. तसंच कॅथलिक चर्चच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या विशेष मासमध्येही सहभागी झाले नाहीत.
विश्रांती आणि आजारातून सावरण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी गेल्या आठवड्यात व्हॅटिकनमधील निवासस्थानीही काही बैठका घेतल्या.
सेंट पीटर्स बासिलिका बाहेर असलेले नागरिक पोपना शुभेच्छा देत आहेत.
इंग्लंडमध्ये राहणारे ऑस्ट्रेलियन बर्नाड त्यांच्या मुलांसह रोमला आले होते. ते म्हणाले की, "आम्ही पोपसाठी प्रार्थना करू."
"त्यांचे खूप जास्त वय असतानाही त्यांना काम करावं लागतं. त्यामुळं अनेकदा त्यांना अशा प्रकारच्या वैद्यकीय समस्यांचा सामना करावा लागतो," असं ते बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.
रोमचे रहिवासी असलेले अर्मांडो यांनी पोप हे 'महात्मा' आणि 'सर्वांसाठी प्रेरणा' असल्याचंही म्हटलं.
"ऑल द बेस्ट पोप. तुम्ही लवकर बरे होऊन याल याची आम्ही आतुरतेनी वाट पाहत आहोत," असंही ते म्हणाले.
रोमन कॅथलिक चर्चचे नेतृत्व करताना 12 वर्षांच्या काळात पोपना अनेक वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. त्यांनी जीवनातही अनेक वैद्यकीय समस्यांचा सामनाही करावा लागला. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांचं एक फुफ्फुस काढावं लागलं होतं.
मार्च 2023 मध्ये त्यांना ब्राँकायटिसमुळंच तीन दिवस रुग्णालयात दाखल राहावं लागलं होतं. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रियाही करण्यात आली.
आणखी एका आजारपणामुळं त्यांना 2023 मध्ये यूएईमध्ये झालेल्या हवामान परिषदेलाही उपस्थित राहता आलं नव्हतं.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सेंट पीर्ट्स बासिलिका याठिकाणी 21 नवीन कॅथलिक कॉर्डिनलसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, त्यांच्या हनुवटीवर एका जखमेचे व्रणही दिसले होते. पडल्यामुळं झालेल्या लहानशा अपघातात ती जखम झाल्याचं नंतर व्हॅटिकनकडून सांगण्यात आलं.
तर अलिकडे म्हणजे जाणेवारी महिन्यात पडल्यामुळं त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











