'बॅंकेच्या मॅनेजरने माझ्या खात्यातून परस्पर 16 कोटी रुपये घेतले', आयसीआयसीआय बँकेवर महिलेचा आरोप

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

भारतातील एका मोठ्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने परस्पर आपल्या खात्यातून बेकायदेशीरपणे 16 कोटी रुपये काढल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.

श्वेता शर्मा असं या महिलेचं नाव असून त्यांनी सांगितलं की, मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करून त्यांनी त्यांच्या अमेरिकन खात्यातून आयसीआयसीआय या बँकेत पैसे हस्तांतरित केले.

मात्र, एका बँक अधिकाऱ्याने माझ्या खात्यातून पैसे काढण्यासाठी बनावट खाती तयार केली. माझी खोटी सही केली आणि डेबिट कार्ड आणि चेकबूक घेतल्याचा आरोप श्वेता शर्मा यांनी केला आहे.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "या व्यक्तीने बँकेचे खोटे स्टेटमेंट दिले. माझ्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार करण्यात आला. बँक रेकॉर्डमध्ये माझा फोन नंबर बदलण्यात आला. त्यामुळे रोख पैसे काढल्यानंतर मला काहीच माहिती मिळाली नाही."

बँकेच्या प्रवक्त्याने बीबीसीकडे कबूल केलंय की, "फसवणूक झाली हे खरं असलं तरी कोट्यवधी ग्राहकांच्या हजारो कोटींच्या ठेवी असलेली आयसीआयसीआय बँक ही नावाजलेली बँक आहे."

या फसवणुकीत जो कोणी सहभागी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

अमेरिका आणि हाँगकाँगमध्ये अनेक दशकं राहाणाऱ्या शर्मा 2016 मध्ये आपल्या पतीसोबत भारतात आल्या. इथे आल्यानंतर एका मित्राच्या माध्यमातून त्यांची या बँकरशी ओळख झाली.

अमेरिकेत बँक ठेवींवरील व्याजदर खूपच कमी आहेत, तर भारतात मुदत ठेवींवरील व्याजदर 5.5 ते 6 टक्के असल्याचं सांगत त्याने श्वेता शर्मा यांना इथल्या बँकेत पैसे जमा करण्याचा सल्ला दिला.

त्याच्या सल्ल्यानुसार शर्मा यांनी दिल्लीजवळील जुन्या गुरुग्राम येथील आयसीआयसीआय बँकेला भेट दिली आणि एनआरआय खातं सुरू केलं. 2019 मध्ये त्यांच्या अमेरिकन खात्यातून इथल्या शाखेत पैसे हस्तांतरित करण्यात आले.

शर्मा यांनी सांगितलं की, "आम्ही सप्टेंबर 2019 ते डिसेंबर 2023 या चार वर्षांच्या कालावधीसाठी 13.5 कोटी रुपयांची आयुष्यभराची बचत बँकेत जमा केली. त्याच्यावर व्याज मिळून ही रक्कम 16 कोटींहून जास्त झाली."

त्या सांगतात, आम्हाला याबाबत कधीच संशय आला नाही कारण शाखा व्यवस्थापक वेळोवेळी पावत्या पाठवायचा. आणि आयसीआयसी बँकेतूनही वेळोवेळी ईमेलवर स्टेटमेंट यायचं.

ही फसवणूक जानेवारीच्या सुरुवातीला उघडकीस आली, जेव्हा बँकेतील एका नवीन कर्मचाऱ्याने शर्मा यांना त्यांच्या पैशावर अधिक चांगला परतावा मिळू शकेल असा सल्ला दिला.

त्यांच्या सर्व मुदत ठेवी गायब झाल्याचं लक्षात आलं. एका ठेवीवर 2.5 कोटी रुपयांचा ओव्हरड्राफ्टही काढण्यात आला होता.

शर्मा सांगतात, "हे ऐकून माझे पती आणि मला धक्काच बसला. मी ऑटोइम्यून डिसऑर्डरची रुग्ण आहे. त्यामुळे आठवडाभर मी अंथरुणाला खिळून होते. तुमच्या डोळ्यासमोर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं दिसतं आणि तुम्ही काहीच करू शकत नाही."

श्वेता शर्मा म्हणाल्या की, त्यांनी बऱ्याचदा हे संपूर्ण प्रकरण बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली आहे.

शर्मा म्हणाल्या, "16 जानेवारी रोजी, बँकेच्या प्रादेशिक आणि विभागीय प्रमुखांसह आम्ही मुंबईहून आलेल्या बँकेच्या अंतर्गत दक्षता प्रमुखांना भेटलो. ते म्हणाले की त्यांच्याकडून चूक झाली आहे. शाखा व्यवस्थापकाने फसवणूक केल्याचे त्यांनी मान्य केलं."

"त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आमचे पैसे आम्हाला परत केले जातील. परंतु त्यांनी सांगितलं की हे फसवे व्यवहार ओळखण्यासाठी त्यांना माझी मदत लागेल."

त्यानंतर शर्मा आणि त्यांच्या लेखापालांच्या टीमने गेल्या चार वर्षांपासून बँकेचे व्यवहार आणि त्यांचे तपशील यावर काही दिवस काम केले. 100% फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालेल्या व्यवहारांचे तपशील त्यांनी दक्षता पथकाकडे सुपूर्द केले.

"माझ्या खात्यातून पैशांचा अपहार कसा झाला आणि ते कुठे खर्च केले गेले हे जाणून मला आश्चर्य वाटलं."

शर्मा सांगतात की, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ही समस्या दोन आठवड्यांत सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आज सहा आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि त्या अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत.

यादरम्यान त्यांनी आयसीआयसीआय बँकेचे सीईओ आणि डेप्युटी सीईओ यांना पत्र लिहिलं. तसेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.

बँकेच्या सूत्रांनी जे पत्र शर्मा यांना पाठवलं होतं त्यात म्हटलंय की, या घटनेची चौकशी होईपर्यंत सुरुवातीचे 9. 27 कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातील.

मात्र, शर्मा यांनी बँकेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. "माझ्याकडे असलेल्या 16 कोटी रुपयांपेक्षा हे खूपच कमी आहे. पोलीस प्रकरण बंद करेपर्यंत खात्यातील व्यवहार गोठवले जातात. आणि यासाठी बरीच वर्षं लागतात."

शर्मा म्हणतात, "कोणतीही चूक न करता मी ही शिक्षा का भोगावी? माझ्या आयुष्यात उलथापालथ झाली आहे. झोप येत नाही, भयानक स्वप्न पडतात."

'कॅशलेस कंझ्युमर' या फिनटेक कंपनीचे श्रीकांत एल म्हणाले की, अशी प्रकरणं फार दुर्मिळ आहेत आणि अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून बँका ऑडिट आणि तपासणी करतात.

पण बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने तुमची फसवणूक करायचं ठरवलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही असंही ते म्हणाले.

"शर्मा यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला कारण तो शाखा व्यवस्थापक होता. ग्राहकांनी अधिक सतर्क राहावं. त्यांनी त्यांच्या खात्यातून होणाऱ्या रोखीच्या व्यवहारांवर सतत लक्ष ठेवावं."

"ग्राहक याची तपासणी करत नसल्यामुळे अशा प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते."

अशा प्रकारच्या अनियमिततेमुळे चर्चेत येण्याची आयसीआयसीआय बँकेची या महिन्यातली ही दुसरी वेळ आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला राजस्थान पोलिसांनी सांगितलं होतं की, शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारी बँकेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांपासून ठेवीदारांचे शेकडो कोटी रुपये इतर खात्यांमध्ये वळवत आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढले जायचे आणि नवीन चालू, बचत खाती, मुदत ठेवी सुरू करण्यासाठी हे पैसे वापरले जायचे.

आयसीआयसीआयच्या प्रवक्त्याने या प्रकरणात सांगितलं की, बँकेने त्वरित प्रतिक्रिया देऊन व्यवस्थापकावर कारवाई केली आहे. या प्रकरणात कोणत्याही ग्राहकाने पैसे गमावलेले नाहीत.

त्यांनी श्वेता शर्मा यांच्या प्रकरणाबाबत सांगितलं की, "त्यांना तीन वर्षांपासून खात्यातील व्यवहार आणि शिल्लक तपशीलांची माहिती नव्हती आणि नुकतीच त्यांना या संदर्भात माहिती मिळाली, हे धक्कादायक आहे."

"बँकेने त्यांना वेळोवेळी त्यांचे नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेलवर व्यवहाराचे तपशील पाठवले आहेत."

"आरोप झालेल्या शाखा व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आलं असून तपास प्रलंबित आहे. यात आमचीही फसवणूक झालीय" असं ते म्हणाले.

"आम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडेही तक्रार केली आहे. पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत थांबा. त्यांनी केलेला आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांचे पैसे व्याजासह परत केले जातील. दुर्दैवाने त्यांना तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल."

याप्रकरणी संबंधित बँक व्यवस्थापकाशी बीबीसी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.