मेहुल चोकसी : प्रथितयश व्यापारी, पीएनबी घोटाळा आणि देशातून फरार होण्याची गोष्ट

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

13,600 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यात भारताला हवा असलेला मुख्य आरोपी मेहुल चोकसी उत्तर अमेरिका खंडात डॉमनिका बेटांवर पोलिसांच्या हाती लागला आहे.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्यातल्या जटिलपणामुळे चोकसी आताच भारताच्या हाती लागणं कठीण आहे. पण, त्यानिमित्ताने या प्रथितयश हिरे व्यापाऱ्याने हा घोटाळा कसा घडवून आणला आणि देशातून फरार होण्यात कसं यश मिळवलं, याची कथा जाणून घेऊया...

2018 मधला सगळ्यांत गाजलेला बँक घोटाळा म्हणजे पंजाब नॅशनल बँकेत झालेला 13,600 कोटी रुपयांचा कर्ज वाटप घोटाळा. मेहुल चोकसी आणि नीरव मोदी या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होते.

दोघांनी पीएनबी बँकेच्या मुंबईतल्या एकाच शाखेतून बनावट कागदपत्रं सादर करून तब्बल 13,600 कोटी रुपये कर्जावर उचलले होते. चोकसी आणि मोदी यांचा खरा व्यापार हिरे आणि मौल्यवान खडे विकण्याचा आणि त्याचे दागिने घडवून विकण्याचा. गीतांजली जेम्स या नावाने त्यांनी देशभर आणि देशाबाहेरही शेकडो फ्रँचाईजी उघडल्या. पण, शेवटी कर्ज देणाऱ्या संस्था आणि आपले ग्राहक अशा सगळ्यांनाच त्यांनी कोट्यवधी रुपयांना फसवलं. स्वत: मात्र कारवाई होण्यापूर्वीच फरार झाले.

मेहुल चोकसी तीन दिवसांपूर्वी उत्तर अमेरिकेतील डॉमनिका बेटांवर पोलिसांच्या हाती लागले. देशाच्या सागरी हद्दीत बेकायदा प्रवेश केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. पण, भारताला हवा असलेला गुन्हेगार अशाप्रकारे त्रयस्थ देशात पकडला गेल्यामुळे भारतानेही त्यांचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू केले आहेत.

मागच्या आठवड्याभरातील घटनाक्रम

भारतातून पळून गेल्यावर मेहुल चोकसी अँटिग्वा या कॅरेबियन बेटांवरच्या एका देशाचा नागरिक झाला होता. पण, 23 मे रोजी रात्रीचं जेवण झाल्यानंतर तो अँटिग्वाच्या आपल्या घरी नसल्याचं त्याच्या नोकरांच्या लक्षात आलं.

घरच्या लोकांनी पोलिसांत तशी तक्रार नोंदवली आणि त्यानंतर ज्या गोष्टी समोर येतायत ते नाट्य एखाद्या वेबसीरिजला लाजवेल असं आहे.

अँटिग्वातल्या पोलिसांना चोकसीची कार मिळाली. पण, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यांनी इंटरपोलची येलो नोटीस जी हरवलेल्या माणसाच्या शोधासाठी असते ती जारी केली.

या नोटिशीला उत्तर मिळालं शेजारच्या डॉमनिका बेटांवरच्या पोलिसांकडून….त्यांनी कळवलं की, मेहुल चोकसी अवैध मार्गांनी त्यांच्या हद्दीत प्रवेश करत असताना त्याला पकडण्यात आलं आहे. डॉमनिका पोलिसांनी तिथल्या कस्टडीत असलेला मेहुल चोकसी यांचा फोटोही ट्विटरवर प्रसिद्ध केला.

त्यावर आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन चोकसी समुद्रसफरीवर निघाला होता अशीही एक बातमी काही आंतरराष्ट्रीय मीडियाने छापली होती.

मेहुल चोकसी त्रयस्थ देशांत पोलिसांच्या ताब्यात आहे म्हटल्यावर भारतातही हालचाली सुरू झाल्या त्याला भारतात परत आणण्यासाठी. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संमतीने एक जेटही भारतातून डॉमनिका बेटांवर रवाना करण्यात आलं.

अँटिग्वा देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या जेटचा एक फोटोही प्रसिद्ध केला. पण, सध्या मेहुल चोकसी यांना भारताच्या ताब्यात देण्यावर बरीच कायदेशीर बंधनं आहेत. त्यासाठी कैद्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आणि सध्या डॉमनिका कोर्टाने अशा प्रक्रियेला पूर्ण स्थगिती दिली आहे.

उलट मेहुल चोकसीच्या वकिलांनी चोकसीला फसवून, जबरदस्तीने अँटिग्वामधून डॉमनिकाला आणल्याचा दावा कोर्टात केला आहे.

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, "डॉमनिकामध्ये त्यांना पोलीस कस्टडीत जबर मारहाण झाली आहे. त्यांचा एक डोळा सुजला आहे. आणि चेहरा आणि हातावर चटका दिल्याच्या खुणा आहेत. मेहुल यांनी मला माहिती दिली त्याप्रमाणे, ते अँटिग्वाच्या जॉली हार्बरवर होते. पण, तिथून जबरदस्तीने त्यांना डॉमनिकाला आणण्यात आलं. जबरदस्ती करणारी माणसं भारतीय आणि अँटिग्वाची असावीत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला."

या सगळ्या कोर्ट कचेरीच्या भानगडीत आणि आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पणाचे जटील कायदे बघता खरंच मेहुल चोकसींना भारतात आणता येईल का हे आताच सांगणं कठीण आहे. पण, त्यापूर्वी एक प्रथितयश व्यापारी मेहुल चोकसीचा फरार गुन्हेगार होण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला हे पाहणंही रंजक आहे.

मेहुल चोकसी - एक प्रथितयश पण, घोटाळेबाज उद्योजक

2018 पर्यंत मुंबईच्या सगळ्या पेज थ्री पार्टीमध्ये मेहुल चोकसी आणि त्यांचा भाचा नीरव मोदी आघाडीवर होते. खासकरून हिरे आणि मौल्यवान खड्यांविषयीची सगळी प्रदर्शनं, लिलाव इथं तर त्यांची उपस्थिती एखाद्या सेलिब्रिटीसारखी होती.

गीतांजली जेम्स ही 1960 पासून पिढीजात अस्तित्वात असलेली कंपनी कॉमर्स ग्रॅज्युएट असलेल्या मेहुल चोकसी यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर 1985मध्ये ताब्यात घेतली. एरवी फक्त हिरे पॉलिशिंग आणि कच्चे हिऱ्यांच्या व्यापारात असलेल्या कंपनीला मेहुल यांनी गीतांजली जेम्सच्या नावाने कॉर्पोरेट लूक दिला. दागिने घडवणे आणि त्यांची विक्री करण्याच्या व्यवसायात ते उतरले.

आपला भाचा नीरव मोदीला हाताशी धरून देशभरात आणि देशाबाहेर दुबई, आखाती देशात त्यांनी गीतांजली जेम्सच्या शेकडो शो रूम उघडल्या. गिली, नक्षत्र, अस्मि, संगिनी, निझाम आणि परिणिता हे सगळे ब्रँड आणि 'हीरा है सदा केलिए' ही कॅचलाईन गीतांजलीनेच दिलेली.

त्यांनी हळूहळू आपला ब्रँड इतका मोठा केला की, त्यांचे जास्त किमतीचे दागिनेही लोक विश्वासाने घेत होते.

पण, देशातला हिरे व्यापार हा मूळात असंघटित आहे. म्हणजे त्यावर कुणाचा वचक नाही आणि याचा फायदा घेऊन मेहुल चोकसी यांना मिळकतीचे भलतेच मार्ग दिसायला लागले. आणि इथंच सगळं बिघडलं.

गीतांजली जेम्सची एक उपकंपनी गीतांजली ज्वेलरी रिटेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक संतोष श्रीवास्तव यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "2011 ते 2012 पर्यंत सगळं सुरळीत सुरू असल्याचं भासत होतं. मात्र, हळूहळू मला असं जाणवू लागलं की चोकसी यांना कंपनी मोठी करण्यापेक्षा फंड उभारण्यात जास्त रस आहे. याच दरम्यान बँक आणि फ्रॅन्चायझींमधूनही कंपनीत पैसा येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. कागदोपत्री आमच्याकडे माल होता. पण प्रत्यक्षात फ्रान्चायझींना पाठवण्यासाठी आमच्याकडे माल नव्हता."

पुढचा धोका ओळखून श्रीवास्तव यांनी गीतांजली जेम्सला सोडचिठ्ठी दिली आणि ते बरंच झालं. कारण, 2018मध्ये उघडकीला आला 14,000 कोटी रुपयांचा भारतीय कॉर्पोरेट इतिहासातला सगळ्यांत मोठा घोटाळा…

पीएनबी घोटाळा आणि देशातून फरार

7 जानेवारी 2018च्या मध्यरात्री मेहुल चोकसी आणि त्यांची पत्नी यांनी मुंबईहून अँटिग्वाला जाणारं विमान पकडलं. आपली तब्येत बरी नाही असं कारण त्यांनी दिलं होतं.

भाचा नीरव मोदी पूर्वीच लंडनच्या आपल्या घरी स्थिरावला होता आणि त्यानंतर 15 फेब्रुवारीला पंजाब नॅशनल बँकेनं त्यांच्या मुंबईतल्या एकाच शाखेतून बनावट 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' देऊन जवळ जवळ 13,600 कोटी रुपयांचं बनावट कर्ज उचलल्याची तक्रार मुंबई पोलिसांत केली.

'लेटर ऑफ अंडरटेकिंग' म्हणजे बँक तुम्हाला एक प्रकारचं हमीपत्र देते की, ही व्यक्ती कर्ज देण्यासाठी लायक आहे. या पत्राच्या आधारे तुम्ही भारतीय बँकेच्या परदेशातील शाखेकडून कमी मुदतीचं कर्ज उचलू शकता. अशी करोडो रुपयांची बनावट पत्रं मेहुल यांचे भाचे नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेतून घेतली.

कर्जं त्यांनी बुडवली हे वेगळं सांगायला नको. गीतांजली जेम्सची फ्रँचाईजी उघडण्यासाठी लोकांनी त्यांच्याकडे दिलेले पैसेही त्यांनी बुडवले. पैसे घेऊन त्यांना माल दिलाच नाही, अशा कितीतरी घटना आहेत.

गीतांजली जेम्सची टीव्ही जाहिरात करण्यासाठी काही सिनेस्टारना घेण्यात आलं होतं. त्यांचेही पैसे त्यांना मिळाले नाहीत.

सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेली चार्जशीट असं सांगते की, त्यांच्यावर ग्राहक आणि कर्जदारांना फसवण्यासाठी देशभर संघटित आणि पूर्वनियोजित रॅकेट चालवणारा इसम असल्याचा आरोप केला आहे.

पोलीस केस फेबुवारीत झाली तरी बँकेची अंतर्गत चौकशी आणि कारवाई काही महिने आधीच सुरू झाली असणार. आणि तिथल्या सूत्रांकडून माहिती मिळाल्यावर मेहुल चोकसी, नीरव मोदी आणि कुटुंबीयं आधीच देशातून फरार झाले असणार असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

काही देशांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एक नियम आहे. तुम्ही त्या देशांत ठराविक प्रमाणात डॉलरमध्ये गुंतवणूक केलीत तर तुम्हाला देशाचं नागरिकत्व मिळू शकतं.

अँटिग्वा देशाचं नागरिकत्व मिळवण्यासाठी मेहुल चोकसीने तेच केलं. आणि हे सगळं त्यांनी पळून जाण्यापूर्वी एक वर्षं नोव्हेंबर 2017मध्ये केलं हा योगायोग नसावा.

असा हा मेहुल चोकसी...सध्या डॉमनिका बेटांवर पोलिसांच्या ताब्यात आहे. तर भाचा नीरव मोदी लंडनमध्ये पोलिसांच्या ताब्यात. भारताला हे दोन्ही गुन्हेगार हवे आहेत. पण, आंतरराष्ट्रीय कैद्यांच्या प्रत्यार्पणाच्या केसेस खूप किचकट असतात. आणि त्या महिनोंमहिने चालतात. खासकरून लंडनमध्ये तर कैद्याचं प्रत्यार्पण केल्याच्या घटनाच विरळ आहेत. डॉमनिकानेही सध्या मेहुल यांच्या प्रत्यार्पणाला स्थगिती दिली आहे.

दोघांना भारतात कधी आणता येईल हे अजून स्पष्ट नाही. पण, त्याचवेळी त्यांच्यामुळे फसवणूक झालेले लोक आणि बँक बुडल्यामुळे नुकसान झालेले लाखो खातेदार यांचं नुकसान न भरून निघणारं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)