पीएनबी घोटाळाः मेहुल चोकसीला भारतात पाठवण्यासाठी डोमिनिका तयार

डोमिनिकात ताब्यात घेण्यात आलेले हिरे व्यापारी मेहुल चोकसी यांना भारतात परत पाठवलं जावं, याला अँटिग्वा आणि बारबूडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी सहमती दर्शवली आहे.

मेहुल यांना अँटिग्वा आणि बारबूडाला न पाठवता सरळ भारताच्या स्वाधीन करावं, अशी सूचना गॅस्टन ब्राऊन यांनी डोमिनिकाला दिली आहे.

13 हजार 500 कोटी रूपयांच्या पीएनबी घोटाळ्यातले आरोपी मेहुल रविवारी अँटिग्वा आणि बारबुडाहून फरार झाले होते. तेव्हापासून तिथले पोलीस त्यांना शोधत आहेत.

ब्राऊन यांनी म्हटलं की मेहुल अवैधरितीने डोमिनिकामध्ये गेलेले असू शकतात.

वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन म्हणाले की, "आमचा देश मेहुल चोकसी यांना स्वीकारणार नाही. त्यांनी या बेटावरून जाऊन खूप मोठी चूक केली आहे. डोमिनिकाचं सरकार आणि अधिकारी आम्हाला सहकार्य करत आहेत आणि आम्ही भारत सरकारलाही सांगितलंय की त्यांना भारताकडे स्वाधीन केलं जाईल."

'भारत आणि डोमिनिकाचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात'

मेहुल चोकसी जानेवारी 2018 मध्ये भारत सोडून फरार झाले. पळून जायच्या आधी त्यांनी 2017 सालीच कॅरिबियन देश अँटिग्वा अँड बारबूडाचं नागरिकत्व घेतलं होतं. या देशात गुंतवणूक करण्याच्या योजनेअंतर्गत नागरिकत्व मिळू शकतं.

ब्राऊन म्हणाले की, 'डोमिनिका चोकसीला परत पाठवायला तयार आहे पण आम्ही त्यांना परत घेणार नाही. मी डोमिनिकाचे पंतप्रधान आणि प्रशासनाला आवाहतन केलंय की त्यांना इथे परत पाठवू नका कारण एक नागरिक म्हणून त्यांना कायदेशीर आणि घटनात्मक संरक्षण लाभलेलं आहे."

ते पुढे म्हणाले, "आम्ही विनंती केलीये की त्यांना ताब्यात घेऊन भारतात पाठवण्याची व्यवस्था करावी. मला नाही वाटत त्यांनी डोमिनिकाचं नागरिकत्व घेतलंय. त्यामुळे डोमिनिकाला त्यांचं प्रत्यर्पण करण्यात काही अडचण येणार नाही."

वृत्तसंस्था एएनआयनुसार बुधवारी, 26 मेला रात्री चोकसीच्या वकिलांनी या गोष्टीला दुजोरा दिला की ते डोमिनिकात सापडले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)