You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वास्को द गामा भारतात आला आणि पोर्तुगीजांनी आपल्या देशाचा इतिहास असा बदलला...
- Author, झफर सय्यद,
- Role, बीबीसी ऊर्दू, इस्लामाबाद
शनिवार, 8 जुलै 1497- हा दिवस पोर्तुगालच्या शाही ज्योतिषांनी अतिशय सावधपणे निवडला होता.
राजधानी लिस्बनमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. लोक जत्थ्यांनी समुद्रकिनाऱ्याकडे निघाले होते. किनाऱ्यावर चार नवीन जहाजं दूरच्या सफरीचा आरंभ करण्यासाठी सज्ज होती.
शहरातील सर्व उच्चपदस्थ पाद्रीसुद्धा झळाळत्या पोशाखांमध्ये आशीर्वाद देण्यासाठी तिथे आले होते. ते सामूहिक प्रार्थना म्हणत असताना गर्दीतील लोक त्यांच्या सुरात सूर मिसळत होते.
बादशहा रोम मॅन्युअल यांना स्वतःला या मोहिमेत रस होता. आवश्यक नवीन उपकरणं आणि जमिनीचे व आभाळाचा अंदाज देणारे नकाशे घेऊन वास्को द गामाच्या नेतृत्वाखालील ही चार जहाजं प्रदीर्घ प्रवासाला निघणार होती. त्या काळातील आधुनिक तोफाही या जहाजांवर ठेवण्यात आल्या होत्या.
जहाजाकडे निघालेल्या सुमारे 170 नाविकांनी बिनबाह्यांचे सदरे घातले होते. त्यांच्या हातात पेटलेल्या मेणबत्त्या होत्या आणि सैन्याच्या शिस्तीत ते जहाजाच्या दिशेने संथपणे पावलं टाकत होते.
या दृश्याची झलक पाहता यावी आणि समुद्रावर प्रवासाला निघालेल्या या नाविकांना निरोप द्यावा यासाठी लोक तिथे जमले होते. त्यांच्या डोळ्यांमधून सुखदुःखाच्या संमिश्र भावना व्यक्त करणारे अश्रू वाहत होते. काही वर्षं लांबणाऱ्या या प्रवासासाठी निघालेले बहुतांश नाविक- किंवा कदाचित त्यांच्यापैकी कोणीच- परत येऊ शकणार नाहीत, हे लोकांना कळत होतं.
त्याहून महत्त्वाचं म्हणजे या लोकांना याचीही जाणीव होती की, ही मोहीम यशस्वी झाली तर, युरोपच्या एका कोपऱ्यातला छोटासा पोर्तुगाल देश इतिहासामध्ये एका नवीन प्रकरणाचा आरंभ करणारा ठरेल.
इतिहासाचं नवीन वळण
ही जाणीव खरी ठरली. दहा महिने व बारा दिवसांनी हा जहाजांचा ताफा भारताच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आला, तेव्हा युरोपाची समुद्राविषयीची हुरहूर संपुष्टात आली. पूर्वेकडचं आणि पश्चिमेकडचं जग पहिल्यांदाच समुद्रीमार्गाने एकमेकांशी जोडले गेले, किंबहुना ते एकमेकांना भिडले.
अटलान्टिक महासागर व हिंद महासागर यांना जोडणारा जलमार्ग सापडला आणि जगाच्या इतिहासाला एक नवीन वळण मिळालं.
दुसऱ्या बाजूला कोणा युरोपीय देशाने आशिया व आफ्रिकेत वसाहत स्थापन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता, त्यानंतर डझनावारी देश काही शतकं दयनीय परिस्थितीला सामोरे गेले आणि त्या परिस्थितीला सामोरं जाऊन बाहेर पडल्यावर अजूनही ते कसेबसे सावरत आहेत.
या घटनेने दक्षिण आशियाच्या इतिहासात इतकी उलथापालथ केली की, वास्को द गामाच्या सफरीविना आपल्या आजच्या जगण्याची कल्पनाही करणं शक्य झालं नसतं.
त्या ऐतिहासिक प्रवासामुळे दक्षिण आशियाला- किंबहुना संपूर्ण आशियाला पहिल्यांदाच मका, बटाटा, टोमॅटो, लाल मिरची व तंबाखू इत्यादी पिकांची ओळख झाली. या पिकांविना आजचं जगणं अकल्पनीय आहे.
भारताबाबत विलक्षण रुची
भारतापर्यंत पोचण्याचा पोर्तुगिजांचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. युरोपच्या पश्चिमेकडचा हा छोटासा देश कित्येक वर्षांपासून आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याचा नकाशा तयार करत होता आणि या दरम्यान शेकडो नाविकांना प्राण गमवावे लागले होते.
या मोहिमेत इतकी साधनसामग्री खर्च करणाऱ्या युरोपीय पोर्तुगाल देशाला भारतामध्ये इतकी रुची का होती?
तत्पूर्वी काहीच वर्षांआधी 1453 साली उस्मानी सुलतान दुसऱ्या महमदाने कॉन्स्टॅन्टिनोपल (आजचं इस्तंबूल) काबीज करण्यासाठी युरोपात आकाशपाताळ एक केलं होतं. आता पूर्वेकडून बराचसा व्यापार उस्मानी साम्राज्यातून किंवा इजिप्तमधूनच करणं शक्य होत. या प्रदेशांमधील राजवटी हिंदुस्थान व आशियाच्या दुसऱ्या भागांमधून येणाऱ्या उत्पादनांवर- विशेषतः मसाल्यांवर प्रचंड कर लावत असत.
दुसऱ्या बाजूला युरोपातही आशियासोबत जमीनमार्गे होणाऱ्या व्यापारावर व्हेनिस व जीनिव्हा यांची एकाधिकारशाही प्रस्थापित झालेली होती. यामुळे इतर युरोपीय देश- विशेषतः स्पेन व पोर्तुगाल यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत होतं.
याच कारणामुळे वास्को द गामाची मोहीम सुरू होण्याच्या पाच वर्षं आधी स्पेनमधील ख्रिस्तोफर कोलंबसाच्या नेतृत्वाखाली पश्मिमेकडील मार्गाने भारताचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती.
पण कोलंबसाचं नियोजन व माहिती कमी आहे, त्यामुळे तो कधीच भारतात पोचू शकणार नाही, हे पोर्तुगिजांना माहीत होतं. कोलंबसाने अपघाताने एका नवीन खंडाचा शोध लावला खरा, पण त्याला आयुष्याच्या अखेरपर्यंत तो भारतात पोचलाय असंच वाटत राहिलं होतं.
पोर्तुगिजांना मात्र आधीच्या समुद्री मोहिमांमुळे माहीत होतं की, अटलान्टिक महासागराच्या दक्षिणेकडून प्रवास केला, तर आफ्रिकेच्या टोकाला वळसा घालून हिंद महासागरापर्यंत पोचता येतं आणि असं केल्यावर आशियासोबतच्या व्यापारात इतर युरोपपेक्षा आपल्याला वरचष्मा प्राप्त होईल.
वाटेतील असंख्य अडचणींना सामोरं जात वास्को द गामाने युरोपच्या इतिहासात पहिल्यांदाच आफ्रिकेच्या दक्षिण टोकाकडील समुद्रकिनाऱ्याला स्पर्श करण्यात यश मिळवलं. तिथूनसुद्धा भारत हजारो मैल दूर होता आणि तिथवर पोचायचा मार्ग शोधणं अंधारात सुई शोधण्यासारखं होतं.
सुदैवाने केनियाच्या किनाऱ्यावरील मालिंदी शहरात वास्को द गामाची गाठ एका गुजराती मुसलमान व्यापाऱ्याशी पडली. हा व्यापारी स्वतःच्या तळहातावरील रेषांप्रमाणे हिंद महासागरी प्रदेशाबद्दल माहिती राखून होता.
त्या घटनेला पाच शतकं उलटून गेल्यानंतरही अरबी जहाजं त्याच गुजराती व्यापाऱ्याच्या नकाशानुसार प्रवास करतात. त्याने 'फिरंग्यां'ना हिंद महासागराची वाट दाखवली आणि आशियात हजारो वर्षांपासून प्रस्थापित झालेला व्यापारी समतोल कोलमडून पडला.
त्याच वाटेने 12 हजार मैलांचा प्रवास करत वास्को द गामा 20 मे 1498 रोजी भारतातील कालिकत इथे येऊन पोचला. या प्रवासात त्याला कित्येक डझन सहकारी गमवावे लागले.
त्या काळी भारताबाबत युरोपियांना फारशी माहिती नव्हती, त्यामुळे कालिकतमध्ये राहत असताना वास्को द गामा हिंदूंनाही वाट चुकून इकडे आलेले ख्रिस्तीच मानत होता. पोर्तुगीज नाविक मंदिरांमध्ये जाऊन तिथल्या हिंदू देवींच्या मूर्तींना माता मरियम आणि देवांना येशू मानून प्रार्थना करत असत.
कालिकतध्ये 'समुद्री राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाने आपल्या महालात वास्को द गामाचं जोरदार स्वागत केलं. पाऊस पडत असताना छत्री लावलेल्या पालखीत बसवून वास्को द गामाला बंदरातून दरबारापर्यंत आणण्यात आलं. पण या आनंदावर थोड्याच वेळात विरजण पडलं- तत्कालीन परंपरेनुसार वास्को द गामाने राजासाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या (लाल रंगाची हॅट, पितळेची भांडी, काही किलो साखर व मध), पण या भेटी इतक्या फुटकळ मानल्या गेल्या की पाहुण्यांच्या स्वागतासाठी आलेल्या वझिराने त्या भेटी राजाला दाखवण्यास नकार दिला.
याचा परिणाम असा झाला की स्थानिक अधिकारी वास्को द गामाला एखाद्या श्रीमंत देशातील राजेशाही प्रवाशाऐवजी समुद्री डाकू मानू लागले.
व्यापारी कोठारं उभारण्यासाठी व पोर्तुगीज व्यापाऱ्यांना कर माफ करण्याची वास्को द गामाची विनंती समुद्री राजाने अमान्य केली. शेवटी परिस्थिती इतकी बिघडली की, स्थानिक लोकांना अनेक पोर्तुगिजांवर हल्ला करून त्यांना मारून टाकलं.
वास्को द गामा प्रचंड संतापला. त्याच्या जहाजावरील तोफांच्या तोडीसतोड काहीच अस्त्रं समुद्री राजाकडे नव्हती. त्यामुळे वास्को द गामाने कालिकतवर बॉम्बगोळे टाकून अनेक इमारती आणि शाही महाल उद्ध्वस्त करून टाकला. अखेर समुद्री राजाला देशाच्या आतल्या भागा पळून जावं लागलं.
हे राजकीय अपयश एका बाजूला सहन करावं लागलं असलं, तरी कालिकतमधील तीन महिन्यांच्या वास्तव्यादरम्यान पोर्तुगिजांना अत्यंत स्वस्त दरात अमूल्य मसाले मिळाल्यामुळे त्यांनी जहाजांवर मसाले खच्चून भरून घेतले.
सगळ्या ख्रिस्ती जगासाठी मसाले
वास्को द गामाचा परतीचा प्रवास खूपच कष्टप्रद झाला. अर्धे सहकारी आजारांना बळी पडले, तर एक जहाज वादळाला तोंड देऊ न शकल्याने समुद्रतळाशी गेलं. अखेरीस लिस्बनहून बाहेर पडल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी, 10 जुलै 1499 रोजी 28 हजार किलोमीटरचा प्रवास करून पोर्तुगालची ही जहाजं परत लिस्बनला आली (वास्को द गामा त्याच्या भावाच्या आजारपणामुळे एका बेटावर थांबला होता), तेव्हा त्यांचं प्रचंड मोठं स्वागत करण्यात आलं. परंतु, 170 नाविकांच्या दलातील केवळ 54 जणच जिवंत परत आले.
संपूर्ण युरोपात आपल्या यशाची वार्ता तत्काळ पोचेल, अशी तजवीज राजा दुसरा मॅन्युअल याने केली. स्पेनची महाराणी इसाबेल व राजा फर्डिनांड यांना पत्र लिहून या घडामोडींना धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न केला- "खुदाच्या कृपेने, या प्रदेशातील मुसलमानांना संपन्न करणारा व्यापार आता आमच्या साम्राज्यातील जहाजांकडे असेल आणि हे मसाले सगळ्या ख्रिस्ती जगतापर्यंत पोचतील."
पण हजारो मैलांवर मोठ्या प्रमाणात प्रस्थापित झालेलं व्यापारी जाळं तोडण्याची उमेद पोर्तुगालसारखा छोटा देश कशी काय ठेवून होता?
जुने व्यापारी रस्ते
वास्कोने कालिकतमधील वास्तव्यादरम्यान मुसलमानांकडील किमान पंधराशे जहाजं मोजली होती. पण त्याला एक रोचक गोष्टही लक्षात आली- ही जहाजं बहुतांश वेळा निःशस्त्रं असायची. हिंद महासागरातील व्यापार परस्परांच्या सहकार्याचे नियम पाळत सुरू होता आणि दोन्ही बाजूंचा लाभ होईल अशा रितीने त्यातील महसूल निश्चित केला जात असे.
पोर्तुगाल या नियमांनुसार काम करू इच्छित नव्हता. बळाच्या आधारे आपली मक्तेदारी स्थापन करून सर्व दुसऱ्या घटकांना आपल्या अटी मान्य करायला भाग पाडणं, हा पोर्तुगिजांचा उद्देश होता.
लवकरच पोर्तुगिजांचा हा उद्देश स्पष्ट झाला. वास्को द गामा पोचल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच पेद्रो अल्वारेज काबरालच्या नेतृत्वाखाली दुसरी पोर्तुगीज मोहीम भारताच्या दिशेने रवाना झाली, तेव्हा त्यात 13 जहाजं सामील झाली होती आणि यावेळची तयारी व्यापारी मोहिमेपेक्षाही युद्धमोहिमेसारखी करण्यात आली होती.
शक्य तो फायदा उपटण्याचा प्रयत्न
काबरालला पोर्तुगीज राजाने जी लेखी सूचना केली होती, त्यावरून राजाची महत्त्वाकांक्षा स्पष्ट होते-
"समुद्रात मक्क्यातील मुसलमानांची जहाजं दिसली की सर्वतोपरी प्रयत्न करून ती ताब्यात घ्यायची, त्या जहाजांवरील माल व संबंधित मुसलमानांना स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घ्यावं. त्यांच्याशी लढून शक्य होईल तितकं त्यांचं नुकसान करा."
या सल्ल्याला अनुसरून कालिकतला पोचलेल्या पोर्तुगिजांच्या सशस्त्र जहाजी जत्थ्याने मुसलमान व्यापाऱ्यांच्या जहाजांवर हल्ले केले, तिथल्या मालाची लुटालूट केली आणि जहाजांना त्यावरील प्रवासी व नाविक यांच्यासह आग लावून दिली.
निर्धोकपणे काबराल पुढे येऊन कालिकतवर दोन दिवस बॉम्बफेक करत राहिला. यामध्ये शहरातील अनेक लोकांना घरदार सोडून पळून जावं लागलं. यामुळेच तो कोचीन व कन्नूरमधील बंदरांवर उतरला तेव्हा तिथल्या राजांपर्यंत आधीच त्याच्या आमनाची बातमी पोचली होती, आणि या राजांनी पोर्तुगिजांना त्यांच्या अटींनुसार व्यापारी तळ वसवायला परवानगी दिली.
काबरालची मसाल्यांनी भरलेली जहाजं परत पोर्तुगालला पोचली तेव्हा लिस्बनमध्ये जल्लोष झाला, तितक्याच प्रमाणात व्हेनिसमध्ये दुखवटा व्यक्त झाला.
एका इतिहासकारांनी लिहिल्यानुसार, "व्हेनिससाठी ही वाईट बातमी आहे. व्हेनिसमधील व्यापारी खरोखरच अडचणींना सामोरं जात आहेत."
जहाजांवरील बंदुकींच्या आधारे व्यापार
ही भविष्यवाणी खरी ठरली. 1502 साली व्हेनिसमधील जहाज अलेक्झांड्रियाच्या बंदरावर पोचली, तेव्हा तिथे मसाल्यांची वानवा होती आणि उपलब्ध मसाल्यांच्या किंमती गगनाला भिडलेल्या होत्या.
पुढच्या वेळी वास्को द गामा भारताच्या सफरीवर गेले तेव्हा त्यांचा पवित्रा वेगळा होता. या वेळी त्याने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील शहरांवर विनाकारण अंदाधुंद बॉम्बफेक केली आणि कर वसूल केला. तिथून जाण्यापूर्वी त्याने मुसलमान व्यापाऱ्यांना व्यापार करू न देण्याचं वचनही घेतलं.
जहाजांवरील बंदुकीच्या आधारे मुत्सद्देगिरी- किंबहुना व्यापार करण्याचा हा एक ठळक दाखला होता.
भारताकडे जाण्याच्या प्रवासात वास्को द गामाच्या वाटेत आलेलं प्रत्येक जहाज त्याने बुडवून टाकलं. या वेळी मीरी नावाचं हाजी मंडळींचं एक जहाज त्याच्या हाती लागलं, त्यावरील चारशे प्रवासी कालिकतहून मक्केला निघाले होते.
वास्को द गामाने या प्रवाशांना बांधून जहाजाला आग लावून दिली. प्रत्यक्षदर्शींनी नोंदवल्यानुसार, त्या जहाजावरच्या महिला हातात लहान मुलांना घेऊन दयेची याचना करत होत्या आणि वास्को द गामा त्याच्या जहाजातून हा सगळा गदारोळ बघत होता.
मलबारच्या किनाऱ्यावर आजही मीरी जहाज उद्ध्वस्त झालं त्याची कहाणी ऐकायला मिळते. या संपूर्ण प्रदेशात पोर्तुगालची दहशत बसवणं, असा वास्को द गामाचा स्पष्ट उद्देश होता.
वास्कोचा हा उद्देश पूर्णतः सफल झाला. त्याच्या कारवायांची वार्ता समुद्रीमार्गांनी हिंद महासागरातील दूरदूरच्या ठिकाणांपर्यंत जाऊन पोचली. पोर्तुगिजांच्या उत्तमोत्तम तोफा आणि त्यांचा आक्रमक पवित्रा यांना तोंड देण्यासाठी भारतीय किनापट्टीवरच्या शहरांकडे काहीच नव्हतं. आपल्या व्यापाराच्या चाव्या वास्कोकडे सुपूर्द करण्यावाचून त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.
पाश्चात्त्य वसाहतवाद्यांना इथे स्थायिक होण्यासाठी ही अंदाधुंद आक्रमकता उपयोगी पडली, याचा हा दाखला होता. कोणी दुसऱ्याला समुद्रात प्रवास करण्यापासून थोपवू शकतं, ही बाब स्थानिक राजांसाठी अविश्वसनीय होती.
समुद्री चाचे
वास्को द गामाच्या या कारवाया व्यापारी नसून समुद्री लूटमारीच्या आहेत, अशी प्रतिमा आशियात निर्माण झाली, पण युरोपात या गोष्टी सर्रास घडत असत. पोर्तुगाल दुसऱ्या युरोपीय देशांशी जबरदस्त स्पर्धा करायचा, व्यापारामध्ये सैन्यदलांचं बळ वापरलं जात होतं आणि सैन्याच्या ताकदीमध्ये नवनवीन तंत्रांचा वापरही केला जात होता.
संपूर्ण हिंद महासागरावरील पोर्तुगालच्या एकाधिकारशाहीची ही सुरुवात होती. स्थानिक राजांनी त्यांच्या परीने प्रतिकाराचा प्रयत्न केला, पण त्यांना हार मानावी लागली. यामुळे पुढील दीड शतक पोर्तुगिजांनी कन्नूर, कोचीन, गोवा, मद्रास व कालिकत याव्यतिरिक्त इतर किनारपट्टीवरील प्रदेशांमध्ये ताकदीच्या बळावर राज्य बळकावलं आणि स्वतःचे व्हाइसरॉय व गव्हर्नर आणून बसवले.
इतर युरोपीय देश हा सगळा खेळ अत्यंत कुतूहलाने पाहत होते. कालांतराने नेदरलँड्स, फ्रान्स व अखेरीस इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपात हेच काम केलं आणि पोर्तुगिजांना त्यांच्याच क्लृप्तीने नामोहरम करून भारतावरच नव्हे, तर संपूर्ण हिंद महासागरी प्रदेशावर ताबा मिळवला. फक्त गोवा, दिव-दमण हे प्रदेश दक्षिण आशिया स्वतंत्र होईपर्यंत पोर्तुगिजांकडे राहिले. अखेरीस डिसेंबर 1961 मध्ये भारताने सैन्यदलं पाठवून हे प्रदेशातून पोर्तुगिजांना हुसकावलं.
व्यापारी जाळं
पण त्याआधी जवळपास दीड शतक पोर्तुगीज भारतातून गरम मसाला, आलं, वेलची, लवंग व कपडे, मलायाहून दालचिनी, चीनवरून रेशीम व भांडी युरोपात घेऊन जात होते. युरोपातील दारू, लोकर व इतर उत्पादनं आशियाच्या विविध भागांमध्ये विकत होते. एवढंच नव्हे तर आशिया व आफ्रिकेतील विविध भागांमध्ये व्यापारी व्यवहारांवर त्यांनी कब्जा मिळवला आणि इतर व्यापाऱ्यांकडून प्रचंड महसूल कमावू लागले.
याच दरम्यान अमेरिका खंडाचा शोध लागला होता, तिथे स्पेनसोबतच पोर्तुगीज व इतर युरोपीय देशांनी आपापल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली होती.
पोर्तुगिजांनी याच नवीन जगतामधून मका, बटाटा, तंबाखू, अननस, काजू व लाल मिर्ची आणली आणि भारतात व आशियातील इतर प्रदेशांमध्ये या पदार्थांची ओळख करून दिली. आज बहुतांश लोकांना लाल मिर्ची हा भारतीय आहाराचा निकडीचा भाग वाटतो, पण पोर्तुगीज येण्यापूर्वी तो भारतीय आहारात नव्हता.
लोकांच्या भाषेवरील प्रभाव
परंतु, पोर्तुगिजांचे भारतासोबतचे संबंध केवळ सैनिकी किंवा व्यापारी नव्हते, तर भारतीय संस्कृती व सभ्यतेवरही त्यांचा प्रभाव पडला.
पोर्तुगीज भाषा कित्येक शतकं हिंद महासागरातील बंदरांमध्ये रोजच्या बोलण्याची भाषा होती. डच, फ्रेंच व इंग्रजांनाही भारतात आल्यानंतर सुरुवातीला भारतीयांकडून पोर्तुगीज शिकावी लागली.
सिराजुद्दौलावर मात करणारे लॉर्ड क्लाइव्हदेखील स्थानिक भारतीयांशी पोर्तुगीज भाषेत बोलत असत. पोर्तुगीज भाषेचा प्रभाव स्थानिक भाषांवरही पडला. यामुळेच दक्षिण आशियातील पन्नासहून अधिक भाषांमध्ये पोर्तुगीज शब्द सापडतात.
चावी, पाद्री, गिरजाघर, इंग्रज, इंग्रजी, पिंप, गोदाम, इस्त्री, काज, परात, भत्ता, पगार, अल्फान्सो (आंबा), पपई, मारतोड, तंबाखू, बंब, असे इतर अनेक शब्द विविध भारतीय भाषांमध्ये पसरलेले दिसतात.
मुघलांना समुद्रात रुची नव्हती
बाबराने 1526 साली हिंदुस्थानात मुघल साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा पोर्तुगिजांनी भारतीय किनारपट्टीवर स्वतःचं स्थान बळकट केलं होतं. मुघल मध्य आशियातील कोरड्या प्रदेशांमधून आले होते, त्यामुळे त्यांना समुद्राकडे फिरकरण्यातही रस वाचत नव्हता. त्यांनी समुद्री घडामोडींना अजिबात प्राधान्य दिलं नाही. पोर्तुगिजांनी मुघलांसोबत राजकीय संबंध प्रस्थापित केले आणि ते अकबर, जहांगीर व शाहजहान यांना विविध भेटवस्तू पाठवत राहिले.
विशेषतः युरोपीय चित्रांनी मुघल प्रभावित झाले आणि त्याचा प्रभाव मुघलकालीन कलेवर पडला.
दक्षिण आशियाला पोर्तुगिजांनी दिलेल्या आणखी एका योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही. आपण सगळेच हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळाचं कौतुक करतो. या संगीताच्या प्रसारामध्ये पोर्तुगीज मूळ असलेल्या संगीतकारांचा मोठा वाटा आहे. त्यांनी भारतीय संगीतकारांना अरेन्जमेन्ट व ऑर्केस्ट्रा यांचा वापर शिकवला.
शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन, सी. रामचंद्र, ओ. पी. नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांसारख्या संगीतकारांच्या चित्रपटांमध्ये 'म्यूझिक अरेन्जमेन्ट'च्या श्रेयनामावलीत आपल्याला गोन्साल्वीस, फर्नांडो, डिसूझा, डिसिल्वा यांसारखी अनेक पोर्तुगीज नावं दिसतात. भूतकाळाच्या कहाणीच्या खाणाखुणा या नावांमधून उलगडतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)