मेहुल चोकसी : हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी कोण आहेत?

    • Author, जयदीप वसंत
    • Role, बीबीसी गुजराती

(मेहुल चोकसी यांना डोमिनिका सरकारने ताब्यात घेतल्यानंतर प्रथमच त्यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. मेहुल चोकसी कोण आहेत या विषयावरील त्यांचा लेख पुन्हा शेअर करत आहोत.)

पंजाब नॅशनल बँकेत (PNB) 13 हजार कोटींहून जास्त रकमेच्या घोटाळ्याचे आरोपी मेहुल चोकसी यांना कॅरेबियन बेटावरील डोमिनिका सरकारने ताब्यात घेतलं आहे.

कॅरेबियन बेटावरील अँटिग्वा या देशातून ते बेपत्ता झाले होते. ते अवैधरित्या अँटिग्वामधून डोमिनिकला पळून गेले असावे, असं अँटिग्वाच्या पंतप्रधानांचं म्हणणं आहे..

अँटिग्वा सोडून मेहुल चोकसी यांनी घोडचूक केल्याचं म्हणत अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी आता चोकसीला स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे डोमिनिकाला मेहुल चोकसींना थेट भारताच्या स्वाधीन करावं लागणार आहे. मात्र, त्यांना भारतात आणण्याच्या मार्गात तांत्रिक अडचणी येऊ शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

चोकसीला भारतात आणतीलही, पण त्यांच्याकडून बुडालेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाटत नसल्याचं पीएनबी घोटाळ्यातील पीडितांचं म्हणणं आहे.

मेहुल चोकसी यांचे पुतणे नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांचे बनावट लेटर ऑफ अंडरस्टँडिग (LOU) दिल्याचा आरोप आहे.

नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये आहेत. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी आतापर्यंत अनेकवेळा अर्ज करण्यात आले. मात्र, हे अर्ज आजवर फेटाळण्यात आले आहेत.

चोकसी यांच्या नागरिकत्वावरून संभ्रम

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन म्हणाले होते, "आम्ही मेहुल चोकसीला पुन्हा स्वीकारणार नाही. त्यांनी हा देश सोडून घोडचूक केली आहे. डोमिनिकाचं सरकार आणि अधिकारी आम्हाला सहकार्य करत आहेत. आम्ही भारतालाही सर्व माहिती दिली आहे. त्यांना भारताच्या स्वाधीन केलं जाईल."

"अँटिग्वामध्ये मेहुल चोकसीला नागरिक म्हणून कायदेशीर आणि घटनात्मक संरक्षण लाभलेलं आहे. त्यामुळे त्यांना इथे परत पाठवू नका, असं आवाहनही आम्ही डोमिनिकाच्या प्रशासनाला केलंय. आम्ही विनंती केलीये की त्यांना ताब्यात घेऊन भारतात पाठवण्याची व्यवस्था करावी. त्यांनी डोमिनिकाचं नागरिकत्व घेतलं आहे. त्यामुळे त्यांचं भारताकडे प्रत्यर्पण करण्यात काही अडचण येईल, असं मला वाटत नाही."

मेहुल चोकसी यांचे भारतातील वकील विजय अगरवाल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "संयुक्त राष्ट्रांच्या युनिव्हर्सल डिक्लेरेशननुसार एखादी व्यक्ती जिथून आली असेल तिला तिथेच परत पाठवलं जावं. त्यामुळे त्यांना डोमिनिकाहून भारतात पाठवण्याचा प्रश्नच नाही. कारण माझ्या अशिलाकडे अँटिग्वाचा पासपोर्ट आहे. त्यांनी भारतीय नागरिकत्त्वाचा त्याग केला आहे."

"डोमिनिकाचा कायदादेखील एखादी व्यक्ती जिथून आली आहे तिथेच तिला परत पाठवलं जावं, असं सांगतो. त्यामुळे त्यांना पुन्हा भारतात पाठवण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही माझ्या अशिलाच्या भारतात प्रत्यार्पणाविरोधात स्टे ऑर्डर मिळवला आहे."

अँटिग्वामध्ये गुंतवणूक करून तिथलं नागरिकत्त्व मिळवता येतं. चोकसी यांनी याच योजनेचा लाभ घेत अँटिग्वाचं नागरिकत्त्व मिळवलं होतं. कुठल्याही भारतीयाला इतर कुठल्या देशाचं नागरिकत्व घ्यायचं असेल तर त्याला भारतीय पासपोर्ट परत करावा लागतो. चोकसीने जानेवारी 2019 मध्येच त्यांचा भारतीय पासपोर्ट परत केला होता.

याविषयी बोलताना अँटिग्वाचे पंतप्रधान ब्राऊन यांनी सप्टेंबर 2019 मध्येच भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी आमच्या प्रशासनाला चुकीची माहिती दिल्याचं म्हटलं होतं. खरी माहिती मिळाली असती तर चोकसीला अँटिग्वाचं नागरिकत्व मिळालंच नसतं, असंही ते म्हणाले होते.

भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये चोकसीविरोधीत फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय आर्थिक अफरातफरचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मेहुल चोकसीने फसवणूक कशी केली?

2018 ची जेमतेम सुरुवात झाली होती. त्याचवर्षी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात मेहुल चोकसीने भारतातून पलायन केलं. त्याआधीच 2017 मध्ये त्यांनी अँटिग्वा आणि बारबुडाचं नागरिकत्व मिळवलं होतं.

या प्रकरणातील व्हिसलब्लोअर आणि चोकसी यांच्या गीतांजली ग्रुपची सबसिडरी असणाऱ्या गीतांजली ज्वेलरी रिटेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक संतोष श्रीवास्तव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मी 2007 ते 2013 या दरम्यान जवळपास साडेपाच वर्ष चोकसी यांच्या कंपनीसाठी काम केलं. नवनवीन शोरूम उघडणं, फ्रान्चायझी सुरू करणं, त्यांना माल पोहोचवणं आणि दररोजचं कामकाज बघणं, हे माझं काम होतं. 2011 ते 2012 पर्यंत सगळं सुरळीत सुरू असल्याचं भासत होतं."

"मात्र, हळूहळू मला असं जाणवू लागलं की चोकसी यांना कंपनी मोठी करण्यापेक्षा फंड उभारण्यात जास्त रस आहे. याच दरम्यान बँक आणि फ्रान्चायझींमधूनही कंपनीत पैसा येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. कागदोपत्री आमच्याकडे माल होता. पण प्रत्यक्षात फ्रान्चायझींना पाठवण्यासाठी आमच्याकडे माल नव्हता."

"मी जेव्हा व्यवस्थापनातील वरिष्ठांकडे याविषयी बोलले तेव्हा त्यांनी मलाच शांत करण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केला. मी जेव्हा अधिक खोलात चौकशी केली तेव्हा त्यांनी मला गप्प बसायला सांगितलं आणि जेवढं काम नेमून दिलं आहे त्याव्यतिरिक्त इतर कामात लुडबुड करू नकोस म्हणून तंबीही दिली."

"शेवटी मी 2013 मध्ये राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मी सर्व फ्रान्चायझी मालकांना फोन करून कंपनीबरोबर आर्थिक आणि मालाचा व्यवहार करताना सावध राहण्यास सांगितलं. काही फ्रान्चायझी मालकांनी सिरिअस फ्रॉड इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंटकडे मेहुल चोकसी यांच्या कृती, फसवणूक आणि कर्जाविषयी तक्रारीही केल्या होत्या."

"आम्हीसुद्धा पंतप्रधान कार्यालयाला ई-मेल करून या सर्व प्रकाराची कंपनी रजिस्ट्रारकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याचं पुढे काहीच झालं नाही. PNB ने तक्रार दाखल केल्यानंतर मग आमच्या अर्जाची दखल घेण्यात आली."

श्रीवास्तव यांनी मेहुल चोकसीबरोबर जवळून काम केलं आहे. चोकसी यांच्याविरोधात सिरिअस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस (SFIO), अंमलबजावणी संचलनालय (ED), सीबीआय, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC) अशा वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या. तरीही तब्बल तीन वर्ष त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही, असं सांगत चोकसी फार 'धूर्त', 'हेराफेरी करणारे' आणि 'अनेकांशी लागेबांधे असणारे' होते, असं श्रीवास्तव यांचं म्हणणं आहे.

श्रीवास्तव पुढे म्हणाले, "कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अनेक सेलिब्रेटिंशी करार करण्यात आले होते. मात्र, त्यांना मानधन देण्यात कंपनीने कायम कुचराई केली. 5 ते 10 लाख किंमतीचे दागिने 25 ते 50 लाखांना विकले. अशा मुद्द्यांवरुनही भांडणं व्हायची."

"एक व्हिसलब्लोअर, नागरिक आणि कंपनीचा माजी कर्मचारी या नात्याने मला हे सांगावसं वाटतं की त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांचं करिअर संपवलं. बँकेला फसवून बँकेकडून लुबाडण्यात आलेले हजारो कोटी त्यांच्याकडून परत घेतले पाहिजे. शेवटी हा पैसा या देशातल्या करदात्यांचा आहे."

60 कोटी रुपयांची फसवणूक

गुजरातमधील भावनगर इथल्या दिग्विजय सिंह जडेजा या व्यावसायिकाने मेहुल चोकसीविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. मेहुल चोकशी घोटाळ्यात जडेजा यांचीही 60 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

जडेजा यांच्या म्हणण्यानुसार, "चोकसीचे कर्मचारी माझ्याकडे एक बिझनेस प्रपोजल घेऊन आले. आम्ही जेवढं सोनं त्यांच्याकडे ठेवू त्या मोबदल्यात ते मार्केट दरानुसार 12 टक्क्यांच्या फिक्स्ड रेट देतील, असा तो प्रस्ताव होता."

"आम्ही गुजरातमधल्या भावनगर, जामनगर, वडोदरा, अहमदाबाद आणि भूजमध्ये गीतांजलीचे शोरुम उघडले होते. आमच्याकडे असलेल्या स्टॉकच्या तुलनेत आम्हाला फक्त 30 टक्के माल देण्यात आला. याविषयी आम्ही सातत्याने चर्चा करत होतो. पण त्यावर समाधान होऊ शकेल, असा तोडगा निघालाच नाही. अखेर आम्ही ऑगस्ट 2014 मध्ये करार रद्द केला."

"आम्ही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आणि मेहुल चोकसीने देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, असा अर्ज गुजरात उच्च न्यायालयात दाखल केला."

"त्यानंतर आम्ही गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल केली. न्यायालयाने ती मान्य केली. आमची याचिका दाखल करून घेतल्यानंतर काही दिवसातच चोकसीने देशातून पलायन केलं."

चोकसीने आपल्या कायदेविषयक सल्लागारांच्या मदतीने बँका आणि या देशातील नागरिकांची फसवणूक केल्याचं जडेजा यांचं म्हणणं आहे. मेहुल चोकसी फार धूर्त असल्याने आमचे किंवा सरकारचे बुडालेले पैसे परत मिळतील, अशी आशा वाटत नसल्याचं जडेजा यांचं म्हणणं आहे.

शिवाय, चोकसीला भारतात परत आणता येईल का, याबद्दल ते साशंक आहेत. प्रत्यार्पण टाळण्यासाठीच मेहुल चोकसीने अँटिग्वामधून डोमिनिकामध्ये पलायन केलं असावं, असं त्यांना वाटतं.

गुजरात पोलीस आणि इतर तपास यंत्रणांनी वेळीच पावलं उचलली असती तर चोकसीला देश सोडून जाताच आलं नसतं, असंही जडेजा यांचं म्हणणं आहे.

बंगळुरूच्या गीतांजली फ्रान्चायझीचे एस. के. हरी प्रसाद सांगतात, "मी 2012 साली गीतांजली गोल्ड अँड डायमंड ज्वेलरीची फ्रान्चायझी घेतली होती. कंपनीने फिक्स्ड कॉम्पेनसेशन देण्याचं कबूल केलं होतं. कंपनी आम्हाला सोनं आणि हिरे पुरवठा करणार होती."

"त्यांचे दागिने फार महागडे होते. मूळ किंमतींपेक्षा पाचपट महाग. हा मुद्दा आम्ही कंपनीशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आम्ही बंगळुरू न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर न्यायालयाने चोकसीचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश दिले."

मेहुल चोकसी यापुढे कधीही भारतात परतणार नाही आणि परत आलेच तर ते फ्रान्चायझी मालकांचे पैसे परत करणार नाही, असं हरी प्रसाद यांना वाटतं. चोकसी यांनी हा सर्व पैसा परेदशातील टॅक्स हेवनमध्ये ठेवला असावा, असं हरीप्रसाद यांचं म्हणणं आहे.

फसवणुकीची आणखी एक कहाणी

दिल्लीत राहणारे वैभव खुरानिया यांनीही गीतांजली ज्वेलर्सची फ्रान्चायझी घेतली आणि राजौरी गार्डन भागात नवीन शोरुम उघडलं. मात्र यात त्यांचीही दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली. ते सांगतात, "आम्ही 2013 साली गीतांजली ज्वेलर्सची फ्रान्चायझी घेतली. वृत्तपत्रामध्ये दिलेल्या एका जाहिरातीवरून मी आणि माझ्या भागीदाराने त्यांच्याशी संपर्क केला. कंपनीचा प्रतिनिधी आला आणि आम्ही करार केला. आम्ही विहित नुकसान भरपाई आणि कायदेशीर करारानुसार कंपनीसोबत व्यवसाय सुरू केला."

"करारानुसार आम्ही गुंतवणूक करणार होतो आणि इतर सर्व खर्च कंपनी करणार होती. शोरुममध्ये लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्थाही कंपनीच बघणार होती. शोरुमचं भाडं आणि इतर खर्चही कंपनीच करणार होती. आम्ही ऑक्टोबर 2013 मध्ये शोरुम सुरू केलं. मात्र, कंपनीकडून जो माल यायचा तो निकृष्ट दर्जाचा होता. तो जुना होता आणि महागही."

"आम्ही गीतांजलीच्या दिल्लीच्या ऑफिसला गेलो तेव्हा त्यांनी 30 लाख रुपयांचा माल बदलून दिला. त्यावेळी कंपनीचा एक कर्मचारी मुंबईला जात होता. त्यामुळे त्याच्या हातून आम्ही 40 लाख रुपयांचा माल परत पाठवला. या जुन्या मालाच्या मोबदल्यात नवीन माल देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं."

"मात्र, आम्ही वारंवार चौकशी करूनही आमचा माल आम्हाला परत मिळाल नाही. शेवटी त्यांनी आम्हालाच मुंबईला जाऊन माल घेऊन यायला सांगितलं. जेव्हा माझा भागीदार मुंबईला गेला तेव्हा त्यांच्याकडे मालच नव्हता. आम्हाला द्यायला कंपनीकडे मालच नव्हता. हाँगकाँग, दुबई आणि युरोपातून माल येणार असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र, तो माल तिथून कधी आलाच नाही."

"कंपनीचे सीईओ, व्यवस्थापकीय मंडळातले इतर सदस्य आणि कर्मचारी या साऱ्यांनी चोकसीभोवती एक कडं उभं केलं होतं. ते आम्हाला चोकसीला भेटू देत नव्हते."

इतरांप्रमाणेच वैभव यांनाही त्यांचे पैसे परत मिळतील, याची शाश्वती वाटत नाही. मेहुल चोकसीला भारतात आणणं शक्य नसल्याचं त्यांनाही वाटतं आणि आणलंच तर त्यांना शिक्षा होईल पण बुडालेले पैसे परत मिळणार नाही, असं ते सांगतात.

सप्टेंबर 2018 मध्ये चोकसीने एक व्हीडिओ प्रसारित करत आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप 'खोटे' आणि 'निराधार' असल्याचं सांगितलं. आपली मालमत्ताही बेकायदेशीरपणे जप्त करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

सूरतमधल्या एका हिरे व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "चोकसी अत्यंत चाणाक्ष आणि हुशार आहे. त्यांचं नेटवर्क खूप मोठं आहे. त्यांच्याकडे खूप बिझनेस आयडियाज आहेत. वेगवेगळी प्रदर्शनं किंवा कार्यक्रमांमध्ये ते ओळखीतल्या लोकांशी या आयडियाजवर बोलायचे."

"त्यांचं वक्तृत्त्व आणि आत्मविश्वास इतका दांडगा असायचा की शंकेला स्थानच नसायचं. सुरुवातीला तुम्हाला जशी अपेक्षा असते तसंच त्यांचं वागणं असतं. पुढे हळूहळू ते आपला रंग दाखवायला सुरुवात करतात. 2011 साली जोधपूरमध्ये त्यांच्या मुलीचा लग्न सोहळा पार पडला. सिनेसृष्टीतील अनेक तारे-तारकांनी या लग्नात परफॉर्म केलं होतं."

सूरतमधल्या या व्यापाऱ्यालाही मेहुल चोकसीच्या कंपनीत गुंतवणूक करायची होती. पण, त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने त्यांनी गुंतवणूक केली नाही आणि आज ते एका मोठ्या फसवणुकीतून बचावलेत.

नियमांची पायमल्ली

सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, "चोकसी यांनी अनेक सरकारी बँकेत घोटाळे केलेत. हे घोटाळे प्रामुख्याने लेटर ऑफ अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून करण्यात आलेत."

"बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरल्याशिवाय, असे घोटाळे होऊ शकत नाही. बॅलेंस शीटवरील स्टॉकची खातरजमा करावी लागते. ही प्रक्रिया योग्यरीतीने पार पडली असती तर हा बुडबुडा खूप आधीच फुटला असता."

"याशिवाय मेहुल चोकसीने लेटर ऑफ अंडरस्टँडिंगच्याच माध्यमातून अनेक सरकारी आणि खाजगी कंपन्यांकडूनही कर्ज उचललं. या लेटर्ससाठी त्यांनी बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि सर्व पैसा त्यातच फिरवला. बँक अधिकाऱ्यांनी थोडं बारकाईने लक्ष दिलं असतं तर बनावट लेटरमधूनच हा घोटाळा उघड झाला असता."

"महत्त्वाच्या पदावरच्या कर्मचाऱ्यांची नियमित बदली करावी, असा नियम असतो. मात्र, मेहुल चोकसीच्या प्रकरणात या नियमाचीही पायमल्ली करण्यात आली. गीतांजलीच्या शेअरची किंमत कृत्रिमरित्या वाढवण्यात आली. त्यानंतर हे शेअर्स तारण ठेवून बँकांकडून कर्ज उचलण्यात आलं."

मेहुल चोकसीची मालमत्ता जप्त करण्यात आली असली तरी घोटाळ्याच्या तुलनेत तिची किंमत खूप कमी आहे, असं या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.

'ज्यांनी करदात्यांचे पैसे लुबाडून देशातून पळ काढला, त्यांना शिक्षा नक्की होईल आणि त्यांच्याकडून प्रत्येक रुपया वसूल केला जाईल,' असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी दिलं आहे. मात्र, हे कधी आणि कसं होणार, हा प्रश्न उरतोच.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)