4 वर्षांत सार्वजनिक बँकांमध्ये 22,743 कोटींचे घोटाळे

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी

दोनच दिवसांपूर्वी पंजाब नॅशनल बँक या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत 11,400 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला. पण गेल्या चार वर्षांत देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाचे घोटाळ्यांमुळे 22 हजार 743 रुपयांचे नुकसान झालं आहे.

नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्यांनी आपली परदेशी कर्जं फेडण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेला चुना लावल्याने देशाचं आर्थिक वातावरण ढवळून निघालं आहे.

त्याचवेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिलेलं विवेचन आणखीच धक्कादायक आहे.

त्यांनी सदनाला दिलेल्या माहितीनुसार, मागच्या चार वर्षांत म्हणजेच 2012पासून ते 2016 या कालावधीत घोटाळ्यांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं 22 हजार 743 रुपयांचं नुकसान झालं आहे.

बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेनं देशातल्या बँक घोटाळ्यांचा एक विस्तृत अहवाल तयार केला आहे.

2017मध्ये पहिल्या 9 महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियात 429, आयसीआयसीआय बँकेत 455 तर एचडीएफसी बँकेत 244 प्रकरणं उघड झाली. हे सगळे घोटाळे एक लाखांपेक्षा जास्त रकमेचे होते.

या घोटाळ्यांमध्ये मुख्य सहभाग बँकेच्या कर्मचाऱ्यांचा असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

स्टेट बँकेतून 60, एचडीएफसीमधून 49 तर एक्सिस बँकेतून 35 जणांना घोटाळ्यांच्या आरोपांवरुन नारळ देण्यात आला आहे.

आता नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेतही20 कर्मचारी निलंबित झाले आहेत.

एक नजर टाकूया देशातल्या लक्षात राहिलेल्या 5 महत्त्वाच्या बॅंक घोटाळ्यांवर...

2011 - सीबीआयने केलेल्या तपासात 1500 कोटींचा कर्ज घोटाळा उघड झाला. महाराष्ट्र बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि आयडीबीआयमधल्या अधिकाऱ्यांनी मिळून 10 हजारच्या वर बनावट खाती उघडली. या खात्यांना 1500 कोटी रुपयांची कर्जं वितरित केली. हा खटला अजून सुरू आहे.

2014 - 3 वर्षांनंतर मुंबई पोलिसांनी फिक्स्ड डिपॉझिट किंवा मुदत ठेवींचा घोटाळा उघडकीला आणला. 700 कोटी रुपयांचा चुना त्यात बँकेला बसला. तर कोलकात्यातला एक उद्योजक बिपिन व्होरा याने सेंट्रल बँकेला फसवून 1400 कोटी रुपयाचं कर्ज उचललं होतं.

याच वर्षी सिंडिकेट बँकेचे एस के जैन याला पकडण्यात आलं होतं. त्यांच्यावर 8000 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे.

याच वर्षी मद्यसम्राट विजय माल्या याने युनियन बँकेचं कर्ज भरता येणार नाही असं सांगून टाकलं होतं. बँकेनं त्याला कर्जबुडवा जाहीर केलं.

2015 - हे वर्ष परकीय चलन घोटाळ्यामुळे गाजलं. काही बँकांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन 6000 कोटी रुपये अवैधरित्या हाँगकाँगमध्ये पाठवले.

2016 - सिंडिकेट बँकेत 4 जणांनी 380 बनावट खाती उघडली. खोटे चेक, सह्या, आयुर्विमा पावत्या यांच्या साहाय्याने त्यांनी बँकेला 1000 कोटी रुपयांना चुना लावला.

2017 - हे वर्षंच घोटाळ्यांचं म्हणावं लागेल. सुरुवातीला मद्यसम्राट विजय माल्याच्या 9500 कोटी थकलेल्या कर्जासाठी आयडीबीआय बँकेनं गुन्हा दाखल केला. पण, त्यापूर्वीच विजय माल्या लंडनला पळून गेला होता.

त्यानंतर काही महिन्यातच 7000 कोटी रुपयांचा विनसम डायमंड्स कंपनीचा घोटाळा समोर आला. जतीन मेहता या व्यक्तीने विनसम डायमंड्स नावाची कंपनी सुरू केली. कंपनीसाठी भारतीय बँकांकडून लेटर ऑफ अंडरटेकिंग घेऊन कर्ज उचललं. पण 2014पासून या कर्जाची परतफेड झालीच नाही.

आताच्या नीरव मोदी याने केलेल्या फसवणुकीसारखाच हा घोटाळा आहे.

गेल्यावर्षी कोलकात्यातला एक उद्योजक नीलेश पारेख याला मुंबई पोलिसांनी विमानतळावर अटक केली. त्यांच्यावर 20 बँकांना 2223 कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप आहे. भारतीय बँकांकडून कर्ज घेऊन हे पैसे त्यांनी परस्पर भारताबाहेरच्या शेल कंपन्यांमध्ये गुंतवले, असल्याचा संशय आहे.

2017मध्ये महाराष्ट्र बँकेच्या एका अधिकाऱ्याला 836 कोटी रुपयांचं कर्ज सुरतच्या व्यापाऱ्याला अवैधरित्या दिल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)