नीरव मोदीः लंडनमधील न्यायालयानं तिसऱ्यांदा फेटाळला जामीन अर्ज

लंडनच्या वेस्टमिंस्टर कोर्टाने पुन्हा एकदा भारतातले हिऱ्याचे व्यापारी नीरव मोदी यांचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला आहे.

भारत सरकारच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांचं म्हणणं होतं, की जर नीरव मोदींचा जामीन मंजूर झाला तर ते साक्षी-पुरावे फिरवू शकतात. नीरव मोदींच्या वकील क्लेअर मोंटोगमरी यांनी जामीन म्हणून 20 लाख पाऊंड भरण्याची तयारी दाखवली होती.

याच वर्षी मार्च महिन्यात मोदींना अटक झाली होती. त्यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेत जवळजवळ 13,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

भारत सरकारने ऑगस्ट महिन्यात ब्रिटनकडे नीरव मोदींच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.

पंजाब नॅशनल बँकेतला घोटाळा भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा समजला जातो.

कसा झाला होता घोटाळा?

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत 11,360 कोटी रुपयांचा हा घोटाळा होता, जो 3 जानेवारी 2018ला प्रथम लक्षात आला होता. भारतातील सार्वजनिक बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे काही कर्मचारी आणि आरोपी खातेधारक यांची हातमिळवणी असल्याची कबुली बँकेने दिली होती, मात्र या प्रकरणात अडकलेल्यांची नावं बँकेने जाहीर केलेली नाहीत.

2011 ते 2018 अशी सात वर्षं या घोटाळ्यादरम्यान कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले.

PNB घोटाळ्यात 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'चा (LOU) गैरवापर मूलभूत आहे. भारतात कार्यरत असणारे उद्योजक देशाबाहेरून वस्तूंची आयात करतात, तेव्हा त्यांच्या बदल्यात देशाबाहेर असलेल्या व्यक्ती किंवा संस्थेला पैसे द्यावे लागतात. जर आयातकर्त्याकडे पैसे नसतील किंवा क्रेडिट कालावधी किंवा उसन्या वेळेचा त्याला फायदा घ्यायचा असेल तर बँक आयातकर्त्या माणसाला विदेशातील एका बँकेला LOU देतं.

PNBकडून विदेशातील बँकेला LOU देण्यात आलं असेल तर निर्यातकर्त्या व्यक्तीला आयातकर्ती व्यक्तीकडून जेवढी रक्कम मिळणे आहे, तेवढी रक्कम विदेशी बँकेकडून देण्यात येते, तीसुद्धा PNBने दिलेल्या हमीनुसार.

एका वर्षानंतर आयातकर्ता PNB कडे पैसे जमा करतो. यानंतर PNB कडून विदेशी बँकेला व्याजासकट पैसे परत करण्यात येतील, असं या LOUचं काम चालतं.

पण इथेच एका त्रुटीचा फायदा नीरव मोदी आणि त्यांच्या साथीदारांनी घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)