काँग्रेसचं 'न्यायपत्र' आणि भाजपचं 'संकल्पपत्र', जाहीरनाम्यातून कुठली आश्वासनं?

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या भारतातील दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केलेत.
भाजपनं या जाहीरनाम्याला 'भाजपाचा संकल्प, मोदींची गॅरंटी' असं नाव दिलं आहे, तर काँग्रेसनं 'न्यायपत्र' असं जाहीरनाम्याला म्हटलंय.
भारतात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. काही दिवसांवर पहिल्या टप्प्यातील मतदानही येऊन ठेपलं आहे. भारतात एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी संहित आणि वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणीचं आश्वासन दिलंय. त्यामुळे या जाहीरनाम्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, तर दुसरीकडे काँग्रेसनं एससी, एसटी आणि ओबीसींसाठी 50 टक्के आरक्षणाची निश्चित मर्यादा वाढवण्याचं आश्वासन देत, त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती दुरुस्ती करण्याचं देखील आश्वासन दिलंय.
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, देशात अनेक राज्यांमध्ये नव वर्षासारखा उत्साह पाहायला मिळतो आहे. आम्ही संकल्प पत्रात देशाला डोळ्यासमोर ठेवलं आहे. लोकांनी भाजपाचं संकल्प पत्र बनवण्यासाठी देशभरातून सूचना पाठवल्या आहेत.
भाजपच्या 'संकल्प पत्रात' काय आहे?
संपूर्ण देश भाजपाच्या घोषणापत्राची वाट पाहत होता, भाजपाने प्रत्येक गॅरंटीची पूर्तता केली आहे, हे यामागचं मोठं कारण आहे, असं नरेंद्र मोदी जाहीरनामा प्रसिद्ध करताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "हे संकल्प पत्र, युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार वर्गांना सबल करतं. यात आम्ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा मुद्दा मांडला आहे. तरुण भारताच्या तरुण अपेक्षांचं प्रतिबिंब भाजपाच्या घोषणापत्रात उमटलं आहे."

फोटो स्रोत, BJP
पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले, "25 कोटी लोकांना दारिद्रयातून बाहेर काढून आम्ही हे सिद्ध केलं आहे की आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो. बदल घडवण्यासाठी आम्ही काम करतो.''
युनिफॉर्म सिव्हिल कोड (यूसीसी) चा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजप या मुद्द्याला खूप महत्त्वाचा मानते.
भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे :
- पुढील पाच वर्षांपर्यत मोफत रेशन, पानी, गॅस कनेक्शन, पीएम सूर्य घर योजनेद्वारे झिरो वीज बिलाची व्यवस्था
- आयुष्मान भारत योजनेद्वारे पाच लाखापर्यंत मोफत उपचार होत आहेत. यापुढेदेखील ही योजना सुरू राहील.
- मोदींची गॅरंटी आहे, जन औषधी केंद्रावर औषधांवर 80 टक्के सूट मिळत राहिल.
- गरीबांना चार कोटी पक्की घरे बनवून दिली आहेत. आणखी तीन कोटी पक्की घरे बनवली जाणार आहेत.
- पेपर लीक होण्यावर महत्त्वाचा कायदा बनला आहे, त्याची अंमलबजावणी होईल.
- मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांचे कर्ज मिळेल.
- नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ची अंमलबजावणी होईल.
- 2036 च्या ऑलिंपिकचे आयोजन करण्यात येईल.
- दिव्यांगांना पीएम आवाज योजनेमध्ये प्राधान्य मिळेल.
- तरुणांसाठी पायाभूत सुविधा, मॅन्युफॅक्चरिंग, स्टार्टअप, खेळ, गुंतवणूक, उच्च मूल्याधारित सेवा आणि पर्यटनाच्या माध्यमातून लाखो रोजगार निर्माण करणार.

फोटो स्रोत, BJP
- एक कोटी बहिणी, लखपती दीदी बनल्या आहेत, आणखी तीन कोटींना लखपती दीदी बनवले जाईल.
- नारी वंदन अधिनियम लागू करणार.
- बियाणांपासून बाजारपेठेपर्यत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. श्रीअन्न सुपरफूड म्हणून स्थापित करणार, नेनो युरिया आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जमिनीचे संरक्षण करणार.
- मासेमारांच्या आयुष्याशी निगडीत, बोटीचा विमा, फिश प्रोसेसिंग युनिट, सॅटेलाईटद्वारे वेळेवर माहिती यासारख्या प्रत्येक गोष्टीला भक्कम करणार.
- मासेपालन करणाऱ्यांना सी-वीड आणि मोतीची शेती करणाऱ्यांनादेखील प्रोत्साहन देणार.
- गिग वर्कर्स, टॅक्सी ड्रायव्हर, ऑटो ड्रायव्हर, घरांमध्ये काम करणारे मजूर, स्थलांतरित मजूर, ट्रक ड्रायव्हर, कुली, सर्वांना ई-श्रम शी जोडणार आणि कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचवणार.
- तिरुवल्लुवर कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभरात पोचवणार.
- भारतातील शास्त्रीय भाषांच्या अभ्यासासाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यवस्था करणार.
- 2025 ला जनजातीय गौरव वर्गाच्या रुपात घोषीत करणार.
- एकलव्य स्कूल, पीएम जनमन वन उत्पादनांमध्ये मूल्य वर्धन करणार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणार.
- ओबीसी, एससी आणि एसटी समाजाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सन्मान देणार.
- ट्रान्सजेंडर्सना आयुष्मान योजनेचा लाभ मिळणार.
कॉंग्रेसच्या 'न्याय पत्रात' काय आहे?
भाजपच्या आधीच म्हणजे 5 एप्रिलला काँग्रेसनं न्यायपत्र नावानं जाहीरनामा प्रसिद्ध केला.
काँग्रेसनं जाहीरनाम्यात बरीच मोठी आश्वासनं दिली असली तरी सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती, या एससी, एसटी आणि ओबीसींसाठी 50 टक्के आरक्षणाची निश्चित मर्यादा वाढवण्याबद्दल सांगण्यात आलंय याची. ही मर्यादा वाढवण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचंही आश्वासन काँग्रेसनं दिलंय.
कॉंग्रेसचं सरकार आल्यावर किमान आधार मूल्य देण्यासाठी कायदेशीर गॅरंटी देण्याचं देखील आश्वासन देण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, ANI
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे :
- केंद्र सरकारमध्ये ज्या 30 लाख नोकऱ्या आहेत, ती पदं भरली जाणार.
- राजस्थानच्या चिरंजीवी योजने प्रमाणे संपूर्ण देशात 25 लाख रुपयांचा आरोग्यविमा दिला जाणार.
- सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना देशभरात केली जाणार.
- डिप्लोमा धारकांना किंवा 25 वर्षापेक्षा कमी वयात पदवी मिळवलेल्या तरुणांना एक वर्षाची अप्रेंटिसशीप उपलब्ध करून दिली जाणार.
- पेपर लीक होण्याच्या प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालये सुरू केली जाणार आणि पीडितांना आर्थिक स्वरुपात नुकसान भरपाई दिली जाणार.
- स्टार्टअपसाठी भांडवल उपलब्ध करून दिले जाणार, जेणेकरून 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येणार.
- डिजिटल लर्निंगचं महत्त्व लक्षात घेऊन 9वी पासून ते 12 वाी पर्यतच्या विद्यार्थ्यांना फोन उपलब्ध करून दिला जाणार.
- 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या उदयोन्मुख खेळाडूंना 10 हजार रुपये प्रति महिना देण्याची योजना सुरू करणार.
- महालक्ष्मी योजना सुरू करून गरीब कुटुंबाना विनाअट दरवर्षी एक लाख रुपये दिले जाणार. ही रक्कम घरातील महिलेला दिली जाणार.
- 2025 पासून महिलांसाठी केंद्र सरकारमधील निम्म्या नोकऱ्या आरक्षित केल्या जाणार.
- फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी, जसे आशा, अंगणवाडी, मिड-डे मील स्वयंपाकघर यांच्या वेतनासाठीचे केंद्र सरकारचे अनुदान दुप्पट केलं जाणार.
- मनरेगा अंतर्गत मजूरी वाढवून 400 रुपये प्रति दिन केली जाणार.

फोटो स्रोत, Getty Images
- प्रतिदिन 400 रुपये किमान राष्ट्रीय वेतनाची गॅरंटी देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे.
- घोषणापत्रात आश्वासन देण्यात आले आहे की कॉंग्रेस पक्ष, भोजन, पोशाख, प्रेम, विवाह आणि भारताच्या कोणत्याही भागात प्रवास किंवा निवासाच्या वैयक्तिक आवडीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. हस्तक्षेप करणाऱ्या कायद्यांना रद्दबातल केले जाणार.
- सभागृहात सत्र सुरू असताना आठवड्यातून एक दिवस विरोधी पक्षांनी सुचवलेल्या अजेंड्यावर चर्चा केली जाणार.
- मतदान ईव्हीएम द्वारे होणार मात्र मशीनमधून निघालेली मतदानाची रिसीट मतदारांना व्हीव्हीपॅट मध्ये ठेवता आणि जमा करता येणार.
- इलेक्टोरल बाँड गैरव्यवहार, सार्वजनिक संपत्तीची अंदाधुंद विक्री, पीएम केअर्स गैरव्यवहार, उच्च पातळीवर वारंवार गुप्तचरांच्या अपयशाची चौकशी केली जाणार.
- प्रसारमाध्यमांना संविधानानुसार असणारे स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत केली जाणार
- सेन्सरशीप लावणाऱ्या कायद्यांना रद्द केले जाणार.
- उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील रिक्त जागा तीन वर्षांच्या आत भरल्या जाणार.
- अग्निपथ योजना बंद केली जाणार आणि जुनी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार.
- वन रॅंक, वन पेंशन संदर्भात यूपीए सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार.
- सत्तेत आल्यावर जम्मू आणि काश्मीरला तात्काळ राज्याचा दर्जा दिला जाणार.
- पुदुचेरीला (पॉंडेचेरी) पूर्ण राज्याचा दर्जा देणार.
- दिल्ली सरकार अधिनियम 1991 मध्ये सुधारणा करून उपराज्यपालांच्या सेवांसह सर्व प्रकरणांमध्ये एनसीटी, दिल्लीच्या मंत्रिमंडळाच्या मार्गदर्शनाखाली काम होणार.












