चांगले पैसे कमावणे, उपचार करुन घेण्याच्या स्वप्नांचा मृत्यूदंडाने शेवट; शहजादीसोबत UAE मध्ये काय घडलं?

- Author, सय्यद मोझीज इमाम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"माझ्या मुलीचा 13 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता फोन आला होता. सुरुवातीला ती रडतच होती. नंतर तिने तिला वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आल्याचं सांगितलं. आता मी काही वाचणार नाही. हा माझा शेवटचा कॉल असू शकतो, असं ती म्हणाली."
शहजादीचे वडील शब्बीर अहमद हे सांगताना रडत होते. ते सतत आपली मुलगी निर्दोष होती, हे सांगत होते.
परराष्ट्र मंत्रालयानं शहजादी यांना 15 फेब्रुवारी रोजी तिला मृत्यूदंड देण्यात आल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाला कळवलं आहे.
शहजादी यांच्यावर 5 मार्च रोजी अबुधाबी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शहजादीला मृत्यूदंड देण्यात आल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं.


शहजादीला फाशी का देण्यात आली?
शहजादी यांच्या वतीने कोर्टात हजर असलेले वकील माझ मलिक यांनीही सांगितलं की, परराष्ट्र मंत्रालयाने फाशीची शिक्षा दिल्याची न्यायालयात खात्री केली आहे.
33 वर्षीय शहजादी यांना 10 फेब्रुवारी 2023 मध्ये अबूधाबी पोलिसांकडे सोपवण्यात आलं होतं. 31 जुलै 2023 त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
शहजादी या डिसेंबर 2021 मध्ये अबूधाबीला गेल्या होत्या. ऑगस्ट 2022 पासून त्या तिथे एका कुटुंबात मदतनीस म्हणून काम करत होत्या. त्यांच्यावर चार महिन्याच्या बाळाची देखभाल करण्याची जबाबदारी होती. त्याच बाळाची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
चुकीच्या लसीकरणामुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचं शहजादीच्या नातेवाईकांनी सांगितलं. त्यामुळंच या प्रकरणात यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
मात्र तब्बल दोन महिन्यांनंतर बाळाच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने त्यांची मुलगी अडकली, असं ते म्हणतात.

शहजादी यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी 15 डिसेंबर 2021 रोजी अबूधाबीला गेली होती. सात डिसेंबर 2022 रोजी ज्या बाळाची ती देखभाल करत होती, त्याचा मृत्यू झाला. मग 10 फेब्रुवारी 2023 रोजी मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जेव्हा शहजादी तुरुंगात होती, तेव्हा बीबीसीनं मृत बाळाचे वडील फैज अहमद यांच्याशी याबाबत संपर्क साधला होता.
मृत बाळाच्या वडिलांनी उत्तरादाखल म्हटलं की, "शहजादीने माझ्या मुलाची निर्घृणपणे आणि जाणूनबुजून हत्या केली आहे. यूएई अधिकाऱ्यांच्या तपासात हे सिद्ध झालं आहे. एक पालक म्हणून आमच्या वेदना समजून घ्या, अशी विनंती मी माध्यमांना करतो."
तर दुसरीकडे शहजादी यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला फसवण्यात आल्याचा आरोप करत आहेत.
शब्बीर हे मुलाच्या कुटुंबीयांना भेटण्यास आग्रा येथेही गेले होते. परंतु, ते लोक काहीच ऐकायला तयार नाहीत.
शब्बीर म्हणाले की, "मी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दिल्लीलाही गेलो होते. पण मला कोणत्याच प्रकारचं उत्तर दिलं गेलं नाही."
सोशल मीडियापासून सुरू झालेला प्रवास...
शहजादी या नोकरी आणि चांगल्या उपचाराच्या आशेनं संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबूधाबीला गेल्या होत्या. त्या उत्तर प्रदेशमधील बांदा येथील गोयरा मोगली गावच्या रहिवासी होत्या.
शहजादी यांचं गाव गोयरा मोगली बांदा शहरापासून सुमारे दहा किलोमीटर लांब होतं. घरी वडील शब्बीर आणि आई नाजरा असतात.
सोशल मीडियावरील मैत्रीमुळे शहजादी यांना अबूधाबीला जाण्याची संधी मिळाली.
ती एक मनमिळाऊ मुलगी होती, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तिला लोकांमध्ये मिसळणं आवडायचं. शहजादीच्या आईनं सांगितलं की, लहानपणी तिचा चेहरा भाजला होता. तिला तिच्या चेहऱ्यावरील खुणा कायमच्या मिटवायच्या होत्या.
उपचारासाठी शोधाशोध करत असताना, एके दिवशी ती फेसबुकच्या माध्यमातून आग्रा येथील उझैरच्या संपर्कात आली.

शहजादीच्या आईच्या म्हणण्यानुसार, उझैरनं शहजादीला अबुधाबीमध्ये नोकरी मिळवून देईल आणि तिच्यावर उपचारही करवून देईल, असा शब्द दिला होता.
शहजादी यांचे वडील शब्बीर यांनी सांगितलं की, सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजादी ज्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती. त्या व्यक्तीनं तिला आपल्या नातेवाईकाकडे काम करण्यासाठी अबूधाबीला पाठवलं होतं.
शब्बीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये आग्रा येथील उझैरनं शहजादीला टुरिस्ट व्हिसावर अबूधाबीला पाठवलं होतं. तिथं ती उझैरच्या नातेवाईकाच्या घरी काम करू लागली. त्यांच्या चार महिन्याच्या मुलाची देखभाल करण्याची प्रमुख जबाबदारी तिला देण्यात आली होती.
शहजादीच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांची मुलगी नियमितपणे अबूधाबीहून व्हिडिओ कॉल करत असे. अनेकवेळा ती देखभाल करत असलेल्या 4 महिन्यांच्या मुलालाही दाखवायची. मग अचानक एके दिवशी तिचा फोन येणं बंद झालं. नंतर त्यांना त्याच्या नातेवाईकांकडून समजलं की, शहजादी अबुधाबीच्या तुरुंगात आहे.
शहजादीचे गावकरी तिच्याबद्दल काय म्हणतात?
शहजादी ही गावामध्ये विविध कार्यांमध्ये सक्रिय होती, असं बांदा येथील गोयरा मोगली गावातील ग्रामस्थ सांगतात.
गावातील मोहम्मद नईम म्हणाले की, ती कोणत्याही कामाला नकार द्यायची नाही. लोकांच्या रेशन कार्डपासून ते त्यांची किरकोळ सरकारी कामं पण ती करुन द्यायची.

शहजादी नेहमीच गावकऱ्यांच्या मदतीसाठी तयार असत. त्यामुळं ती प्रसारमाध्यमातील लोकांनाही ओळखत होती.
ती एक साधी मुलगी होती. पण अबुधाबीमध्ये जे घडलं ते अविश्वसनीय आहे, असं स्थानिक पत्रकार रानू अन्वर रझा यांनी सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












