इराण-तुर्किये, अमेरिका-मेक्सिको... हा आहे जगातला सर्वांत धोकादायक प्रवास

अवैध स्थलांतर

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय सीमा पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थलांतरितांच्या बाबतीत घडलेल्या दोन मोठ्या दुर्घटना जगाने पाहिल्या.

शुक्रवारी स्पेन आणि मोराक्कोला वेगळ्या करणाऱ्या मेलिलाचा दलदलीचा गवताळ प्रदेश पार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 23 लोकांचा मृत्यू झाला.

यानंतर तीनच दिवसात अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातल्या सॅन अँटोनियोमध्ये एका बेवारस ट्रकमध्ये पोलिसांना 50 हून जास्त लोकांचे मृतदेह सापडले.

कोव्हिड-19 नंतर जगभरात जी उलथापालथ झाली त्यामुळे अवैध स्थलांतरासाठी वापरल्या जाणाऱ्या या रस्त्यांवर लोकांची वर्दळ वाढली. त्यामुळे अनेक देशांनी या रस्त्यांवर कडक प्रतिबंध लावले आहेत.

त्यामुळे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की येत्या काही दिवसांत मृतांची संख्या वाढू शकते.

संयुक्त राष्ट्रांची संस्था एजेन्सी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (आयओएम) नुसार 2014 पासून आजपर्यंत अमेरिका किंवा युरोपातल्या देशात पोहचण्याच्या नादात जवळपास 50 हजार अवैध स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे किंवा ते बेपत्ता झाले आहेत.

या संस्थेचं म्हणणं आहे की खरंतर हा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो पण जगातल्या सर्वांत धोकादायक रस्त्यांवरून हे प्रवासी प्रवास करत असतात. त्यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे.

आयओएमच्या मते भू-मध्य समुद्र अशा अवैध स्थलांतर करणाऱ्यांसाठी सर्वाधित धोकादायक रस्ता आहे. एका अंदाजानुसार उत्तर आफ्रिकेहून भू-मध्य समुद्राच्या वाटेने युरोपात जाताना 19 हजार 500 लोकांचा मृत्यू झालेला आहे.

अवैध स्थलांतर

फोटो स्रोत, Getty Images

भू-मध्य समुद्र ओलांडण्याच्या नादात अनेक अपघात होतात. अनेकदा होड्यांमध्ये गरजेपेक्षा अधिक माणसं कोंबलेली असतात किंवा त्या होड्याच जुगाड करून बनवलेल्या असतात. अशा होड्यांचे अपघात झाल्याने किंवा त्या बुडाल्याने सर्वाधिक मृत्यू होतात.

ट्युनिशियातून येणारे लोक भू-मध्य समुद्रामार्गे युरोपात शिरण्यासाठी आधी लीबिया गाठतात. युरोपमध्ये जाताना ज्या लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे त्यांच्या आठवणींत एक स्मारक बांधलं गेलं आहे.

ट्युनिशियातून युरोपात जाण्याची इच्छा असणारे नायजेरियाचे स्थलांतरित विकी म्हणतात की, "या कबरी, स्मारकं पाहून मन उदास होतं. समुद्रामार्गे युरोपात शिरण्याची इच्छा मरून जाते."

आयओएमसारख्या संस्थांचं मत आहे की अशा तऱ्हेच्या समाध्या, कबरीही समुद्रामार्गे युरोपात किंवा अमेरिकेत जाऊ पाहाणाऱ्या प्रवाशांचा रस्ता रोखू शकत नाहीत.

आयओएमच्या प्रवक्ता सफा सेहली म्हणतात की, "या धोकादायक समुद्र प्रवासात जीव गमावणाऱ्या लोकांची संख्या सतत वाढतेय."

त्यांचं म्हणणं आहे की या लोकांचे मृत्यू थांबवण्यासाठी वेगवेगळ्या देशांची सरकारं ठोस पावलं उचलत नाहीयेत.

तर यूरोपीयन सीमा आणि तटरक्षक दल फ्रंटेक्सच्या एका अहवालानुसार 2015 पासून आतापर्यंत या रस्त्याने जाणाऱ्या तीन लाख लोकांचा जीव वाचवण्यात आला आहे.

आफ्रिकेतले अंतर्गत रस्ते

आफ्रिकेतल्या अनेक स्थलांतरितांना आपलं युरोपात जाण्याचं स्वप्न साध्य करण्यासाठी आधी स्वतःच्याच देशाचा प्रवास करावा लागतो. त्यांना आधी सहारा वाळवंट ओलांडावं लागतं.

इथलं वातावरण आणि परिस्थिती या स्थलांतरितांसमोरचं एक मोठं आव्हान आहे. आयओएमचं म्हणणं आहे की 2014 ते 2022 पर्यंत सहारा वाळवंट पार करण्याच्या नादात 5400 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाळवंट पार करण्याच्या नादात अनेकांचा मृत्यू होतो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वाळवंट पार करण्याच्या नादात अनेकांचा मृत्यू होतो

स्थलांतरित अब्दुल्ला इब्राहिम यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला आपला अनुभव सांगितला. ते म्हणतात, "वाळवंटात अनेक लोकांचा मृत्यू होतो. त्यांच्यातली ताकद संपल्याने ते मारले जातात. अनेकांचा मृत्यू पाणी संपल्यामुळेही होतो."

अवैध स्थलांतरितांचे जीव जाण्यामाके आणखी एक कारण मानवी तस्करी हेही आहे. आयओएमने आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटलंय की, "सहारा वाळवंटात सक्रिय असणारे तस्कर आणि बॉर्डर एजंट्सच्या हिंसेतही अनेकांचे जीव जातात."

अमेरिका-मेक्सिको बॉर्डर

अमेरिका-मेक्सिको सीमेवरही काही कमी आव्हानं नाहीयेत. भौगोलिकदृष्ट्या हा भाग खडतर आहे. इथंही मोठं वाळवंट आहे.

स्थलांतरित सहसा इथे धोकादायक 'रियो ग्रांड'च्या रस्त्याने अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न करतात.

स्थलांतरित

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेक्सिकन स्थलांतरित (संग्रहित छायाचित्र)

रिओ ग्रांड ही एक नदी आहे जी सीमेला समांतर वाहाते. या रस्त्यावर बहुतांश लोकांचं मृत्यू बुडून होतो. आयओएमचं म्हणणं आहे की 2014 पासून या रस्त्यावर 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जे लोक अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटांपासून वाचण्यासाठी वाहानांमध्ये लपून जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना अधिक धोका असतो.

सफा सेहली म्हणतात, "गेल्या काही काळा अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक लोकांचा रस्त्यात मृत्यू झाला आहे."

डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण मेक्सिकोच्या चियापास भागात एका ट्रकचा अपघात झाल्यामुळे 56 स्थलांतरितांचा मृत्यू झाला होता.

आशियायी रस्ते

आयओएमचं म्हणणं आहे की 2020 मध्ये ज्यांनी प्रवास केला त्यातल्या 10 पैकी चार आशियात जन्मलेले होते. आशियात अनेक महत्त्वाचे स्थलांतर मार्ग आहेत.

अवैध स्थलांतर

फोटो स्रोत, Getty Images

या संस्थेचं म्हणणं आहे का गेल्या आठ वर्षांत आशियातून 5000 लोक बेपत्ता झाले आहेत. मृत्यू होणाऱ्यांमध्ये बहुतांश लोक रोहिंग्या आणि बांग्लादेशी स्थलांतरित होते जे बंगालची खाडी आणि अंदमान समुद्र पार करून शेजारच्या देशात किंवा युरोपात जाऊ पाहात होते.

या पण या प्रवासात त्यांना बऱ्याच अडचणी येतात. हे स्थलांतरित अनेकदा मानवी तस्करी करणाऱ्या गँग्सच्या शोषणाला बळी पडतात.

आणखी एक धोकादायक रस्ता इराण आणि टर्कीच्या सीमेवर आहे. गेल्या वर्षी जेव्हा अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला तेव्हा इथे अफगाणी निर्वासितांची संख्या प्रचंड वाढली.

संयुक्त राष्ट्रांची निर्वासितांसाठी काम करणारी संस्था यूएनएचसीआरने म्हटलंय की इराण आणि शेजारी राष्ट्रांमध्ये 20 लाख लोकांनी स्वतःला एक निर्वासित म्हणून रजिस्टर केलेलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)