एक फोटो काढण्यासाठी तब्बल 10 वर्षे लागली, वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर स्पर्धेतील विजेत्यांचे ते खास 20 छायाचित्रं

फोटो स्रोत, Wim van den Heever
एक तपकिरी रंगाचा तरस बराच काळ ओस पडलेल्या हिऱ्याच्या खाणीजवळील उद्ध्वस्त वसाहतीच्या अवशेषांमध्ये उभा आहे.
हा थरारक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपल्याबद्दल विम व्हॅन डेन हीवर यांना 'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर' हा किताब मिळाला आहे.
फोटोग्राफर विम व्हॅन डेन हीवर यांनी हे छायाचित्र घेण्यासाठी खास पद्धत वापरली. त्यांनी अटलांटिक महासागरातून येणाऱ्या दाट धुक्यात आपला कॅमेरा लावला आणि तो क्षण टिपला.
विम व्हॅन डेन हीवर सांगतात की, हे खास छायाचित्र घेण्यासाठी त्यांना तब्बल 10 वर्षे लागली. ते म्हणतात, "एका तपकिरी तरसाचा हा एकच फोटो टिपायला मला तब्बल 10 वर्षे लागली."
या प्रजातीचा तरस बहुतेक वेळा रात्री बाहेर पडतो आणि एकटं राहणं पसंत करतो.
नामिबियातील कोल्मन्सकॉप नावाच्या ठिकाणी हे तरस जाताना अनेकदा दिसतात.
विम व्हॅन डेन हीवर यांना हा पुरस्कार लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये देण्यात आला. या संग्रहालयात विजेत्यांची छायाचित्रं 17 ऑक्टोबरपासून पुढील वर्षी 12 जुलैपर्यंत पाहायला मिळणार आहेत.
विजेत्यांच्या विविध श्रेणी
इटलीचे फोटोग्राफर आंद्रेआ डोमिनिझी यांना त्यांच्या 'आफ्टर द डिस्ट्रक्शन' या छायाचित्रासाठी यंग वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर आणि 15 ते 17 वर्षे या वयोगटातील विजेतेपद मिळालं आहे.

फोटो स्रोत, Andrea Dominizi
डोमिनिझी इटलीतील लेपिनी पर्वतरांगेत होते, जिथे पूर्वी जुन्या बीच झाडांची कापणी केली जात होती. तिथं त्यांनी कापलेल्या झाडाच्या खोडावर विसावलेला एक किडा (बीटल) पाहिला.
त्या किड्याच्या जवळच जंगलातील वृक्षं तोडण्यासाठी वापरल्या गेलेल्या जुन्या मशिन्स पडलेल्या होत्या.
त्यांनी वाइड-अँगल लेन्स वापरली आणि कॅमेऱ्याचा फ्लॅश न वापरता या छोट्या जीवाला फ्रेममध्ये टिपलं, जेणेकरून या फोटोद्वारे मोठी गोष्ट सांगता येईल.
ते म्हणतात, "हे छायाचित्र अनेक प्रजातींना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यांची गोष्ट दाखवतं. जसं की घर गमावणं. या प्रकरणात त्या किड्याने आपली अंडी घालण्यासाठी लागणाऱ्या झाडाचा आणि लाकडाचा आधार गमावला आहे."
लाँगहॉर्न बीटल जंगलाचं आरोग्य टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हा किडा सुकलेल्या किंवा मृत लाकडात बोगदे (सुरंग) तयार करतात.
त्या बोगद्यांमधून बुरशी (फंगस) आत जाते, जी लाकूड कुजवण्याचं काम करते. लाकूड कुजल्यावर त्यातील पोषक घटक पुन्हा मातीमध्ये मिसळतात. त्यामुळे जंगलाची सुपीकता टिकून राहते.
'अॅनिमल इन देअर एन्व्हायर्नमेंट' या श्रेणीत कॅनडाचे फोटोग्राफर शेन ग्रॉस यांच्या 'लाइक अॅन ईल आउट ऑफ वॉटर' या छायाचित्राला विजेतेपद मिळाले आहे.
मागच्या वर्षीचे विजेते फोटोग्राफर शेन ग्रॉस यांना यंदाही त्यांच्या एका खास छायाचित्रासाठी पुरस्कार मिळाला आहे.
या फोटोत 'पेपर्ड मोराय ईल' कमी भरतीच्या वेळी मृत शिकार शोधताना दिसतो आहे.
हे छायाचित्र टिपण्यासाठी ग्रॉस यांना अनेक आठवडे वाट पाहावी लागली.
ते सांगतात, "मी वेगळी पद्धत वापरली, मी फक्त एका ठिकाणी थांबलो आणि वाट पाहिली की ते (ईल) स्वतःहून माझ्याजवळ येतील."

फोटो स्रोत, Shane Gross
10 वर्षे आणि त्याखालील वयोगटाच्या श्रेणीमध्ये यूकेच्या जेमी स्मार्टने तिच्या 'द वीव्हर्स लेअर' या छायाचित्रासाठी पुरस्कार जिंकला.
जेमी स्मार्टने हा फोटो सप्टेंबरमधील एका थंड सकाळी टिपला. ऑर्ब-वीव्हर स्पायडरने (कोळी) स्वतःला जाळ्यात गुंडाळून घेतलं होतं.
जेमी म्हणतात, "हे छायाचित्र माझ्यासाठी खूप खास आहे, कारण यात मी अशा एका गोष्टीला (कोळी) दाखवलं आहे, ज्याला लोक सहसा घाबरतात."

फोटो स्रोत, Jamie Smart
'वेटलँड्स: द बिगर पिक्चर' या श्रेणीत जर्मनीचे फोटोग्राफर सेबॅस्टियन फ्रॉलिश यांना त्यांच्या 'व्हॅनिशिंग पाँड' या छायाचित्रासाठी पुरस्कार मिळाला आहे.
ऑस्ट्रियातील प्लात्झर्टाल या दलदलीच्या भागात सेबॅस्टियन फ्रॉलिश यांनी एक लहान स्प्रिंगटेल नावाचा कीटक पाहिला. तो चमकदार हिरव्या मिथेन वायूच्या बुडबुड्यांमधून धावत जात होता.
हे छायाचित्र अशावेळी समोर आलं आहे, जेव्हा ऑस्ट्रियाने आपली सुमारे 90 टक्के दलदलीची म्हणजेच पाणथळ जमीन गमावली आहे.
या छायाचित्रात गॅसच्या बुडबुड्यांवरून धावत जाणारा छोटा स्प्रिंगटेल कीटक आजूबाजूच्या विशाल आणि भयावह वातावरणाचं प्रतीक आहे.
त्यातून हे दिसतं की, एवढ्या छोट्या जीवासाठीही परिस्थिती किती कठीण आणि धोकादायक बनली आहे.

फोटो स्रोत, Sebastian Frölich
11 ते 14 वर्षांच्या श्रेणीत फ्रान्सचे फोटोग्राफर लुबिन गोडिन यांना त्यांच्या 'अल्पाइन डॉन' या छायाचित्रासाठी विजेतेपद मिळालं आहे.
लुबिन गोडिन एकदा डोंगर चढत असताना त्यांना ढगांच्या मधोमध विसावलेला एक अल्पाइन आयबेक्स दिसला.
पुढच्या वेळी ते त्याच मार्गाने सूर्योदयाआधीच परत गेले आणि धुकं पुन्हा पसरायच्या आधीच त्यांनी तो सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

फोटो स्रोत, Lubin Godin
'अंडरवॉटर' या श्रेणीत अमेरिकेचे फोटोग्राफर राल्फ पेस यांना त्यांच्या 'सर्व्हायव्हल पर्स' या छायाचित्रासाठी विजेतेपद मिळाले आहे.
राल्फ पेस यांनी स्वेल शार्कच्या अंड्याच्या कवचाचं छायाचित्र घेण्यासाठी आपला कॅमेरा स्थिर ठेवला. त्यांनी त्या कवचाच्या मागून प्रकाश टाकला आणि त्यामुळे अंड्याच्या आतला भ्रूण स्पष्ट दिसू लागला.
स्वेल शार्क आपल्या चामड्यासारख्या अंड्यांना ठेवण्यासाठी केल्प नावाच्या समुद्री गवतावर (सीग्रासचा एक प्रकार) अवलंबून असतात.

फोटो स्रोत, Ralph Pace
'अॅनिमल पोर्ट्रेट्स' या श्रेणीत इटलीचे फोटोग्राफर फिलिप एगर यांना त्यांच्या 'शॅडो हंटर' या छायाचित्रासाठी विजेतेपद मिळाले आहे.
फिलिप एगर यांनी तब्बल 4 वर्षे दूरून या गरुड-घुबडाच्या घरट्यावर लक्ष ठेवून काळजीपूर्वक या छायाचित्राची योजना आखली होती.
ईगल (गरुड) घुबड हा जगातील सर्वात मोठ्या घुबडांपैकी एक आहे. त्याचं वजन सामान्य बजर्ड पक्ष्यांच्या दुप्पट असतं.

फोटो स्रोत, Philipp Egger
'बिहेवियर: बर्ड' या श्रेणीत चीनचे फोटोग्राफर चिंगरोंग यांग यांना त्यांच्या 'सिंक्रोनाज्ड फिशिंग' या छायाचित्रासाठी विजेतेपद मिळालं आहे.
चिंगरोंग यांग यांनी युनडांग तलावात मासा पकडणाऱ्या एका लेडीफिशचा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला. ते अशा सुंदर क्षणांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी या तलावाला नेहमी भेट देत असतात.

फोटो स्रोत, Qingrong Yang
'बिहेवियर: मॅमल्स' या श्रेणीत अमेरिकेचे फोटोग्राफर डेनिस स्टॉग्सडिल यांना त्यांच्या 'कॅट अमंगस्ट द फ्लेमिंगोज' या छायाचित्रासाठी विजेतेपद मिळाले आहे.
अनेक दिवस जंगली मांजरींचा शोध घेतल्यानंतर, फोटोग्राफर डेनिस स्टॉग्सडिल जेव्हा एनदूतू तलावाजवळ पोहोचले, तेव्हा त्यांना तिथं एक सर्व्हल मांजर दिसण्याची अपेक्षा होती.
परंतु, त्याऐवजी त्यांनी एका कॅराकल मांजरीला फ्लेमिंगो पक्ष्यांवर झेप घेताना पाहिलं.
कॅराकल मांजरी त्यांच्या अक्रोबॅटिक उड्यांसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यांचा वापर त्या पक्षी पकडण्यासाठी करतात. परंतु, त्यांना फ्लेमिंगोची शिकार करताना पाहणं अत्यंत दुर्मिळ असतं.

फोटो स्रोत, Dennis Stogsdill
'फोटो जर्नलिझम' या श्रेणीत स्पेनचे फोटोग्राफर जॉन ए. जुआरेझ यांना त्यांच्या 'हाऊ टू सेव्ह अ स्पीसीज' या छायाचित्रासाठी विजेतेपद मिळाले आहे.
जॉन ए. जुआरेझ अनेक वर्षांपासून 'बायोरेस्क्यू प्रोजेक्ट' सोबत काम करत आहेत.
या काळात त्यांनी गेंड्यांच्या संरक्षणातील एक मोठी प्रगती पाहिली, म्हणजेच पहिल्यांदा यशस्वी भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आलं होतं.
"हा अनुभव असा होता, जो मी कधीच विसरू शकणार नाही," असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, Jon A Juárez
'बिहेवियर: अॅम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स' या श्रेणीत फ्रान्सचे फोटोग्राफर क्वेंटिन मार्टिनेझ यांना त्यांच्या 'फ्रॉलिकिंग फ्रॉग्स' या छायाचित्रासाठी विजेतेपद मिळाले आहे.
मुसळधार पावसात, फोटोग्राफर क्वेंटिन मार्टिनेज जंगलाच्या मध्यभागी एका मोकळ्या जागेवर असलेल्या पाण्याच्या पुलावर पोहोचले.
त्यांनी वाइड-अँगल लेन्स आणि डिफ्यूज्ड फ्लॅश वापरला. या तंत्राने त्यांनी प्रजननासाठी जमलेल्या छोट्या बेडकांचं छायाचित्र घेतलं.

फोटो स्रोत, Quentin Martinez
'फोटोजर्नलिझम स्टोरीअॅवॉर्ड' या श्रेणीत स्पेनचे फोटोग्राफर झेवियर अझनार गोंझालेझ दे रूएडा यांना त्यांच्या 'एंड ऑफ द राउंड-अप: सीडिंग पिट' या फोटोसाठी विजेतेपद मिळाले आहे.
झेवियर यांनी अमेरिकेत रॅटलस्नेक्सबद्दल लोकांची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
काही लोक या सापांचा आदर करतात, तर अनेकजण त्याला घाबरतात आणि त्यांना मारण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात.

फोटो स्रोत, Javier Aznar González de Rueda
'बिहेवियर: इनव्हर्टेब्रेट्स' या श्रेणीत ऑस्ट्रेलियाच्या फोटोग्राफर जॉर्जिना स्टाइटलर यांना त्यांच्या 'मॅड हॅटरपिलर' या छायाचित्रासाठी विजेतेपद मिळालं आहे.
खूप दिवसांच्या शोधानंतर जॉर्जिना स्टाइटलर यांना असं पान सापडलं, ज्यात फक्त शिरा उरल्या होत्या. म्हणजेच ते गम-लीफ कॅटरपिलरने (अळी) खाल्लेलं होतं.

फोटो स्रोत, Georgina Steytler
'ओशन: द बिगर पिक्चर' या श्रेणीत नॉर्वेचे छायाचित्रकार ऑडून रिकार्डसन यांना 'द फिस्ट' या फोटोसाठी विजेता घोषित करण्यात आलं आहे.
नॉर्वेमध्ये ध्रुवीय रात्रीच्या काळात फोटोग्राफर ऑडून रिकार्डसन यांनी मासेमारीच्या जहाजाभोवती घिरट्या घालणाऱ्या समुद्री पक्ष्यांचे (सीगल्स) सुंदर छायाचित्र टिपले आहे.
हे पक्षी जाळ्यात अडकलेल्या माशांना पकडण्याचा प्रयत्न करत होते.

फोटो स्रोत, Audun Rickardsen
'प्लँट्स अँड फंगी' या श्रेणीत मलेशियाचे छायाचित्रकार चिएन ली यांना 'डेडली अॅल्यूअर' या छायाचित्रासाठी विजेता घोषित करण्यात आलं आहे.
हे दृश्य टिपण्यासाठी चिएन ली यांनी लाँग एक्स्पोजरचा वापर केला आणि यूव्ही टॉर्च लावली.

फोटो स्रोत, Chien Lee
'रायझिंग स्टार अॅवॉर्ड' या श्रेणीत जर्मनीचे छायाचित्रकार लुका लॉरेन्झ यांना 'वॉचफुल मोमेंट्स: मीट द नेबर्स' या छायाचित्रासाठी विजेता घोषित करण्यात आलं आहे.
लहानपणी लुका लॉरेन्झ तासन्तास पक्षी पाहण्यात आणि जंगलातील प्राण्यांविषयी माहिती घेण्यात घालवत असत.
एकदा ते तलावावर म्युट स्वान्सचे (एक प्रकारचा हंस) फोटो काढत होते, तेव्हा अचानक एक कोयपूने (मोठा उंदीरसदृश प्राणी) त्यांच्या फ्रेममध्ये येऊन फोटोबॉम्ब (फोटो खराब करतो) केला.

फोटो स्रोत, Luca Lorenz
'नॅचरल आर्टिस्ट्री' या श्रेणीत जर्मनीच्या फोटोग्राफर सिमोन बाउमेइस्टर यांना 'कॉट इन द हेडलाइट्स' या छायाचित्रासाठी विजेता घोषित करण्यात आलं आहे.
एका शहरातील पुलावरून सिमोन बाउमेइस्टर यांनी खाली असलेल्या ट्रॅफिक लाईट्सच्या पार्श्वभूमीवर ऑर्ब-वीव्हर स्पायडरच्या (कोळी) सावलीचे छायाचित्र टिपले.

फोटो स्रोत, Simone Baumeister
'इम्पॅक्ट अॅवॉर्ड'मध्ये ब्राझीलचे फोटोग्राफर फर्नांडो फॅसिओल यांना त्यांच्या 'ऑर्फन ऑफ द रोड' या फोटोसाठी विजेता घोषित करण्यात आलं आहे.
ब्राझीलमधील एका पुनर्वसन केंद्रात, फोटोग्राफर फर्नांडो फॅसिओल यांनी एका अनाथ उदमांजराच्या पिलाचा फोटो काढला.
ते पिलू आपली काळजी घेणाऱ्या (केअरटेकर) व्यक्तीच्या मागोमाग चालत होतं.

फोटो स्रोत, Fernando Faciole
'पोर्टफोलिओ अॅवॉर्ड' या श्रेणीत इस्रायल आणि रशियाचे फोटोग्राफर ॲलेक्सी खारितोनोव्ह यांना त्यांच्या 'व्हिजन्स ऑफ द नॉर्थ: आइस मोटिफ्स'चे विजेते घोषित करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Alexey Kharitonov
ॲलेक्सी खारितोनोव्ह हे स्वयं-शिक्षित लँडस्केप फोटोग्राफर आहेत.
ते रशियाच्या उत्तर भागातील, सायबेरिया आणि आशियातील विशाल निसर्गदृश्यांना आपल्या कलेचं कॅनव्हास (कलेचा आधार) मानतात.
त्यांच्या विजेत्या छायाचित्रात, स्वेतल्याचकोव्हस्कॉय दलदलीतील नुकत्याच गोठलेल्या तलावाचं अप्रतिम दृश्य दिसतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











