'नेपाम गर्ल'चा जगप्रसिद्ध फोटो नेमका कोणी आणि कसा काढला होता?

फोटो

फोटो स्रोत, AP

फोटो कॅप्शन, 'हॉरर ऑफ वॉर' हा फोटो 'नेपाम गर्ल' या नावानं देखील ओळखला जातो, या फोटोमुळे निक उट यांना पुलित्झर पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले
    • Author, बुई थू, मिहांग, रान, बुई हाई, ग्रेस सोई
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नेपाम या रसायनानं भिजलेली एक नग्न मुलगी, इतर मुलांबरोबर धावते. ते सर्व रडत आहेत, घाबरलेले आहेत आणि भेदरलेल्या अवस्थेत कॅमेराच्या लेन्सच्या दिशेनंच धावत आहेत.

हे दृश्य व्हिएतनाम युद्धाचं प्रतिक बनलं. ते 'नेपाम गर्ल' या नावानं जगभरात प्रसिद्ध झालं.

त्यानंतर 'नेपाम गर्ल' व्हिएतनामच्या फोटोग्राफर्ससाठी अभिमानाची आणि प्रेरणेची बाब बनलं.

या फोटोचे जनक 'निक उट', पुलित्झर पुरस्कार मिळणारे व्हिएतनामी वंशाचे पहिले आणि एकमेव व्यक्ती बनले.

नेपाम हे एक रसायनांचं मिश्रण असतं. ते अतिशय ज्वलनशील असतं. व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेनं बॉम्बमध्ये याचा वापर केला होता. त्यामुळे त्याला नेपाम बॉम्ब देखील म्हटलं जायचं.

"निक उट हे खास व्यक्ती होते," असं नाव न सांगता एक व्हिएतनामी फोटोग्राफर म्हणाले.

निक उट 'शिक्षक' म्हणून ओळखले जातात. ते व्हिएतनाममधील फोटोग्राफर्सच्या नवीन पिढ्यांना शिकवण्यासाठी अनेकदा मायदेशी येतात.

स्ट्रिंगर माहितीपटातून उपस्थित झाली शंका

मात्र अर्ध्या शतकाहून अधिक काळानंतर, 'स्ट्रिंगर' या नवीन माहितीपटात हा फोटो नेमका कोणी काढला याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली. जानेवारी महिन्यात, संडन्स चित्रपट महोत्सवात हा माहितीपट दाखवण्यात आला.

या माहितीपटात एक खळबळजनक सूचना करण्यात आली. ती म्हणजे, खरं तर, 'नेपाम गर्ल' हा फोटो गुयेन थान्ह न्गे या एका फ्रीलान्स फोटोग्राफरनं काढल्याचं त्या सांगण्यात आलं.

हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर, वर्ल्ड प्रेस फोटोनं (डब्ल्यूपीपी) याबाबत एक तपास सुरू केला आणि निक उट यांना या फोटोचं श्रेय देण्याचं तात्पुरतं थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे छायापत्रकारितेच्या (फोटोजर्नलिझम) क्षेत्रात मोठी फूट पडली.

"एका नायकाला, महान व्यक्तीला बाजूला सारण्यासाठी पुरेसे आणि सबळ पुरावे असले पाहिजेत," असं दुसऱ्या एका व्हिएतनामी फोटोजर्नलिस्टनं बीबीसीला सांगितलं.

फोटो काढल्याचा क्षण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, त्या घटनाक्रमातील दुसऱ्या एका फोटोमध्ये न्गुयेन थान्ह न्गे पेंटॅक्स कॅमेऱ्यासह (डावीकडे)दिसत आहेत, तर व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत असल्यानुसार निक उट संरक्षक कपडे आणि उपकरणांसह दिसत आहेत

सध्याच्या डिजिटल युगात, एखाद्या फोटोचा इतका प्रभाव पडणं ही दुर्मिळ गोष्ट आहे, असं ते पुढे म्हणाले.

"आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. वादामुळे इतक्या महत्त्वाच्या फोटोच्या वारशाचं आपण नुकसान होऊ देऊ शकत नाही - किंवा एकमेकांना दुखावू शकत नाही," असं ते म्हणाले.

या फोटोच्या सत्यतेबद्दल वाद नाही. मात्र हा वाद प्रचंड भावनिक पातळीवर पोहोचला आहे. कारण या फोटोग्राफरचं नाव देखील आता "ऐतिहासिक स्मृतीचा भाग झालं आहे," असं कीथ ग्रीनवूड म्हणाले. ते मिसूरी विद्यापीठात फोटोजर्नलिझमचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

"युद्धाचा इतिहास गुंतागुंतीचा असतो. त्यामुळे अजूनही तीव्र स्वरुपाच्या भावनांना उजाळा मिळतो. त्यामुळे या फोटोच्या सत्यतेबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या शंकांमुळे काही भावना दुखावल्या जाणं स्वाभाविक आहे," असं ते म्हणाले.

'नेपाम गर्ल' फोटोची कहाणी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हा प्रसिद्ध फोटो 8 जून 1972 चा आहे. व्हिएतनाममधील ट्रांग बांग गावावर दक्षिण व्हिएतनामी हवाई दलानं चुकून नेपल्म बॉम्ब टाकल्यानंतर हा फोटो घेण्यात आला होता.

या फोटोतील मुख्य पात्र आहे किम फुक. ती तिच्या भावाबरोबर आणि चुलत भावंडांबरोबर एका मंदिराच्या अंगणात खेळत होती.

निक उट, त्यावेळेस असोसिएटेड प्रेससाठी (एपी) काम करत होते. उट म्हणाले की, स्फोटानंतर, गावकरी जवळच्या महामार्गावरून पळत गेले. त्यावेळेस उट यांनी मरणासन्न मुलाला धरून ठेवलेल्या एका आजीचा फोटो काढला.

मग त्यांनी पाहिलं की, फुक तिचे हात वर करून धावते आहे. ते तिच्या मागे धावले. त्यांना तिचे काही फोटो घ्यायचे होते.

मात्र उट यांनी पाहिलं की तिची त्वचा सोलली गेली आहे. त्यांनी लगेच तिच्या अंगावर पाणी ओतलं आणि मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

डिजिटल कॅमेरा येण्यापूर्वी, पूर्णवेळ आणि अर्धवेळ अशा दोन्ही फोटोग्राफर्सना त्यांच्या फोटोची फिल्म त्यांच्या एजन्सीच्या कार्यालयात द्यावी लागायची.

त्यानंतर फोटो लॅब संपादक फोटोची नोंदणी करून तो फोटो विकसित करत असे. मग त्यातील कोणते फोटो मुख्यालयात पाठवायचे हे वरिष्ठ फोटो संपादक ठरवत असे.

"हे फोटो काढून मी जेव्हा ऑफिसमध्ये परतलो, तेव्हा मी ओरडलो, 'माझ्याकडे एक खूप खास फोटो आहे!' ते ऐकून सर्वजण माझ्याकडे पाहू लागले," असं उट यांनी जानेवारीमध्ये बीबीसीला सांगितलं.

किम फुक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या फोटोतील मुख्य पात्र आहे किम फुक. ती तिच्या भावाबरोबर आणि चुलत भावंडांबरोबर एका मंदिराच्या अंगणात खेळत होती. तिची त्वचा सोलली गेली आहे.

ते म्हणाले की फोटो ऑफिसमध्ये एकच व्यक्ती होती, ती म्हणजे फोटो लॅब संपादक युईची 'जॅकसन' इशिझाकी. त्यामुळे उट यांनी काढलेल्या फोटोंची फिल्म इशिझाकी विकसित करत होते, तेव्हा उट त्यांच्या शेजारी उभे होते.

त्यानंतर इशिझाकी यांनी उट यांच्या नावानं त्या फिल्मवर सही केली आणि तो फोटो मुख्य कार्यालयात नेला.

"प्रत्येकानं तो फोटो पाहिला आणि कोणीतरी माझ्या बॉसला म्हणजे मुख्य फोटो संपादक, हॉर्स्ट फास यांना फोन केला आणि जेवण करून ताबडतोब परत येण्यास सांगितलं," असं उट म्हणाले.

उट यांनी दिलेल्या माहितीनुसार, फास, फोटो संपादक कार्ल रॉबिन्सन यांच्या आधी आले आणि या दोघांमध्ये हा फोटो पाठवायचा की नाही यावर वाद झाला.

रॉबिन्सन यांच्यावर फोटोसाठीचा कॅप्शन म्हणजे फोटो ओळ लिहिण्याची जबाबदारी होती. त्यांना वाटलं की या फोटोमध्ये नग्न लोक आहेत, त्यामुळे तो फोटो पाठवणं योग्य नाही. मात्र त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

मात्र रॉबिन्सन यांनी बीबीसीला या घटनाक्रमाबद्दल वेगळीच माहिती सांगितली.

रॉबिन्सन म्हणाले की, ते दुपारचं जेवण करून परतले तेव्हा त्यांनी पाहिलं की लॅबमध्ये फक्त इशिझाकी आणि एक तंत्रज्ञ आहे. रॉबिन्सन म्हणाले की फोटोच्या फिल्मवरून फोटो आधीच तयार करण्यात आले होते आणि ते पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते.

दोन वेगवेगळ्या फोटोग्राफर्सनी पाठवलेल्या फिल्मच्या वेगवेगळ्या रोल्समध्ये तेच दृश्य, बाजूच्या अंगानं आणि समोरच्या बाजूनं दिसत होतं.

व्हिडिओ फुटेज

फोटो स्रोत, Getty Images/World Press Photo

फोटो कॅप्शन, व्हिडिओ फुटेजमध्ये दिसतं की 'नेपाम गर्ल' हा फोटो काढल्यानंतर काही अंतरावर एक अस्पष्ट आकृती (ते उट असल्याचं मानलं जातं) आहे

रॉबिन्सन यांना मासिकात एक अपरिचित नाव दिसलं. कारण तो फ्रीलान्सर एपीचा पूर्णवेळ रिपोर्टर नव्हता. "आमच्याकडे व्हिएतनामी स्ट्रिंगर्सचा एक संपूर्ण ताफा होता. त्यात नागरिक होते आणि कधीकधी आमच्यासाठी काम करणारे सैनिक होते," असं ते म्हणाले.

रॉबिन्सन पुढे म्हणाले की, फास नंतर परतले आणि कोणता फोटो पाठवायचा यावर त्यांनी वाद घातला नाही. मात्र रॉबिन्सन यांनी दावा केला की ज्यावेळेस फोटोंची निवड करण्यात आली, तेव्हा उट तिथे उपस्थित नव्हते.

"ते निर्णयाची वाट पाहत दरवाजावर उभे होते," असं ते म्हणाले.

रॉबिन्सन म्हणाले की ते बायलाईन लिहत होते. तेव्हा फास त्यांच्या कानात कुजबुजले की एपीचा कर्मचारी असलेल्या उट यांना या फोटोचं श्रेय द्यावं.

"त्यांना नकार देण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. कारण मला सायगावमध्ये माझी व्हिएतनामी पत्नी आणि दोन छोट्या मुलांबरोबर राहायचं होतं."

त्यानंतर फास आणि इशिझाकी यांचा मृत्यू झाला आहे.

व्हिएतनाम युद्धातील फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हा प्रसिद्ध फोटो 8 जून 1972 चा आहे. व्हिएतनाममधील ट्रांग बांग गावावर दक्षिण व्हिएतनामी हवाई दलानं चुकून नेपल्म बॉम्ब टाकल्यानंतर हा फोटो घेण्यात आला होता.

त्यानंतरच्या दशकांमध्ये रॉबिन्सन यांची विवेकबुद्धी त्या घटनेबद्दल त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांना त्या फोटोग्राफरची माफी मागायची होती. मात्र त्यांना त्याचं नाव आठवत नव्हतं.

2015 मध्ये एपीच्या एका माजी सहकाऱ्याच्या मदतीनं, रॉबिन्सन यांनी न्गे यांचं नाव शोधलं. मात्र त्यांना ते सापडले नाहीत.

सात वर्षांनी, त्या फोटोला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उट आणि किम यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. अखेर मी सत्याला सामोरं जायचं ठरवलं. "मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो आणि ते विसरूही शकत नव्हतो," असं रॉबिन्सन म्हणाले.

मग रॉबिन्सन यांनी फोटोजर्नलिस्ट गॅरी नाईट यांच्याशी संपर्क साधला. गॅरी त्यांची मुलाखत घेण्यास तयार झाले. या मुलाखतीतूनच अखेर 'स्ट्रिंगर' हा चित्रपट तयार झाला.

त्यानंतर लवकरच, चित्रपटाच्या टीमला न्गे सापडले. सायगाव पडल्यानंतर ते निर्वासित म्हणून अमेरिकेत गेले होते. मात्र 2002 मध्ये पुन्हा मायदेशी परतले.

"मी शांत, नि:शब्द, चिंताग्रस्त आणि दु:खी होतो - माझ्या भावना खोलवर दाबल्या गेल्या होत्या. सत्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही," असं न्गे म्हणाले. ते आता 87 वर्षांचे आहेत.

फोटो कोणी काढला याचा तपास

या माहितीपटाची माहिती मिळाल्यानंतर, एपीनं उपलब्ध फुटेज, जिवंत असलेल्या साक्षीदारांच्या मुलाखती आणि उट यांच्या कॅमेऱ्यांची तपासणी याच्या आधारे या प्रकरणात स्वत:चा तपास सुरू केला. या एजन्सीनं जानेवारी आणि मे महिन्यात दोन अहवाल प्रकाशित केले.

यात त्यांनी निष्कर्ष काढला आहे की तो फोटो उट यांनी घेतला नव्हता असं सिद्ध करण्यासाठी "कोणताही निश्चित स्वरुपाचा पुरावा नाही". मात्र या वृत्तसंस्थेनं हे मान्य केलं आहे की या प्रकरणात अजूनही "गंभीर प्रश्न" आहेत.

एपीनं म्हटलं आहे की, तो फोटो 'बहुधा' पेंटॅक्सनं घेण्यात आला आहे. उट यांनी दिलेल्या साक्षीशी ते मेळ खात नाही. उट यांनी प्रदीर्घ काळ दावा केला आहे की त्या दिवशी त्यांच्याकडे चार कॅमेरे होते. दोन लिका आणि दोन निकॉन कॅमेरे. त्यांनी तो फोटो लिका कॅमेऱ्यानं घेतला होता.

एपीनं जेव्हा त्यांना याबद्दल उट यांना विचारलं, तेव्हा उट म्हणाले की कोणत्या मॉडेलचा कॅमेरा होता, याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. फास यांनी त्यांना सांगितलं की तो फोटो लिकाच्या फिल्मवर घेण्यात आला आहे.

त्या दिवशी आणखी एक फोटो काढण्यात आला होता, त्यात न्गे यांनी हातात पेन्टॅक्स कॅमेरा धरल्याचं दिसतं.

गुयेन थान्ह न्गे आणि कार्ल रॉबिन्सन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'द स्ट्रिंगर' या माहितीपटाच्या प्रीमियरमध्ये गुयेन थान्ह न्गे आणि कार्ल रॉबिन्सन

माहितीपट आणि एपी या दोघांनीही, उपलब्ध व्हिडिओ, फोटो आणि उपग्रहाद्वारे घेतलेल्या प्रतिमा यांच्या आधारे त्या दिवसाचा घटनाक्रम पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला. 'नेपाम गर्ल' फोटो काढल्यानंतर लगेचच काढलेल्या व्हिडिओमध्ये एक अस्पष्ट आकृती दिसते.

ते उट असल्याचं मानलं जातं. ते मुलांपासून काही अंतरावर उभे आहेत. या माहितीपटात दावा करण्यात आला आहे की उट कॅमेऱ्यापासून 200 फूट अंतरावर होते. याचा फोटो काढल्यानंतर त्यांना पळून जावं लागलं असतं.

एपीनं या आकडेवारीबद्दल वादविवाद केला. त्यांनी म्हटलं की हे अंतर 92.5 फूट ते 150 फूट (28.8 आणि 48 मीटर) यांच्या दरम्यान होतं. ज्यात 20 टक्क्यांची त्रुटी होती.

एजन्सीचं म्हणणं आहे की, अंतराच्या अंदाजावर विविध घटकांचा परिणाम होऊ शकतो. माहितीपटात काही फुटेजकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तसंच एजन्सीनं त्यांच्या तपासासाठी वापरलेले फोटोंचे दोन सेट, माहितीपटाला उपलब्ध नव्हते.

सद्यस्थितीत आपल्याकडे काय माहिती आहे?

एपी किंवा डब्ल्यूपीपी दोघांनीही फोटोग्राफरची ओळख पटवल्याचा दावा केलेला नाही. डब्ल्यूपीपीनं तर असंही सुचवलं की हा फोटो तिसऱ्या फोटोग्राफरनं काढलेला असावा.

मात्र त्या दिवसाच्या घटनांच्या बाबतीत त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल प्रश्न कायम आहेत. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या असंख्य पत्रकारांनी माहितीपटात मांडण्यात आलेल्या दृष्टीकोन निराधार असल्याचं म्हणत त्यांचा दावा नाकारला. त्यांनी या माहितीपटाच्या चित्रीकरणात भाग घेण्यास नकार दिला.

त्या फोटोचं काय? न्गे म्हणाले की फास यांनी त्यांना या फोटोची एक प्रत दिली होती. मात्र त्यांच्या पत्नीनं नैराशात ती फाडून टाकली.

प्रातिनिधिनिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'नेपाम गर्ल' या फोटोला 50 वर्षे झाल्यानिमित्त, निक उट आणि किम फुक 2022 मध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटले होते

उट दावा करतात की त्यांनीच तो फोटो काढला आहे. ते याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहेत.

"अर्थातच, लोकांना या फोटोबद्दलचं सत्य जाणून घ्यायचं आहे. नक्की काय झालं होतं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला अधिक वेळ आणि पुरावे हवे आहेत," असं एक अनामिक व्हिएतनामी फोटोग्राफर म्हणाला.

फोटो काढल्यानंतर इतक्या दशकानंतरदेखील नेपाम गर्ल या फोटोची दृश्यात्मक ताकद तशीच आहे. मात्र हा फोटो कोणी आणि कसा काढला, याबद्दलच्या वादामुळे त्याभोवतीचं गूढ वाढलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)