'मी मृतदेहातील सौंदर्य शोधायचो', एका कालबाह्य फोटोग्राफरची गोष्ट

फोटो स्रोत, Richard Kennady
- Author, प्रमिला कृष्णन
- Role, बीबीसी तमीळ प्रतिनिधी
सूचना : या कथेमध्ये मृतदेहांच्या प्रतिमा आहेत
नोकरीच्या पहिल्या दिवसाबद्दल रवींद्रन सांगतात, "मला मृत शरीराला उचलून खुर्चीत सरळ बसवायला सांगितलं."
"त्यानंतर फोटोग्राफरला फोटो काढता यावे यासाठी मला मृताच्या पापण्या उचलाव्या लागल्या."
ते साल होतं 1972. त्यावेळी रवींद्रन केवळ 14 वर्षांचे होते. त्यांचे वडील श्रीनिवासन फोटोग्राफीचा स्टुडिओ चालवायचे. त्यांच्या वडिलांनी त्यांना एका कामासाठी बाहेर पाठवलं.
रिचर्ड केनडी अवघ्या नऊ वर्षांचे असताना त्यांनाही असाच अस्वस्थ करणारा अनुभव आला होता. त्यांना मृत व्यक्ती बसलेल्या खुर्चीच्या मागे पडदा म्हणून पांढरे कापड धरण्यास सांगितले होते.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "मी घाबरून थरथर कापत होतो. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. मी अनेक रात्री जागून काढल्या, मला स्वप्नात ती मृत व्यक्ती वारंवार दिसत होती. ते खूप भयानक होतं."
हे दोघेही फोटोग्राफी क्षेत्रात आले कारण त्यांच्या वडिलांचा स्टुडिओ होता. त्यांनी जवळपास 1,000 हून अधिक मृत लोकांचे फोटो काढले असतील.
दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यात मृतांचे फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या छायाचित्रकारांपैकी ते दोघे आहेत.
या अस्वस्थ करणाऱ्या कामाविषयी त्यांनी बीबीसीला माहिती दिली. पण 1970-80 च्या दशकात हे काम चांगल्या पगाराचं होतं.
मनातल्या भीतीशी लढा
काही दशकांपूर्वीपर्यंत तमिळनाडूमधील लोकांमध्ये असा गैरसमज होता की फोटो काढल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते. म्हणूनच लोकांनी मेल्यानंतरच त्यांचे फोटो काढून घेतले होते.
रवींद्रन तामिळनाडूतील चेन्नईपासून 400 किमी दक्षिणेकडील कराईकुडी येथे राहतात. किशोरवयातच हे काम सुरू करणं त्यांच्यासाठी अवघड होतं. पण त्यांना शाळेत जायचं नव्हतं म्हणून त्यांनी हा पर्याय निवडला.
ते सांगतात, "काही महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर, मी मृत लोकांचे फोटो काढण्यासाठी एकटाच गेलो."

फोटो स्रोत, Ravindran
रवींद्रनने हळूहळू यात आपलं कौशल्य वाढवलं. ते मृताचं डोकं स्थिर राहावं यासाठी शरीराच्या मानेखाली उशीचा वापर करतात. त्यांचे कपडे नीटनेटके करून मग फोटो काढून मागील बॅकग्राऊंड बदलतात.
रवींद्रन म्हणतात "मी माझ्या मनातल्या भीतीशी लढलो आणि नंतर मला माझं काम आवडू लागलं. मी काढलेल्या फोटोंमध्ये मृत व्यक्ती जिवंत असल्याचं भासतं."
हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती
रिचर्डची सुरुवात यापेक्षाही आधी झाली होती. चेन्नईच्या पश्चिमेला सुमारे 350 किमी अंतरावर असलेल्या येरकौड परिसरात ते त्यांच्या वडिलांसोबत काम करायचे.
मृत नवजात बाळाचे फोटो काढणं त्यांच्यासाठी खूप अवघड होतं. त्या बाळाचे 'आई-वडील असह्यपणे रडत होते.
फोटोग्राफर आल्यानंतर आईने आंघोळ करून बाळाला नवीन कपडे घातले आणि त्याला टिकली पावडर लावली.

फोटो स्रोत, Richard Kennady
रिचर्ड सांगतात, "बाळ बाहुलीसारखे दिसत होते, आईने बाळाला तिच्या मांडीवर बसवले आणि मी फोटो काढला. ते बाळ झोपल्याचा भास होत होता. ती परिस्थिती खूप भावनिक होती."
त्यांनी बाळाला अंघोळ घालताना, त्याला फुलांनी सजवतानाही फोटो काढले. काही कुटुंबं एक किंवा दोन फोटो काढून समाधान मानतात, तर काहीजण जास्त फोटो काढतात.
रवींद्रन सांगतात, "मी स्मशानभूमीतही गेलोय आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करतानाचे क्षणही मी टिपले आहेत."
फोटोग्राफरकडे फार कमी वेळ असतो. त्यांना एका रात्रीत फोटो डेव्हलप करून त्याची प्रिंट काढावी लागते. कारण दुसऱ्या दिवशीच्या इतर धार्मिक विधीसाठी मृतांचे फ्रेम केलेले फोटो आवश्यक असतात.

फोटो स्रोत, Richard Kennady
रवींद्रन आणि रिचर्ड दोघांनीही कृष्णधवल कॅमेरे वापरले आहेत. पण त्यांनी त्यांचं काम नीट पार पाडलंय.
या दोघांकडे हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबातील लोक जास्त येतात. ही कुटुंबं मृतांचे फ्रेम केलेले फोटो त्यांच्या देवघरात लावतात.
रवींद्रन यांनी केवळ दोन मृत मुस्लीम पुरुषांचे फोटो काढले आहेत, तर रिचर्ड यांनी एकाही मुस्लीम व्यक्तीचे फोटो काढलेले नाहीत.
दुःस्वप्न...
रिचर्ड यांनी पोलूस खात्यासाठीही काम केलंय. त्यांना अनेक छिन्नविच्छिन्न मृतदेहांचे फोटो काढावे लागलेत. यात गुन्हेगारी, आत्महत्या, रस्ते अपघातांचे बळी अशा विकृत मृतदेहांचे फोटो काढावे लागतात.
रिचर्ड सांगतात, "हे खूप त्रासदायक असतं. कधीकधी तर अशी वेळ येते की मला जेवावसं वाटत नाही, झोप येत नाही."
त्यांनी काढलेले फोटो न्यायालयात पुरावा म्हणून वापरले जातात. त्यामुळे कुटुंबांना नुकसानभरपाई मिळण्यास मदत होते.

फोटो स्रोत, Heritage Art/Getty
फोटोग्राफर्सना अशा प्रकारच्या कामासाठी चांगले पैसे मिळतात. मृतदेहांचे फोटो काढण्यासाठी ते त्यांच्या नेहमीच्या दरापेक्षा जास्त दर आकारतात. त्यांना कधीकधी नातेवाइकांकडून जास्तीचे पैसेही मिळतात. पण अशा कामाचे परिणामही तेवढेच वाईट असतात."
रिचर्ड सांगतात, "जसं की, अनेक ग्राहक मला इतर कोणत्याही कामासाठी बोलावत नाहीत."
रवींद्रन हिंदू आहेत. त्यांचे कुटुंबीय मृत्यूशी संबंधित कोणत्याही ठिकाणांना अपवित्र मानते. म्हणून त्यांना त्यांच्या घरात किंवा स्टुडिओमध्ये जाण्यापूर्वी सक्तीने शुचिर्भूत व्हावे लागते.
ते सांगतात, "मला प्रत्येक वेळी आंघोळ करावी लागते. माझे बाबा त्यांचा कॅमेरा स्टुडिओत नेण्यापूर्वी त्यावर थोडे पाणी शिंपडायचे."
पूर्वी अनेक देशांमध्ये मृत्यूनंतर फोटो काढण्याची प्रथा होती.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात, अनेक शोकग्रस्त कुटुंबं त्यांच्या मृत मुलांसोबत किंवा नातेवाईकांसोबत उभं राहून फोटो काढायचे.
त्या काळात फोटो काढणं परवडणारी गोष्ट नव्हती. अनेक लोक जिवंत असताना स्वतःची आठवण राहावी म्हणून कधीच फोटो काढायचे नाहीत. मात्र आपल्या प्रियजनांचा मृत्यू झाल्यास त्यांची आठवण म्हणून त्यांचे फोटो काढायचे.

फोटो स्रोत, Ravindran
अमेरिकेत लोक त्यांच्या प्रियजनाचा मृत्यू झाल्यावर त्याचं शरीर बर्फाच्या एका ब्लॉकवर ठेऊन फोटो घ्यायचे.
अनेक नातेवाईकांना, कुटुंबातील सदस्यांना अंत्यसंस्कारासाठी वेळेत येता येणं शक्य नसायचं त्यांच्यासाठी हे फोटो खूप महत्त्वाचे असायचे.
व्हिक्टोरियन काळात ब्रिटनमध्ये मृतांचे फोटो काढण्याची पद्धत रुढ होती.
त्या काळात बऱ्याच शहरांमध्ये गोवर, डायरिया, स्कार्लेट फीवर, रुबेला यांची प्राणघातक साथ आलेली असायची. अशा शहरात लोकांचा मृत्यू कधी होईल हे सांगता यायचं नाही. शिवाय त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात स्वतःचा एकही फोटो काढलेला नसायचा.
अशावेळी शेवटची आठवण म्हणून शवविच्छेदनाचा फोटो मिळवणं हीच त्यांच्यासाठी शेवटची संधी असायची.
परंतु 20 व्या शतकात जगातील बहुतेक भागांमधील ही प्रथा नाहीशी झाली. कारण आरोग्यसेवेमुळे लोकांचं जीवनमान सुधारलं, आयुर्मान वाढलं. पण तामिळनाडू आणि इतर भारतीय राज्यांमध्ये ही प्रथा बराच काळ अस्तित्वात होती. यात पश्चिम बंगाल, ओडिशा, वाराणसी या शहरांचा समावेश आहे.
रिचर्ड म्हणतात, पूर्वीच्या काळी चित्र काढली जायची, पण फोटोचं तंत्र अस्तित्वात आल्यावर बदल होत गेले.

फोटो स्रोत, Richard Kennady
"फोटोग्राफीच्या शोधापूर्वी मोठे जमीनदार कलाकारांना त्यांचे चित्र काढण्यासाठी पैसे द्यायचे."
"एखाद्याची स्मृती जतन करण्यासाठी ज्या पद्धतीने चित्रं काढली जायची, त्याचप्रमाणे फोटोग्राफी केली जाऊ लागली. केवळ श्रीमंतांनाच चित्रं काढून घेणं परवडत होतं. पण फोटोग्राफी गरीबांच्या आर्थिक आवाक्यातली होती."
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात, कॅमेरे स्वस्त झाले. त्याचा वापर करणं सर्वांना शक्य होतं. त्यामुळे फोटोविषयीची जी भीती लोकांच्या मनात होती, ती नाहीशी होऊ लागली.
रिचर्डने सांगतात, "अनेकांनी छोटे कॅमेरे विकत घेतले आणि फोटो क्लिक करायला सुरुवात केली."
आता रिचर्ड सारख्या फोटोग्राफरची मागणी कमी झाल्यामुळे, त्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी चर्चचे कार्यक्रम आणि उत्सव, सणसमारंभाचे फोटो काढायला सुरुवात केली.
रवींद्रन आता शालेय कार्यक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे फोटो काढतात. आता ते लग्नाचेही फोटो काढतात.
ज्या मृत लोकांमुळे त्यांना रोजगाराचं साधन मिळालं होतं त्यांचे ते आभार मानतात. ते म्हणतात, "त्यांच्यामुळेच आम्हाला कौशल्य विकसित करायला मदत मिळाली. त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या भीतीवर मात केली."
"माझ्या मृत्यूनंतर कोणीही माझा फोटो काढावा अशी माझी इच्छा नाही," हे ही ते स्पष्टपणे सांगतात.
रिचर्डने आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांचाही फोटो काढला आणि त्यात त्यांच्या पूर्वजांच्या तीन पिढ्यांचे फोटो आहेत. त्यांच्याकडे अशा मृतांच्या फोटोचा मोठा संग्रह आहे.
रिचर्ड म्हणतात, "आमच्या कुटुंबाने नेहमीच आमच्या पूर्वजांचे फोटो जपले. मी माझ्या धाकट्या मुलाला सांगितलंय की त्याने माझ्या मृत्यूनंतर असाच फोटो काढावा जेणेकरून तो फोटो कौटुंबिक वारशाचा भाग होईल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








