अक्षय परांजपे : थरथरत्या हातांनी जेव्हा तो फोटोग्राफी करतो...

अक्षय परांजपे
फोटो कॅप्शन, अक्षय परांजपे
    • Author, विशाखा निकम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अक्षय परांजपे गेले काही वर्ष पुण्यात फोटोग्राफी करतोय. त्याला 'विल्सन' हा दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. तरीही तो कोणतेही फोटो अगदी परफेक्ट क्लिक करतो, ते एडिट करतो. कारण फोटोग्राफी ही अक्षयची पॅशन आहे.

या आजारात रुग्णाचं शरीर स्थिर राहात नाही अगदी पूर्ण वेळ शरीराला कंप येतो.

असं म्हणतात की फोटोग्राफीसाठी आपलं शरीर आणि मन स्थिर असावं लागतं, आपल्या हालचालींवर आपल्या मनावर नियंत्रण असेल तर तुम्ही चांगले फोटोग्राफर बनू शकता. अर्थात तुम्हाला त्याची आवड आणि तसं व्हिजनही असणं आवश्यक आहेच.

'विल्सन' आजार झाल्याचं कसं कळलं?

विल्सन आजार झाल्याचं अक्षयला 2011 मध्ये कळलं होतं. 2010 च्या डिसेंबरपासून या आजाराची लक्षणं त्याला दिसायला लागली होती. त्याचं वय तेव्हा जेमतेम 16 वर्षं होतं. त्याची वागणुक बदलली होती.

हा आजार काय आहे हे त्याच्या कुटुंबियांना सुरुवातीला कळलंच नाही. त्याचे वडील संतोष परांजपे सांगतात, 'तो काहीतरी वेगळंच वागू लागला होता. जो मुलगा खूप बिनधास्त होता, अभ्यासू होता, जो उत्कृष्ट बॅडमिंटन खेळायचा आणि एकावेळी 108 सूर्यनमस्कार घालायचा तो अचानक शांत झाला होता.

तो रस्ता क्रास करायला घाबरायला लागला होता, शाळेत जाताना आई-बाबाच सोबत हवेत असा हट्ट करायला लागला होता. हळूहळू त्याच्या तोंडातून लाळ गळायला सुरुवात झाली होती. त्याचे हात-पाय अर्थात संपूर्ण शरीर हलायला लागलं होतं. '

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

'विल्सन' आजारात नेमकं काय होतं?

या आजारात शरीरामध्ये अतिरिक्त तांबं म्हणजेच कॉपर जमा होतं. रुग्णाच्या शरिरात हेवी कॉपर डिपॉझीट होतं. हे का होतं तर, आपल्या शरिरातील कॉपर बाहेर काढून टाकणारा जो एमझाईम असतो तो कमी होतो त्यामुळे कॉपर बाहेर जात नाही. आणि त्याचं डिपॉझीशन व्हायला सुरू होते.

मुख्यत: ते आपल्या ब्रेन आणि लिव्हरवर होतं. अक्षयचे वडील सांगतात की, दुर्दैवानं त्यांना अक्षयच्या आजाराबद्दल कळेपर्यंत त्याचा लिव्हर आणि ब्रेन दोन्ही मेजर कॅप्चर झाले होते. पहिली 3 वर्ष तो पूर्णपणे बेडवर होता त्याला काहीच करता येत नव्हतं. त्याला अंघोळ घालणं, भरवणं या सगळ्याच गोष्टी त्याचे वडील, आई आणि लहान बहीण करत होते.

अक्षय परांजपे
फोटो कॅप्शन, अक्षय परांजपे

'डॉक्टरांनी हे सांगितलंय की, यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये सुधारणा होणार नाही. पण ठीक आहे, आम्ही हा विचार करतोय की, या आजारात तर खरंच डेथ रेशव 60-70 टक्के असेल तर आमचा मुलगा आम्हाला दिसतोय हेच आमच्यासाठी खूप आहे. ' असं अक्षयचे वडील सांगतात.

'माझा आजार फोटोग्राफीच्या मध्ये कधीच आला नाही'

शरिराला कंप येत असेल तर सहजच कॅमेरा हातातून घसरू शकतो किंवा एखादा सुंदर क्षण कॅप्चर करता आला नाही असं होऊ शकतं. पण अक्षयच्या बाबतीत असं कधीच घडलं नसल्याचं तो सांगतो. याउलट त्यानं त्याच्या आयुष्यातील अनेक सुंदर क्षण टिपलेत.

अनेक जेष्ठ अभिनेत्यांचे फोटोशूट्स तो करतो. वयाच्या 27 व्या वर्षी त्यानं पुण्यात स्वत:चा स्टुडिओ सुरू केलाय. यात तो प्रोडक्ट फोटोग्राफी, पोटरेट फोटोग्राफीसारख्या अनेक प्रकारचे फोटोज क्लिक करतो. याशिवाय प्री-वेडींग आणि फॅशन फोटोग्राफीचंही अक्षयला वेड आहे.

सचिन पिळगावकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, शिल्पा तुळसकर, संदीप खरे अशा दिग्गज कलाकारांसोबत आपल्या कामाची सुरुवात झाल्यामुळे फोटोग्राफीला जास्त ग्रीप मिळाली असा अक्षयचा विश्वास आहे. संधी अनेकदा आपल्याला मिळते पण त्या संधीचा योग्य उपयोग करता आला पाहिजे जो मी केला अशा शब्दात अक्षय स्वत:च्या करियरबदद्ल सांगतो.

अक्षय असा बनला फोटोग्राफर

फोटोग्राफी अक्षयला आवडत होती. मोबाईलमध्ये तो कधीतरी फोटो क्लिक करायचा मात्र त्याला कॅमेरा हवाय असं सांगताच त्याच्या आजोबांनी त्याला DSLR कॅमेरा घेऊन दिला. आजोबांमुळेच त्याच्या या फोटोग्राफीच्या कलेला वाव मिळाला.

तो रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉलेजला दांडी मारुन रत्नागिरीचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करायचा. एक 40 हजारांचा कॅमेरा घेतल्यावर त्याला अजून मोठा 5D कॅमेरा हवा होता. त्याच्या आजोबांनी तोही हट्ट पूर्ण केला. अक्षयला आता नव्या आणि मोठ्या शहरात जायचं होतं.

अक्षय परांजपे
फोटो कॅप्शन, अक्षय परांजपे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्याने ठरवलं होतं की पुणे गाठायचं. त्याचे कुटुंबिय याबद्दल काळजीत होते मात्र धाडस करत त्यांनी अक्षयला पुण्यात पाठवलं आणि अक्षयचा फोटोग्राफर म्हणून प्रवास सुरू झाला. सुरुवातीला चित्रपटांच्या सेटवर जाऊन तो लाईट्सची कामं शिकू लागला, मग त्याचं कॅमेरा शिकण्याची इच्छा दाखवली.

सेटवर असलेल्या कलाकारांचे तो आपल्या कॅमेऱ्यात फोटो क्लिक करू लागला आणि त्यानं क्लिक केलेले फोटो कलाकारांना आवडायला लागले. आता अक्षय मोठ-मोठाल्या सभा, कार्यक्रम अशा ठिकाणी जाऊन हजारो लोकांसमोर आत्मविश्वासानं स्वत:चं काम प्रामाणिकपणे करतो.

संशोधनानुसार, या आजारात 70 टक्के लोकांचा मृत्यू होतो. अक्षय म्हणाला की, 'आजार डिटेक्ट झाला तेव्हा कळलं की 70 टक्के लोकांचा यात मृत्यू होतो, मी म्हटलं 30 टक्के तर जगतात ना? जी 30 टक्के जगतात तीसुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून जगतात.

सतत कुणाचा तरी आधार घेऊन जगतात पण आपण जर त्यांच्या दोन पायऱ्या वर गेलो तर ते कोणाला चालणार नाही. मला ही हवं होतं की मी आयुष्यात काहीतरी करावं. कारण मला माहिती होतं की, जर माझा बाप माझ्यासाठी त्याची आयुष्यभराची पुंजी लावायला तयार आहे तर मी नक्कीच जगून काहीतरी नक्कीच करू शकतो.'

कटू अनुभवांवर मात

सगळंच असं छान होत नसतं आयुष्यात, मोठं होण्यासाठी अनेक कटू अनुभवांनासुद्धा सामोरं जावं लागतं. अक्षय गेली 4 वर्षं स्वतःच्या हिंमतीवर पुण्यात राहतोय. पण जेव्हा तो पहिल्यांदा पुण्यासारख्या शहरात आला तेव्हा नवख्या शहरात त्याच्या आजारावरुन थट्टा झाल्याचा अनुभवही त्याला आला होता.

अक्षयनं तो अनुभव सांगितला, 'मी पुण्यात नवीन होतो तेव्हा, मी एक अस्सल पुणेरी अनुभव सदाशीव पेठेत घेतला होता. मी एस.पी कॉलेजजवळून सकाळी 9.30 च्या दरम्यान चालत जात होतो. समोर 40-45 वर्षांचे काका उभे होते, तेव्हा माझ्या पाठीवर जड कॅमेऱ्याची बॅग होती ते समोरुन गेले आणि पुन्हा मागे वळून परत आले, मला थांबवलं आणि म्हणाले सकाळी-सकाळी घेऊन फिरतोय का?

अक्षयचे कुटुंबीय
फोटो कॅप्शन, अक्षयचे कुटुंबीय

'हा अनुभव वाईट होता. एखाद्या माणसाला जर तुम्ही ओळखत नसाल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल. तर तुम्ही तू असा का चालतोय? असा प्रश्न विचारू शकता. त्यांनी चुकीच्या पद्धतीनं प्रश्न विचारला म्हणून मीही त्यांना उत्तर दिलं, हो काका एकत्र बसून घेऊयात का? तुमचे पैसे मी देतो. पण त्यांचं ते वाक्य ऐकून त्याच गोष्टीचा विचार करत बसलो असतो तर मला पुण्यात एकटं राहणं शक्यच झालं नसतं.'

अशा कटू अनुभवांवर मात करत अक्षय आत्मविश्वासानं आपली फोटोग्राफी करतोय. रोजची औषधं, आणि रोजच्या कामाचा आनंद घेत त्याचं काम सुरू असतं.

'कुटुंबियांशिवाय हे सगळं शक्य झालं नसतं.'

प्रत्येक अडचणीत आपल कुटुंबच आपल्या सोबत असतं हे आपण नेहमी ऐकतो, पण अक्षयच्या बाबतीत हे अगदी खरं ठरलंय. आजार झाल्यापासून अक्षयचे आई-वडील आणि बहीण आकांशा त्याच्यासोबत अगदी कणखरपणे उभे राहीले. त्याला प्रत्येकवेळी सांभाळलं, त्याच्या औषधांपासून ते त्याची दिवसभरातील कामांपर्यंत त्याच्या कुटुंबियांनी त्याची खास काळजी घेतली आणि स्वत:च्या पायावर उभ होण्याची हिंमत दिली.

पण अक्षयची काळजी घेत असताना आकांशाच्या बालपणी तिच्यावर लक्ष देता आलं नाही, किंवा तिला वेळ देता आला नाही याची संतोष यांना खंत आहे.

आयुष्यात आपली स्वप्न खूप लवकर पूर्ण होत असल्याचं अक्षय सांगतो. सोबतच त्याची स्वप्न पूर्ण होण्याचं श्रेय तो त्याच्या कुटुंबालाच देतो.

'एक गोष्ट आहे, जर मी माझं स्वप्न पूर्ण केलं पण जर मी एकटा असतो तर मी 10 जन्म घेतले असते तरी पूर्ण करू शकतो नसतो. माझ्या मागे माझा बाबा, माझी आई, आजोबा - आजी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी बहीण होती.'

वडिलांनी अशी दिली हिंमत

अक्षयचा आजार खूप दुर्मिळ आहे. सुरुवातीला काही वर्ष त्याला चालता-बोलता येत नव्हतं. अगदी ठणठणीत असलेला एखादा मुलगा अचानक या परिस्थितीत येणं किती अवघड असू शकतं याचा विचारही करणं अवघड आहे. अक्षयसोबतही हेच घडत होतं, अशात त्याच्या वडिलांनी त्याला अनेक गोष्टींची जाणीव करुन दिली.

'एक दिवस ट्रेन लागली होती. तो घाबरला की अरे बाबा गाडी लागली आहे आपण पोहोचणार कसं? मी म्हटलं टेंशन घेऊ नको तुझा बाप बरोबर आहे. तू लहानपणी माझ्या पाठावर बसायचास ना तसा बस. आपण लहान मुलांना कांदेबटाटे सारखं घेतो तसं मी त्याला पाठीवर बसवलं, तो बसायला तयार नव्हता. त्याला लाज वाटत होती.

त्याला बोललो हे बघ, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव. त्याला आधी बसवलं पाठीवर. लोक टकामका बघत होते त्यामुळे तो लाजत होता. मी त्याला सांगितलं म्हटलं तुला जर आयुष्यात सुखात जगायचं असेल तर लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात याचा आयुष्यात कधी विचार करू नकोस. माणसानं निर्लज्ज बनल्याशिवाय तो सुखानं जगू शकत नाही.'

अक्षयचे वडील
फोटो कॅप्शन, अक्षयचे वडील

'त्याचा फायदा असा झाला की, आता या स्टेजला तुम्ही हजारो लोकांच्या पुढे जरी त्याला सांगितलं की तुला भाषण द्यायचं आहे तरी लोकांना कळतंय की नाही याचं त्याला घेणंदेणं नसतं. तो बिनधास्त स्टेजवर जाऊन बोलतो.'

सध्या अक्षय मोठ-मोठ्या सभा, नाटकं चित्रपटाचे सेट्सवर अगदी आत्मविश्वासानं फोटोग्राफी करतो. रोज सकाळी त्याची औषधं घेऊन तो दिवसभरातली स्वत:ची सगळी कामं स्वत: करतो. मला हव्या त्या सगळ्या गोष्टींचा मी आनंद घेतो आणि माझं काम अभिमानानं करतो असं अक्षय अगदी ठामपणे सांगतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)