बांगलादेशमधील नेते भारतीय उच्चायुक्तांच्या हकालपट्टीची मागणी का करत आहेत? भारतावर उपस्थित केलेत 'हे' प्रश्न

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या 'सेव्हन सिस्टर्स' राज्यांना वेगळं करण्याची धमकी दिल्यानंतर बुधवारी (17 डिसेंबर) बांगलादेशच्या नॅशनल सिटिझन पार्टीचे (एनसीपी) दक्षिण विभाग प्रमुख संघटक हसनत अब्दुल्ला यांनी भारताच्या उच्चायुक्तांना देशाबाहेर काढायला हवं होतं, असं म्हटलं.
बांगलादेशात फेब्रुवारी 2026 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत एनसीपीने हसनत अब्दुल्ला यांना कुमिल्ला-4 मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
17 डिसेंबरला कुमिल्ला येथील देबीद्वार येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना हसनत अब्दुल्ला यांनी भारतात बांगलादेशच्या उच्चायुक्तांना बोलावल्याबद्दल आक्षेप घेतला.
ते म्हणाले, "भारताच्या या भूमिकेला आपण कठोर प्रतिक्रिया द्यायला हवी होती. भारतीय उच्चायुक्तांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे होते, कारण भारत शेख हसीना यांना आश्रय देत आहे."
दरम्यान, भारताने दिल्लीतील बांगलादेशचे उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांना बोलावून, ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
हसनत अब्दुल्ला म्हणाले की, भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध परस्पर सन्मानावर आधारित असायला हवेत.
ते म्हणाले, "भारताने बांगलादेशप्रती तितकाच सन्मान दाखवला, तरच बांगलादेश भारताची सार्वभौमता आणि सीमांचा आदर करेल. जर तुम्ही 'दिसताच गोळी मारण्याच्या' धोरणावर विश्वास ठेवत असाल, तर आम्ही 'दिसताच सलाम करण्याच्या' धोरणावर का चालावं?"

फोटो स्रोत, @hasnat2471
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधील अनेक नेते भारताविरोधात आक्रमक वक्तव्यं करताना दिसत आहेत.
या आरोपांना फेटाळून लावत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बांगलादेशातील अलीकडील काही घटनांबाबत कट्टरपंथी घटकांनी पसरवलेल्या खोट्या कथनाला आम्ही पूर्णपणे नाकारतो. ही दुर्दैवी बाब आहे की, अंतरिम सरकारने या घटनांची सखोल चौकशी केलेली नाही किंवा या संदर्भात भारतासोबत कोणतेही ठोस पुरावेही सादर केलेले नाहीत."
बांगलादेशमध्ये भारताबाबत नाराजी
भारताविरोधात हसनत अब्दुल्ला यांच्या आक्रमक भूमिकेबाबत बांगलादेश मुक्त विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापक आरिफा रहमान रूमा म्हणतात की, मोहम्मद युनूस कट्टरपंथींना प्रोत्साहन देत आहेत.
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर हसनत यांचा एक व्हीडिओ पोस्ट केला. यामध्ये ते भारतीय उच्चायुक्तांना देशाबाहेर काढण्याबाबत बोलत आहेत.

फोटो स्रोत, @sajeebwazed
आरिफा रहमान रूमा यांनी 'एक्स'वर लिहिलं, "बांगलादेश धोकादायक पद्धतीने नियंत्रणाबाहेर जात आहे. हसनत अब्दुल्ला यांनी जाहीरपणे भारतीय उच्चायुक्तांना देशाबाहेर काढलं पाहिजे, असं म्हटलं आहे. कोणताही जबाबदार नेता कधीही असे विधान करणार नाही. हसनत आणि त्यांचे समर्थक यांच्यासारखे अतिरेकी आणि हिंसक विचारसरणीचे लोक आता मोहम्मद युनूस यांना पाठिंबा देणारी एकमेव खरी शक्ती बनले आहेत."
"ज्या देशात युनूस यांचे नेते सार्वजनिक सभांमध्ये उघडपणे असं म्हणू शकतात की, ते शेजारच्या देशाच्या उच्चायुक्तांना देशाबाहेर हाकलून लावतील, तिथे सामान्य लोकांना दिवस-रात्र किती असुरक्षित वाटत असेल, हे स्पष्ट होतं."
"अशा बांगलादेशात आता सामान्य नागरिकांना ना आपल्या जीविताची सुरक्षितता वाटते, ना आपल्या मालमत्तेची. देशातील कायदा-सुव्यवस्था आणि राजकीय संयम पूर्णपणे कोसळल्याचं चित्र हे कठोर वास्तव उघड करते," असंही त्यांनी नमूद केलं.
शेख हसीना यांच्या मुलाने काय म्हटलं?
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या ईमेल मुलाखतीत म्हटले आहे की, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार इस्लामिक राजवट स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
बांगलादेशातील सध्याची परिस्थिती भारतासाठी वाढता धोका निर्माण करत आहे, असा इशाराही 54 वर्षीय वाजेद यांनी दिला. ते सध्या अमेरिकेत राहतात.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी पाकिस्तानची वाढती जवळीकता याबद्दल वाजेद म्हणाले, "ही भारतासाठी गंभीर चिंतेची बाब असली पाहिजे. आमच्या अवामी लीग सरकारने भारताच्या पूर्वेकडील सीमांचे सर्व दहशतवादी कारवायांपासून संरक्षण केले. त्यापूर्वी, भारतात बंडखोरी निर्माण करण्यासाठीचा तळ म्हणून बांगलादेशचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता."
"आता ती परिस्थिती परत येईल. युनूस सरकारने जमात-ए-इस्लामी आणि देशातील इतर इस्लामी पक्षांना मोकळीक दिली आहे. इस्लामी पक्षांना बांगलादेशात कधीही 5 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. सर्व पुरोगामी आणि उदारमतवादी पक्षांवर बंदी घालून आणि गोंधळात निवडणुका घेऊन, युनूस इस्लामी कट्टरपंथीयांना सत्तेत बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेशचे अंतरिम सरकार देखील भारताप्रती फारशी उदारता दाखवत नाही.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांनी बुधवारी (17 डिसेंबर) भारतावर 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धात बांगलादेशच्या योगदानाला सातत्याने कमी लेखण्याचा आरोप केला.
बांगलादेशच्या स्वातंत्र्यसैनिकांशिवाय हा विजय शक्य झाला नसता, यावर तौहिद हुसेन यांनी भर दिला.
पत्रकारांनी विजय दिवसाच्या निमित्ताने पाठवलेल्या अभिनंदनपर संदेशांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार तौहिद म्हणाले की, कोलकातामध्ये हा दिवस स्वतंत्रपणे 'ईस्टर्न कमांड डे' म्हणून साजरा केला जातो. यावरून दिसतं की, भारत याला आपल्या सशस्त्र दलांचा विजय मानतो.
तौहिद हुसेन म्हणाले, "भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला हे खरे आहे. परंतु बांगलादेशातील विजयाच्या संदर्भात स्वतः भारतीय तज्ज्ञही मान्य करतात की, स्थानिक प्रतिकारामुळे पाकिस्तानी सैन्य कमकुवत झाले नसते, तर भारताला जिंकण्यासाठी खूप जास्त वेळ लागला असता. नुकसान आणि जीवितहानीही खूप जास्त झाली असती. याचा उल्लेख मी माझ्या पुस्तकात केला आहे."
बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धातील भारताच्या भूमिकेबद्दल प्रश्न
ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर, बांगलादेशच्या निर्मितीत भारताच्या भूमिकेबद्दल बरीच चर्चा झाली आहे. अनेक बांगलादेशी नेते भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
डिसेंबर 2024 मध्ये, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) स्थायी समितीचे सदस्य मिर्झा अब्बास म्हणाले होते, "भारताने बांगलादेशची निर्मिती केली नाही. आम्ही बांगलादेशला स्वतंत्र केले. भारताने आमच्या फायद्यासाठी नाही, तर स्वतःच्या फायद्यासाठी पाकिस्तानचे विभाजन केले."
शेख हसीना पंतप्रधान असतानाही, 1971 चा लढा स्वातंत्र्ययुद्ध होते की, भारत-पाकिस्तान युद्ध होते याबद्दल वाद झाला.
पाकिस्तान याला भारतासोबतचे युद्ध म्हणतो, बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध म्हणत नाही. भारतीय पाठ्यपुस्तकांमध्येही ते युद्ध भारत-पाकिस्तान युद्ध म्हणूनच पाहिले जाते. मात्र, भारताला ते बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध आहे, असं म्हणण्यावर कोणताही आक्षेप नाही.

फोटो स्रोत, Getty Images
6 डिसेंबर 2021 रोजी, बांगलादेशचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल एके मोमेन यांनी भारतासोबतच्या राजनैतिक संबंधांच्या 50 व्या वर्षाच्या निमित्ताने बांगलादेशच्या नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली.
मोमेन म्हणाले, "पाकिस्तान बांग्लादेश स्वातंत्र्ययुद्धाला भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध होते. यात भारताने फक्त मदत केली. 6 डिसेंबरला भारताने बांगलादेशला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता दिली."
1971 चे युद्ध पाकिस्तानने पश्चिम आघाडीवर सुरू केले होते. नंतर, भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी युद्ध करण्याचा निर्णय घेतला.
शेख हसीना यांचे विरोधक स्वातंत्र्ययुद्धाच्याही विरोधात आहेत का?
जुलै 2024 मध्ये शेख हसीना यांच्या विरोधात सुरू झालेले आंदोलन बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या विरोधातही असल्याचे दिसून आले.
आंदोलकांनी स्वातंत्र्ययुद्धाच्या अनेक प्रतिकांवर हल्ला केला. बांगलादेशचे संस्थापक मुजीबुर रहमान यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. दुसरीकडे, बांगलादेशचे पाकिस्तानशी संबंध वाढताना दिसत आहेत.
सध्या बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या बाजूने असल्याचा आरोप असणारी 'जमात-ए-इस्लामी' संघटना एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून बांगलादेशात उदयास येत आहे. जमात-ए-इस्लामी देखील बांगलादेशातील भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये बांगलादेशी वृत्तसंस्था 'प्रथम आलो'ला दिलेल्या मुलाखतीत बांगलादेश जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान म्हणाले, "1971 मध्ये आमची भूमिका तत्वावर आधारित होती. आम्हाला भारताच्या फायद्यासाठी स्वतंत्र देश नको होता."
"जर आम्हाला एखाद्याच्या माध्यमातून किंवा कोणाच्या वतीने स्वातंत्र्य मिळाले असते, तर ते एका ओझ्यापासून दुसऱ्या ओझ्यापर्यंत पोहोचण्यासारखे झाले असते. गेल्या 53 वर्षांपासून बांगलादेशमध्ये हे खरे नाही का? आपल्याला असे का ऐकावे मिळते की, एका विशिष्ट देशाला एक विशिष्ट पक्ष आवडत नाही. जर एखाद्या विशिष्ट देशाला ते नको असेल, तर एक विशिष्ट पक्ष सत्तेत येऊ शकत नाही. स्वतंत्र देशात असं घडतं का? बांगलादेशच्या तरुणांना आता हे सर्व ऐकायला आवडत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
जुलै 2024 मध्ये शेख हसीना यांच्याविरुद्ध सुरू झालेले आंदोलन बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाविरोधात रूपांतरित झाले आहे का?
बांगलादेशची इंग्रजी वृत्तसंस्था 'प्रथम आलो'ने प्रसिद्ध विचारवंत आणि 'सेंटर फॉर पॉलिसी डायलॉग'चे संस्थापक रहमान सोभन यांना हाच प्रश्न विचारला. त्यांनी उत्तर दिले, "जुलैतील आंदोलन लोकशाही अपयश आणि अन्याय्य शासनामुळे झाले होते."
"स्वातंत्र्ययुद्धाच्या विरोधकांनी या आंदोलनाचा फायदा घेतला. स्वातंत्र्ययुद्धाचे विरोधक मोठा काळा बांगलादेशच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी आंदोलनात घुसखोरी केली आणि कदाचित त्याची दिशा निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे अनेकदा एकाधिकारशाही राजवटीविरुद्धच्या लोकप्रिय आंदोलनांमध्ये घडताना दिसून येते."
रहमान सोभन पुढे म्हणाले, "बांगलादेशच्या अंतरिम सरकारमध्ये अशा विरोधकांचा उदय स्पष्टपणे दिसून येतो. निवडणुकीत ते जिंकण्याची शक्यताही मोठी आहे. ते राजकीयदृष्ट्या हुशार नेत्यांच्या नेतृत्वाखाली, स्वातंत्र्ययुद्धाबाबतच्या त्यांच्या भूमिका काही सावधगिरीने मांडत जातील. असं असलं तरी, 1971 मधील त्यांची भूमिका रुजवणं हा त्यांच्या रणनीतीचा अविभाज्य भाग राहील."
आतापर्यंत काय घडलं?
विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशची राजधानी ढाकामधल्या अनेक भागात गुरुवारी (18 डिसेंबर) हिंसाचार उफाळून आला.
दोन वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले, तोडफोड आणि जाळपोळ झाली असून, भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरही जमाव जमला आणि दगडफेकीच्या घटना घडल्या.
हादी हे गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित नेते होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी ढाकामध्ये उस्मान हादी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, ज्यात ते गंभीर जखमी झाले होते.
15 डिसेंबरला त्यांना एअरलिफ्ट करून उपचारांसाठी सिंगापूरला नेण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान (18 डिसेंबर) त्यांचा मृत्यू झाला. उस्मान हादीच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर आंदोलक रस्त्यावर उतरले.

फोटो स्रोत, Getty Images
ताज्या घडामोडींमुळे बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत.
त्यातच बांगलादेशातील काही नेत्यांनी भारताविरोधात वादग्रस्त विधानं केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढला आहे.
दरम्यान, बुधवारी बांगलादेशच्या नॅशनल सिटिजन पार्टी (एनसीपी)चे दक्षिण विभागाचे मुख्य संघटक हसनत अब्दुल्ला यांनी इशारा देत म्हटलं होतं की, "जर बांगलादेश अस्थिर केला गेला, तर भारताच्या ईशान्येकडील 'सेव्हन सिस्टर्स' राज्यांना वेगळं पाडलं जाईल."
त्यांनी भारताच्या उच्चायुक्तांना देशाबाहेर काढण्याची मागणीही केली होती.
या विधानामुळे दोन्ही देशांमधील आधीच 'नाजूक' असलेले संबंध आणखी ताणले गेले. आणि भारत सरकारने दिल्लीमध्ये बांगलादेशच्या राजदूतांना बोलावून करून भारतीय उच्चायोगाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
मात्र, बांगलादेशच्या अंतरिम सरकारची भारताबाबतची भूमिका फारशी नरम राहिलेली नाही.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांनी बुधवारी (17 डिसेंबर) भारतावर 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धात बांगलादेशच्या योगदानाला सातत्याने कमी लेखण्याचा आरोप केला.
बांगलादेशच्या स्वातंत्र्यसैनिकांशिवाय हा विजय शक्य झाला नसता, यावर तौहिद हुसेन यांनी भर दिला.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत बांगलादेशी उच्चायुक्तांच्या निमंत्रणावर दोन्ही देशांमधील ऐतिहासिक मैत्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सध्याचे आणि माजी भारतीय मुत्सद्दी, लष्करी अधिकारी तसेच थिंक टँकचे सदस्य सहभागी झाले होते.
मात्र, या मैत्रीपूर्ण संबंधांचं संपूर्ण चित्र एका रात्रीत पूर्णपणे बदलून गेलं. बुधवारी सकाळी भारताने बांगलादेशच्या उच्चायुक्तांना साऊथ ब्लॉकमध्ये बोलावून घेतल्याचं वृत्त प्रकाशित झालं.
दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांनंतरही दिल्ली आणि ढाका यांच्यात सर्व काही आलबेल नाही, याची पुन्हा एकदा सर्वांना जाणीव झाली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











