'वडिलांनी मला 10 वर्षांची होईपर्यंत मुलगा म्हणूनच वाढवलं, इतरांनी त्यावर विश्वास ठेवला आणि...'

निलोफर अयुबी

फोटो स्रोत, NILOFAR AYOUBI

चार वर्षांची निलोफर अयुबी उत्तर अफगाणिस्तानमधील कुंदुझच्या रस्त्यावर खेळत होती. तिथेच एका व्यक्तीने येऊन तिला मारहाण करायला सुरुवात केली. त्या व्यक्तीच्या माराने निलोफर जमिनीवर पडली.

ती घटना आठवून निलोफर सांगते, "मग मी रडत घरी आले. माझे वडील रागाने लालबुंद झाले होते."

आज निलोफर 23 वर्षांची आहे. तिला आजही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो.

ती सांगते, "मला आठवतंय, माझे वडील खूप रागावले होते. ते रागाने म्हणाले, तो तिला हात लावूच कसा शकतो."

मारण्याच्या काही क्षण आधी त्या व्यक्तीने निलोफरच्या छातीला स्पर्श केला होता. त्याने तिच्याशी गैरवर्तन केले आणि धमकी दिली की, पुन्हा येईन तेव्हा बुरखा घातला नाही तर तुझ्या वडिलांनाही मारहाण करेन.

अशा काही घटनांनंतर निलोफरच्या वडिलांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

निलोफर सांगते, ''त्यांनी आईकडे कात्री मागितली आणि माझे केस कापून टाकले. त्यांनी मला मुलांसारखे कपडे घालायला सांगितले."

1996 ते 2001 पर्यंत जेव्हा तालिबान अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असताना देश इस्लामिक शरिया कायद्याच्या नियंत्रणाखाली होता. या कायद्यानुसार महिलांवर कडक निर्बंध होते.

निलोफर सांगते की, तुमच्या लिंगामुळे तुमच्या मानवी हक्कांवर मर्यादा येतात.

कुंदुझ येथील बालपण

निलोफरचा जन्म 1996 सालचा, पण तिच्या कागदपत्रांवरील नोंदींमधून तिचा जन्म 1993 मध्ये झाल्याचं दिसतं.

2001 मध्ये तालिबान सरकार उलथून टाकल्यानंतर आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर तिचं शिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

निलोफरने सांगते की, शरियाच्या कठोर नियमांनुसार अफगाणिस्तानातील कुटुंबांमध्ये मुलींनी मुलासारखा पेहराव करणं अतिशय सामान्य आहे.

विशेषत: घरात कोणी मोठा पुरुष नसतो तेव्हा बाहेरचा पुरुष घरात येतो आणि एखाद्या मुलीला पाचवी किंवा सहावी पत्नी म्हणून घेऊन जातो.

बुरख्यातली लहान मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो

"पण मला वडील होते. माझ्या वडिलांनी मला स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला."

अफगाणिस्तानात शरिया कायद्याची कडक अंमलबजावणी होत असताना वडिलांकडे अतिशय खास व्यक्ती म्हणून पाहिले जात होते.

निलोफर म्हणते की, ते राजकारणाचा द्वेष करायचे.

‘मी वडिलांसोबत खेळ पाहायला जायचे’

निलोफर सांगते, "मी माझे केस कापून आणि माझ्या भावांसारखे कपडे घालून माझ्या वडिलांसमोर आले. मी माझ्या वयाच्या इतर मुलींपेक्षा खूप वेगळी दिसत होते. त्यांनी मला माझ्या भावांसारखंच वागवलं."

"मी मुलांसारखे कपडे घालून माझ्या वडिलांसोबत बाजारात जायचे. ते मैलोन मैल चालायचे. खेळ पाहण्यासाठी आम्ही बसमधून प्रवास करायचो. माझे मित्र आमच्या शेजारीच राहायला होते. मी त्यांच्याबरोबर रस्त्यावर खेळायचे."

निलोफर सांगते, "पण माझ्या मोठ्या बहिणी घरीच असायच्या. त्यांचे केस झाकलेले असायचे, त्या पारंपरिक कपडे घालायच्या. खरं तर हे माझ्या वडिलांना मान्य नव्हतं. ते माझ्या आईशी नेहमीच यावरून वाद घालायचे. माझ्या बहिणींचे लांब आणि सैल कपडे पाहून ते आईला प्रश्न विचारायचे. माझ्या वडिलांचे विचार खूप उदारमतवादी होते."

बुरख्यातल्या मुली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

विश्वास संपादन केला

या जगात दोन ओळखी घेऊन जगणं कठीण आहे. निलोफरच्या शेजारच्या घरात एक मुलगी राहत होती. ती देखील लहानपणी निलोफर सारखेच कपडे घालायची.

"आम्ही दोघी एकमेकींना मदत करायचो."

निलोफर कराटे, सायकल आणि ज्युडो शिकली. पण तिच्या मोठ्या बहिणी मात्र घरकामच करायच्या.

निलोफर म्हणते, "माझ्या बहिणींशिवाय माझं जग कसं असतं मला माहित नाही. मुलींना मासिक पाळी येते हे देखील मला माहीत नव्हतं."

एके दिवशी निलोफरने टीव्हीवर सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात पाहिली. त्यांच्यावर पाण्याचे थेंब टाकण्यात आले आणि ते पाण्याचे थेंब बाहेर न येता शोषून घेतात असं जाहिरातीत दाखवण्यात आलं. ते कशासाठी असतं हे निलोफरला समजलं नव्हतं.

निलोफर अयुबीचे वडील

फोटो स्रोत, Nilofar Ayubi's father

फोटो कॅप्शन, निलोफर अयुबीचे वडील
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"टीव्हीवर पाहिलेली ती गोष्ट मला दिसली आणि मी ती विकत घेतली. ती वस्तू मी माझ्या वडिलांना दाखवली, यावर काय बोलायचं त्यांना सुचलं नाही. मी त्यांना सांगितलं की, मी हे टीव्हीवर पाहिलं होतं."

"त्यानंतर ते घेऊन माझ्या बहिणीकडे गेले. तिने माझ्याकडून ते घेतलं आणि माझी चेष्टा केली. त्यावेळी मला मासिक पाळी म्हणजे काय हे सांगायला हवं याचा विचारच कोणी केला नाही."

त्यावेळी निलोफर 13 वर्षांची असेल. ज्युडो खेळल्यानंतर निलोफर खूप थकून घरी आली. तिचे पाय खूप दुखत होते. निलोफरला लवकर झोपायचं होतं.

मात्र बाथरूममध्ये गेल्यानंतर तिला रक्तस्त्राव होत असल्याचं दिसून आलं. तिच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल होणार आहे हे तिला माहीत नव्हतं.

ही गोष्ट निलोफरने दुसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणीला सांगितली तेव्हा तिची मैत्रीण हसली.

निलोफर सांगते, "मी घरी आल्यावर आईला माझ्या कपड्यांवरचे डाग दिसले. मला मिठी मारून तू इतक्या लवकर मोठी का झालीस? असं म्हणत आई रडू लागली."

इतर मुलींप्रमाणे निलोफरचं आयुष्यही आता घराच्या चार भिंतीत बंदिस्त होणार याची जाणीव होऊन तिची आई रडत होती.

यावेळी निलोफरला ती मुलगी आहे हे समजणार होतं.

निलोफर म्हणते, "इंद्रधनुष्याखाली गेल्याने लिंग बदलते असा आमचा गैरसमज होता."

बंडखोर निलोफर

वर्षानुवर्षे मुलासारखं जगणाऱ्या निलोफरने शाळेतील इतर मुलींना नसलेली सुरक्षितता अनुभवली होती.

11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरता सुरू झाली.

सत्तेवर आलेल्या नव्या सरकारवर कायदे कायम ठेवण्याचा प्रचंड दबाव होता. पण, महिलांना शिक्षणासारखे काही अधिकार मिळाले.

याच काळात निलोफर शाळेत जाऊ लागली. विद्रोहाची भावना तिच्या मनात लहानपणापासूनच रुजली होती.

याच काळात त्यांनी निनास 'डेल नॉर्टे' नावाचा गट तयार केला. या गटाच्या माध्यमातून आम्ही मुलींना शाळेत शिक्षण मिळावं यासाठी चळवळ सुरू केली. अफगाणिस्तानात मुलींसाठी सर्व काही निषिद्ध होतं.

स्त्रीत्वाच्या संक्रमणादरम्यान त्यांच्या शरीरात बदल होतात. त्यांना लाज वाटते म्हणून बदल लपविण्यासाठी त्या आपलं शरीर कपड्याने गुंडाळतात. निलोफर सांगते की, यामुळे शरीरातील अवयवांची वाढ रोखली जाते.

बुरख्यातील महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी निलोफर अनेकदा शाळा संचालकांच्या कार्यालयात गेली होती. निलोफर अभ्यासात हुशार असल्याने त्यांनी तिला भारतात पाठवायला मदत केली.

हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल होता. पदव्युत्तर पदवी मिळेपर्यंत तिने खूप कष्ट केले.

लहान असताना तिला लग्नाचे अनेक प्रस्ताव आले. पण, तिच्या वडिलांनी तिला अफगाणिस्तान मध्ये परत न येण्याचा इशारा दिला होता.

निलोफर सांगते, "माझे वडील म्हणायचे तू आत्ताच लग्न करायचं नाहीये. जोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होत नाही आणि तुला आवडणारी व्यक्ती मिळत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही. त्यानंतर मी फक्त माझी पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्याचा विचार केला आणि त्यानंतर लग्नाचा विचार केला."

निलोफरने 2016 मध्ये लग्न केलं. त्या वेळी ती 19 वर्षांची होती. पण, त्याच्या आदल्या वर्षी तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे ती दुःखी होती.

पतीच्या मदतीने निलोफर अफगाणिस्तानात परतली आणि व्यावसायिक बनली. तिने फॅशन, फर्निचर आणि इंटिरियर डिझाइन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपला जम बसवला. तिने पुरुषांकडून आर्थिक मदत न मिळालेल्या महिलांना नोकऱ्या दिल्या.

आज तिच्या व्यवसायात 300 कर्मचारी आहेत. शहरात तिची अनेक दुकानं आहेत.

अफगाणिस्तानातून पलायन

निलोफरच्या कुटुंबाला अफगाणिस्तानात व्यवसायात यश मिळालं असलं तरी देशातील राजकीय अस्थिरतेमुळे महिलांसाठी पुन्हा असुरक्षित वातावरण तयार झालं.

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेण्यास सुरुवात केली.

निलोफर सांगते, "माझ्या पतीला एका सरकारी मंत्र्याचा फोन आला. त्याने मुलीचं ओळखपत्र आणि पासपोर्ट लवकर तयार करून घ्या असं सांगितलं. तेव्हा माझं बाळ 11 महिन्यांचं होतं."

आमच्या दुकानातील कर्मचारीही फोन करून काय करायचं विचारू लागले.

निलोफरने तिच्या बाळाची काळजी घेणाऱ्या केअरटेकरला फोन करून बाळाची बॅग भरायला सांगितली. जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांनी तिला टॅक्सीतून घरी आणलं.

शहरात तणाव वाढत होता. तिने बाळाला घेतलं, बॅग भरली आणि आईच्या घराकडे निघाली.

अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

यावेळी पाहिलेल्या घटनांनी तिचं आयुष्यच बदलून गेल्याचं निलोफर सांगते.

पोलिसांच्या गणवेशातला एक माणूस सायकलवरून येताना दिसला. "माझी बंदूक घे, माझी सायकल घे, मला साधे कपडे दे" अशी विनवणी तो दुसऱ्या व्यक्तीला करत होता.

तालिबान सत्तेवर आल्यानंतर अमेरिकन सरकारसाठी काम करणाऱ्या हजारो लोकांना क्रूरपणे शिक्षा देण्यात आली. काहींना फाशीची शिक्षाही झाली.

निलोफर आईच्या घरी पोहोचू शकली नाही. निलोफरने मुलांना जवळच्या परिसरात लपवून ठेवलं. अफगाणिस्तानात नेमकं काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी जगभरातील अनेक पत्रकारांनी तिला फोन केला.

निलोफर सांगते, "पोलंडमधील एका पत्रकाराने फोन करून विचारलं की तुमचं नाव इव्हॅक्युएशन लिस्टमध्ये आहे का? यावर मी नाही असं सांगितलं. तो पत्रकार म्हणाला मला थोडा वेळ द्या मी पुन्हा फोन करतो. त्यानंतर, त्याने पुन्हा फोन केला आणि सांगितलं की, पोलंडचं एक विमान आहे जे तुम्हाला देशाबाहेर घेऊन जाईल."

पोलंडमधील नवं आयुष्य

त्यानंतर पोलिश पत्रकाराने निलोफरचा एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समावेश केला. पुढचा कॉल आल्यानंतर तिला 24 तासांत दोन सुटकेस घेऊन विमानतळावर जाण्यास सांगण्यात आलं.

"माझ्या घरी माझी आई पवित्र कुराण धरून उभी होती. मी आईला पाहिलं, मला माहित होतं की मी तिला पुन्हा कधीच पाहू शकणार नाही. त्या दिवशी मी माझ्या आईला आणि घराला शेवटचं पाहिलं होतं. तीन दिवसांच्या खडतर प्रवासानंतर मी पोलंडला पोहोचले आणि नवीन आयुष्याची सुरुवात केली."

निलोफर म्हणते, इथे कुटुंबाशिवाय राहणं फार कठीण होतं. विशेषतः माझ्या मुलासाठी. त्याला काबुलची खूप आठवण यायची. "तो वारंवार विचारायचा की आजी कशी आहे, तिला आपल्यासोबत का आणलं नाही."

निलोफरने अफगाणिस्तानात मागे सोडलेल्या तिची आई, तिचे कर्मचारी, बहिणी यांच्यासाठी काम करण्यास सुरुवात केली.

निलोफर अयुबी

फोटो स्रोत, NILOFAR AYOUBI

फोटो कॅप्शन, निलोफर अयुबी

तिने आपल्या देशातील महिलांच्या हक्कांसाठी मानवाधिकार परिषदांमध्ये सहभाग घेत ब्रुसेल्स, जर्मनी आणि अमेरिकेचा प्रवास केला आहे.

महिलांना मदत करणाऱ्या संस्थांसोबत ती काम करते.

अफगाणिस्तानात मुलगा आणि मुलगी म्हणून जगू शकलेल्या निलोफरने सांगितलं की, तिला जे काही मिळालं तो आशीर्वाद तर आहेच पण सोबत शाप देखील आहे.

"मी 100 टक्के मुलगी आहे. पण, दोन्ही आयुष्य जगण्यात मी धन्यता मानते. त्यामुळेच आज मी एक सशक्त महिला म्हणून उभी राहू शकले. मला समजासाठी काहीतरी करून मगच जीव सोडायचा आहे."

वडिलांच्या मार्गदर्शनाने प्रेरित झालेल्या निलोफरने सांगितलं की, "माझ्या हृदयात वडिलांसाठी नेहमीच विशेष स्थान असेल. मला आजही त्यांच्या चेहरा आठवतो. मी नेहमीच राजकारणापासून दूर राहण्याचा विचार केला. मात्र समाजाचं भलं व्हावं या आशेने आपण सर्व ठिकाणी जायला हवं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)