अफगाणिस्तान : लोकांवर आलीय मुलांची विक्री करायची पाळी - ब्लॉग

अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Sanjay Ganguli/BBC News

    • Author, योगिता लिमये
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आम्ही हेरात शहरातून बाहेर पडत असताना वर्दळ असलेल्या रस्त्यांनंतर आम्हाला एक मोकळा हायवे लागला. तोपर्यंत आम्ही तालिबानच्या दोन चौक्या पार केल्या होत्या. आता अफगाणिस्तानात कोणाची राजवट आहे हे त्या सांगून गेल्या.

पहिल्या चौकीवर भेटलेली काही मुलं मनमिळाऊ होती. पण, त्यांनी आमची कार आणि संस्कृती मंत्रालयाकडून मिळालेला परवाना बारकाईने तपासला. आम्ही तिथून निघत असताना असॉल्ट रायफल घेतलेला एक इसम हसतमुखाने आमच्याकडे आला आणि म्हणाला, "तालिबानला घाबरू नका. आम्ही चांगले लोक आहोत."

दुसऱ्या चौकीवर हजर असलेले चौकीदार मात्र थोडे वेगळे होते- थंड आणि काहीसे भीतीदायक.

खरं तर तुमचा सामना कोणत्या प्रकारच्या तालिबान्यांशी होत आहे याचा अंदाज तुम्हाला कधीही घेता येत नाही. अलीकडेच त्यांच्या काही लढाऊ मुलांनी तालिबान्यांचा विरोध करणाऱ्या काही अफगाण पत्रकारांना बेदम मारहाण केली होती. एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यात एका परदेशी फोटोग्राफरला ते आपल्या बंदुकीच्या बटने मारहाण करत होते.

व्हीडिओ कॅप्शन, तस्करांच्या मदतीने आपला देश सोडून अफगाण लोक कुठे चालले आहेत?

दिलासादायक बाब म्हणजे या चेकपॉईंट्सवरून आमची सुटका लवकर झाली. पण जाता जाता इशारा दिल्यासारखं ते म्हणाले, "आमच्याविषयी चांगलंच लिहिलं जाईल याची खात्री करा."

एका लहान मुलाची किंमत 65 हजार

हेरातपासून 15 किलोमीटर दूर असलेल्या एका वस्तीच्या ठिकाणी आम्ही पोहचलो. माती आणि विटांच्या घरांची ही वस्ती होती.

दीर्घकाळापासून दुष्काळामुळे पीडित लोक आपली राहती घरं सोडून इथे स्थलांतरित झाली होती. जवळच्या शहरात काही काम आणि सुरक्षा मिळेल या अपेक्षने ते इथे राहतात.

आम्ही कारमधून बाहेर पडताच धूळ उडाली, हवा बोचरी होती, काही आठवड्यातच इथे कडाक्याची थंडी सुरू होईल. गरिबीने हतबल होऊन खरंच इथले लोक आपल्या मुलांना विकतायत का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो.

अफगाणिस्तान, लहान मुलगी

फोटो स्रोत, Sanjay Ganguli/BBC News

मी जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मनात विचार केला की अशी एखादीच घटना असावी. पण आम्ही जे अनुभवलं त्यासाठी माझ्या मनाची तयारी झाली नव्हती.

आम्ही तिथे पोहचल्यानंतर एका व्यक्तीने आमच्या टीमच्या सदस्याला थेट विचारलं, 'तुम्ही आमचं मूल खरेदी करणार का?' या बदल्यात ते जवळपास 65 हजार रुपयांची मागणी करत होते.

यावर माझ्या सहकाऱ्याने त्यांना विचारलं, 'तुम्हाला मूल का विकायचंय?' ते म्हणाले, 'आमची आणखी 8 मुलं आहेत. त्यांना देण्यासाठी आमच्याकडे अन्न नाही.'

अन्नासाठी मुलांची विक्री करण्यासाठी हतबल

आम्ही थोडं पुढे गेलो नाही तोपर्यंत एका लहान मुलीला घेऊन आमच्याकडे एक महिला आली. ती घाईघाईत आणि घाबरत बोलत होती. पैशांची अत्यंत आवश्यकता असल्याने तिने तिच्या दीड वर्षांच्या मुलाला आधीच विकलं असल्याचं ती सांगत असल्याचं आम्हाला आमच्या दुभाष्याने सांगितलं.

आम्ही त्यांना आणखी काही विचारण्याआधीच आमच्याजवळ गर्दी झाली. एका तरुणाने आम्हाला सांगितलं की त्यांनी त्यांच्या 13 महिन्याच्या भाचीची विक्री केली. घोर प्रातांच्या एका कबील्याच्या व्यक्तीने तिला खरेदी केलं. त्यांच्या कुटुंबाने आम्हाला सांगितलं की ही मुलगी जेव्हा मोठी होईल तेव्हा तिचं लग्न आमच्या मुलाशी करू.

अफगाणिस्तान, लहान मुलगी

फोटो स्रोत, Sanjay Ganguli/BBC News

फोटो कॅप्शन, सहा महिन्यांच्या या छकुलीची विक्री करण्यात आलीय. ती चालायला लागली की तिला विकत घेणारे येऊन तिला घेऊन जातील

या मुलांच्या भविष्याबाबत कोणीही निश्चित काहीच सांगू शकत नाही.

एका घरात आम्ही 6 महिन्याच्या एका चिमुकल्या मुलीला पाळण्यात झोपलेलं पाहिलं. ती जेव्हा चालायला लागेल तेव्हा तिचा ग्राहक तिला घेऊन जाईल असं आम्हाला समजलं. तिच्या पालकांना आणखी तीन मुलं आहेत. हिरव्या रंगाचे डोळे असलेली छोटी मुलं.

अन्न नसल्याने यांच्या कुटुंबाला कित्येक दिवस उपाशी रहावं लागतं. या मुलीचे वडील कचरा वेचून आपला उदरनिर्वाह भागवतात.

ते म्हणाले, "आता बहुतांश दिवस तर माझी काही कमाई होत नाही. काही कमाई होते तेव्हा आम्ही सहा-सात ब्रेड घेतो आणि तेच आपाआपसात वाटतो. माझ्या मुलीला विकण्याच्या निर्णयाशी माझी पत्नी सहमत नाही. आम्ही अस्वस्थ आहोत. पण मी हतबल आहे. जगण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही."

अफ़ग़ानिस्तान

फोटो स्रोत, Sanjay Ganguli/BBC News

फोटो कॅप्शन, कुटुंबातल्या इतरांचं पोट भरण्यासाठी आईबापांवर मुलं विकण्याची पाळी आलीय.

मी त्यांच्या पत्नीचे डोळे कधीही विसरू शकणार नाही. संताप आणि हतबलता दोन्ही त्यांच्या डोळ्यात दिसत होती. बाळाला विकून जे पैसे मिळतील ते त्यांना जगण्यासाठी मदत करतील, इतर मुलांच्या जेवणाची सोय होईल पण केवळ काही महिन्यांपुरती.

आम्ही तिथून निघत होतो तेवढ्यात आणखी एक महिला आमच्याकडे आली. पैशांकडे बोट दाखवत ती आपल्या मुलांना आमच्याकडे तिथेच सुपूर्द करण्यासाठी तयार होती.

'आम्हाला या परिस्थितीची जाणीवही नव्हती'

इथे एवढी कुटुंबं आपली मुलं विकण्यासाठी हतबल असावीत याची पुसटशीही कल्पना नव्हती. याविषयी उघडपणे चर्चा करणं तर सोडूनच द्या.

आम्हाला जी माहिती मिळाली ती देण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रांची मुलांची संस्था युनिसेफला संपर्क साधला. या कुटुंबांपर्यंत आणि मुलांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं.

अफ़ग़ानिस्तान, महिला

फोटो स्रोत, Sanjay Ganguli/BBC News

फोटो कॅप्शन, कुटुंबाचं पोट भरण्यासाठी यांच्या नवऱ्याने सहा महिन्यांच्या मुलीला विकलं. या आईच्या डोळ्यांत रागही होता आणि हतबलताही.

अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था परदेशी अर्थव्यवहारातून चालते. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर पैशांचे असे स्त्रोत स्थगित केले. याचा अर्थ असा की प्रत्येक खर्च - सरकारी खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, विकास काम सर्व काही ठप्प झालं. यामुळे सर्वांत गरीब स्तरातील लोकांची परिस्थिती बिकट झाली. ऑगस्ट महिन्याच्या आधीही जे कसंबसं जगत होते त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस आव्हानात्मक बनला.

मानवी हक्कांच्या सुरक्षेची खात्री आणि पैसे कुठे खर्च होणार याची पडताळणी केल्याशिवाय तालिबानला पैसे देणं धोकादायक आहे. पण या समस्येवर तोडगा निघत नाही तोपर्यंत अफगाण लोक नाइलाजाने उपासमारीकडे जात आहेत.

आम्ही हेरातमध्ये जे अनुभवलं त्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे, बाहेरील मदतीशिवाय अफगाणिस्तानतले लाखो लोक कडाक्याच्या थंडीत या हिवाळ्याचा सामना करू शकणार नाहीत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)