तालिबानचे आदेश, 'क्लिन शेव्ह आणि दाढी कोरू नका'

तालिबानच्या सत्तेचा काळ

फोटो स्रोत, Getty Images

तालिबाननं अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतातील न्हाव्यांना दाढी, क्लिन शेव्ह करण्यास अथवा त्याहून केस कमी करण्यास बंदी घातली आहे.

तालिबान इस्लाम कायद्याची जी व्याख्या करतं, त्यात अशाप्रकारे केस कापणं चालत नाही. असा प्रकार या कायद्याचं उल्लंघन करतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यास शिक्षा देण्यात येईल, असं तालिबानच्या धार्मिक पोलिसांचं म्हणणं आहे.

राजधानी काबुलच्या न्हाव्यांनाही अशाप्रकारे आदेश मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

या निर्देशांमुळे तालिबानचं कट्टर सरकार पुन्हा परत येत आहे, असं समजलं जात आहे. तालिबाननं मात्र यावेळी आम्ही फार कठोर भूमिका घेणार नाही, असं म्हटलं होतं.

चार जणांना लटकावलं

गेल्या महिन्यात सत्ता हस्तगत केल्यानंतर तालिबाननं विरोधकांना कठोर शिक्षा दिली आहे. शनिवारी बातमी आली होती की, अपहरण केल्याप्रकरणी तालिबाननं चार जणांना ठार केलं आणि त्यांच्या मृतदेहांना हैरात शहरातील चौकात लटकावण्यात आलं.

तालिबानच्या सत्तेचा काळ

फोटो स्रोत, Getty Images

"केस आणि दाढी करताना शरिया कायद्याचं पालन करा," तालिबानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या या सूचनेची नोटीस हेलमंड प्रांतातील सलूनबाहेर लागली आहे.

बीबीसीनं ही नोटीस वाचली आहे. यात लिहिलं आहे की, "कुणालाही तक्रार करण्याचा अधिकार नाहीये."

दुकानांवर येऊन आदेश दिले

काबुलमधल्या एका न्हाव्यानं म्हटलं, "तालिबानचे सैनिक सतत येत आहेत आणि आम्हाला दाढी न करण्याचा आदेश देत आहेत."

"आम्हाला पकडण्यासाठी ते अंडरकव्हर इन्स्पेक्टरही पाठवू शकतात," असं दुसऱ्या एका न्हाव्यानं म्हटलं.

शहरातील एक मोठं सलून चालवणाऱ्या न्हाव्यानं सांगितलं, "आम्हालाही एक फोन आला आणि त्या व्यक्तीनं स्वत:ची ओळख सरकारी अधिकारी अशी सांगितली. अमेरिका स्टाईलचं पालन करणं थांबवा आणि कुणाचीही दाढी करणं थांबवा, असं तो म्हणाला."

1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता असताना पुरुषांना आकर्षित करणारी हेअरस्टाईल ठेवण्यास निर्बंध घातले होते. तसंच पुरुषांच्या दाढी वाढवण्यावर जोर दिला होता.

तालिबान गेल्यानंतर क्लीन शेव्ह ठेवणं ही एक सामान्य बाब झाली होती आणि अनेक अफगाणी माणसं सलूनमध्ये फॅशनेबल पद्धतीनं केस कापण्यासाठी जात होते.

सलूनच्या कमाईवर परिणाम

अनेक न्हाव्यांनी त्यांचं नाव न छापण्याच्या अटीवर मत व्यक्त केलं आहे. नव्या कायद्यांमुळे कमाई करणं अवघड होईल, असं त्यांचं म्हणणं आहे.

एका न्हाव्यानं बीबीसीला सांगितलं, "अनेक वर्षांपासून माझ्या सलूनमध्ये तरुणांची दाढी केली जाते आणि ते जसं म्हणतात तशी दाढी करून दिली जाते. पण, आता हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा काही फायदा नाहीये."

दुसऱ्या एका न्हाव्यानं सांगितलं, "फॅशन सलून आणि न्हाव्याच्या कामावर यावर देशात निर्बंध घातले जात आहेत. गेल्या 15 वर्षांपासून मी हे करत होतो. पण, आता मला नाही वाटत की मी हे चालू ठेवू शकेल."

तालिबानच्या सत्तेचा काळ

फोटो स्रोत, Getty Images

हैरातमधील एका न्हाव्यानं सांगितलं, त्यांना अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस मिळालेली नाहीये. पण त्यांनी स्वत:हून लोकांची दाढी करणं बंद केलं आहे.

"ग्राहक स्वत:च दाढी करत नाहीत. कारण रस्त्यावरील तालिबानच्या फौजांनी आपल्याला निशाणा करू नये, असं त्यांना वाटतं."

केस कापण्याचे दर कमी केल्यानंतरही त्यांचा व्यवसाय थंड पडला आहे.

ते सांगतात, "कुणालाही आता स्टाईल आणि केसांच्या फॅशनची पर्वा नाहीये."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)