You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रागाच्या भरात दिलेल्या धमकीमुळं असं उलगडलं 5 वर्षांपूर्वीच्या दृश्यम स्टाईल हत्येचं 'गूढ'
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
हरवलेला मुलगा परत मिळावा यासाठी ज्या व्यक्तीकडं कुटुंबीय जात होते, त्या व्यक्तीनेच मुलाची हत्या केली, असं समजल्यावर काय होईल?
भिवंडीतील एका कुटुंबावर असाच प्रसंग ओढावला. यातील भयंकर बाब म्हणजे आरोपीने त्या मुलाची हत्या करुन 'दृश्यम' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मृतदेह पुरून वरतून फरशी बसवली.
साधारणतः पाच वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांडाच्या आरोपात आरोपी मौलवी गुलाब उर्फ रब्बानी गुलाम शेख याला अटक झाली असून त्याच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे.
या अटकेनंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. भिवंडी शहर पोलिसांनी सर्व घटनाक्रम उलगडून सांगितला आहे.
आरोपी अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करायचा. ही बाब दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाला माहीत झाली होती आणि तो मौलवीकडून पैसे उकळू लागला होता.
याला कंटाळून आरोपीने 'ब्लॅकमेल' करत असलेल्या मुलाची हत्या केल्याचं तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
20 नोव्हेंबर 2020 रोजी भिवंडीतील नवीबस्ती नेहरूनगर भागातील सलीम (पीडित अल्पवयीन असल्यामुळे त्याचे नाव बदलले आहे) हा 16 वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला.
कुटुंबीयांना यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आणि कुटुंबीयांनी शोधाशोध करुनही सलीम सापडला नाही.
मुलगा सापडावा या आशेनं कुटुंबीयांनी एका मौलवीची मदत घेतली. त्याच भागात राहणारा गुलाब शेख हा मौलवी एका मशिदीत काम करायचा. तसंच त्याचं छोटं दुकानही होतं.
मुलगा लवकरच परत यावा, यासाठी मी देखील प्रार्थना करतो, असा दिलासा मौलवी कुटुंबीयांना द्यायचा. त्याचा सल्ला ऐकून कुटुंबीयांनी कधी बकऱ्याचा बळी दिला, कधी मझारवर चादर चढवली तर कधी तो कधी अजमेर शरीफची यात्रा करण्याचा सल्ला द्यायचा.
हे सर्व करत असताना कुटुंबीयांना जराशीही कल्पना नव्हती की ज्या व्यक्तीकडे आपण श्रद्धेनं जात आहोत, त्याच व्यक्तीने आपल्या मुलाची हत्या केली आहे. तसंच ज्या ठिकाणी तो दुकान चालवतो त्याच ठिकाणी बाजूला असलेल्या गाळ्यात त्यानं आपल्या मुलाला पुरले आहे, असं वाटलंही नाही.
हत्या का केली?
गुलाब शेखच्या दुकानात एक अल्पवयीन मुलगा कामाला होता. त्या मुलासोबत गुलाब शेख अनैसर्गिक कृत्य करत होता.
ही बाब सलीमला समजली. हे कुणालाही कळू नये म्हणून मौलवी सलीमला पैसे देऊ लागला. तसेच दुकानात घेतलेल्या सामानाचे पैसेही सलीम देत नव्हता.
दिवसेंदिवस सलीमच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. एकेदिवशी या गोष्टीला कंटाळून गुलाब शेखने त्याला दुकानावर बोलवले आणि गळा दाबून त्याची हत्या केली.
त्याच्यावर शस्त्राचा वापरही केला. त्यानंतर दुकानाशेजारी असलेल्या गाळ्यात मृताला पुरले आणि पुन्हा वरून फरशी फरशी बसवली.
सात आठ महिन्यांनी मृतदेह वर येऊ लागला तेव्हा गुलाब शेखने कुजलेल्या मृतदेहाचे तुकडे केला. काही भाग फेकून दिला आणि काही भाग पुन्हा गाडला, असे पोलिसांनी सांगितले.
रागाच्या भरात धमकी दिली अन् बिंग फुटलं
गुलाब शेखवर 2023 मध्ये एका अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्याची तक्रार झाली. त्यावेळी सलीमच्या कुटुंबीयांना वाटलं की, या घटनेशी आणि सलीमच्या बेपत्ता होण्याशी काही संबंध असावा.
त्यांच्या कानावरही काही गोष्टी येत होत्या. सलीमची हत्या गुलाबनेच केली आहे, असा कुटुंबीयांचा संशय बळावला आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
हत्येच्या संशयाबाबतचा तपास करण्यासाठी पोलीस येण्याआधीच गुलाब शेखने तिथून पोबारा केला आणि तो उत्तराखंडला गेला. रुरकी या शहरात नाव बदलून एका मशिदीत तो मौलवीचे काम करू लागला.
तिथे त्याचे एका माणसाशी भांडण झाले त्यावेळी गुलाबने त्याला धमकी दिली की 'मी तुझ्यासारखे लोक कापून गाडून टाकले आहेत.'
त्या व्यक्तीने पोलिसांकडं तक्रार केल्यावर पोलिसांनी त्याची पार्श्वभूमी तपासली. यात तो एका गुन्ह्यात भिवंडी पोलिसांना हवा आहे, ही बाब समोर आली.
गुलाब शेखला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने हत्या केल्याची बाब कबूल केली. त्यानंतर तो आधी राहत असलेल्या भिवंडीतील दुकानाची तपासणी करण्यात आली.
त्या ठिकाणी बाजूच्याच गाळ्यात मृतदेहाची हाडे सापडली. ही हाडे पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवण्यात आली आहेत.
सलीमच्या कुटुंबीयांनी मुलाच्या मारेकर्याला फाशी व्हावी अशी मागणी केली आहे.
पीडित मुलाच्या आईने रडत रडत माध्यमांना सांगितले, "माझा मुलगा खूपच निरागस होता. त्याचा इतक्या क्रूरपणे खून करणारा आमच्याच शेजारी राहात होता हे आम्हाला कधीच कळलं नाही. आज तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.