मृतदेहानं भरलेली बॅग ढकलताना सापडले दोन मूकबहिरे, मुंबई पोलिसाच्या मुलानं उलगडलं हत्येचं गूढ

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

(अत्यंत अवघड वाटणाऱ्या गुन्ह्यांची महाराष्ट्रातील पोलिसांनी उकल कशी केली? त्या मागची गोष्ट काय आहे? हे 'गुन्ह्याची गोष्ट' या मालिकेतून बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत आणत आहे.)

आज आपण मुंबई पोलिसाच्या मूकबहिऱ्या मुलानंच एका क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा कसा करून दिला, हे जाणून घेणार आहोत.

मुंबईतील गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात 2024 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये एका बॅगमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

रेल्वे स्थानकात ज्या दोन आरोपींकडे बॅग सापडली, ते दोघेही मुके आणि बहिरे होते. त्यामुळे मुंबई पोलीस गुन्ह्याचा उलगडा करताना अक्षरश: हतबल झाले, तपासात अनेक अडचणी येत होत्या.

अखेरीस मुंबईच्याच पोलिसाच्या मुलानं या प्रकरणाचा गुंता सोडवला.

हे प्रकरण मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालं होतं. पायधुनी पोलीस, दादर लोहमार्ग पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या विविध पथकांनी याचा तपास केला होता. त्याची ही गोष्ट.

अशी होती घटना

तारीख होती 4 ऑगस्ट 2024 , वार रविवार .

वेळ होती रात्रीची, 11 वाजून 50 मिनिटांदरम्यानची.

ठिकाण होतं , दादर रेल्वे स्थानक.

रेल्वे स्थानकात ट्रेन पकडण्यासाठी वर्दळ होती.

दादर जंक्शन असल्यामुळं नेहमीप्रमाणे लोकलबरोबरच एक्सप्रेस गाड्यांची सततची ये-जा होती.

सोमवारी रात्री दादरहून सावंतवाडीला जाणारी तुतारी एक्सप्रेस पकडण्यासाठी फलाट क्रमांक 11 वर प्रवासी वाट पाहत उभे होते.

तुतारी एक्सप्रेस स्थानकात आली आणि प्रवाशांची गाडी पकडण्यासाठी लगबग सुरू झाली.

फलाट क्रमांक 11 वर बोगी क्रमांक पाच ते सहा दरम्यान दोन व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी जात होत्या. या दोघांकडं चाकं असलेली एक बॅग होती. मात्र, ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना या दोघांची प्रचंड दमछाक झाली. वजनामुळे दोघांनाही बॅग रेल्वेत चढवताना चांगलाच घाम फुटला.

त्यावेळी फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे गस्तीवर होते. त्यांना या दोघांच्या हालचाली बघून संशय आला.

त्यांनी या दोघांना थांबवून बॅग उघडायला सांगितली. पण, ते टाळाटाळ करत होते. त्यांच्या हालचालीवरून पोलिसांनी दाट संशय आला तसंच बॅगेची अवस्था बघून पोलिसांनी त्यांना बॅग उघडायला लावली. बॅग उघडल्यानंतर मात्र सर्वांनाच धक्का बसला होता.

बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते. पोलिसांनी लगेचच या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यातला एक पळून गेला, आणि दुसऱ्याला पोलिसांनी पकडलं.

पोलिसांनी या व्यक्तीसह बॅग ताब्यात घेऊन मृतदेह रुग्णालयात पाठवला. आरोपीला पायधुनी पोलीस ठाण्यात नेले. कारण मिळालेल्या कागदपत्रानुसार आरोपी पायधुनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आला होता.

पायधुनी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. पकडलेला व्यक्ती हा बहिरा होता. त्यामुळं सुरुवातीला पोलिसांना त्याच्याकडून काही माहिती मिळवता येईना. पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या.

साईन लँग्वेजची माहिती असलेल्या व्यक्तीचा शोध

तपासात पोलिसांचा गुंता अधिकाधिक वाढत चालला होता. आरोपीकडून काहीच माहिती मिळत नसल्यानं तपासाला खिळ बसली होती.

मग काही तासांनी या हत्येचा गुंता सोडवण्यासाठी पायधुनी पोलीस मूक आणि बहिऱ्या लोकांच्या साईन लॅगवेजची माहिती असलेल्या व्यक्तीचा शोध घेत होते. मध्य रात्र झाली होती , त्यामुळे आता कोण येईल? असा प्रश्न होताच. पण पायधुनी पोलिसांची एक टीम मिळालेल्या माहितीनुसार साइन लँग्वेज असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले होते.

त्यावेळी मध्यरात्री दोन वाजताची वेळ होती दादर पोलीस आरएके किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नाकाबंदी परिसरात पोहोचले. त्यावेळेला आर ए के किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार राजेश सातपुते हे मध्यरात्री एक ते तीन अशा बंदोबस्तासाठी होते.

आर. के. किडवाई मार्ग पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दादर पोलिसांच्या गाडीमध्ये असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना विचारलं कुठे जात आहात ? तर याबाबत दादर पोलिसांनी साधना विद्यालय मूक आणि बहिऱ्या व्यक्तीच्या शोधत आहोत याबाबत सांगितले.

मात्र या वेळेला आता कोणीच मिळणार नाही असे नाकाबंदीत उपस्थित असलेल्या हवालदार राजेश सातपुते यांनी दादर पोलिसांना माहिती दिली. मात्र माझा मुलगा देखील त्या शाळेत होता आणि तो आपल्याला मदत करू शकेल याबाबत पायधुनी पोलीस आणि राजेश सातपुते यांच्यात चर्चा झाली.

यावर पायधूनी पोलिसांनी सातपुते यांना त्वरित मदत करण्याची विनंती केली. रात्री दोन वाजता सातपुते वरिष्ठांच्या सूचनेनुसार घरी जाऊन आपल्या मुलाला कोणत्याही क्षणाचा विलंब न करता , गौरव सातपुतेला घेऊन पायधुनी पोलीस ठाण्यात पोहोचले.

गौरवने संवाद साधून महत्त्वपूर्ण माहिती मिळवली

पोलीस टीमने रात्री २ वाजता गौरवला आरोपीशी संवाद साधण्यासाठी प्रश्नावली दिली. गौरवने सांकेतिक भाषेत जय चावडाशी संवाद साधायला सुरुवात केली. एकेक प्रश्नाचे उत्तर मिळू लागलं, पुढे तासभर संवाद साधून तपासासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. यामुळे पोलिसांना गुन्हा, सहआरोपी आणि कारण याबद्दल सविस्तर माहिती मिळाली.

हवालदार राजेश सातपुते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, मी आणि माझ्या मुलाने एक नागरिक म्हणून कर्तव्य पार पडले. गौरवने साधना विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून, माझगाव डॉक लिमिटेडमधून पाइप फिटरचा कोर्स पूर्ण केला आहे. सध्या तो घरीच असतो. मात्र त्यावेळेला आपल्या पोलिस सहकाऱ्यांना अशाप्रकारे एका गुन्ह्यामध्ये मदत हवी होती त्यामुळे माझ्या मुलाने तात्काळ मदत केली. गौरवच्या प्रयत्नांमुळे पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती मिळू शकली. गौरव मूक आणि बहिरा असला तरी त्याला जे काही काम सांगू ते तो व्यवस्थित करतो. हुशार आहे.

गौरवमुळे चौकशीत काय निष्पन्न झाले?

तपासात शिवजित सिंह असं पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे असं कळलं. तो उल्हासनगर येथे रहात असल्याचं समोर आले. स्थानिक पोलीस आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून दुसरा आरोपी शिवजीत सिंह यांच्या देखील पोलिसांनी मुस्क्या आवळल्या .

सापडलेला मृतदेह अर्शद अली सादिक अली शेख (वय 30) याचा असल्याचे समजले. अर्शद हा सांताक्रुझच्या कलिना परिसरात राहायला होता. अर्शद शेख हा देखील मुका आणि बहिरा होता.

शिवजित सिंग आणि जय चावडा या दोघांनी सादिक अली शेखची हत्या केली असल्याचे चौकशीत त्यांनी कबूल केले.

त्यानंतर दोन्ही आरोपींनी मृतदेहाची कोकणात नेऊन विल्हेवाट लावायची ठरवली होत. त्यासाठी दोघांनी अर्शदचा मृतदेह बॅगेत भरला आणि ते तुतारी एक्स्प्रेसने कोकणात निघाले होते.

मात्र, पोलिसांनी संशय येऊन त्यांनी दोघांना हटकल्याने हा सगळा प्रकार उघडकीला आला असे चौकशीत आरोपींनी कबूल केले.

या हत्येचं गूढ इथेच संपत नाही, पोलीस हवालदार राजेश सातपुते यांचा मुलगा गौरवने आणखी एक धक्कादायक माहिती आरोपींची बोलल्यानंतर दिली होती. ज्यामध्ये दोन्ही आरोपी एका अशा व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य होते. ज्यामध्ये जगातील अनेक देशांमधील अपंग व्यक्ती आहेत.

अर्शदचा खून करण्यासाठी मारेकऱ्यांनी या ग्रुपमधील तीन अपंगांची मदत घेतली होती. हत्या करताना त्या तीन अपंगांशी व्हीडिओ कॉलवर संभाषण करण्यात आलं होतं. त्यात बेल्जियममधील एका अपंगाचाही समावेश आहे याबाबत देखील माहिती आरोपींनी गौरव जवळ दिली.

हत्या का करण्यात आली होती?

सांताक्रुज गुलाल वाडी परिसरात अर्शद शेख हा व्यक्ती राहत होता.अर्शद आणि रुकसाना यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी 2012 मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन मुलंही आहेत. रुकसानासुद्धा मूक आहे.

अर्शद लहानमोठी कामं करून कुटुंबाचा गाडा चालवत होता. एके दिवशी पायधुनी इथं कोट्यवधींच्या घरात राहणाऱ्या जय चावडा आणि शिवजीत याच्याशी त्याची मैत्री झाली होती.

पुढे जय आणि अर्शदची मैत्री अधिक वाढली. घरी ये-जा झाली. त्यात अर्शदची पत्नी रुखसानाचे जय प्रवीण चावडाशी अनैतिक संबंध झाले .

दोघांमध्ये अडसर ठरत असलेल्या अर्शदला मार्गातून हटवण्यासाठी या मग जयने कट रचला होता.

हत्येची योजना काही दिवसांपासून तयार करण्यात येत होती अशी ही कबुली पोलिसांना आरोपींनी दिली.

यासाठी जयने त्याचा मित्र शिवजीतची मदत घेतली.

त्यांनी अर्शदला पार्टीसाठी पायधुनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आपल्या घरी बोलावलं, त्याला दारू पाजवली आणि त्याला जास्त नशा झाल्यावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केली अशी कबुली पोलिसांसमोर आरोपींनी दिली.

याप्रकरणी आरोप पत्र देखील दाखल

या प्रकरणामध्ये पुढे अधिक तपास पोलिसांनी केला , त्यात अर्शदची पत्नी तिच्याबाबत देखील पोलिसांना पुरावे मिळाल्याने, पायधुनी पोलिसांनी रुकसाना शेख हिला देखील अटक केली.

तसेच बेल्जियम मधील एका व्यक्तीवर आरोप असल्याने, त्याला देखील पोलिसांना ताब्यात घ्यायचं होतं. मात्र तिथे जाण शक्य नाही.त्यामुळे तेथील कोर्टात हे प्रकरण चालवावे यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले आहेत.

या प्रकरणामध्ये प्राथमिक तपास हा चार तासांमध्ये पोलिसांनी त्यावेळेला केला होता.मात्र पुढे पोलिसांनी अनेक दिवस तपास केल्यानंतर वापरलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे.

अनेकांचे जबाब नोंदवले, आरोपींची कबुली घेतली आणि ठोस पुराव्यानिशी पुढे, याप्रकरणाची पुढील तपासणी करुन पोलिसांकडून जय प्रवीण चावडा, शिवजित सिंह आणि रुकसाना शेख यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत . या प्रकरणाची लवकरच सुनावणी होईल.

या प्रकरणामध्ये पोलिसांच्या सर्वच टीमने मोठ्या मेहनतीने प्रयत्न करत हत्येचा गुंता सोडवला.

किडवाई पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राजेश सातपुते यांचे आणि त्यांच्या मुलाचे कर्तव्य निष्ठेने पार पाडल्याबद्दल सर्वांनीच कौतुक केले. महत्त्वाचं म्हणजे गौरवच्या मदतीने सुरुवातीपासून दादर रेल्वे स्टेशनवरील खून प्रकरणाचा उलगडा होऊ शकला. याप्रकरणी पुढे अनेक साईन लँग्वेजची एक्सपर्टची देखील मदत घेतली गेली.

या प्रकरणांमध्ये सातपुते यांचे आणि मुलाचे सर्वत्र कौतुक झाले.

यामध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी म्हटलं की,"पोलीस हवालदार राजेश सातपुते यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा मुलगा मूकबधिर आहे. त्याच्या सांकेतिक भाषेमुळे मदत होऊ शकते हा विचार करून त्याची मदत घेतली. रात्री 2 वाजता आपल्या झोपलेल्या मुलाला उठवले, त्याला बोलावून घेऊन त्याच्या सांकेतिक भाषेच्या मदतीने गंभीर गुन्ह्याचा अवघ्या चार तासात उघडकीस आला. हे केवळ गौरवच्या बहुमोल पाठिंब्याने व निस्वार्थी प्रयत्नांनी शक्य झाले. हा प्रसंग कर्तव्याच्या पलीकडचा असून धैर्य व चिकाटीचा प्रभाव अधोरेखित करतो. पोलीस हवालदार राजेश सातपुते व त्यांचा मुलगा गौरव यांनी गुन्हा तपासासाठी जी मदत केली, हे मुंबई पोलिसांच्या अखंड समर्पणाचे उदाहरण आहे"

"आजकाल स्वतःच्या मुलाचे रेप्युटेशन टिकविण्याकरिता पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागू नये म्हणून धडपड करणारे, पुरावे नष्ट करणारे धनाढ्य कुठे अन स्वतःचा मुलगा मूकबधिर असल्याचे स्वतःच सांगून त्याला रात्रीच्या दोन वाजता झोपेतून उठवून पोलिसांच्या कामी आणणारे आमचे पोलीस हवालदार राजेश सातपुते कुठे.सलाम पोलीस हवालदार राजेश सातपुते यांच्या कर्तव्यनिष्ठेला, अन मुलगा गौरव याने दाखवलेल्या संस्काराला सलाम", असे किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर यांनी म्हटलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.