You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'स्वस्तात साहित्य देतो', असं सांगत पुण्यातील व्यावसायिकाची बिहारला बोलवून हत्या; नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील एका व्यावसायिकाला कामानिमित्त बिहारमध्ये बोलवून घेऊन त्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मण साधू शिंदे असं या 55 वर्षीय व्यावसायिकाचं नाव असून गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
आरोपींनी या व्यावसायिकांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 33 वर फेकून दिला होता.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण शिंदे हे पुण्यातील कोथरुडमधील व्यावसायिक असून त्यांची 'रत्नदीप कास्टींग' नावाची मोठी कंपनी आहे.
ही कंपनी मेटलचे प्रोडक्ट तयार करण्याचं काम करते. लक्ष्मण शिंदे यांना 11 एप्रिल रोजी कंपनीच्या कामानिमित्त पाटण्यात बोलावून घेण्यात आलं होतं.
मारेकऱ्यांनी त्यांनी ई मेल करुन बोलावलं होतं. 'कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो', अशा स्वरुपाचा मेल लक्ष्मण शिंदे यांना आला होता.
उद्योगासाठी स्वस्तात मशिनरी मिळेल, या विचाराने शिंदे हे बिहारमधील पाटण्याला गेले होते. पण त्याठिकाणी गेल्यानंतर मात्र त्यांना जीव गमवावा लागला.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या घटनेबाबत माहिती दिली.
"शिंदे यांनी व्हीआयपी व्यक्तीप्रमाणेच एअरपोर्टवरुन पिक-अप करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना नालंदा, बोधगया आणि जेहानाबाद जिल्ह्यामध्ये गाडीमधून फिरवण्यात आलं," असं त्यांनी सांगितलं.
या काळात घरच्यांशी त्यांचा मेसेज आणि फोन कॉल्सवरुन नियमित पद्धतीने संवाद सुरू होता. मात्र, काही काळानंतर त्यांच्याशी संपर्क बंद झाला.
कुटुंबीयांना बराच वेळ काहीही संपर्क होत नसल्यानं त्यांनी पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली.
पाटण्यात सापडला मृतदेह
पोलिसांनी म्हटलं की, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आम्ही दोन दिवस त्यांचा शोध घेत होतो. आमची टीम कुटुंबीयांसहित पाटण्याला गेली होती. पाटण्यातील पोलिसांसोबत समन्वय साधत त्यांचा शोध सुरू होता.
अखेरीस काल बुधवारी (16 एप्रिल) जेहानाबादमध्ये व्यावसायिक लक्ष्मण शिंदे यांचा मृतदेह सापडला. आरोपींनी त्यांच्या अकाऊंटमधून 90 हजार रुपयेही काढून घेतले आहेत. हा अत्यंत गंभीर असा बिझनेस रिलेटेड सायबर ट्रॅपचा प्रकार आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
आरोपींनी अत्यंत बारकाईने नियोजन करुन त्यांना बिहारला बोलवून घेतलं आणि टॉर्चर करत त्यांची हत्या केली आहे. मात्र, त्यांचा खून पैशांसाठीच करण्यात आला की, इतर कोणत्या कारणासाठी, हे अद्यापही समजू शकलेलं नाही.
बिहारमधील पाच संशयित ताब्यात
बिहारच्या स्पेशल टीमने या संदर्भात पाच संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
आरोपींनी व्यावसायिक लक्ष्मण शिंदे यांची हत्या करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 33 वर टाकून दिला होता. हा महामार्ग बिहारमधील जेहानबाद या जिल्ह्यातून जातो.
हत्या झाल्यानंतर बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने पाच संशयितांना जेहानबाद आणि नालंदा या जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी कडून बिहार पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांचा मृतदेह आणण्यासाठी पुणे पोलीस बिहारमध्ये दाखल झाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)