You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सागर कारंडेची 62 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक; 'अशी' झाली होती फसवणूक
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
प्रसिद्ध हास्यकलाकार, लेखक व अभिनेता सागर कारंडे यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.
देशासह राज्यभरात सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या युक्त्या वापरून सोशल प्लॅटफॉर्मवर सायबर ठग लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांचीच फसवणूक करत आहेत.
मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींना सुद्धा याचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक कलाकार सुद्धा ऑनलाइन स्कॅमचे बळी पडले आहेत.
कोण आहे आरोपी?
अक्षय कुमार गोपालन असं या आरोपीचं नाव असून त्याला कांदिवलीतील उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
या फसवणुकीसाठी आरोपीने कमिशनच्या बदल्यात आपलं खात सायबर ठगांना वापरायला दिल्याचा आरोप आहे.
मात्र, सागर कारंडे यांनी माध्यमांशी बोलताना 'तो मी नव्हेच' अशी प्रतिक्रिया दिली होती.
नेमकं काय आहे प्रकरण?
मराठी हास्यकलाकार सागर कारंडे यांनी 31 मार्च 2025 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार सायबर ठगांनी 61 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणाची संपूर्ण माहिती ही पोलिसांनी दिलेली होती.
याप्रकरणी कांदिवली येथे सायबर पोलीस ठाण्यात (उत्तर विभाग) गुन्हा नोंदवण्यात आला होता. 3 अज्ञात व्यक्तींविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस याप्रकरणी विविध पथकांमार्फत तपास करत आहेत.
'तो मी नव्हेच'
गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण आता सर्वांसमोर आलेले आहे. या संदर्भात अभिनेते सागर कारंडे यांच्याशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता संवाद होऊ शकला नाही.
मात्र, काही माध्यमांनी त्यांना या प्रकरणी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तर देणं टाळलं. ते म्हणाले की, "हे सगळं फेक आहे. सागर कारंडे नावाचा एकच माणूस नाहीये. खूप आहेत. सर्च केलं तर खूप दिसतील तुम्हाला. माध्यमांमध्ये जे येतंय, ते त्यांचं काम आहे, ते त्यांना करु देना. आपल्याला काय करायचं आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मात्र, बीबीसी मराठीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अद्याप तरी सागर कारंडे यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
त्यामुळे अनेक चर्चांना सध्या उधाण आले आहे. अधिकृत प्रतिक्रिया आल्यास या बातमीत अपडेट करण्यात येईल.
नक्की घटना कधी समोर आली?
पोलीस एफआयआरमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2025 रोजी अभिनेता सागर कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इन्स्टाग्रामवर लाईकच्या बदल्यात पैशाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली.
विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी कारंडे यांच्या खात्यात काही पैसे देखील पाठवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे उकळून अभिनेत्याची फसवणूक झाली, असं एफआयआरमध्ये नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली असल्याचे कारंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच कारंडे यांनी हेल्पलाइन नंबरवर कॉल करत 5 मार्च 2025 रोजी सायबर पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार केली.
त्यानंतर कारंडे यांच्याकडून 31 मार्च 2024 रोजी याप्रकरणी कांदिवली येथे प्रत्यक्ष जाऊन रीतसर तक्रार देण्यात आली.
हे प्रकरण नक्की घडलं कसं?
कलाकार सागर कारंडे यांनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार कारंडे यांना 23 फेब्रुवारी 2025 रोजी एका अनोळखी नंबर वरून मेसेज आला. ज्यात एका महिलेने इंस्टाग्राम पोस्ट लाईक केल्यावर 150 रुपये मिळतील असे सांगितले.
त्यामुळे कारंडे यांनी सहज फोटो लाईक करून त्याचा स्क्रीनशॉट संबंधितांना पाठवला. त्यानंतर समोरील व्यक्तीकडून टेलिग्रामवर एका व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी कारंडे यांना सांगण्यात आले.
कारंडे यांनी त्यानुसार स्क्रीनशॉट आणि बँकेची माहिती समोरील टेलिग्राम अकाउंटवर पाठवली. त्यानुसार काही वेळात कारंडे यांना समोरून फोटो लाईक केल्यानुसार पैसे पाठवण्यात आले. त्यामुळे कारंडे प्रभावित झाले.
यानंतर पुढील टास्कसाठी कारंडे यांना एका टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यात आले. त्यामध्ये नवीन टास्क कारंडे यांना देण्यात आला, तोही टास्क कारंडे यांनी पूर्ण केल्यानंतर दहा वेळा 11000 रुपये त्यांना देण्यात आले. पुढे कारंडे यांचा या टास्कवर विश्वास बसला.
पुढे मात्र हे काम सुरू ठेवण्यासाठी पैसे गुंतवावे लागतील. त्याचे अतिरिक्त 30 टक्के कमिशन आणि लाइक केल्याचा वेगळा मोबदला वॉलेटवर जमा होईल, असे सांगण्यात आले.
त्यानुसार कारंडे यांनी सुरुवातीला काही रक्कम भरली. याबद्दल कमिशन व मोबदला सायबर गुन्हेगारांनी उघडलेल्या वॉलेटवरून दिले आणि ते त्यानुसार अकाउंटवर दिसत देखील होते. सुरुवातीला सागरने 27 लाख रुपांयांची गुंतवणूक विविध खात्यांतून केली. त्यानुसार परतावा देखील वॉलेटमध्ये दाखवला गेला.
तेच वॉलेटमधील पैसे कारंडे यांनी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील असे समोरून सांगण्यात आले. त्यानंतर कारंडे यांच्याकडून आणखी 19 लाख रुपये व त्यावर 30 टक्के कर, असे एकूण 61 लाख 83 हजार रुपये भरून घेतले.
मात्र 30 टक्के कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगण्यात आले आणि पैसे पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. तेव्हा कारंडे यांच्या मनात शंका आली. हे सर्व प्रकरण 23 फेब्रुवारीपासून सुरू झाले ते 4 मार्चपर्यंत सुरू होते, अशी माहिती एफआयआरमध्ये नोंद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मार्चला फसवणुकीबद्दल शंका आल्यामुळे कारंडे यांनी 5 मार्चला ऑनलाइन सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 31 मार्चला कांदिवली येथे प्रत्यक्ष जाऊन कारंडे यांनी तक्रार केली आणि हे प्रकरण समोर आले.
सायबर पोलीस घेत आहेत आरोपीचा शोध
याप्रकरणी कांदिवली येथे सायबर पोलीस ठाण्यात (उत्तर विभाग) तक्रार दाखल केल्यानंतर मीना सकपाळ, अगरवाल आणि प्रसन्ना ट्यूटर नामक अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66 सी, 66 डी, भारतीय न्याय संहिता 2023 –318(4), 319( 2), 336(2), 336(3), 338,340(2) आणि 68(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पोलिसांच्या विविध टीम वेगवेगळ्या अँगल्सने तपास करत आहेत, अशी पोलिसांनी माहिती दिली होती. एक टीम परराज्यात जाऊन आर्थिक व्यवहार झाला होता तिथे चौकशी करत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर दिली होती.
अशा सायबर फ्रॉडची मोडस ऑपरेंडी काय असते?
एक व्यक्ती व्हॉट्सॲपवरून तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. ती व्यक्ती तुम्हाला सांगते की ती एका डिजिटल मार्केटिंग कंपनीची प्रतिनिधी आहे आणि तुमच्यासाठी त्याच्याकडे एक ऑफर आहे.
ती ऑफर अशी की, सध्या तुम्ही एखादी नोकरी शोधत असाल किंवा नोकरी करता करता साईड इन्कम कमावण्याची संधी तुम्हाला आहे.
तुम्ही त्याच्या पहिल्या मेसेजला रिप्लाय केला नाही, तरीही ती व्यक्ती एकामागोमाग एक मेसेज तुम्हाला पाठवत राहील. ती व्यक्ती तुम्हाला सांगेल की, त्याच्याकडे युट्यूबवर छोटी छोटी कामं करून पैसे मिळवण्याची एक संधी आहे किंवा इतर सोशल प्लॅटफॉर्मसवर लाईक शेअर करून तुम्हाला किमान 50 ते 200 रुपये मिळतील.
एक उत्तम हास्य अभिनेता म्हणून परिचित
सागर कारंडे हे मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक आहेत. 1 जानेवारी 1980 मध्ये कारंडे यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्याचं शिक्षण नाशिक येथेच झाले.
कॉलेज जीवनापासूनच एकांकिकेच्या माध्यमातून ते अभिनय क्षेत्राकडे वळले. पुढे एका कंपनीत काम करत असताना ते छोटे-मोठे नाटक करत होते.
पुढे टीव्ही मराठीवरील 'कॉमेडी एक्सप्रेस' आणि 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' यासारख्या मराठी कॉमेडी शोमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका खूपच गाजल्या.
यानंतर त्यांनी झी मराठीवरील 'फु बाई फु' या कॉमेडी शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 'फू बाई फू' या कार्यक्रमात त्यांनी अभिनेता भारत गणेशपुरे बरोबर केलेले विविध विनोदी सादरीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या कार्यक्रमातील आठव्या पर्वात ही जोडी विजेती ठरली होती.
यानंतर 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात त्यांनी विविध विनोदी भूमिका सादर केल्या आहेत. विशेषतः पोस्टमन म्हणून त्यांनी केलेले विविध भागातील पत्र वाचन हृदयस्पर्शी ठरले. सागर कारंडे यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सायबर फसवणुकीपासून सावधान
अलीकडच्या काळात ऑनलाइन स्कॅम, फसवणुकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया लिंक्स, बनावट कॉल यामार्फत फसवणूक करून नागरिकांकडून पैसे उकळले जातात. त्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून राज्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाकडून सोशल मीडियावर कोणत्याही आमिषाला आणि फसवणुकीला बळी पडू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.
कोणत्याही फसव्या लिंकवर किंवा कॉलवर विश्वास ठेवू नये. सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी. सायबर गुन्ह्यांचा आवाका वाढत आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगावी.
सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आपली माहिती कोणालाही देऊ नये किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर शेअर करू नये. डेबिट आणि क्रेडिट कार्डचा तपशील 'डार्कवेब'वर विक्रीसाठी उपलब्ध नसेल याची खात्री करावी.
ऑनलाइन व्यवहार करताना योग्य संरक्षणाची काळजी घ्यावी. तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)